पेर कांदा लागवडीचे फायदे | पुढारी

पेर कांदा लागवडीचे फायदे

मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकर्‍यांचा कांदा पेरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. यामुळे शेतकर्‍यांना कांदा पेरणीचा पर्याय अधिक आकर्षक वाटत आहे. मात्र, या पेरणीच्या कांद्याबाबत काही शेतकर्‍यांच्या मनात साशंकता आहे. पूर्वापार पद्धत सोडून देण्याचे शेतकर्‍यांना धाडस होत नाही. तसेच पेरणीच्या कांद्याचे उत्पादन कमी येते, असाही एक मतप्रवाह आहे; पण पेर कांद्याचे (पेर कांदा) उत्पादन कमी येते हा एक गैरसमज आहे.

* भाकड काळ व पाणीवापर (पेर कांदा)

रोपांअभावी लाल कांदा व उन्हाळ कांदा बियाणे वापरून रांगडा म्हणून जो कांदा लागवड केला जातो, त्यावेळेस रोपांअभावी काहीच करू शकत नाही. कांदा पेरला नाही तर 45-60 दिवस शेताकडे बघत बसण्यापेक्षा तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमच्याकडील असलेले विहीर, नदीतील पाणी तसेच शेतकामासाठी उपलब्ध वेळ हे सर्व विनावापर पडूनच राहते. फक्त जमिनीची सावकाश मशागत व उत्तम वाफसा प्राप्त होतो व मजूर लागवडीसाठी रोप हातात येण्याची वाट बघत बसतात. याला चुकीच्या नियोजनाचा व नैसर्गिक साधनसंपचा विनावापरातील भाकड काळ समजला जातो.

* पेर कांद्याचेच पैसे होणार

शेतकर्‍यांनी कांदापेर केली तर लागवडीपेक्षा लाल तसेच उन्हाळ कांदा 30-35 दिवस लवकर विक्रीसाठी हातात येतो आणि नेमक्या याच वेळेस बाजारात कांद्याचा तुटवडा असतो व भाव अधिक मिळतो. कारण, पेर कांद्याशिवाय जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांत दुसरा कांदा उपलब्ध नसतो. यंदाच्या हंगामात उशिराच्या खरिपाच्या रोपवाटिका खराब हवामानामुळे वाया गेल्या. परिणामी तुटपुंजा लाल कांदा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याचेही अवेळी पावसाने नुकसान झाले. यामुळे पेर कांद्याचे चांगले पैसे देण्यासाठी बाजार समित्या शेतकर्‍यांची वाट बघत असल्याचे चित्र आहे.

* पेर कांद्याचा असाही फायदा

ऑक्टोबरच्या अखेरीस व नोव्हेंबरच्या सुरुवातीस पेरलेल्या कांद्यास पाणी व सिंचनासाठी वीजपुरवठा चांगल्या प्रमाणात असतो. भारनियमन कमी प्रमाणात असते. तसेच विजेचा भारही पुरेसा असतो. कारण इतर शेतकर्‍यांचा पाण्याचा उपसा नसल्याने विजेची मागणी कमी असते. यामुळे दोन महिने आरामशीर निघून जातात. पाण्याचे योग्य नियोजन होऊन तुमच्या स्रोताचा थेंब न थेंब वापरला जातो व भविष्यातील लागवड कांद्यावर पाणी भरणीचा ताण येत नाही.

* उन्हाळ कांद्यासाठी लागते अधिक पाणी

नोव्हेंबर ते जानेवारी या काळात पाणी मागणीच्या तुलनेत फेब्रुवारी ते मे या काळात मागणी जास्त असते. एकाकी उन्हाळ कांदा लागवड झाल्यामुळे 1 फेब्रुवारीपासून अति पाणीउपसा व विजेच्या अधिक वापराने विजेचा खोळंबा होऊन शेतकर्‍यांना सिंचन करण्यात अडचणी येतात. मात्र, शेतकर्‍यांनी पेर कांदा केलेला असल्यास तो फेब्रुवारीपर्यंत काढला जात असल्याने उन्हाळ कांद्याचे नियोजन चांगले करता येते. विजेच्या खोळंब्यामुळे पिकाला फटका बसून पीक थोडे कोमेजते. पेर कांदा यावेळेस निघून गेलेला असतो. त्यामुळे राहिलेल्या उन्हाळ लागवडीचे पाणी नियोजन चांगले करता येते.

* थंडी उपलब्धता वेगवेगळी (पेर कांदा)

पिकास थंडी महत्त्वाची असून, जमिनीलगत नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान अधिक हवेच्या घनतेमुळे हवेचा दाब उच्च असतो, तर शेतजमीन आकुंचनामुळे जमिनीची रंध्रे मोकळी होतात. पिकाचा श्वासोच्छ्वास चांगला होऊन मुळी सक्षम होते अन् हे केवळ पेर कांद्यात घडू शकते. उन्हाळ लागवड कांद्यात फेब्रुवारी ते मे दरम्यान हे घडत नाही. कारण, थंडी उपलब्धतेचा आलेख झुकतीकडे कललेला असतो.

* पेर कांद्यावर थ्रीप्स करप्याचा प्रादुर्भाव कमी

उन्हाळ कांद्याला उष्णता व वारंवार पाणी गरजेमुळे, थंडी अभावामुळे काळा, तपकिरी माव्याचा व करप्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. पेर कांद्यात होत नाही. पेर कांद्याला अवकाळी पाऊस व गारपिटीचा धोका कमी असतो. तुलनेने जोमात असलेल्या उन्हाळ कांद्याच्या कालावधीत नेमका गारपीट सिझन चालू होतो, तर काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊसही भेट देऊन जातो. उन्हाळ कांद्याला काढणी वेळेस बाजारात दरही कमी असतो. मात्र, पेर कांदा केलेल्या शेतकर्‍यांनी महिन्यापूर्वीच चांगल्या दराने कांदा विक्री केलेली असते.
– माणिकराव खुळे, नाशिक

Back to top button