व्यवस्थापन लिंबू किडीचे | पुढारी

व्यवस्थापन लिंबू किडीचे

सध्या लिंबू पिकाला फार मागणी आहे. लिंबाचे बहार तीनही हंगामात घेता येत असले तरी हस्त बहारातील फळेच शेतकर्‍यांना आर्थिक फायदा मिळवून देतात. लिंबू फळांचे दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून वेळीच किडींचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. हस्त बहारातील लिंबाच्या कीड व्यवस्थापनाच्या द़ृष्टीने सप्टेंबर-जानेवारी हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे.

लिंबावर नवीन पालवी आणि बहार फुटण्यास सुरुवात होताच वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. किडींच्या प्रादुर्भावामुळे फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन उत्पादन कमी मिळते. कमी प्रतीच्या फळांना बाजारभाव कमी मिळतो. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. यासाठी किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे वेळीच ओळखून कीड व्यवस्थापनाची उपाययोजना केल्यास चांगल्या उत्पादनाबरोबरच चांगला बाजारभाव मिळणे शक्य होते. लिंबावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. ते लक्षात घेऊन उपाययोजना केल्यास चांगला बहार मिळू शकतो.

काळी-पांढरी माशी (कोळशी) ही अशाच प्रकारची कीड आहे. काळी माशी आणि पिल्ले कोवळ्या पानांतील रस शोषण करतात. काळ्या माशीची पिल्ले आपल्या शरीरातून गोड चिकट स्राव बाहेर टाकतात. हा चिकट स्राव खालच्या पानांच्या पृष्ठभागावर पडतो आणि त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. यालाच कोळशी असे म्हणतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पूर्ण झाडच फळांसह काळे होते. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत अडथळा निर्माण होऊन झाड अशक्त होते.

झाडांवर काळ्या माशीच्या पिल्लांची प्रथमावस्था दिसताच अ‍ॅसिफेट 12.5 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 5 मिली किंवा डायमेथोएट 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हस्त बहारामध्ये काळ्या माशीच्या व्यवस्थापनाकरिता डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात फवारणी करावी. परिणामकारक कीड नियंत्रणासाठी पहिल्या फवारणी नंतर दुसरी फवारणी 15 दिवसांनी करावी; मात्र प्रत्येक वेळी कीटकनाशक बदलून वापरावे. म्हणजेच लागोपाठ एकाच कीटकनाशकाचा वापर करू नये.

झाडांवर नवीन पालवी फुटायला लागताच सायट्रस सिला या किडीचा प्रादुर्भाव सुरू होतो. नवीन पानांवर आणि फुलांवर भुरकट रंगाची पिल्ले आणि करड्या रंगाचे प्रौढ पानाखाली ओळीने बसून रस शोषण करतात. त्यामुळे नवती करपून पानांची आणि फुलांची गळ होते. कळीचे फळात रूपांतर न होता कळ्या गळून पडतात आणि फळधारणा कमी होते.

नवतीवर किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी अ‍ॅसिफेट 10 ग्रॅम, डायमेथोएट 15 मिली, क्विनालफॉस 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 10-15 दिवसांनी करावी.

मावा कीड नवीन आणि कोवळ्या पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पाने वाकडी होतात. झाडाची वाढ मंदावते. या किडीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर-फेब्रुवारी या कालावधीत जास्त आढळतो.

मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच डायमेथोएट 7.5 मिली किंवा क्विनॉलफॉल 7.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास गरजेनुसार दुसरी फवारणी 10-15 दिवसांनंतर करावी.

पाने पोखरणारीअळी नागमोडी पद्धतीने पाने पोखरते. त्यामुळे पानांवर पांढर्‍या चमकदार नागमोडी रेषा दिसतात. पाने पिवळी पडून गळून पडतात. नवीन पालवीवर या अळीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामुळे शेंडेमर होते. ही अळी कॅकर रोग पसरवण्यास मदत करते. पाने खाणार्‍या अळीमध्ये फुलपाखरू पिवळ्या रंगाचे असून पंखावर काळे ठिपके असतात. अळी लहान असताना चिमणीच्या विष्ठेसारखी दिसते. मोठी अळी हिरव्या रंगाची असून तिच्या डोक्यावर दोन शिंगे असतात. अळ्या संत्र्याची पाने खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास फक्त शिराच शिल्लक राहतात. रोपवाटिकेत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. अळीच्या विविध अवस्था हाताने वेचून नष्ट कराव्यात. अळीच्या नियंत्रणाकरीता फेनवलरेट 10 मिली किंवा अ‍ॅसिफेट 12.5 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 मिली अथवा थायोडिकार्ब 10 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. अशा प्रकारे किडींचे व्यवस्थापन केल्यास लिंबाचा चांगला बहार मिळण्यास मदत होते.
– योगेश देसाई

Back to top button