

महेश कोळी, संगणक अभियंता
अलीकडील काळात देशाच्या डिजिटल संदेश प्रणालीच्या विश्वात एका वादळामुळे प्रचंड खळबळ उडालेली दिसली. या वादळाने जगप्रसिद्ध व्हॉटस्अॅपच्या धोरणकर्त्यांच्या माथ्यावर घाम आणला. हे वादळ म्हणजे, भारताचे स्वदेशी मेसेजिंग अॅप ‘अरट्टै’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वदेशी तंत्रज्ञान’ स्वीकारा या आवाहनामुळे, तसेच मंत्र्यांच्या व उद्योगपतींच्या प्रचार मोहिमेमुळे या महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत ‘अरट्टै’ने 75 लाख डाऊनलोडचा आकडा गाठला. तसेच दैनंदिन नोंदणी 3,50,000 पर्यंत पोहोचली.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या मनमानीमुळे आणि छुप्या धोरणांमुळे नागरिकांची तसेच माहितीची गोपनियता धोक्यात येत चालली आहे. ‘केम्ब्रिज अॅनालिका’ प्रकरणानंतर याची प्रकर्षाने चर्चा होऊ लागली आणि याबाबत विविध देशांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असली, तरी या टेक जायंटस्नी आपली कार्यपद्धती बदलली आहे. ‘फेसबुक’कार मार्क झुकरबर्ग यांनी कालौघात इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अॅपचाही ताबा घेत या क्षेत्रात दमदार आघाडी घेतली. आज भारतासारख्या देशामध्ये व्हॉटस्अॅप हे कोट्यवधी जनतेच्या रोजच्या जगण्याचा भाग बनले आहे. प्रचंड प्रमाणात होणार्या या वापरामुळे झुकरबर्ग यांचे उखळ पांढरे झाले खरे; पण अनेक तज्ज्ञांनी याचे दुष्परिणाम आणि त्यामधील डेटाच्या गैरवापराच्या शक्यता यांचा विचार करता हा ‘डिजिटल वसाहतवाद’ असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर स्वदेशी संदेशवहन प्रणाली का विकसित केली जाऊ नये, हा विचार पुढे आला. याचे कारण, अमेरिकादी प्रगत देशातील बड्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये अनेक भारतीय प्रतिभावंत कार्यरत आहेत. भारतात बुद्धिमत्तेची आणि बुद्धिवंतांची कमतरता कधीच नव्हती, तरीही आपल्याला विंडोज, जी-मेल, गुगल, व्हॉटस्अॅप यांसारख्या परदेशी डिजिटल माध्यमांना पर्याय विकसित करता आला नाही, हे वास्तव आहे. यासाठी प्रयत्न झाले नाहीत असे नाही; पण ते फलद्रुप झाले नाहीत. अलीकडील काळात अमेरिकेच्या दंडेलशाहीमुळे आणि टॅरिफ अस्त्र उगारून भारताची कोंडी करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नामुळे तसेच चिनी अॅप्सकडून होणार्या हेरगिरीमुळे स्वदेशी अॅपचा विचार प्रबळपणाने पुढे येऊ लागला. या पार्श्वभूमीवर अलीकडेच चर्चेत आलेल्या ‘जोहो मेल’ आणि ‘अरट्टै’ या सोशल नेटवर्किंग अॅपमुळे एक नवा आशेचा किरण दिसून आला आहे.
अरट्टै अॅप समजून घेण्यापूर्वी आपल्याला ‘झोहो’ समजून घेणे गरजेचे आहे. ‘झोहो’ हे स्टार्टअप नसून ती भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी असून तिचा कारभार जगभरात पसरलेला आहे. तसेच ‘झोहो’ची इकोसिस्टीम एका अॅपपुरती मर्यादित नाही. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी जेव्हा ‘अरट्टै’ या स्वदेशी अॅपचा वापर करण्याविषयी खुद्द पंतप्रधानांनी आणि मंत्र्यांनी, उद्योगपतींनी आवाहन केले आणि त्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये 75 लाख जणांकडून हे अॅप डाऊनलोड करण्यात आले तेव्हा डिजिटल मेसेजिंग इकोसिस्टीममध्ये प्रचंड खळबळ उडाली. व्हॉटस्अॅपच्या निर्मात्यांनाही या भारतीय अॅपच्या अचानक वाढलेल्या लोकप्रियतेने घाम फुटला. सद्यस्थितीत ‘अरट्टै’चे 10 लाखांहून अधिक मासिक वापरकर्ते आहेत. व्हॉटस्अॅपच्या वापरकर्त्यांचा आकडा 53.58 कोटी इतका आहे. त्यामुळे वापरकर्त्यांच्या आकड्यांच्या तुलनेत ‘अरट्टै’ खूपच पिछाडीवर आहे; परंतु कोणत्याही व्यवसायात नवा स्पर्धक दाखल झाला आणि त्याकडे ग्राहकांचा ओढा वाढलेला दिसला की, मूळ व्यावसायिकांची चलबिचल सुरू होते. तसाच काहीसा प्रकार झुकरबर्ग यांच्याबाबत घडला असावा, असे मानण्यास जागा आहे. या अॅपने केवळ काही दिवसांतच भारतीय डिजिटल बाजारात एक वेगळी चर्चा निर्माण केली आहे.
