Ladakh in crisis
लडाख संकटात; उपाय काय?Pudhari File Photo

लडाख संकटात; उपाय काय?

या भागावर हवामान बदलाचे गंभीर परिणाम
Published on

प्रसाद पाटील

लेह लडाख या भारतातील सर्वात सुंदर प्रदेशाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. लडाखला नैसर्गिक साधनसामग्रीची खाण म्हणून ओळखले जाते. पण गेल्या काही वर्षांपासून या भागावर हवामान बदलाचे गंभीर परिणाम दिसत आहेत. हिमकडे (ग्लेशियर) वितळणे हे गंभीर परिणामांचे प्रतीक आहे. हवामान बदलाच्या तीव्रतेने या भागातील पर्यावरण आणि सामाजिक स्थिती बिघडत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अनेक पर्यटनस्थळांपैकी एक विलोभनीय आणि साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे लेह-लडाख. रूपेरी पडद्यावरील अनेक दृश्यांमधून अथवा वृत्तपत्रांमधून आपण लडाखचे अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहिलेले असते. त्यामुळे त्याविषयी प्रत्येकाच्याच मनात प्रचंड कुतूहल असते. हा प्रदेश भारतातील सर्वात उचांवर असलेले ‘लडाख पठार’ म्हणून ओळखला जातो. पांढर्‍या शुभ्र हिमाच्छादित शिखरांमुळे आणि प्रचंड उंचीमुळे तेथील वातावरण स्वर्गाप्रमाणे असते. निळेशार पाणी, कोवळ्या सोनेरी किरणांनी प्रफुल्लित झालेली हिरवाई, समोर विशालकाय पर्वतराजी आणि जोडीला गारठवणारी थंडी असे निसर्गसौंदर्य न्याहाळताना थक्क व्हायला होतं. याचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे बर्फाची स्वच्छ चादर पांघरलेली हिमशिखरे दिसतानाच दुसरीकडे वाळवंटही पाहायला मिळते. हवामानही असेच विषम असते. कधी कमालीचा उकाडा, तर कधी रक्त गोठवणारी थंडी असते. समुद्रसपाटीपासून सर्वात उंच असलेला हा प्रदेश हा प्रदेश सिंधू नदीचं उगमस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे.

लडाखला नैसर्गिक साधनसामग्रीची खाण म्हणून ओळखले जाते. पण गेल्या काही वर्षांपासून या भागावर हवामान बदलाचे गंभीर परिणाम दिसत आहेत. हिमकडे (ग्लेशियर) वितळणे हे गंभीर परिणामाचे प्रतीक आहे. एकार्थाने हिमकडे हे परिसरातील हिमनद्या, सरोवर, तलावांसाठी जीवनवाहिनीचे काम करतात. परंतु आता तेच वेगाने वितळताना दिसत आहेत. यामुळे केवळ ताज्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नसून तात्पुरत्या प्रमाणात हिमसरोवर निर्माण होण्याचे प्रमाणही वाढत आहे. हे चित्र धोकादायक आहे. कारण ते फुटण्याचा धोका राहतो.

प्रसिद्ध नियतकालिक ‘फ्रंटियर्स इन अर्थ सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेेल्या एका संशोधन गटात सहभागी डॉ. इरफान राशिद यांनीही तीन वर्षांपूर्वी लडाखमधील सरोवरांच्या स्फोटाची शक्यता वाढल्याचे नमूद केले आहे. हे क्षेत्र भूकंपाच्या दृष्टीनेदेखील संवेदनशील मानले जाते. बर्फाचे अस्तर मोठ्या प्रमाणात वितळू लागल्यास गोठलेले तलाव फुटण्याची शक्यता असून त्याचा आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला होता. वातावरण बदलाची तीव्रता गेल्या दोन दशकांपासून प्रखरतेने जाणवू लागली आहे. आशिया खंडामधील पाण्याच्या दुर्भिक्षावर कार्यरत असलेल्या ‘द थर्ड पोल’ या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने तयार केलेला ‘लडाख आणि त्यावर होत असलेला वातावरण बदलाचा परिणाम’ हा अहवाल अतिशय बोलका आहे. त्यानुसार वातावरण बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत. बर्फ पडणे आणि पाऊस कमी झाला आहे. याचा परिणाम या शीत वाळवंटातील शेतीवर होत आहे. हिमकडे कोसळण्याचे वाढते प्रमाण पर्यावरण संतुलनात बिघाड करण्याचे काम करत आहेत. तापमानातील वाढ, हवामानातील बदल या कारणांमुळे लेह-लडाखची ‘आबोहवा’ बिघडली आहे. एकापरीने पर्यावरणीय संकट निर्माण झाले आहे. म्हणूनच तत्काळ उपाय करण्याची गरज आहे, जेणेकरून दुर्गम दर्‍याखोर्‍यात वसलेल्या निसर्गपूरक जमिनीला वाचविण्याच्या दृष्टीने काम केले जाईल आणि त्यास स्थायी रूपात सुरक्षित केले जाईल.

