हरभरा पीक आणि तण | पुढारी

हरभरा पीक आणि तण

तण हे हरभर्‍याच्या झाडाशी अन्नद्रव्ये व पाणी याकरिता स्पर्धा करते. तणांचा वाढीचा दर पिकापेक्षा जास्त असल्यामुळे अन्नद्रव्ये व पाण्याचा वापर ते जास्त क्षमतेने करतात. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्य व पाण्याची कमतरता मिळते. परिणामी हरभर्‍याच्या झाडाची वाढ कमी होऊन

उत्पादनात घट येते. तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास 50 ते 70 टक्क्यापर्यंत घट येऊ शकते म्हणून या पिकाच्या बाबतीत पीक 40 ते 85 दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. 45 दिवसांनंतर पिकांची वाढ झपाट्याने होऊन जमीन झाकली जात असल्यामुळे तणे जोमाने वाढू शकत नाहीत. त्याकरिता पीक 20-25 दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि 30-35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी.

कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत हवा खेळणी राहते आणि त्यायोगे पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळींतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या आवश्य द्याव्यात. मजुरांअभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास फ्ल्युक्लोरॅलिन किंव पॅडिमिथिलिन हे तणनाशक 2.5 ते 3 लीटर प्रती हेक्टरला 500 ते 700 लिटर पाण्यातून पेरणी करताना फवारावेत.

तसेच हरभरा पीक फुलोर्‍यात असताना 2 टक्के युरियाची फवारणी करावी. यासाठी 200 ग्रॅम युरिया 10 लिटर पाण्यात घ्यावा. त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी. यामुळे पीक उत्पादन वाढते.
– अनिल विद्याधर

Back to top button