यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार  | पुढारी

यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशात यंदाच्या वर्षी सरासरीच्या (लाँग पिरिअड अ‍ॅव्हरेज) 96 टक्के (4 टक्के कमी) पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला. या अंदाजात 5 टक्के अधिक किंवा कमी असा फरक पडू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे.

जून ते सप्टेंबर हे चार महिने नैऋत्य मोसमी पावसाचे  म्हणून ओळखले जातात. दरम्यान, हवामान विभागाने सोमवारी (दि. 15) आपला पहिला-वहिला अंदाज वर्तविला. या अंदाजानुसार सरासरीएवढ्या पावसाची शक्यता 39 टक्के एवढी आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हवामान विभागाकडून दुसरा अंदाज वर्तविला जाणार असून तो अधिक अचूक असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, 2014 व 2015 ही वर्षे एल निनोची वर्षे होती. या दोन्ही वर्षांत दुष्काळी परिस्थिती उद्भवली होती. 2016 मध्ये देशात सरासरीएवढ्या पावसाची नोंद झाली. 2017 मध्ये देशात सरासरीच्या 91 टक्के (9 टक्के कमी) पाऊस पडल्याने ते वर्षही मान्सूनकरिता चांगले नव्हते.

गतवर्षी 2018 मध्ये सलग दुसर्‍या वर्षी वरूणराजा रुसला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी तो दमदारपणे बरसतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, एल-निनोचा प्रतिकूल परिणाम मान्सूनवर होणार नसून सप्टेंबरपर्यंत एल निनोची परिस्थिती संपुष्टात येईल, असे हवामान विभागाने नमूद केले आहे. 

मान्सूनच्या 5 श्रेणी खालीलप्रमाणे 

टक्केवारी                              पावसाची श्रेणी

90 टक्के                            सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस

90 ते 96 टक्के                      सामान्यपेक्षा कमी

96 ते 104 टक्के                       सामान्य पाऊस

104 ते 110 टक्के                     सरासरीपेक्षा अधिक पाऊस

110 टक्क्यापेक्षा जास्त                 अतिरिक्त पाऊस

 

पुण्यासह राज्याच्या मान्सूनच्या अंदाजाबाबत आताच सांगणे धाडसाचे ठरेल. राज्याच्या कोणत्या भागात किती पाऊस पडेल याबाबत जूनमध्येच अधिक अचूक अंदाज वर्तविला जाईल. देशापेक्षा राज्य लहान असून एवढ्या लहान भागाचा अंदाज आताच वर्तविता येणे कठीण आहे. 


ए. के. श्रीवास्तव, प्रमुख, हवामान निरीक्षण आणि विश्‍लेषण गट, आयएमडी, 


 

Back to top button