

लोकसंस्कृतीचे आणि दिवाळीचे नाते अतूट आहे. म्हणूनच अनेक जानपदगीतांतील दिवाळी हरखून टाकणारी असते. आंब्याचे टाळ, झेंडूच्या फुलांच्या माळा, गेरूने आणि चुन्याने सजवलेले कोनाडे, त्यातले दिवे, गावच्या अंधाराच्या कुशीतील पणत्यांच्या रूपाने सुरू झालेली तेजाची पूजा म्हणजे दिवाळी! जानपदगीतांतील स्त्रीचा संवाद कधी आपला आपल्याशी, कधी आपल्या समष्टीशी, कधी आपल्या कुटुंबाशी, तर कधी निसर्गाशी असतो. बहिणाबाईंनी याच संवादाला ‘हिरीताचं देणं घेणं’ असं म्हटलं आहे...
संत, पंत आणि तंत यांनी महाराष्ट्राचा लोकधर्म घडविला. पिढ्यान्पिढ्यांचे संस्कार मुखर झाले ते संत साहित्यातून, पंत साहित्यातून आणि तंत साहित्य म्हणजे शाहिरांकडून आलेले. या तिन्ही संस्थांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील अनेक गोष्टी टीपकागदाने शाई टिपावी तशा टिपून घेतल्या. इतकंच नव्हे, तर त्याला जानपद साहित्याचं सुवर्णकोंदण दिलं. दिवाळीसारखा सणही या संत, पंत आणि तंत परंपरेनं प्रेमाने जपून ठेवला. संत ज्ञानेश्वरांनी दिवाळीचं वर्णन करताना ‘ज्ञानेश्वरीत’ म्हटलं आहे -
‘सूर्ये अधिष्ठिली प्राचीश्र
जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची ।
दिवाळी करी ॥’
संत तुकाराम महाराजांनीदेखील ‘साधुसंत घरी येणे म्हणजेच दिवाळी आहे’ असं म्हटलं आहे -
‘दसरा दिवाळी तोची आम्हा सण ।
सखे संतजन भेटतील ॥
अमूप जोडील्या सुखाचिया राशी ।
पार या भाग्यासी नाही आता ॥
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा ।
पिकली हे वाचा रामनामी ॥
तुका म्हणे काय होऊ उतराई ।
जीव ठेवू पायी संतांचिया ॥’
दिवाळीचं महत्त्व संतांनी अशा पद्धतीने अधोरेखित केलं असतानाच लोकसंस्कृतीतील लोकवाङ्मयानेदेखील ते पिढ्यान्पिढ्या जपून त्याचं संवर्धन केलं ते जात्यावरच्या ओव्यांच्या रूपाने अथवा दिवाळीत साजर्या होणार्या विविध गीतांच्या माध्यमातून. खरं म्हणजे दिवाळी हा सर्जनाचा सण. कृषी संस्कृतीत हे सर्जन धनधान्याच्या रूपाने प्रगट होतं -
‘आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे,
करू काम स्मरू नाम मुखी राम हरी रे,
नाचतीया पोर सोर बागडती गुरढोर
मोत्याची रास आली खळ्यावरी रे’
दसर्याच्या सुमारासच मोत्याच्या राशी खळ्यावर यायला सुरुवात होते. दसरा म्हणजे जणू दिवाळीचा पूर्वरंग. दसर्यालाच झेंडूच्या फुलांच्या माळांनी घर सजतं. खुरासणीच्या फुलांनी घटस्थापनेत माळा चढविल्या जातात. आदिमायेची पूजा प्रथम दसर्याला सुरू होते आणि या पूजेचा संस्कार पुढे दिवाळीतही सुरू राहतो. भगवान शंकराची पार्वती. तिची आदिमाया, दुर्गा, महिषासुरमर्दिनी, अन्नपूर्णा, जगदंबा, दशभूजा, सिंहवाहिनी, काली, मुक्तेश्वरी, जगत्गौरी, तारा, छिन्न मस्तका, गणेश नंदिनी अशा विविध रूपांत पूजा बांधली जाते. दसर्यापासून हा शक्तिदेवतेचा उत्सव सुरू होतो आणि तो सर्जनाचं सर्व वैभव घेऊन येतो. घरोघर मातीचे घट, मातीचे दिवे, शेतातून उगवलेलं धान्य, त्याची घटाभोवती पखरण, खुरासणीच्या पिवळ्या फुलांनी सजलेला घट, गव्हाच्या लोंब्या आणि अहोरात्र तेवणारे अखंड दिवे. ही दिव्यांची आरास दिवाळी आली की, उत्तरोत्तर अधिक रंगत जाते. दिवाळी शक्तिदेवतेची, पंचमहाभूतांची, बळीराजाची, यमदेवाची. दसर्याचा उत्साह पुढे आश्विनी शुद्ध पौर्णिमेला म्हणजे कोजागरी पौर्णिमेला चंद्राच्या कलेप्रमाणे वर्धिष्णू होतो. कोजागरीला लक्ष्मीची पूजा करून तिला आवतन द्यायचं आणि रात्री तिच्या स्वागतासाठी सज्ज राहायचं. दिवाळी केवळ माणसांचीच नाही, तर गायीगुरांचीही.
