Masai Plateau | निसर्गसमृद्ध आणि अनोखे मसाई पठार

Masai Plateau
Masai Plateau | निसर्गसमृद्ध आणि अनोखे मसाई पठार
Published on
Updated on

मिलिंद पोतदार

सातार्‍यातील कास पठार आणि कोल्हापुरातील मसाई पठार ही दोन्ही पठारे नैसर्गिक वारसा, जैवविविधता आणि पर्यावरण शिक्षणासाठी महत्त्वाची आहेत. कास पठार अधिक प्रसिद्ध असून, पर्यटन विकास झपाट्याने झाला आहे, तर मसाई पठार स्थानिक उपक्रमांमुळे विकसित होत आहे. या दोन्ही पठारांची तुलना केली असता, नैसर्गिक वैशिष्ट्ये जरी समान असली, तरी व्यवस्थापन आणि प्रसिद्धीमध्ये फरक दिसून येतो.

सातार्‍यातील कास पठार आणि कोल्हापुरातील मसाई पठार ही दोन्ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध जैवविविधतेची केंद्रे आहेत. कास पठाराला फुलांची दरी किंवा कास फूलपठार म्हणून ओळखले जाते, तर मसाई पठाराला मिनी कास असेही म्हटले जाते. दोन्ही पठारे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असून, पावसाळ्यात फुलांच्या विविध रंगांनी नटलेली असतात. कास पठार युनेस्को जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाले आहे, तर मसाई पठार स्थानिक पातळीवर संरक्षण प्रयत्नांमुळे प्रसिद्ध होत आहे. दोन्ही ठिकाणी हंगामी फुलझाडांचे, औषधी वनस्पतींचे आणि कीटकांच्या विविध प्रजातींचे दर्शन घडते. कास पठारातील वनस्पती अधिक संशोधित आणि नोंदवलेल्या आहेत, तर मसाई पठार अजूनही संशोधनाच्या द़ृष्टीने उघडे क्षेत्र आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे कास पठारावर पर्यावरणीय ताण वाढला असला, तरी मसाई पठार तुलनेने शांत आणि स्वच्छ आहे. दोन्ही पठारे नैसर्गिक वारसा, जैवविविधता आणि पर्यावरण शिक्षणासाठी महत्त्वाची आहेत. कास पठार अधिक प्रसिद्ध असून, पर्यटन विकास झपाट्याने झाला आहे, तर मसाई पठार स्थानिक उपक्रमांमुळे विकसित होत आहे. या दोन्ही पठारांची तुलना केली असता, नैसर्गिक वैशिष्ट्ये जरी समान असली, तरी व्यवस्थापन आणि प्रसिद्धीमध्ये फरक दिसून येतो. मसाई पठाराची वैविध्यतादेखील अतुलनीय आहे. येथील परिसंस्था, भूगोल, जैववैविध्यत या सर्वांचा थोडक्यात घेतलेला आढावा...

मसाई पठार ही एक महत्त्वाची आणि लवकर ओळखलेली नैसर्गिक संसाधन संपत्ती आहे. या पठारावरच्या जैवविविधतेमुळे, विशेषतः मोसमी फुले व दुर्मीळ वनस्पतींच्या निमित्ताने, ती एक महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून समोर येते.

पर्यावरणीय पार्श्वभूमी : मसाई पठार हे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याजवळ असणारे ठिकाण. कोल्हापूर शहरापासून सुमारे 30 ते 35 कि.मी.च्या अंतरावर हे पठार आहे. भूगर्भीयद़ृष्ट्या हे पठार म्हणजे सुप्त ज्वालामुखीय बेसॉल्टची (lateritic/ferricrete) जमीन आहे. ज्यावर विरळ माती, दगडाचे मोठे कण व विशेष प्रकारचे जल-ढाचा (micro-habitats) आढळतो. पश्चिम घाटातील हा भाग जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण, अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती-प्राण्यांचा व संस्थात्मक परिसंस्था (ecosystem) चा विकास येथे झाला आहे. डोंगरावरचे महाळुंगे गाव सोडून गेल्यानंतर मसाई पठाराची सुरुवात होते. विस्तीर्ण आणि नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त जमीन... पावसाळ्यानंतर गर्द हिरवाईने झाकलेली पठारावरची चादर हेच खास वैशिष्ट्य मसाईचं आहे. नेहमी भिरभिरणारा सोसाट्याचा वारा मन शांत करून जाणारा ठरतो. जसजसे पठारावरून चालत पुढे जाऊ तसतसे भौगोलिक प्रदेशातील वैविध्यता द़ृष्टीस पडायला सुरुवात होते. सगळीकडे नीरव शांतता हे आणखी एक पठाराचे वैशिष्ट्य म्हणता येईल. खूप पावसाचे प्रमाण असल्यामुळे इथे जाणे जिकिरीचे ठरते. पावसाळ्यानंतर या ठिकाणी फुले यायला सुरुवात होते. पठाराच्या पायथ्याशी चारचाकी, दुचाकी वाहन पोहोचते; पण त्यानंतर मात्र पायी चालत या पठाराची भ्रमंती करता येते. या ठिकाणी खोल दर्‍या, खडकांचे नैसर्गिक आकार आणि गुहा (लेणी) आढळतात. या दर्‍या लाव्हारस खडकांच्या झिजेमुळे तयार झालेल्या आहेत. मसाई पठाराला निसर्गाने एक देणगी दिली आहे ती म्हणजे येथील मातीचा बदलणारा रंग. सुरुवातीला काळी, नंतर तांबडी, थोड्या अंतरावर पांढरी, मध्येच पिवळी आणि शेवटी चिकण माती. उन्हाळ्यात किंवा थोडं कोरडे वातावरण असताना या ठिकाणी गेल्यानंतर मातीचं वेगळंपण अनुभवायला नक्कीच मिळेल.

