संतांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच विघ्नहर्ता, बुद्धीची देवता असलेल्या गणपतीला आपल्या उपासनेत अढळ स्थान दिले. कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी कार्य निर्विघ्नपणे सिद्धीस जावे, यासाठी गणेशवंदना केली जाते. ग्रंथारंभीही गणेशस्तवन करण्याची प्राचीन परंपरा आहे. शनिवार (दि. 7) पासून सुरू होणार्या गणेशोत्सवानिमित्त...
सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय यांचे निमित्त आणि उपादान कारण एक निराकार ‘ब्रह्म’ म्हणजेच सर्वव्यापी एकमेवाद्वितीय परमचैतन्यच आहे, अशी वेदान्ताची वाणी आहे. ‘ब्रह्मसूत्रां’मधील प्रारंभीचेच सूत्र ‘जन्माद्यस्य यतः’ हे त्याचेच प्रतिपादन करणारे आहे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी हेच एकमेव तत्त्व होते, सृष्टी अस्तित्वात असताना तिला याच तत्त्वाचे अधिष्ठान असते व शेवटी तिचा लय या तत्त्वातच होतो. सृष्टीचे कार्य सुरू असताना त्यामधील विविध स्वरूपाच्या कार्यांसाठी, ग्रहलोकांसाठी व अगदी नद्या-पर्वतांसाठीही वेगवेगळ्या अधिष्ठातृ देवतांची रूपे त्या एकमेव परब्रह्मानेच घेतली. या देवता वेगवेगळ्या व संख्येने अनेक दिसत असल्या, तरी त्या मुळात एकाच तत्त्वाची वेगवेगळी रूपे आहेत, हे वैदिक साहित्याने बजावून सांगितलेले आहे. त्यापैकी विघ्ननाशक देवतेचे रूप म्हणजे श्रीगणेश. कोणत्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी संभाव्य विघ्नांचा विचार करून व अशी विघ्ने दूर होऊन कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी श्रीगणेशाची पूजा केली जाते. त्यामुळेच गणेशाला आद्यपूजेचा मान मिळालेला आहे. गृत्समद या प्राचीन वैदिक ऋषीपासून ते मुद्गल ऋषी, मोरया गोसावी (यांच्या नावावरूनच गणेशाचा ‘गणपतीबाप्पा मोरया’ असा जयघोष केला जातो) यांच्यापर्यंत अनेकांनी गणेशाची उपासना केलेली आढळते. संतांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच विघ्नहर्ता, बुद्धीची देवता असलेल्या गणपतीला आपल्या उपासनेत अढळ स्थान दिले. विशेषतः, महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो व ही देवता घरोघरी स्थानापन्न होऊन पूजा स्वीकारते.
गणेशाचे उल्लेख अतिशय प्राचीन वाङ्मयातून पाहायला मिळतात. ऋग्वेदात ‘ब्रह्मणस्पति सूक्त’ आहे. ‘ब्रह्मणस्पति’ ही एक वैदिक देवता आहे. देवगुरू बृहस्पतीलाही ‘ब्रह्मणस्पति’ असे म्हटले जाते. मात्र, ऋग्वेदातील या ब्रह्मणस्पतीचे गणपतीशी असलेले कमालीचे साधर्म्य पाहून ही गणेशदेवताच असल्याचे अनेकांना वाटते. गणपतीला बुद्धिदेवता, ज्ञानदाता म्हटले जाते. ऋग्वेदातील ब्रह्मणस्पतीही असाच ज्ञानदाता आहे. गणपतीच्या हातात जसा सुवर्णपरशु आहे तसाच ब्रह्मणस्पतीच्याही हातात आहे. कार्यारंभी आपण जसे श्रीगणेशाचे आवाहन करतो, तसेच आवाहन ब्रह्मणस्पतीलाही केलेले आहे. त्याचाच मंत्र आता परंपरेने गणेशपूजेतही समाविष्ट झालेला आहे. ‘गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नुतिभिः सीद सादनम्॥’ (ऋग्वेद, 2-23-1) असा हा मंत्र आहे. त्याचा अर्थ ‘गणांचा प्रभू असा तू गणपती, ज्ञानीजनांमधील तू अत्यंत ज्ञानी व कीर्तिवंतांमधील तू वरिष्ठ. तूच राजाधिराज. तुला आम्ही आदराने बोलावतो. तू आपल्या सर्वशक्तीनिशी ये आणि या आसनावर विराजमान हो.’ आचार्य सायण यांच्यापेक्षाही प्राचीन वेदभाष्यकार श्रीस्कंदस्वामी आपल्या ऋग्वेद भाष्याच्या प्रारंभी लिहितात, ‘विघ्नेश विधिमार्तण्डचन्द्रेन्द्रोपेन्द्रवन्दित। नमो गणपते तुभ्यं ब्रह्मणां ब्रह्मणस्पते.’ (ब्रह्मदेव, सूर्य, चंद्र, इंद्र तसेच विष्णूद्वारे वंदित हे विघ्नेश गणपती, मंत्रांचे स्वामी ब्रह्मणस्पती, आपल्याला नमस्कार असो’. मुद्गलपुराणात म्हटले आहे, ‘सिद्धिबुद्धिपति वन्दे ब्रह्मणस्पतिसंज्ञितम्। मांगल्येशं सर्वपूज्यं विघ्नानां नायकं परम्॥’ (समस्त मंगलांचे स्वामी, सर्वांचे परमपूज्य, सकळ विघ्नांचे परम नायक, ‘ब्रह्मणस्पती’ नावाने प्रसिद्ध सिद्धी-बुद्धीचे पती अशा गणपतीला मी वंदन करतो.) अथर्ववेदात ‘गणपत्यथर्वशीर्ष’ नावाचे एक छोटेसे उपनिषद आहे. श्रीगणेशाचे समग्र दर्शन या गणपती अथर्वशीर्षामधून दिसते. विशेषतः, मूळ ब्रह्मस्वरूपातच यामध्ये गणेशाला नमन केलेले आहे. ‘त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि’ किंवा ‘त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि’ असे संबोधून गणेशाचे सर्वव्यापी, गुणत्रयातीत, कालत्रयातीत, अवस्था त्रयातीत स्वरूप वर्णिले आहे. तैत्तिरीय आरण्यकात ‘तत्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दन्तिः प्रचोदयात॥’ असा मंत्र आहे. वैदिक साहित्यात रुद्र आणि गणेश ही नावे अनेक वेळा एकाच अर्थी वापरलेली आहेत. पुत्र हा पित्याचेच एक रूप असतो, असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. तैत्तिरीय संहितेतील एका मंत्रात म्हटले आहे की, ‘हे रुद्रा, उंदीर हा तुझा पशू आहे.’ (तै.सं.1.8.6) वराहपुराणातही म्हटले आहे की, विनायकाला शिवाने उत्पन्न केले व विनायक हा साक्षात रुद्रच आहे. सौरपुराणातही तसाच उल्लेख आढळतो. वराहपुराणात गणेश ‘विघ्ननाशक’ कसा बनला याचे वर्णन आहे. शिवाच्या देहातून प्रतिरुद्रच असा विनायक व अनेक विनायकगण उत्पन्न झाले. विनायकगण हे विघ्नरूप होते; पण त्यांचे अधिपत्य विनायकाला देण्यात आले व तो विघ्नहर्ता ठरला. ‘विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा। संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते॥’ असा एक प्रसिद्ध श्लोक आहे. त्याचा अर्थ ‘विद्यारंभ, विवाह व इतर संस्कार, प्रवेश, प्रवास, संग्राम व संकटकाळ यावेळी जो विघ्नेश गणपतीचे पूजन वा स्मरण करील, त्याचे विघ्न दूर होईल.’ अशा प्रकारे अग्रपूजेचा मान मिळवलेला विनायक हा विघ्ननाशक तसेच भक्तांना अभीष्टसिद्धी प्राप्त करून देणारा सिद्धिविनायकही बनला. ‘गणेशपुराण’, ‘मुद्गलपुराण’ हे गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असून, त्यामध्ये श्रीगणेशाचे अवतार व लीलांचे वर्णन केलेले आहे. ‘महाभारत’ हा ग्रंथ वेदव्यासांनी सांगितला आणि त्याच्या प्रत्येक श्लोकाचा, कूटश्लोकाचा अर्थ ध्यानी घेत श्रीगणेशाने तो लिहून घेतला, असे वर्णन पुराणांमध्ये आहे.
