खत व्यवस्थापन : काळाबरोबर बदलायला हवं! - पुढारी

खत व्यवस्थापन : काळाबरोबर बदलायला हवं!

आज परिस्थिती बदलली आहे. जास्त उत्पादन देणारं जीएम बियाणं घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढलेला आहे. अशा बियाण्यांपासून घेतलेल्या उत्पादनातून पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी लागणारं बियाणं काढून ठेवता येत नाही. कारण, अशा बियाण्यांची उगवण क्षमता दुसर्‍या वेळी कमी होते किंवा नाहीशी होते, असे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे शेतकर्‍याला दरवर्षी नवीन बियाणं बाजारातून विकत आणावं लागतं. याचाच अर्थ शेतकर्‍यांना बियाणासाठी बियाणं उत्पादक कंपन्यांवर भरवसा ठेवून राहावं लागतं. हा एक भाग. यातला दुसरा भाग असा की, अशा बियाण्याचा पेरा केल्यानंतर येणार्‍या पिकावर किडीचा, रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे सगळी मेहनत आणि पैसे वाया जातात. (खत व्यवस्थापन)

खत व्यवस्थापन

किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणावर करावी लागते. त्याचप्रमाणे रासायनिक खतांचा वापरही करावा लागतो. हीच बाब विचारात घेऊन आपलं सरकार रासायनिक खतनिर्मितीसाठी दरवर्षी तब्बल 1 लाख 34 हजार कोटी रुपयांची सबसिडी देते. त्यातून साहजिकच रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. हा झाला तिसरा भाग. काही वर्षे या पद्धतीने पीक घेतल्या नंतर चांगल्या चांगल्या जमिनींची वाटचाल नापिकीच्या दिशेने सुरू होते. जमिनीचा कस रासायनिक खते आणि कीटकनाशकांमुळे उतरत जातो. म्हणजे जमिनीतली निसर्गतः निर्माण झालेली जैववैविधता हळूहळू नष्ट होत जाते. त्यातून कालांतराने जमीन पीक घेण्यायोग्य राहात नाही. या सगळ्या प्रक्रियेत शेतकरी दिवसेंदिवस कंगाल होत जातो आणि बियाणं उत्पादक आणि रासायनिक खतांची निर्मिती करणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्या अब्जावधी रुपयांचा नफा कमवून गडगंज होतात. नव्या बियाण्याला पाणी कमी लागतं. तसंच त्यातून मिथेनचं उत्सर्जन कमी होत असल्याने हरितवायूचा धोकाही कमी होतो, असा दावा संबंधित कंपन्यांकडून केला जातोय. काळाबरोबर बदल होणं क्रमप्राप्‍तच ठरतं. मात्र, बदलासाठी म्हणून विज्ञानाची सांगड अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राशी घातली नाही तर नवेच पेच निर्माण होतात, हेही लक्षात घेतलं पाहिजे. असे नवे पेच आज शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत, होत आहेत. म्हणूनच आज सेंद्रिय शेतीची चळवळ जोमाने वाढताना दिसत आहे.

सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक शेती. शेतातला कचरा शेतातच जिरवा आणि शेतीला कायम जिवंत ठेवत तिच्यातून स्वच्छ, शुद्ध स्वरूपातील अन्‍नधान्याचं पीक घ्या. आज देशाच्या विविध भागांत सेंद्रिय शेतीचे यशस्वी प्रयोग केले जात आहेत. त्यातून फायद्याची शेतीही फुलवली जात आहे. अगदी छोट्यातला छोटा शेतकरीही सेंद्रिय पद्धतीने आपली शेती करू शकतो आणि त्यातून फायदेशीर उत्पादन घेऊ शकतो. त्यासाठी गरज आहे ती योग्य नियोजनाची. नियोजन हा सेंद्रिय शेतीतला अत्यंत महत्त्वाचा भाग. म्हणजे एकाच शेतात अनेक पिके घेणे. ती घेताना निसर्गाचा समतोल ठेवणे या बाबी पाळाव्या लागतात. आता निसर्गाचा समतोल ठेवायचा तर आपल्याला शेतीतला निसर्ग समजून घेतला पाहिजे. शेतजमिनीत अनेकप्रकारचे जीवजंतू वावरत असतात. त्यांची एक साखळी असते. त्यातून ते जमिनीची उत्तमप्रकारे मशागत करतात. एक साधी गोष्ट आपण लक्षात घ्या. आपण जमिनीची नांगरणी, कोळपणी करून मशागत करतो म्हणजे काय करतो? तर शेतजमीन भूसभुशीत करतो. भूसभुशीत जमिनीत पेरलेल्या बियाला उगवायला मोठी मदत होते. हे काम गांडूळ आणि तत्सम इतर जीव अगदी उत्तमप्रकारे करतात. म्हणून सेंद्रिय शेतीत गांडूळ खताची शिफारस केली जाते.

अशा काही खतांचा विचार करण्यापूर्वी सेंद्रीय शेतीत पिकांचे पोषण कसे होते, त्यांचे अन्‍न कोणते व ते कसे निर्माण होते हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. कारण त्याबाबत कोणताही संभ्रम मनात असता कामा नये. एक तर पिके अचर असल्यामुळे त्यांच्या पोषणाची सोय निसर्गात जागेवरच केलेली असते. त्यांचे अन्‍न निर्माण करण्यासाठी हवा, पाणी, सूर्यप्रकाश, हिरवी पाने आणि मुळाशी असणार्‍या असंख्य जीवाणूंची साखळी अशी ती व्यवस्था आहे. अर्थात या व्यवस्थेवर शेतकर्‍यांचा विश्‍वास असायला हवा. त्याशिवाय सेंद्रिय शेती करता येणार नाही. यातला दुसरा भाग असा की, इतर सर्व जीवांप्रमाणेच वनस्पती सृष्टीतील अचर जीवांमध्ये म्हणजे पिकांमध्ये असेल त्यातून हवे ते निर्माण करण्याची क्षमता असते. त्यासाठी जमिनीतील जीवाणू महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून जमीन जीवंत ठेवणे म्हणजे जीवाणूंची साखळी तयार करून ती सक्रिय ठेवणे एवढेच काम आपल्याला करावे लागते. त्यासाठी बाहेरून काहीही विकत आणण्याची गरज पडत नाही.

जनावरे खात नाहीत असे पिकांचे अवशेष, तणे, गाजरगवत, तरट अशा निरुपयोगी वनस्पतींवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी नावाची बुरशी शिंपडून शेतातच जागोजागी ट्रायको-कंपोस्ट तयार करावे. असे कंपोस्ट सतत करीत राहिलात आणि पेरणीपूर्वी ते शेतात मिसळत राहिलात तर शेती जीवंत ठेवण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. अशा पद्धतीने घेतलेलं पीकही अत्यंत शुद्ध स्वरूपात आपल्याला मिळतं.

-नववाथ वारे 

 

Back to top button