मसाई देवीचे मंदिर : इथे मसाई देवीचे छोटेसे एक मंदिर आहे. मसाई देवीच्या नावावरून या पठाराला मसाई पठार नाव पडले आहे. येथील तलावातील पाणीदेखील अतिशय स्वच्छ आणि नितळ पाहावयास मिळते. त्यामुळेच या ठिकाणी जेवणासाठी सहलींचे आयोजन केले जाते.

फुलांची चादर : मसाई पठारावरच्या वनस्पती वैविध्याला विशेष महत्त्व आहे; कारण मान्सूननंतर (ऑगस्ट-सप्टेंबर) या पठारावर फुलांची चादर पसरते.ऑर्किड (orchids) व कॅर्निव्होरस (कीटकभक्षी) वनस्पती जसे की, Drosera indica व Utricularia यासारख्या प्रजाती. कीटकभक्षी वनस्पती, रानतेरडा, गेंदफूल, कंदील फूल, सोनकी फूल, ड्रॉसेरा, नीलिमा पाहायला मिळतात. विविध रानफूल हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. रानकोथिंबीर, सफेद मुसळी, नीलवंती, मंजिरी, सीतेची आसवे, केना, पेनवा आणि असंख्य विविध रंगांची रानफुलेही डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. दुर्मीळ औषधी वनस्पती आणि जांभ्या दगडावर आलेली भुई अमराईची अनेक प्रजाती या ठिकाणी निदर्शनास येतात. मसाई पठार जांभा खडक आणि तेथे फुलणार्‍या फुलांच्या विविध प्रजातींसाठी ओळखले जाते, ज्यात ऑर्किड आणि मांसाहारी वनस्पतींचा समावेश आहे. रंगीबेरंगी फुले पाहण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कोल्हापुरात असणार्‍या या पठाराकडे निसर्ग अभ्यासक, पर्यटकांची रेलचल वाढते.

पांडवदरा लेणी : ‘पांडव दरा’ हे नाव कसे पडले? स्थानिक लोककथेनुसार, पांडवांनी त्यांच्या वनवास काळात येथे वास्तव्य केले, म्हणून या दर्‍यांना पांडव दरा असे नाव देण्यात आले. इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकातील पांडवकालीन लेणी असल्याचे म्हटले जाते. या गुहा नैसर्गिक आहेत; काही ठिकाणी मानवनिर्मित रचना दिसतात. गुहांच्या आसपास पाण्याचे झरे आणि झुडुपांमध्ये विविध फुलझाडे आढळतात. काही ठिकाणी प्राचीन कोरीव आकृतीसारखी चिन्हे दिसतात. लेण्यांच्या परिसरात दुर्मीळ वनस्पती, फुलझाडे व कीटकांचे अधिवास आहेत. येथून संपूर्ण घाटमाथ्याचा विहंगम नजारा दिसतो, विशेषतः पावसाळ्यात धबधबे आणि ढगांचे द़ृश्य मोहक दिसते. स्थानिक प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी संघटनांकडून या परिसराचे संवर्धन केले जाते. येथे जाण्यासाठी ट्रेकिंग मार्ग आहे. हिरव्यागार गवतावर फुललेली रंगीबेरंगी फुले आणि या काळात पडणार्‍या पावसाच्या सरी, तसेच धुक्यामुळे तयार होणारे नयनरम्य द़ृश्य, यामुळे पर्यटकांची पावले या ठिकाणी वळू लागतात. तत्सम सर्वसाधारण व मध्यम आकाराचे प्राणी सांबर, माऊस डिअर, वानर, रानडुक्कर, गवे, बिबट्या, मोर, लांडोर , साळिंदर, अनेक पक्षी, सर्प, जलचर आढळतात. यावरून स्पष्टपणे दिसते की, पठाराचा भूगोल व मातीची अवस्था वनस्पती, परिसंस्थेसाठी अनुकूल आणि विलक्षण अशी आहे.

जैविक मॉडेल व संरक्षण द़ृष्टिकोन : या पठाराचे अध्ययन इतर पठारी परिसंस्थांसाठी मॉडेल ठरू शकते - म्हणजे पर्यावरणीय जाती, माती-घटक व वनस्पती-प्राणी समूह यांचा परस्पर संबंध समजून घेण्यासाठी. या सर्व गोष्टी या पठाराला जैववैविध्य स्थान म्हणून ठरवतात.

मसाई पठार : कोल्हापूर जिल्ह्यातील हे पठार - केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर एक नैसर्गिकसंपदा आहे जी वनस्पती, प्राणी, माती, जलप्रवाह व हवामान यांच्या जटिल परस्परसंवादातून आकारलेली आहे. तिच्या विविध जैववैविध्यामुळे ती अभ्यास, अनुभव व संरक्षण या सर्व बाबतीत महत्त्वाची आहे. मसाई पठाराच्या जैववैविध्याचे दीर्घकालीन संरक्षण करण्यासाठी सरसावले पाहिजे. मसाई पठाराची वैविध्यता काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जाणून घ्यावयाचे असल्यास या ठिकाणी एकदा का होईना नक्की भेट द्यायला हवी. आपल्यालाच महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचा हा वारसा जपता आला पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news