डोंगर उतारावर फुलवली ड्रॅगनफळ शेती! | पुढारी

डोंगर उतारावर फुलवली ड्रॅगनफळ शेती!

पश्चिम महाराष्ट्र हा सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा व दर्‍याखोर्‍यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यातील शेतकर्‍याचा शक्यतो पारंपरिक पद्धतीने ऊस पीक करण्याकडेच कल असतो. त्यामुळे हा पट्टा शुगर बेल्ट म्हणूनच ओळखला जातो. मात्र घोटवडे (ता राधानगरी) येथील तरुण शेतकरी भरत दत्तात्रय डोंगळे यांनी चक्क डोंगर उतारावर ड्रॅगन फ्रुटची शेती यशस्वीपणे फुलवून कृषी क्षेत्रात एक वेगळी वाट निवडली आहे.

मेक्सिको देशातील ड्रॅगनफ्रूट या फळपिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशियाई देश आदी ठिकाणी केली जाते. कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स, इंडोनेशिया आदी देशांत या फळपिकाची लागवड होते. हवाई बेटे, इस्राईल, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस आदी ठिकाणीही त्याची लागवड आढळून येते.
ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकर्‍यांसाठी आश्वासक फळपीक झाले आहे. मूलतः मध्य अमेरिकेपासून ते थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बांगलादेश आदी ठिकाणी ते यशस्वीरीत्या व्यापारी पीक म्हणून घेतले जाते. आता ते भारतातही येऊन पोचले आहे. काही प्रमुख आशियाई देशांत त्याची लागवड केली आहे.

ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस (कूश्रेलशीर्शीी) ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून लाल रंग आतील गर पांढरा, वरून लाल रंग आतील गर लाल व वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा अशा तीन प्रकारांत हे फळ येते.

डोंगळे यांच्या डोंगराचा उपयोग केवळ गवतासाठीच होत होता. मात्र त्यांनी ही निकृष्ठ व मुरमाड जमीन यशस्वीपणे उपयोगात आणली आहे. दोन एकर चढउताराच्या जागेत ड्रॅगन फ्रुटची लागण केली आहे. डोंगरउतार व टेकडी फोडून वाफे बनवले व त्यावर 10 बाय 12 फूट अंतरावर ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची लागण केली आहे. यासाठी लागणारी रोपे सांगली व सोलापूर जिल्ह्यातून आणली होती. 2400 रोपांना खांब व त्यावर चौकोनी रिंग टाकून वाढवली आहेत. त्यासाठी पहिल्या टप्यात सुमारे नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यासाठी पाऊण किलोमीटरवरून पाणी आणले आहे, त्यामुळे खडकाळ मुरमाड व नापीक समजली जाणारी जमीन आता मात्र ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीमुळे अक्षरशः हिरवीगार बनली आहे.

कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता जनावरांचे शेण व मूत्र यापासून स्लरी तयार करून ती रोपांना घातली जाते. त्यामुळे हे पीक सध्या नैसर्गिक पद्धतीने घेतले जाते. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या ठिकाणी लागलेली फळे ही अतिशय चांगली व चवदार आहेत. एका फळाचे वजन 300 ते 500 ग्रॅम एवढे आहे. या फळांना कोल्हापूर सांगलीसह स्थानिक पातळीवर मोठी बाजारपेठही उपलब्ध आहे.
या फळामध्ये मोठया प्रमाणात व्हिटॅमिन,कॅल्शियम सह अन्य खनिज घटक मोठया प्रमाणात आहेत. तसेच हे फळ हृदयरोग, कर्करोग व मधुमेहासह अन्य आजारांवर उपयुक्त आहे, असे तज्ञांचे मत आहे.

हे पीक कमी पाण्यावर येणारे असल्यामुळे या पिकासाठी महिन्यातून केवळ एक वेळ पाण्याची पाळी द्यावी लागते. वर्षातून एप्रिल ते नोव्हेंबर या काळात फळांचा हंगाम असतो. एका हंगामात एकरी कमीत कमी दीड टन फळे निघतात. त्यामुळे एकरी किमान दीड ते पावणे दोन लाख रुपये उत्पन्न मिळू शकते.

डोंगळे यांनी दोन रोपांमध्ये असणार्‍या दहा फूट अंतराच्या पट्ट्याचा आंतरपिकासाठी यशस्वीपणे वापर केला आहे. यामध्ये आंतरपीक म्हणून केळी व शेवगा लावलेला आहे. तसेच मिरची, भुईमूग, सोयाबीन, मका व ज्वारीचे आंतरपीक घेतले जाते.आंतरपिकांतून वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. या पिकांतच केळी, आंबा व चिकूची झाडे चांगली तरारली आहेत. यात विविध प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केली आहे. डोंगळे यांच्या या नव्या प्रयोगाने जिल्ह्यातील कृषिक्षेत्राला नवी दिशा दिली आहे. जिल्ह्यातील डोंगराळ जमीन ड्रॅगन फळाच्या पिकाखाली आणण्यास मोठा वाव आहे.

– राजेंद्र दा. पाटील, कौलव

कोल्हापूर जिल्ह्यात ड्रॅगनफळ लागवडीला मोठा वाव आहे. सध्या सात ठिकाणी दहा हेक्टर क्षेत्रावर या पिकांची लागण झाली आहे. हे बहुवर्षीय पीक शेतकर्‍याना फायदेशीर ठरणारे आहे.
– डी. जी. वाकुरे
जिल्हा कृषी अधीक्षक, कोल्हापूर

Back to top button