सरस उत्पादनासाठी सकस आहार - पुढारी

सरस उत्पादनासाठी सकस आहार

अनुवंश, आहार आणि आरोग्य इत्यादी बाबींवर जनावरांची उत्पादन क्षमता अवलंबून असते. गायी-म्हशींना त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार सकस, संतुलित आहार देणे गरजेचे आहे. जनावरांच्या शरीराकरिता पाणी, प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे हे पोषक घटक मिळणे आवश्यक असते.

सकस आहार

सर्वसामान्यपणे जनावरांना वाळलेला चारा, उपलब्ध असल्यास हिरवा चारा, शक्य असल्यास पेंड अशा प्रकारचा आहार दिला जातो. अशा प्रकारच्या आहारामध्ये प्रथिने, ऊर्जा, खनिज इत्यादीच्या कमतरतेमुळे थेट दूध उत्पादनावर परिणाम होऊन दूध उत्पादन घटते. जनावरे आपल्या क्षमतेनुसार दूध उत्पादन करू शकत नाहीत. संतुुलित खाद्य, हिरवा तसेच वाळलेला चारा (कुट्टी करून) दूध उत्पादनाच्या प्रमाणात दिल्यास अपेक्षित दूध उत्पादन मिळू शकते.संतुलित खाद्य तयार करताना अनेक खाद्य घटकांचा विचार केला जातो. रवंथ करणार्‍या जनावरांच्या खाद्यात तंतुमय पदार्थ ठराविक प्रमाणात असल्यास त्यांचे पचन चांगले होते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे जनावरांचे पोट भरते आणि भूक लागून तृप्ती मिळते. तंतुमय पदार्थांमुळे दुधातील घट्टपणा वाढतो, तसेच ते पचण्यास जड असल्यामुळे त्याच्या पचनसंस्थेतील अधिक काळ वास्तव्याने जनावरांचे पोट भरलेले राहते. गहू, ज्वारी, मका, बाजरी इत्यादी धान्यांत कार्बोदके भरपूर प्रमाणात असतात. गवत, कडबा, हिरवा चारा यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते.

स्निग्ध पदार्थ : कार्बोदकांप्रमाणे स्निग्ध पदार्थ शक्‍ती देतात. आवश्यक स्निग्ध आम्ल स्निग्ध पदार्थांपासून मिळतात. तेलयुक्‍त बिया आणि त्यांची पेंड यामध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण अधिक असते.

प्रथिने : संतुलित खाद्यात कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थांसोबत प्रथिनांचीही आवश्यकता असते. शरीरातील पेशींच्या वाढीसाठी स्नायू तयार करण्याकरिता प्रथिनांची गरज भासते. द्विदल धान्यात उदा. सोयाबीन, भुईमूग, हरभरा, सूर्यफूल, जवस, तीळ इत्यादी तेलबियांपासूनही भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. प्रथिनांच्या प्राणिजन्य स्त्रोतांमध्ये फीश मील, मीठ मील इत्यादीचा समावेश होतो.

खनिज द्रव्य किंवा क्षार : म्हणजे फक्‍त मीठ नव्हे. कॅल्शियम, स्फुरद, सोडियम, पोटॅशियम ही महत्त्वाची खनिज द्रव्ये होत. त्याचबरोबर लोह, तांबे, जस्त, कोबाल्ट, मॅग्नेशियम इत्यादींची गरज जनावरांना भासते.

जीवनसत्त्वे : ही अल्प प्रमाणात लागतात; परंतु शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. उदा. अ, ब, क इत्यादी. अशा प्रकारे निरनिराळे अन्नघटक आहारात समतोल प्रमाणात एकत्र करून संतुलित खाद्य तयार करता येते. दूध देणार्‍या जनावरांकरिता संतुलित खाद्यात 16-18 टक्के पचनीय प्रथिने, 70 टक्के एकूण पचनीय पदार्थ आणि 17 टक्क्यांपेक्षा कमी तंतुमय पदार्थ असावेत.

संतुलित खाद्य देण्यापूर्वी गाय, म्हैस कोणत्या शारीरिक अवस्थेमध्ये आहे हे बघून घ्यावे. वाढ, गर्भावस्था आणि उत्पादन या शारीरिक भिन्न अवस्था होत. या शारीरिक अवस्था लक्षात घेणे जरुरीचे आहे. जनावरांना प्रथमतः खाद्य शरीराच्या निर्वाहाकरिता लागते. मात्र गाय, म्हैस जर गाभण असेल, तर खाद्याचा काही भाग हा गर्भाच्या वाढीकरिता, गर्भाची पोषणविषयीची गरज भागविण्यासाठी आणि काही भाग हा तिच्या निर्वाहाकरिता लागतो. गाय, म्हैस जर दूध देत असेल तर ती किती दूध देते, त्या प्रमाणात तितके दूध तयार करण्याकरिता किती खाद्य लागते, हे प्रथम पाहावे. त्यानंतर तिला निर्वाहाकरिता किती खाद्य लागेल हे पाहावे. अशा रीतीने दोन्हीमिळून एकूण खाद्य द्यावे. संतुलित खाद्यासोबत वाळलेला तसेच हिरवा चारा द्यावा. चारा कुट्टी करूनच द्यावा. हिरव्या चार्‍यामध्ये लसूण, बरसीम इत्यादीचा समावेश असल्यास अधिक चांगले.

जनावरांचे शारीरिक पोषण

संतुलित आहारामुळे जनावरांचे शारीरिक पोषण उत्तमरीत्या होते. आरोग्य उत्तम राहते. रोगप्रतिकारशक्‍ती वाढल्यामुळे जनावरे नेहमी आजारी पडत नाहीत. वासरांची वाढ उत्तम होते. वासरे लवकर वयात येतात. गाभण गाई-म्हशींची विण्याची क्रिया सुलभ होते. व्यायल्यानंतर वार लवकर व व्यवस्थित पडण्यास मदत होते. पोषण तत्त्वांच्या अभावामुळे गर्भपात होत नाही. प्रजोत्पादन क्षमता वाढते. दुग्धोत्पादनाची क्षमता वाढते; तसेच दुधाची प्रत सुधारण्यास मदत होते. दुधाळ जनावर आपल्या क्षमतेनुसार दूध देते. अपेक्षित दुग्धोत्पादन मिळून आर्थिक फायदा होतो. भाकड काळ कमी राहण्यास मदत होते. मिथेन वायूचे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.

संतुलित खाद्य ठराविक वेळेला द्यावे. त्यामध्ये 8-10 तासांचे अंतर असावे. संतुलित खाद्यात अचानक बदल करू नका. प्रत्येक जनावरांना वेगवेगळे खाद्य द्या. जनावरांना कमी अथवा अधिक खाऊ घालू नका. जेवढे आवश्यक तेवढेच द्या. दुधाळ गाई-म्हशींना 1 लिटर दूध तयार करण्याकरिता 1.5 ते 2.5 लिटर पाणी लागते. उदरनिर्वाहाव्यतिरिक्‍त लागणार्‍या पाण्याच्या गरजेपेक्षा, दूध देणार्‍या जनावरांना याप्रमाणे पाणी देणे आवश्यक आहे. म्हणून दुधाळ गाई-म्हशींना दिवसातून 4-5 वेळेस पाणी पाजा. उत्तम दर्जाच्या खाद्यघटकांची निवड करावी. बुरशीयुक्‍त खाद्य देऊ नये.
– सतीश जाधव

पाहा व्हिडिओ : कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध?

Back to top button