पीकपाणी : हादग्याची शेती करताना… | पुढारी

पीकपाणी : हादग्याची शेती करताना...

हादग्याची पाने आणि फुले भाजीसाठी उपयोगात आणली जातात. ही फुले पांढरी किंवा तांबड्या रंगाची असतात. हादग्याच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 2 मिलीग्रॅम आयोडिन असते. हादग्याची फुले त्रिदोषांपैकी वातदोष कमी होण्याकरिता, तसेच कफ आणि पित्तदोषही साम्यावस्थेत आणण्यासाठी, शक्तीवर्धक म्हणूनही उपयुक्त असतात, तसेच ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्याकरिता हादग्याच्या भाजीचे नियमित सेवन उपयुक्त ठरते.

गाजराच्या तुलनेत कितीतरी जास्त पटीने हादग्याच्या पानांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व आढळते. अशा अनेक गुणधर्मांमुळे आणि अलीकडे रामदेवबाबांनी आयुर्वेदाचा प्रचार वाढविल्यामुळे हादग्याच्या फुलांना आणि पानांना ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे. या फुलांची, पानांची आणि शेंगांची बाजारपेठत चांगली मागणी बघता हादग्याची शेती केली जाते. या झाडाच्या मुख्य दोन जाती आहेत. एक पांढरा आणि दुसरा तांबडा हादगा. फुलांच्या रंगांवरून हादग्याच्या या दोन जाती केलेल्या आहेत. शिवाय निळी आणि पिवळी फुलं असलेलाही हादगा असतो. त्यापैकी पांढरा हादगा सर्वत्र आढळतो. याची पानं मध्यम आकाराची पण, दुहेरी आणि पिसासारखी असतात. झाडाला वर्षातून अनेक वेळा फुलं येतात. मात्र खरा फुलांचा बहार असतो तो ऑगस्ट ते डिसेंबर पर्यंत. वर्षातून झाडाला पंधरा ते वीस वेळा फुलं येतात.

हादग्याच्या लागवडीसाठी काळी जमीन योग्य असते. हादग्याची लागवड 3 मीटर अंतरावर करावी. या अंतरावर पावसाळ्यापूर्वी 45 सेमी 45 सेमी आकाराचे खड्डे खोदून खोदून त्यात शेणखत, माती आणि 50 ग्रॅम कार्बारील पावडर मिसळून भरावेत. त्यामुळे हुमणी आणि वाळवीच्या त्रासापासून धोका राहत नाही. यानंतर हादग्याची रोपे पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात लावावीत. हादग्यावर खवले किडीचा प्रादुर्भाव दिसल्यास नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 10 मिली मॅलॅथिऑन मिसळून फवारावे. तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास फवारावे. पाण्यात विरघळणारे गंधक 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम किंवा कॅराथ्रेन 20 मिली या प्रमाणात फवारणी करावी.
हादग्याची फुले सप्टेंबर ते एप्रिल या महिन्यात मिळतात. 50 सेमी लांब शेंगाही मिळतात. पूर्ण वाढलेल्या फुलांच्या पांढर्‍या कळ्यांना भाजी करण्यासाठी ग्राहकांची पसंती मिळते. मात्र कण्यांची काढणी करण्यास उशीर झाल्यास फुलांच्या पाकळ्या गळतात. अशी फुले भाजीसाठी योग्य ठरत नाही..
– विलास कदम 

Back to top button