सूर्यफुलाची पेरणी कशी करावी? | पुढारी

सूर्यफुलाची पेरणी कशी करावी?

सूर्यफुल हे एक बहुगुणी, कमी कालावधीत येणारे, कोणत्याही हंगामात घेता येणारे, कमी पाण्यात तयार होणारे असे अत्यंत उपयुक्‍त पीक आहे. या पिकाचे रब्बी हंगामात अपेक्षित उत्पादन मिळवायचे असल्यास खालील बाबींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते.

पेरणी ः रब्बी हंगामासाठी सूर्यफुलाची पेरणी ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा ते नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा या दरम्यान करावी. मध्यम ते खोल जमिनीत 45 बाय 15 से. मी., भारी जमिनीत 60 बाय 30 से. मी. आणि जास्त कालावधीच्या वाणांची लागवड 60 बाय 30 से. मी. अंतरावर करावी. कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बियाणे 5 से. मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी. पेरणीसाठी सुधारित वाणाचे 8-10 किलो बियाणे आणि संकरित वाणाचे 5 ते 6 किलो बियाणे प्रती हेक्टरी वापरावे.

बीजप्रक्रिया ः मर रोगाच्या प्रतिबंधासाठी 2 ते 2.5 ग्रॅम थायरम किंवा ब्रासिकॉल प्रती किलो बियाण्यास चोळावे. केवडा रोग टाळण्यासाठी 6 ग्रॅम अ‍ॅप्रीन 35 एस. डी. प्रती किलो बियाण्यास चोळावे. तसेच विषाणूजन्य (नॅक्रॉसिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड 70 डब्ल्यू. ए. गाऊचा 5 ग्रॅम प्रती किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर अ‍ॅझोटोबॅक्टर हे जिवाणू खत 25 ग्रॅम प्रती किलो बियाण्यास पेरणीपूर्व लावावे.

– सतीश जाधव

Back to top button