टाळा सूक्ष्म अन्‍नद्रव्यांची कमतरता | पुढारी

टाळा सूक्ष्म अन्‍नद्रव्यांची कमतरता

सजीवांमध्ये अन्‍नद्रव्यांचे कार्य फार महत्त्वाचे असते. त्याची कमतरता निर्माण झाली तर अनेक व्याधींना निमंत्रण मिळते. या अन्‍नद्रव्यामध्ये अनेक घटक महत्त्वाचे आहेत.

सूक्ष्म अन्‍नद्रव्यांची कमतरता

लोह हे त्यापैकीच एक आहे. अप्रत्यक्षरीत्या हरितद्रव्याची निर्मिती आणि प्रकाशसंश्‍लेषण क्रिया वृद्धिंगत करण्यासाठी लोह उपयुक्‍त ठरते. वनस्पतीच्या जीवनात विविध जैव-रासायनिक क्रिया सुरू असतात. त्यांना विकारांची आवश्यकता असते. या विकारांच्या क्रियेत लोहाचा उत्प्रेरक म्हणून सहभाग असतो. लोहामुळे प्रथिनांच्या निर्मिती कार्यासदेखील चालना मिळते. या अन्‍नद्रव्यांचे वहन अगदीच कमी असल्यामुळे हे अन्‍नद्रव्य मुळांपासून इतर अवयवात पोहोचण्यास खूपच विलंब लागतो. त्यामुळे लोहाच्या कमतरतेची लक्षणे प्रथम कोवळ्या पानांवर आणि पिकांच्या बाह्य बिंदूवर दिसू लागतात. या अन्‍नद्रव्याच्या कमतरतेमुळे उसावर केवडा पडतो. कोवळी अपरिपक्‍व आणि नव्याने येणार्‍या, शेंड्यावरील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो. अधिक कमतरता असेल तर पिवळी पाने पांढरट होतात.

टाळा सूक्ष्म अन्‍नद्रव्यांची कमतरता
टाळा सूक्ष्म अन्‍नद्रव्यांची कमतरता

झाडाची वाढ खुंटते.हे टाळायचे असेल तर 0.5 टक्के हिराकसची अथवा फेरस अमोनियम सल्फेटची (0.5 टक्के द्रावणाची) फवारणी करावी. वनस्पतीची वाढ, फुलोरा आणि फळधारणा या क्रियांसाठी विविध जैविक पदार्थांची गरज असते आणि अशा पदार्थांच्या कार्यास बोरॉनमुळे चालना मिळते. पिष्टमय पदार्थांची निर्मिती, त्यांचे चयापचय आणि ते एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेण्याच्या कार्यात बोरॉन उपयुक्‍त ठरते. द्विदल वर्गातील पिकांत प्रथिनांचे प्रमाण तसेच गळीत धान्यांमध्ये तेलांचे प्रमाण बोरॉनमुळे वाढते. नत्र स्थिरीकरण क्रियेत बोरॉन उपयुक्‍त ठरते.

बोरॉनच्या कमतरतेमुळे

बोरॉनच्या कमतरतेमुळे झाडाचा शेंडा आणि कोवळी पाने पांढरट होऊन मरतात. सुरुकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. फळावर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात. त्यावर उपाय म्हणून 50 ग्रॅम बोरिक अ‍ॅसिड पावडरची 100 लिटर पाण्यातून पानांवर फवारणी करावी. वनस्पतीच्या जीवनक्रमात अनेक विविध जैव-रासायनिक क्रिया सुरू असतात. त्यामध्ये जस्ताला फार महत्त्व आहे. विकारांचे कार्य, वनस्पती वर्धकांची तसेच संप्रेरकांची निर्मिती आणि प्रथिनेयुक्‍त पदार्थ निर्माण कार्य यामध्ये जस्ताला फार महत्त्व आहे. त्याच्या कमतरतेमुळे पाने लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. हे टाळण्यासाठी हेक्टरी 10 ते 12 किलो झिंक सल्फेट जमिनीमधून देणे किंवा अर्धा ते एक किलो झिंक सल्फेट 100 लिटर पाण्यातून (0.5 ते 1 टक्‍का) पिकांवर फवारावे.

नत्र-स्थिरीकरण

मंगल पानातील हरितद्रव्यांचे घटकद्रव्य आहे. प्रकाशसंश्‍लेषण क्रियेवर या अन्‍नद्रव्याचा परिणाम होतो. त्याच्या कमतरतेमुळे पानांच्या शिरा हिरव्या आणि शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो. नंतर पांढरट व करडा होतो. संपूर्ण पान फिकट होऊन नंतर पान गळते. त्यावर उपाय म्हणून हेक्टरी 10 ते 25 किलो मँगेनिज सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा 1 टक्‍का मँगेनिज सल्फेट फवारावे. मॉलिब्डेनम या अन्‍नद्रव्यामुले नायट्रेट नत्राचे रूपांतर प्रथिनांमध्ये होण्यास मदत होते. द्विदल वनस्पतीत जैविक पद्धतीने नत्र-स्थिरीकरण कार्यास या द्रव्यामुळे चालना मिळते. म्हणून या अन्‍नद्रव्यामुळे नत्र-स्थिरीकरण तसेच प्रथिनांची निर्मिती वाढते. त्याची कमतरता असेल तर पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्रवतो. हे टाळण्यासाठी हेक्टरी पाव ते अर्धा किलो सोडियम मॉलिब्डेट जमिनीतून द्यावे.

जैव-रासायनिक क्रिया-तांबे 

वनस्पतीच्या जीवनक्रमात अनेक विविध जैव-रासायनिक क्रिया सुरू असतात. त्यांना विकरांची आवश्यकता असते. अशा अनेक विकरांची तांबे हा एक मुख्य घटक आहे. अशा क्रिया तांब्याच्या पुरवठ्यामुळे वाढतात. तसेच प्रथिनांची आणि जीवनसत्व ‘अ’ ची निर्मिती वाढते. अप्रत्यक्षरीत्या प्रकाशसंश्‍लेषण कार्यातदेखील या अन्‍नद्रव्याचा सहभाग असतो. पिकांच्या श्‍वसोच्छ्वासाच्या क्रियेत तांबे नियंत्रकाचे कार्य बजावते. त्याची कमतरता निर्माण झाल्यास झाडाच्या शेंड्याची वाढ खुंटते, झाडांना डायर्बेक नावाचा रोग होतो. खोडाची वाढ कमी होते. पाने लगेच गळतात. यावर उपाय म्हणून मोरचूद 4 ग्रॅम एक लिटर पाण्यात मिसळून (0.4 टक्के) फवारावे. गंधकाची कमतरता असल्यास झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी कमी होतो व नंतर पाने पूर्ण पिवळी पांढरी पडतात. त्यावर उपाय म्हणून हेक्टरी 20 ते 40 किलो गंधक जमिनीतून द्यावे.

– विलास कदम

पाहा व्हिडिओ : संतांच्या वास्तव्याने मन प्रसन्न करणारे आजोबा पर्वत

 

Back to top button