औषधी शतावरीची लागवड, खर्च कमी आणि कमाई जास्त | पुढारी

औषधी शतावरीची लागवड, खर्च कमी आणि कमाई जास्त

शतावरीची लागवड महत्त्वाची

औषधी वनस्पतींच्या लागवडीचा खर्च कमी आणि कमाई जास्त आहे. याशिवाय त्यांचे उत्पादन कमी असल्याने मागणी नेहमीच कायम राहते व शेतमालाला चांगला भाव मिळतो. सरकार सातत्याने शेतकर्‍यांचे उत्पन्‍न दुप्पट करण्याचा प्रयत्न करीत आहे. पारंपरिक शेतीव्यतिरिक्‍त वेगळी शेती करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. चांगले उत्पन्‍न मिळविण्यासाठी शेतकर्‍यांनी फळे, भाज्या याबरोबरीने औषधी वनस्पतींची लागवड करावयास हवी.

शतावरीला हिंदीत शतमुली, शतावर, संस्कृतमध्ये शतपदी, नारायणी असे म्हणतात. शतावरीच्या मुख्यतः दोन प्रजाती असतात. त्यातील पहिली औषधीसाठी शतावरी आणि दुसरी भाजीसाठी शतावरी. याशिवाय शतावरीच्या शोभेची शतावरी, महाशतावरी अशा 22 प्रजाती आहेत.

औषधी शतावरीचा उपयोग अनेक आजारांमध्ये करतात. शतावरीच्या मुळ्या औषधी असतात. यात सपोनीन, ग्लायकोसाईडस्, अल्कालॉईड आणि अस्पराजेमीन इत्यादी घटक असतात. शतावरीच्या मुळ्या शक्‍तिवर्धक असतात. शतावरी बाळंतपणानंतर मातेचा अशक्‍तपणा घालविण्यासाठी आणि दूधवाढीसाठी फार उपयुक्‍त आहे. तसेच गर्भाशयाचे विकार, मूलतत्त्व, प्रदर आणि शुक्रजंतू वाढीसाठी, फेफरे, मुतखडा, रक्‍तदाब, अ‍ॅसिडिटी यावर शतावरी उपयुक्‍त आहे. तसेच मुळ्यांची पावडर दुधासोबत टॉनिक म्हणूनही वापरली जाते. रातआंधळेपणा, मधुमेह, कावीळ, मूत्ररोग, मूळव्याध यावर शतावरीच्या मुळ्या गुणकारी आहेत. शतावरीपासून तयार केलेले नारायण तेल अर्धांगवायू व संधिवात यासाठी वापरण्यात येते. तसेच शतावरीपासून बनविण्यात आलेली शतावरी कल्प, फलाधृत ही औषधेही खूप प्रसिद्ध आहेत.

भाजीच्या शतावरीच्या मुळापासून नवीन कोंब येतात. त्यापासून भाजी आणि सूप तयार करतात. तसेच या शतावरीमध्ये जीवनसत्त्व ब आणि क यांचे प्रमाण जास्त असते. तसेच शतावरीत प्रोटिन, म्युसिलेज, हेमिसेल्युलोज हे घटकसुद्धा आहेत. शतावरीची लागवड बियाणे पेरून किंवा क्राऊन्स (ठोंब) पासून वर्षभर करता येते. भाजीपाल्यासाठी शतावरीच्या कोंबांची छाटणी करतात. तर औषधीसाठी औषधी शतावरीच्या मुळांची छाटणी करतात. मुळावरची साल काढून आतली शीर काढून त्याचे 10 ते 15 सें.मी. लांबीचे तुकडे करून सावलीत वाळवतात. अशा सावलीत सुकलेल्या मुळ्या विक्रीस तयार होतात. महाराष्ट्रात शतावरीच्या लागवडीसाठी मेरी वॉशिंग्टन या वाणाची शिफारस करण्यात आली आहे.

– अमोल जोशी

Back to top button