गायीगुरांना चोळूनमोळून आंघोळ घालायची, त्यांना ओवाळायचं आणि त्यांच्या मुखी पुरणपोळीचा घास घालायचा. टिपर्या-काठ्यांच्या नादात गायीगुरांची रंगभोगाची पूजा मांडलेली असायची. वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत हा तेजाचा सोहळा लोकसंस्कृतीत सुरू असतो. पान ख वरून दिवाळी हा ज्योतीने तेजाची आरती ओवाळावी असा तेजाचा आरतीचा उत्सव आहे. पंचमहाभूतांची म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांची पूजा दिवाळीत विविध प्रतीकांद्वारे केली जाते. दिवाळी तसा सर्जनाचा उत्सव असतो. कारण, मोत्याचं पीक खळ्यावर आलेलं असतं. अशा या तेजाच्या आणि सर्जनाच्या उत्सवाच्या विविध परी लोकसंस्कृतीत पाहायला मिळतात. दिवाळीच्या वेळी नातेसंबंधातील विविध रंगीबेरंगी गोफ विविध ओव्यांमधून गुंफले जातात.
पाडवा आणि भाऊबीज यासंदर्भात अनेक जानपदगीतं आजही ग्रामीण स्त्रियांच्या ओठी असतात. भावाशी लाडाने आणि लटक्या रागाने बोलणारी बहीण दिवाळीच्या निमित्ताने त्याला बजावते,
‘दिवाळीच्या दिशी तुझं दिवाळं काढीन
गायी खुट्याची सोडीन, चोळी अंजिरी फाडीन’
इतकी का बरं भावावर रागावली आहे त्याची बहीण? कारण तो तिला माहेरी न्यायला लवकर आलेला नाही. एका बाजूला ‘बघतेच तुला’ असे म्हणून भावाच्या खुट्याची गाय सोडू पाहणारी बहीण, दुसरीकडे मात्र ‘आपला कामाचा पसारा वाढलेला आहे, जरा उशिराच न्यायला ये’ असे सांगते -
‘दिवाळी-दसरा माझ्या कामाचा पसरा
सांगते बंधू माझ्या मूळ धाडावा उशिरा’
‘मूळ’ म्हणजे ‘मुर्हाळी.’ मुर्हाळी उशिरा पाठव, असे ती भावाला सांगते. या मुर्हाळीला चार युक्तीच्या गोष्टी सांगायलाही बहीण मागेपुढे पाहत नाही,
‘मुर्हाळ्या माझ्या दादा, घोडं बांधावं जाईला
सोयर्याला रामराम, मग भेटावं बाईला’
बहिणीकडे आलेलं हे शहाणपण ‘कॉलेज ऑफ कॉमनसेन्स’मधून आलेलं असतं. कोशातील शब्द मृत असू शकतात; पण बोलीभाषेतील शब्द जिवंत असतात. ओवीगीतांची भाषा उच्चारात व प्रयोगात लवचीक असते. ती व्याकरणाचे बंधन झुगारून आपल्या आंतरिक उर्मीने शब्दांच्या उच्चारांच्या व अर्थाच्या क्षेत्रात अधिक मोकळीक घेऊन म्हणजेच भाषेतील शब्दांना आपल्या मनासारखे वाकवून त्यांच्याद्वारे मनातील भावना व्यक्त करते. भाजी-भाकरीच्या पाव्हण्याचं कौतुक बहिणीला असतं. ‘दिन दिन दिवाळी’ या गाण्याची अनेक रूपं लोकसाहित्यात पाहायला मिळतात. त्यातलं एक रूप असं -
‘दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ववाळी
गाई कुणाच्या
