मोसंबीची लागवड करताय? | पुढारी

मोसंबीची लागवड करताय?

आपल्या राज्यात मोसंबीचे उत्पादन चांगले येऊ शकते. मात्र या पिकाची निगराणी फार जागरूकपणे करावी लागते. अगदी पूर्वमशागत करण्यापासून खतांचा वापर करण्यापर्यंत अनेक बाबतीत या पिकाची काळजी घ्यावी लागते.
हवामानाच्या द‍ृष्टीने महाराष्ट्रात मोसंबीच्या लागवडीस चांगला वाव आहे. कमी पावसाच्या कोरड्या हवामानात मोसंबीची लागवड उत्तम प्रकारे होऊ शकते. कोरड्या हवामानात मोसंबीची झाडे चांगली वाढतात आणि अशा ठिकाणी फळांचा दर्जा चांगला असतो. ज्या ठिकाणचे तापमान 12 से.ग्रे. पेक्षा खाली जात नाही आणि 35 पेक्षा जास्त जात नाही, अशा ठिकाणी या फळझाडाची वाढ चांगली होते आणि फळे उत्तम पोसली जातात. जमीन लागवडीस मध्यम काळी सर्वसाधारणपणे 60 सें.मी. खोलीपर्यंत भुसभुशीत माती असलेली चुनखडी विरहित आणि पाण्याचा अत्यंत निचरा होणारी जमीन निवडावी. चोपण आणि जास्त दिवस ओलावा धरून ठेवणारी अतिशय काळी जमीन, पृष्ठभागाखाली जवळच कठीण खडकाचा तसेच चुनखडीचा थर असलेल्या जमिनीत मोसंबीची लागवड अजिबात करू नये. जमिनीचा सामू (आम्ल-विम्ल निर्देशक) 6 ते 8 च्या दरम्यान आणि क्षारांचे प्रमाण 0.1 टक्क्यापेक्षा कमी पाहिजे. उपलब्ध चुन्याचे प्रमाण 5 टक्क्यापेक्षा जास्त असू नये. लागवडीपूर्वी जमिनीची खोलवर उभी-आडवी नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या देऊन हरळी, लव्हाळा इत्यादी तणांचा पूर्णपणे नायनाट करावा. कलमांची निवड करताना ती शास्त्रोक्‍त पद्धतीने तयार केलेली निरोगी जातिवंत आणि जोमदार वाढणारी जंबेरी किंवा रंगपूर लिंबू या खुंटावर डोळे भरलेली असावीत. मोसंबीची कलमे कृषी विद्यापीठे आणि शासकीय रोपवाटिका येथूनच घेणे अधिक सोयीस्कर आहे. ही कलमे शासनामार्फत रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग विकास योजनेअंतर्गत पुरवली जातात. न्यूसिलर मोसंबीच्या जंबेरी किंवा रंगपूर लाईम या खुंटावर भरलेल्या डोळ्यांपासून केलेल्या कलमांची लागवडीसाठी निवड करावी. या पिकाच्या लागवडीसाठी 606060 सें. मी. आकाराचे खड्डेे 66 मीटर चौरस घ्यावेत. लागवडीपूर्वी एक महिना अगोदर खड्डे खोदावेत. हे खड्डे 25 किलो, चांगले कुजलेले शेणखत अधिक 2 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट इधक 100 ग्रॅम, 10 टक्के क्लोरडेन/ऑल्ड्रिन पावडर आणि जमिनीच्या पृष्ठभागावरील चांगली माती अथवा गाळाची माती यांच्या केलेल्या मिश्रणाने भरून घ्यावेत.
निवड केलेल्या कलमांची मान्सूनचा 3-4 वेळा पाऊस पडून गेल्यानंतर आणि जमिनीत खोलवर योग्य अशी ओल निर्माण झाल्यावर शेतात लागवड करावी. शेतामध्ये लागवड करीत असताना उपरोक्‍त कलमांची उंची पन्हेरीत ज्या उंचीवर डोळा भरलेला आहे, तीच उंची ठेवावी. कलमांची मुख्यत्वे करून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी कमीत कमी 2 तास आकाश ढगाळलेले असताना आणि खड्ड्यात पुरेशी ओल असताना लागवड करावी. यामुळे दुसर्‍या दिवशी ते झाड सूर्यकिरणांना प्रतिकार करण्याइतपत जमिनीमध्ये स्थिर होते आणि कलमे शॉक खाऊन मरण्याचे प्रमाण अतिशय कमी राहते. अशा कमी खर्चिक पद्धतीचा अवलंब केल्यास शेतात कलमे मरण्याचे प्रमाण कमी राहते. कलमे लावल्यानंतर त्यांच्या बुडाभोवतालची माती धक्‍का न पोहोचता पायाने चांगली दाबावी. कलमे लावताना कलमांवर भरलेला डोळा हा जमिनीत गाडला जाणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. कलम लावल्यानंतर अर्धा ते पाऊण मीटर व्यासाचे छोटेसे आळे तयार करावे आणि बोटभर जाडीच्या पाऊण मीटर लांबीच्या काठीचा आधार द्यावा. कलमे लावल्यानंतर कलमांना अंदाजे 1 लिटर पाणी देणे योग्य राहील.
– श्रीकांत देवळे

Back to top button