अथर्ववेदाच्या गणपती अथर्वशीर्षामध्ये श्रीगणेशाचे मूर्तिध्यान सांगितलेले आहे. एकदंत, चतुर्भुज, पाश व अंकुश धारण करणारा, एका हातात तुटलेला दात धारण करणारा व दुसर्या हाताची वरदमुद्रा असलेला, ज्याचा ध्वज मूषकचिन्हांकित आहे असा, रक्तवर्ण, लंबोदर, सुपासारखे कान असलेला, लाल वस्त्रे परिधान केलेला, अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप लावलेला, लाल पुष्पांनी पूजिलेला, भक्तांवर दया करणारा, असे श्रीगणेशाचे ध्यान यामध्ये सांगितलेले आहे. ‘गं’ हा गणेशाचा बीजमंत्र आहे. चतुर्थी ही गणेशाची प्रिय तिथी आहे. शुक्ल पक्षातील चतुर्थीला ‘विनायकी चतुर्थी’ व कृष्ण पक्षातील चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. या दोन्ही तिथींना गणेशाचे व—त सांगितले आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला ‘गणेश चतुर्थी’ म्हटले जाते व ती गणेश उपासनेमधील प्रमुख तिथी आहे. या चतुर्थीमध्येही एक सुंदर तात्त्विक अर्थ दडलेला आहे. चतुर्थी म्हणजे जागृती-स्वप्न-सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडची चौथी ‘तुरीया’ अवस्था. ही तुरीया अवस्था प्राप्त करणे हेच सर्व जीवांचे परमसाध्य आहे. गणेश चतुर्थीला चंद्र पाहत नाहीत. चंद्र ही मनाची संतती मानले जाते. मनाचे ज्यावेळी उन्मन होईल, त्यावेळीच ही तुरीयावस्था प्राप्त होते. मोक्षाच्या मार्गात मनाचाच अडथळा असतो व तो दूर झाला की आत्मदर्शन होते, असा त्याचा अर्थ! तोच आत्मस्वरूपी श्रीगणेश सर्वांच्या अंतर्यामी विद्यमान आहे. योगमार्ग असो किंवा तंत्रमार्ग असो, सर्वत्र गणेशाचे अधिष्ठान आहे. सात चक्रांपैकी पहिल्या मुलाधार चक्राची देवता गणेश आहे. विशेष म्हणजे, या चक्राचे स्वरूप चार पाकळ्यांचे व गणेशाला प्रिय असे लाल रंगाचे आहे. दुर्वा, शमी व मंदार या तीन वनस्पती गणपतीला प्रिय आहेत. औदुंबर वृक्षाच्या तळी जसा भगवान दत्तात्रेयांचा वास असतो तसाच मंदार वृक्षतळी गणेशाचा वास असतो, असे मानले जाते. गणपतीला दुर्वा व शमी वाहिली जाते. गूळ-खोबरे किंवा गूळ-खोबर्यापासूनच बनवलेले मोदक गणेशाला प्रिय नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.
कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी कार्य निर्विघ्नपणे सिद्धीस जावे, यासाठी गणेशवंदना केली जाते. ग्रंथारंभीही गणेशस्तवन करण्याची प्राचीन परंपरा आहे. संतसाहित्यामध्येही ग्रंथारंभी कार्यसिद्धीसाठी गणेशवंदना केलेली आढळते. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ज्ञानेश्वरीत अतिशय सुंदर अशी गणेशवंदना लिहिलेली आहे. ‘ओम नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरुपा॥ देवा तूचि गणेशु। सकलार्थमतिप्रकाशु। म्हणे निवृत्तिदासु। अवधारिजो जी॥’ अशा गणेशवंदनेने ज्ञानेश्वरीचा प्रारंभ होतो. ज्ञानोबारायांनी गणेशाला यामध्ये ‘आत्मरूपा’ असे संबोधत त्याला आत्मस्वरूपातच वर्णिले आहे. संत नामदेवांनी म्हटले आहे, ‘प्रथम नमन करु गणनाथा। उमाशंकराचिया सुता। चरणावरी ठेवुनि माथा। साष्टांगी आता दंडवत॥’ पुढे ते म्हणतात, ‘प्रथम नमू गजवदनु। गौरीहराचा नंदनु। सकळ सुरवरांचा वंदनु। मूषकवाहनु नमियेला॥’ (नामदेवांची अभंगगाथा). ‘दासबोध’ या ग्रंथात समर्थ रामदासांनी गणेशस्तवन करताना लिहिले, ‘ओम नमो जि गणनायेका। सर्वसिद्धिफळदायेका। अज्ञानभ—ांतिछेदका। बोधरुपा॥’ संत एकनाथांनी भागवताच्या अकराव्या स्कंधावरील आपल्या टीकेच्या प्रारंभी लिहिले, ‘नमन श्रीएकदंता। एकपणे तूचि आता। एकी दाविसी अनेकता। परी एकात्मता न मोडे॥’ एकमेवाद्वितीय आत्मस्वरूपातच त्यांनीही गणेशाचे असे वर्णन केले आहे. ‘श्रीरामचरितमानस’च्या प्रारंभी संत तुलसीदासांनी लिहिले आहे, ‘जो सुमिरत सिधि होइ गन नायक करिबर बदन। करउ अनुग्रह सोइ बुद्धि रासि सुभ गुन सदन॥’ (ज्यांचे स्मरण केल्याने सर्व कार्ये सिद्ध होतात, जे गणांचे नायक आणि सुंदर गजमुख असलेले आहेत, तेच बुद्धीची रास असलेले व शुभ गुणांचे धाम श्रीगणेश माझ्यावर कृपा करोत’.) विशेष म्हणजे, शिव-पार्वतीच्या विवाहावेळीही गणेशस्तवन झाले होते असे त्यांनी म्हटले असून, देवता या अनादि असतात, असे त्याचे स्पष्टीकरणही दिलेले आहे. हा दोहा असा ः ‘मुनि अनुसासन गनपतिहि पूजेउ संभु भवानि। कोउ सुनि संसय करै जनि सुर अनादि जियँ जानि॥’
देशभरात श्रीगणेशाची अनेक मंदिरे आहेत व प्रत्येकाचे वेगवेगळे माहात्म्य आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरे देश-विदेशातील भक्तांची श्रद्धास्थाने आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात गणेशाची विविध रूपे आढळतात. नेपाळ, श्रीलंका अशा शेजारी देशांबरोबरच आशियातील अनेक देशांमध्ये गणेशाची विविध रूपे दिसतात. चीन, तिबेटमध्ये प्राचीन गणेशमूर्ती व त्यांची वर्णने आढळतात. जपानमध्ये गणेशाला ‘कांगितेन’ असे नाव आहे. तिथे त्रिमुखी गणेशाच्याही मूर्ती आढळतात. इंडोनेशियात तर आजही गणेशाचा प्रभाव दिसून येतो. तेथील ज्वालामुखीच्या काठावर भक्तांच्या संरक्षणासाठी आणि नोटेवर अर्थव्यवस्थेच्या रक्षणासाठीही गणपतीबाप्पा विराजमान आहेत, हे विशेष! थायलंडमध्ये गणेशाला ‘फ्ररा फिकानेत’ म्हटले जाते. तिथेही हा गणेश विघ्ननाशक व सर्वमंगलकारी स्वरूपातच आहे. कंबोडियात चतुर्मुखी गणेशाच्या मूर्तीही पाहायला मिळतात. या सर्वव्यापी, ब्रम्हस्वरूपी श्रीगणेशाला नमन!