‘झोहो’ कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे, वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला दिलेलं सर्वोच्च स्थान आणि जाहिरातमुक्त धोरण. झोहोने गुगलप्रमाणे ई-मेल, डॉक्युमेंट, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन यांसारख्या अनेक डिजिटल सेवांचा मजबूत संच विकसित केला आहे. त्यामुळे ‘अरट्टैै’ या अॅपविषयीची उत्सुकता वाढली आहे. ‘अरट्टै’ या तमिळ शब्दाचा अर्थच ‘गप्पा’ असा आहे आणि खरं तर हीच भारताच्या संवाद संस्कृतीची ओळख आहे. या अॅपमध्ये टेक्स्ट मेसेज, व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल, हजार सदस्यांपर्यंतचे ग्रुप चॅट, तसेच मल्टिमीडिया शेअरिंग यांसारखी आजच्या काळात आवश्यक असलेली सर्व वैशिष्ट्ये आहेत; परंतु स्पर्धेचं वास्तव मात्र कठोर आहे; पण यामध्ये सध्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फक्त व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलपुरतेच उपलब्ध आहेत. त्यामुळे या अॅपला सोशल मीडियाच्या क्षेत्रात बस्तान बसवण्यासाठी बरीच मोठी मजल मारायची आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे, सामान्यतः प्रत्येक वापरकर्ता त्याचे मित्र, नातेवाईक आणि सहकारी असणार्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहण्यास प्राधान्य देतो. आज जवळजवळ प्रत्येक भारतीय व्हॉटस्अॅपचा वापर करतो. त्यामुळे नवे अॅप स्वीकारणे अनेकांना कठीण वाटते. मागील काळात आलेल्या ‘कू’ आणि ‘हाईक’ यांसारख्या भारतीय अॅप्सना सुरुवातीला लोकप्रियता मिळाली; पण ती टिकू शकली नाही. याचे कारण, एकदा जडलेली डिजिटल सवय बदलणे ही सर्वांत कठीण गोष्ट आहे. भारतातील अॅप बाजार झपाट्याने वाढत आहे; परंतु कोडिंग आणि तांत्रिक शिक्षणातील कमतरता अजूनही अडथळा ठरत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात या अंतरावर मात करण्याचा प्रयत्न झाला आहे; पण त्याचे परिणाम पुढील दशकात दिसतील. अशा स्थितीत ‘अरट्टै’ला यश मिळवायचे असेल, तर त्याला तांत्रिक दर्जा वाढवावा लागेल, वापरकर्त्यांना गोपनीयतेची हमी द्यावी लागेल आणि सतत नवीन प्रयोग करत राहावे लागेल. झोहोसारख्या अनुभवी कंपनीचा पाठिंबा, भारतीय वापरकर्त्यांचा उत्साह आणि ‘स्वदेशी’ भावनेचा जोर हे घटक ‘अरट्टै’च्या बाजूने आहेत; पण दीर्घकाळासाठी टिकून राहायचे असेल, तर विश्वास, नवोन्मेष आणि वापरकर्त्यांसाठी आकर्षक फिचर्स व अद्ययावतता याशिवाय गत्यंतर नाही.
‘अरट्टै’ आज विजयाचं प्रतीक नाही; पण आत्मविश्वासाचं नक्कीच आहे. भारत आता फक्त तंत्रज्ञानाचा ग्राहक नाही, तर तंत्रज्ञान निर्माता देश म्हणून उभा राहतो आहे. भारतीय कंपन्यांनी नवोन्मेष, सुरक्षा आणि गोपनीयतेचा मार्ग कायम ठेवला, तर ‘अरट्टै’सारखी अॅप्स येत्या काळात डिजिटल स्वातंत्र्य आणि स्वदेशी अभिमानाचे नवे अध्याय लिहू शकतील. भारत आता डिजिटल युगात स्वतःची ओळख घडवत आहे. कधीकाळी परकीय तंत्रज्ञानावर अवलंबून असलेला देश आज स्वतःच्या नवकल्पनांवर उभा राहत आहे. या प्रवासात ‘स्वदेशी तंत्रज्ञान’ ही संकल्पना केवळ घोषवाक्य राहिली नाही, तर ती कृतीत उतरू लागली आहे. ‘विकसित भारत’चे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर भारताला कोणत्याही परिस्थितीत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या क्षेत्रात हे शक्य झाले, तर ती भारतासाठी गगनभरारी ठरेल. कारण, वर्तमान स्थितीत स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, समाजकारण, कौटुंबिक आयुष्य, व्यक्तिगत आयुष्य या सर्वांवर एकाच वेळी काही क्षणांत प्रभाव टाकण्याची अफाट शक्ती नवसमाजमाध्यमांमध्ये आहे. त्यामुळे या क्षेत्रातले स्वावलंबन भारतासाठी महत्त्वाचेच आहे. ‘अरट्टै’ला यामध्ये यश मिळणार का, हे येणारा काळच ठरवेल; पण या माध्यमातून भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील परदेशी कंपन्यांना योग्य तो संदेश दिला आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत एक प्रेझेंटेशन दिले होते आणि ते त्यांनी मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट किंवा गुगलवर तयार केले नव्हते, तर त्याऐवजी त्यांनी झोहोच्या ‘झोहो शो’मध्ये त्यांचे प्रेझेंटेशन तयार केले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल चर्चा केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि लाखो भारतीयांना झोहोची ओळख झाली. झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू आहेत. त्यांचे सध्याचे वय 57 वर्ष आहे; परंतु त्यांनी वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी या कंपनीची स्थापना केली होती. आज कंपनीचे मूल्यांकन 12.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा भारतीय रुपयांमध्ये 1.03 लाख कोटी आहे. विशेष बाब म्हणजे, ही कंपनी अद्याप शेअर बाजारात सूचीबद्ध नाही आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, श्रीधर वेम्बू यांना ही कंपनी उभारण्यासाठी कुणाकडूनही एक रुपयाचादेखील निधी मिळालेला नाही.