Germination : तपासा उगवणक्षमता | पुढारी

Germination : तपासा उगवणक्षमता

दर हेक्टरी शिफारस केल्याप्रमाणे रोपांची संख्या राखता येण्यासाठी शेतकर्‍यांनी स्वत:जवळचे बियाणे चाळून, काडीकचरा, पोचट, हलके, किडलेले बी, तणाचे बी काढून टाकून साफ करावे. या साफ केलेल्या बियाण्यांचा नमुना बीज परीक्षण प्रयोगशाळेत पेरणीच्या 1 ते 1.5 महिने अगोदर पाठवून तपासून घ्यावा. बीज परीक्षण प्रयोगशाळेकडून नमुना तपासून घेण्यासाठी पुरेसा अवधी नसल्यास शेतकर्‍यांनी स्वत:च बियाण्याची उगवणक्षमता तपासून पहावी.

भात, ज्वारी, सोयाबीन या तीन पिकांची उगवणक्षमता किमान 80 टक्के असावी लागते. उगवणक्षमता 70 टक्यांपर्यंत असेल तर शिफारस केल्यापेक्षा 15 टक्के अधिक बियाणे वापरावे. उगवणक्षमता 60 टक्क्यांपर्यंत असेल तर 33 टक्के जास्त बियाणे पेरणीसाठी वापरावे. बाजरी, मूग, उडीद, तूर या पिकांच्या बियाण्यांची उगवणक्षमता किमान 75 टक्के असावी लागते. या बियाण्यांची उगवणक्षमता 60 टक्क्यांपर्यंत असेल तर 25 टक्के अधिक बियाणे पेरणीसाठी वापरावे. उगवणक्षमता 50 टक्के असेल तर 50 टक्के अधिक बियाणे पेरणीसाठी वापरावे.

सूर्यफूल आणि भुईमूग या पिकांच्या बियाण्यांची उगवणक्षमता किमान 70 टक्के असावी लागते. उगवणक्षमता 55 टक्के असेल तर 50 टक्के अधिक बियाणे म्हणजे दीडपट बियाणे किमान पेरावे. कापूस बियांची उगवणक्षमता 60 टक्के तर मका बियांची किमान उगवणक्षमता 90 टक्के असावी लागते.कोणत्याही पिकाची पेरणी केली तरी त्याचे उत्पादन चांगले मिळावे अशी प्रत्येक शेतकर्‍याची अपेक्षा असते. पण अनेक शेतकरी पेरणीसाठी स्वत:जवळचे बियाणे वापरतात. पीक विरळ असणे, रोपांची संख्या कमी असणे हे उत्पादनामध्ये घट येण्याचे प्रमुख कारण आहे.

Back to top button