याबाबत सर्वप्रथम पर्यटन व्यवस्थापनाच्या दिशेने पाऊल टाकावे लागणार आहे. म्हणजे पर्यटकांच्या अलोट गर्दीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच वाहनांच्या संख्येला चाप बसवावा लाणार आहे. या भागात इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणे अणि पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. या आधारे लडाखची स्थिती हाताळता येणे शक्य आहे. जलस्रोतांचे व्यवस्थापन करताना ग्लेशियरच्या पाण्याचा वापर कौशल्यपूर्ण करावा लागेल आणि पावसाचे पाणी अडविण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आधुनिक सिंचन तंत्राचा वापर करून आणि कृत्रिम ग्लेशियर तयार करून दुष्काळाच्या काळात पाण्याची कमतरता दूर करता येईल. हवामान बदलास पूरक कृषी उत्पादनाला प्रोत्साहन देताना पिकांत वैविध्यपणा आणणे आणि ग्रीनहाऊस शेतीला पाठबळ द्यायला हवे. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करत जीवाश्म इंधनाच्या वापरावर नियंत्रण आणणे आणि हरित बफर झोनची स्थापना करायला हवी. सार्वजनिक परिवहनाला प्रोत्साहन देणे आणि सायकल संस्कृतीला चालना देणार्‍या पायाभूत सुविधा विकसित करणे ही कामे हवेतील प्रदूषण कमी करण्यात साह्यभूत ठरतील. कचरा व्यवस्थापन आणि पुनर्प्रक्रियेसाठी व्यापक प्रमाणात कचरा पृथ्थकरण आणि पुनर्प्रक्रिया केंद्राची स्थापना करायला हवी.

लडाख भागात शहरी योजना, पायाभूत आराखडा आणि संवेदनशील भागातील बांधकामावर नियंत्रण आणणे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या योजनांचा विकास करायला हवा. विजेवर आधारित प्रकल्पांसाठी पर्यावरणाचे निकष लागू करणे आणि जुन्या इमारतींना रेट्रोफीट करण्यासाठी या भागात प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शिवाय समुदायाचा सहभाग अणि हवामान शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम व प्रशिक्षणावर भर द्यायला हवा. या उपायांतून लडाखच्या पर्यावरण आणि सामाजिक आव्हानांवर तोडगा काढला जाईल. या अद्भुत नैसर्गिक क्षेत्राच्या संरक्षणासाठी आणि शाश्वत विकासासाठी कृती योजना राबविणे महत्त्वाचे आहे. लडाखचे निसर्गसौंदर्य आणि संस्कृती मोलाची आहे. त्याचे सौंदर्य आणि वारसा वाचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे. हवामान बदलाच्या तीव्रतेने या भागातील पर्यावरण आणि सामाजिक स्थिती बिघडत आहे. त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. ही बाब केवळ पर्यावरण संरक्षणापुरतीच मर्यादित नसून स्थानिक लोकसंख्येची सुरक्षा, सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि जागतिक हवामान संतुलनात योगदान देण्याचा देखील मुद्दा आहे. आपल्याला केवळ तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाच्या सुधारणांवर लक्ष देऊन चालणार नाही तर सांघिकपणे हवामान बदलाच्या परिणामाची तीव्रता कमी करण्याची रणनीती आखावी लागणार आहे. सामूहिक व्यापक सहभागाने काम केले तर या भागाचा अभिजात वारसा वाचवता येणे आणि या भागातील आगामी पिढीला सुरक्षित आणि समृद्ध जीवन प्रदान करणे शक्य होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news