किफायतशीर टोमॅटो लागवड | पुढारी

किफायतशीर टोमॅटो लागवड

टोमॅटो हे बारमाही मागणी असणारे आणि चांगले उत्पन्‍न मिळवून देणारे पीक आहे. घरगुती तसेच हॉटेल व्यावसात टोमॅटोचा वापर सतत होत असतो. टोमॅटोचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेही त्याला चांगली मागणी असते. टोमॅटोपासून अनेक प्रक्रियायुक्‍त पदार्थ तयार केले जातात. या सार्‍या बाबी लक्षात घेता टोमॅटोची लागवड किती फायदेशीर ठरणारी आहे याची कल्पना येते.

नाशिक, पुणे, सातारा, अहमनगर, नागपूर, सांगली हे महाराष्ट्रात टोमॅटो पिकवणारे महत्त्वाचे जिल्हे आहेत. खरीप, रबी, उन्हाळी, तिन्ही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येते. टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी, परंतु उत्तम निचरा होणारी जमीन लागवडीयोग्य असते. पीक फुलावर असताना आणि फळांची वाढ होत असताना नियमित पाणी पुरवठा होणे महत्त्वाचे आहे. आधार दिल्यामुळे झाडांची आणि फांद्याची वाढ चांगली होते. फळे भरपूर लागतात. पुसा रूबी फळे मध्यम चपट्या आकाराची, गर्द लाल रंगाची असतात. पुसा गौरव या जातीची फळे लांबट गोल, पिकल्यावर पिवळसर लाल रंगाची होतात. पुसा शीतल हिवाळी हंगामासाठी लागवडीस योग्य जात असून फळे चपटी गोल, लाल रंगाची असतात. रोमा झाडे लहान आणि झुडपाळ असून फळे आकाराने लांबट आणि जाड साल असल्याने वाहतुकीस योग्य आहे.

या पिकावर करपा हा रोग झाडाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो. भुरी रोगामध्ये पानाच्या खालच्या बाजूस पांढरे चट्टे पडतात आणि पानाचा वरचा भाग फिकट पिवळसर होतो. फळे पोखरणारी अळी पाने खाते आणि नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरून आत शिरते आणि सर्व गर खाऊन टाकते. टोमॅटो फळांची हिरवी पक्‍व अवस्था, गुलाबी अवस्था आणि पूर्व पक्‍व अवस्था अशा अवस्थांमध्ये काढणी करावी. – रियाज इनामदार

Back to top button