पीकपाणी : हमखास उत्पन्नाचा सुवासिक पर्याय | पुढारी

पीकपाणी : हमखास उत्पन्नाचा सुवासिक पर्याय

शेतीसाठी बहुतांश शेतकरी नगदी पिकांकडे वळत असले, तरी या प्रवाहाबाहेर जात वेगळी वाट धरून शाश्वत उत्पन्नाचे मार्ग चोखाळणारेही अनेक शेतकरी अवतीभवती दिसतात. अलीकडील काळात विशेषतः कोरोना महामारीचा प्रसार सुरू झाल्यानंतर वनौषधींच्या शेतीकडे अनेक शेतकरी वळताना दिसत आहेत. याखेरीज दुसरा प्रवाह म्हणजे फूलशेतीचा. सुगंधी फुलांना वर्षभर मागणी असते. सणवार, उत्सव, सोहळे, कार्यक्रम हे फुलांशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. आज सजावटीच्या क्षेत्रात असंख्य आधुनिक पर्याय उपलब्ध झाले असले, तरी फुलांच्या सजावटीची सर त्यांना नाही. त्यामुळे फुलांना असणारी मागणी ही फारशी कधी घटताना दिसत नाही. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील फूलशेती करणार्‍या अनेक शेतकर्‍यांनी निर्यातीची कास धरून चांगले उत्पन्न मिळवल्याची उदाहरणे आहेत. ग्लॅडिओला, निशिगंध यासारख्या फुलांची शेती यामध्ये अधिक प्रमाणात आढळते. याखेरीज फुलांमध्ये सुवासाबाबत नेहमीच सरस राहिलेल्या मोगर्‍याच्या शेतीचा पर्यायही अनेक शेतकर्‍यांनी अवलंबला आहे.

मोगर्‍याची शेती हा फूलशेतीत शेतकर्‍यांना चांगला पर्याय ठरू शकेल. ही बाग एकदा केली की, सलग 10 वर्षे उत्पादन घेता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते. दुसरी जमेची बाजू म्हणजे, जनावरांकडून मोगर्‍याला धास्ती नसते. यात शाश्वत उत्पन्न मिळत असून, बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे हमीभावही चांगला मिळतो. ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास शेतकर्‍यांसाठी मोगर्‍याची शेती अधिक किफायतशीर ठरते. मोगर्‍याची झाडे सलग 10 वर्षेे फुले देत असल्याने ठिबक सिंचनाचा खर्च पहिल्याच वर्षी वसूल होतो. तसेच रोपे लागवडीसाठी जमीन मशागत व रोपांचा खर्चही पहिल्याच वर्षी करावा लागतो.

या शेतीसाठी मूरमाड व पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. नोव्हेंबर-डिसेंबर किंवा जून-जुलै महिन्यांमध्ये या फूलशेतीची लागवड केली जाते. एक एकर जागेमध्ये ही शेती करावयाची झाल्यास साधारणतः 4,500 रोपे लागतात. दोन रोपांतील अंतर 2 फूट ठेवावे लागते. 2 वाफ्यांतील अंतर 5 फुटांचे असते. मोगर्‍याच्या शेतीसाठी जमीन मशागत करताना एक एकरसाठी 8 टन शेणखत, 200 किलो एसएसपी खत, 200 किलो निम पेंडल व 125 किलो करंज पेंडल खत घालावे. तसेच 300 किलो सुफला खत द्यावे. पहिल्या वर्षी उत्पादन मिळत नाही. साधारणत:, दीड वर्षापासून उत्पादनाला सुरुवात होते.

मोगर्‍याच्या फुलांची तोडणी सकाळी 7.30 ते 10.30 पर्यंत करायची असते. त्यानंतर फुलांचे पॅकिंग करून बाजारात पाठवावी लागतात. एका एकरमध्ये दररोज मोगरा फुलाच्या किमान 25 किलो कळ्या मिळतात. लागवड केल्यानंतर जानेवारीमध्ये छाटणी करावी लागते. आठ महिन्यांत सरासरी सहा टन उत्पादन मिळते, असे शेतकरी सांगतात. मोगरा एक सुगंधित फूल आहे. मोगर्‍याच्या उगमाचा विचार केला, तर हे भारतीय झाड असून, भारतामधून त्याचा विस्तार इतर देशांमध्ये झाला. वेलीसारखे असणारे मोगर्‍याच्या झाडाचे कालांतराने झुडपांमध्ये विस्तार होतो. मोगर्‍यापासून सुवासिक अत्तर बनवले जाते. मोगर्‍यापासून विविध प्रकारचे तेलही बनवले जातात. याचा उपयोग अनेक प्रकारचे शाम्पू, साबणात केला जातो. मोगर्‍याचे झाड साधारणतः 10 ते 15 फूट वाढते. मोगर्‍याची फुले ही बराच काळ टवटवीत राहतात. मोगर्‍याचा उपयोग औषधी गोष्टीसाठीही होत असतो.

मदन मान, बेला, मोतिया अशा मोगर्‍याच्या प्रजाती आहेत. मोतिया ही प्रजात सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. मोतिया या जातीच्या मोगर्‍याची कळी गोलाकार असते आणि फुलात दुहेरी पाकळ्या असतात. बेला या जातीच्या मोगर्‍याच्या फुलालाही दुहेरी पाकळ्या असतात; परंतु त्या जास्त लांब नसतात. हजर बेला या जातीच्या मोगर्‍याला एकेरी पाकळ्या असतात. शेतकरी मोगरा या प्रकारच्या मोगर्‍याला चांगल्या प्रतीच्या पाकळ्या येत असून, हार व गजरे याकरिता वापरला जातो. बटमोगरा जातीच्या कळ्या आखूड असून, कळ्या चांगल्या टणक फुगतात. विशेष म्हणजे, मोगर्‍याला बिया नसतात. मोगर्‍याची वाढलेली लांब फांदी वाकवून ती दुसर्‍या ठिकाणी पुरतात व नवीन रोपे तयार करतात किंवा नवीन पाने ज्या ठिकाणी येतात तो भाग तोडून मातीत पुरल्यावर त्याच्या नोडपासून खाली मुळे फुटतात. अशाप्रकारे मोगर्‍याचे रोप तयार होते. मोगरा पिकाला जास्त थंडी चालत नाही. अगदी स्वच्छ वातावरणात मोगरा चांगला येतो. तसेच मोगर्‍याची चांगली वाढ होण्यास 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान योग्य ठरते. मोगर्‍याला असणार्‍या मागणीचा विचार करता या पिकासाठी बाजारपेठ शोधताना फारसे श्रम घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे वेगळ्या वाटेने जाण्याची तयारी असणार्‍या शेतकर्‍यांसाठी मोगरा हा एक उत्तम पर्याय ठरतो.

मोगर्‍याची शेती हा फूलशेतीत शेतकर्‍यांना चांगला पर्याय ठरू शकेल. ही बाग एकदा केली की, सलग 10 वर्षे उत्पादन घेता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते. दुसरी जमेची बाजू म्हणजे, जनावरांकडून मोगर्‍याला धास्ती नसते. यात शाश्वत उत्पन्न मिळत असून, बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे हमीभावही चांगला मिळतो.
– विलास कदम

Back to top button