सोयाबीन ‘तपासा’ - पुढारी

सोयाबीन ‘तपासा’

खरंतर सोयाबीन बियाण्यांची तपासणी त्याच्या उगवणक्षमता चाचणीपासून सुरू होते. जर उगवणक्षमता 70 टक्क्क्यांपेक्षा कमी असल्यास त्याच प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीकरिता वापरणे योग्य ठरणार आहे. तसेच शेतकर्‍यांनी स्वत:कडील बियाणे पेरणीकरिता वापरल्यास बियाण्यांवरील खर्च कमी होऊ शकणार आहे. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते. त्याचे बाह्य आवरण पातळ असते आणि बियाण्यातील बीजांकुर आणि बाह्य आवरणाच्या लगत असतात. त्यामुळे बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाणे साठवणूक करताना बियाण्यातील ओलीचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.

बियाणे साठविताना त्यांची थप्पी 6 ते 8 थरांची किंवा 7 फुटांपेक्षा जास्त असणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 3 ग्रॅम थामरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणाची बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम आणि पीएबी प्रत्येकी 200 ते 250 गॅ्रम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी 3 तास अगोदर लावून सावलीत वाळवावे.

सोयाबीन पिकामध्ये उत्पादन वाढविण्यासाठी गंधकाची गरज असते. सिंगल सुपर फॉस्फेट खत दिले तर स्फुरदबरोबर गंधकाचा पुरवठाही पिकास होतो. त्यामुळे डीएपीऐवजी सरळ खताचा वापर करावा. कारण, डीएपीमध्ये गंधकाचे प्रमाण नसते. सोयाबीन पिकास 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 30 किलो पालाश, 20 किलो गंधक आणि 10 किलो बॉरेक्स प्रतिहेक्टरी द्यावे. तसेच बियाणे विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करताना पक्की पावती घेणे आवश्यक आहे.

तसेच पावतीवर उत्पादक कंपनीचे पूर्ण नाव, वाणाचे नाव, लॉट क्रमांक इत्यादी तपशील आवश्यक आहे. बियाणे पिशवी आणि त्याला असलेले लेबल तसेच पावती पीक काढणी होईपर्यंत जपून ठेवावे. 75 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 5 सें.मीं खोलीपयर्र्ंत करावी.

– सत्यजित दुर्वेकर

Back to top button