लकषुमणाच्या’
तुळस, दिवे, रांगोळ्या, तसंच भाऊबीज आणि पाडव्यासंबंधीची अनेक वर्णनं आपणास जानपदगीतात पाहायला मिळतात. जशा की,
‘तुळस वंदावी वंदावी
माऊली संताघरी साऊली’
तुळशीचा महिमा नेमक्या दिवाळीच्या वेळी गाण्याचं कारण दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नाचा माहोल सुरू होतो. ज्ञानेश्वरांनी वासुदेवाच्या तोंडी असणार्या ओव्या सांगितल्या आहेत. त्याची सुरुवातच अशी आहे -
‘घुणघुणा वाजती टाळ । झणझणा नाद रसाळ ।
टाळटाळी लोपला नाद । अंगोअंगी मुरला छंद ।’
असा हा ज्ञानदेवांचा वासुदेव.
दिवाळीत तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. दिवाळीच्या दरम्यान केवळ गावात नव्हे, तर मुंबई-पुण्यासारख्या शहरांमधूनदेखील रंगावली प्रदर्शने आयोजित केली जातात. गावाकडे रंगावली दर्शन असतं, तर शहरात प्रदर्शन असतं. चुनखडीच्या शुभ्र चुणीने, त्याचप्रमाणे विविध रंगांचं साहाय्य घेऊन सारवलेल्या जमिनी व वेलपत्ती, स्वस्तिक, अष्टदल इत्यादी प्रतीकं, पदचिन्हं, चंद्र, सूर्य, सर्वती-भद्रादी मंडलं, विविध कोनात्मक आकृत्या इत्यादी काढतात. त्याला रंगावली म्हणतात. याच रंगावलीला बंगालमध्ये ‘अल्पना’, बिहारमध्ये ‘अलिपन’, राजस्थानात ‘मांडवा’, उत्तर प्रदेशात ‘चौकापूर्ण/सोतारेख, ‘कजली’, गुजरातमध्ये ‘साथिया-साथियो, कर्नाटक-महाराष्ट्रात ‘रांगोळी’, आंध्र प्रदेशात ‘मुग्गू’, तामिळनाडूमध्ये ‘कोलम’ असं म्हणतात. तर केरळी लोकांनी हिचं ‘पूविडल’ असं नामाभिधान केलं आहे.
हल्ली नागर संस्कृतीत ‘दिवाळी पहाट’ आली आहे. लोकसंस्कृतीत दिवाळी पहाट म्हणजे मंदिरातल्या काकड आरतीपासून सुरू झालेला टाळा-मृदंगांचा गजर. राम प्रहरात हा गजर सुरू झालेला असायचा. आजही कार्तिकी एकादशीपूर्वी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा गजर सुरू असतो. दिवाळीत किल्ले करण्याची संकल्पना शिवकालापासून सुरू झालेली असावी. दिवाळीत गुराख्यांची गाणीदेखील रंगत असायची. त्यात प्रश्नोत्तरं असायची ती अशी -
‘वाकडी तिकडी बाभळ
त्याच्यावर बसला होला
इकडून दिला टोला
बेदरला गेला...’
लोकसंस्कृतीतील जानपदगीतात दिवाळी अशी ठायी ठायी दिसते. कारण, या जानपदगीतांतील स्त्रीचा संवाद कधी आपला आपल्याशी, कधी आपल्या समष्टीशी, कधी आपल्या कुटुंबाशी, तर कधी निसर्गाशी असतो. बहिणाबाईंनी याच संवादाला ‘हिरीताचं देणं घेणं’ असं म्हटलं आहे. दिवाळीत हे ‘हिरीताचं देणं घेणं’ करंजीसारखं गोड आणि चिवड्यासारखं खुमासदार वाटतं.