कृषितंत्र : तंत्र भेंडी काढणीचे | पुढारी

कृषितंत्र : तंत्र भेंडी काढणीचे

भेंडीची लागवड प्रामुख्याने खरीप आणि उन्हाळी हंगामात केली जाते. खरीप हंगामात बियांची पेरणी जून ते जुलै महिन्यात करावी. तर उन्हाळी हंगामातील पेरणी 15 जानेवारी आणि 15 फेबु्रवारी या कालावधीत करावी.

बाजाराच्या द़ृष्टीने उत्तम प्रतीची भेंडी मिळविण्याकरिता दोन ते तीन दिवसांनी भेंडीची तोडणी करावी. यापेक्षा तोडणीस उशीर केल्यास फळे खाण्यास निरुपयोगी ठरतात. साधारणपणे एका पिकापासून भेंडीच्या सरासरी 15 ते 16 तोडण्या करता येतात. भेंडीची फळे सकाळी तोडावीत. कारण फळाची लांबी रात्रीच जास्त वाढते. फळे सकाळी तोडण्याचे आणखी फायदे म्हणजे फळांचा ताजेपणा, रंग आणि तजेला जास्त काळ टिकून राहतो. तोडणीनंतर फळे सावलीत आणावीत. फळांची तोडणी उशिरा केल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

भेंडीची फळे काळजीपूर्वक हाताळावीत. कारण दबल्याने ती काळी पडण्याचा अथवा मोडण्याचा संभव असतो. तुटलेली, दबलेली आणि कीटकांनी खराब केलेली फळे चांगल्या फळांमधून वेगळी करावी. वाहतूक करताना जर फळे दबल्या गेली किंवा खराब झाली तर त्यांना बाजारभाव कमी मिळतो. म्हणून वाहतूक करताना फळांची विशेष काळजी घ्यावी. फळे एकमेकांवर आदळून खराब होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारची बास्केट किंवा क्रेट वापरावीत. जेणेकरून फळांचे वजन खालील फळांवर पडणार नाही. फळांची ग्रेडिंग फळांचा, आकार, पक्वता आणि स्वरूपावरून करावी.

भेंडी काढण्यासाठी मजूर बर्‍याचवेळा नाखुश असतात कारण भेंडींच्या देठावर एक प्रकारची लव असते. भेंडी काढताना तळहात आणि बोटांना ज्यामुळे इजा होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने कृषी यंत्र आणि शक्ती योजनेमार्फत भेंडी काढण्यासाठी कात्रीविकसित केली आहे. तिचा उपयोग केल्यास हाताना त्रास होत नाही. एका मजुराद्वारे दिवसाला 50-60 किलो भेंडी सहजपणे काढता येते. त्यामुळे भेंडी काढण्याचा खर्च कमी होतो.

भेंडीचे बी लावल्यापासून साधारणपणे दोन महिन्यांनंतर झाडाला फुले येऊ लागतात. फूल उमलल्यापासून चार आणि सहा दिवसांपर्यंत भेंडीची लांबी, जाडी आणि वजन वाढते. साधारणपणे पाचव्या किंवा सहाव्या दिवसांपर्यंत भेेंडीत रेषा तयार होण्यास सुरुवात होते. त्या आधीच भेंडीची काढणी केल्यास ती कोवळी आणि लुसलुशीत राहते. बाजारात भेंडीच्या कोवळ्या फळांना अधिक मागणी असते. म्हणून फक्त कोवळीच फळे तोडावीत.

– नवनाथ वारे

Back to top button