Flying Car | आले फ्लाईंग कारचे युग

era of the flying car has arrived
Flying Car | आले फ्लाईंग कारचे युग
Published on
Updated on

महेश शिपेकर, वाहन उद्योगाचे अभ्यासक

एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे. प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या नवनवीन आविष्कारांचा नित्य नवा अनुभव अवघं जग घेत आहे. फ्लाईंग कार किंवा हवेत उडणार्‍या चारचाकी हा आविष्कार यापैकीच एक! आजवर पॅराशूट, विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन हवेत उडताना पाहिले आहेत; पण 2026 पर्यंत जगभरातील अनेक कंपन्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लॅडिंग (व्हीटीओएल) श्रेणीतील मोटार तयार करतील, असा अंदाज आहे.

मानवाच्या कल्पनाशक्तीने विज्ञानाला नेहमीच दिशा दिली आहे. शतकानुशतकं माणूस जमिनीवरून आकाशाकडे पाहत राहिला आणि त्या आकाशात झेप घेण्याचं स्वप्न पाहत राहिला. हेच स्वप्न प्रथम विमानांच्या रूपाने साकारले आणि आता त्याच स्वप्नाचा पुढचा टप्पा म्हणजे ‘उडणारी कार’ किंवा ‘फ्लाईंग कार’. विज्ञानकथांमध्ये, चित्रपटांत आणि कल्पनारम्य कथांमध्ये आपण अशा कार पाहिल्या होत्या; पण आता त्या कल्पना प्रत्यक्ष वास्तवात उतरू लागल्या आहेत. आगामी काळात आपल्या शहरांवरून फ्लाईंग कार उडताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये. अनेक परकी कंपन्यांकडून फ्लाईंग मोटारीबाबत चाचपणी केली जात आहे. आपल्याकडेदेखील यासंदर्भात जोरात तयारी सुरू आहे. भविष्यात फ्लाईंग कारचा प्रयोग यशस्वी ठरला, तर प्रवाशांचा नवा प्रवास अनोखा आणि वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, यात तिळमात्र शंका नाही.

उडणारी कार म्हणजे काय, हा प्रश्न सामान्यतः सर्वप्रथम मनात येतो. साध्या भाषेत सांगायचे झाले, तर ही अशी कार आहे जी जमिनीवर चालू शकते आणि आवश्यकतेनुसार आकाशात उड्डाण करू शकते. म्हणजेच ती एकाच वेळी विमान आणि कार या दोन्हींचे गुणधर्म बाळगणारी यंत्रणा आहे. तिच्यामध्ये ‘व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग’ (व्हीटीओएल) क्षमता असते. म्हणजे ती धावपट्टीशिवाय थेट वर उड्डाण करू शकते आणि थेट जमिनीवर उतरू शकते. अर्थात, त्याचा वापर अजून सुरू झालेला नाही. या मोटारी सध्या प्रायोगिक तत्त्वावर , चाचणीच्या पातळीवर आणि नियामक संस्थेची मंजुरी, टेस्ट फ्लाईटच्या टप्प्यातून जात आहेत; मात्र आगामी काळात चीन, जपान, अमेरिका आणि युरोपातीलदेशांच्या आकाशात या मोटारींची भाऊगर्दी झालेली दिसेल.

अनेक पातळ्यांवर तयारी

2026 पर्यंत जगभरातील अनेक कंपन्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लॅडिंग (व्हीटीओएल) श्रेणीतील मोटार तयार करतील, असा अंदाज आहे. कारण, या कंपन्यांच्या फ्लाइंग मोटारींची प्रगती महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. काही देश आणि कंपन्यांनी नव्या श्रेणीतील मोटारींची यादी सोशल मीडियावर जारी केली आहे. सध्या जगभरातील वेगवेगळ्या देशांतील सुमारे अडीचशे कंपन्या फ्लाईंग टॅक्सी किंवा व्हीटीओएल प्रकल्पावर काम करत आहेत. काही प्रायोगिक तत्त्वावरच्या मोटारी हवेत उड्डाण करत आहेत, तर काही मानवी पायलटसह किंवा काही ठिकाणी अनमॅन्ड तंत्रावर उड्डाणे करत आहेत. उदा. तुर्कियेत सिजेरी याची प्रायोगिक मोटार आणि जपानमध्ये स्काय ड्राईव्हच्या प्रायोगिक मोटारीने हवेत उड्डाण केल्याची नोंद झाली आहे. अनेक कंपन्यांनी एअर टॅक्सी सुरू करण्याची व्यावहारिक योजना आखली आहे, तर काही देशांनी सर्टिफिकेशनची प्रक्रियादेखील सुरू केली आहे. सांगण्याचा अर्थ, जमीन, हवा या दोन्ही ठिकाणी दिसणार्‍या मोटारी सध्या सर्वसामान्यांच्या गॅरेजमध्ये नसल्या, तरी संपूर्ण जगभरात त्यावर प्रचंड काम केले जात असून त्याचीच चर्चा सुरू आहे. या श्रेणीतील मोटारींचे उज्ज्वल भवितव्य पाहता जगभरातील मोठे उद्योगपती या श्रेणीतील वाहनांत गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत.

अनेक कंपन्या सक्रिय

आजघडीला विकसित देशांतील अनेक कंपन्या रस्त्यावर धावणार्‍या आणि आकाशात उडणार्‍या मोटारीची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. अमेरिकेतील जॉबी एव्हिएशनने ‘एफएए’कडून एअर करिअर प्रमाणपत्र मिळवले आहे आणि डेल्टा एअरलाईन्ससमवेत भागिदारी केली आहे. याप्रमाणे आर्चर एव्हिशनने देखील युनायटेड एअरलाईन्सकडून दहा दशलक्ष डॉलरची ऑर्डर मिळवली आहे. जेस्ट नावाची एक व्यक्तिगत पातळीवर उडविण्यात येणारी मोटारदेखील अमेरिकेत विकसित होत असून त्याची किंमत 1 लाख 28 हजार डॉलर आहे. या मोटारीसाठी चालकाची गरज नाही. त्याचवेळी चीनची एक्स्पेंग एरोहॉट ही अनमॅन्ड फ्लाईंग मोटार ही नियामक संस्थेकडून प्रमाणपत्र मिळवणारी पहिली कंपनी ठरली आहे. या कंपनीने लँड एअरक्राफ्ट करिअर नावाची मॉड्युलर कार विकसित केली असून त्यात एक फोल्डेबल ‘इव्हीटीओएल’ आहे. टीकॅब टॅग कंपनीने इ-20 नावाची मानवयुक्त इव्हीटीओएल विकसित केली आहे. याप्रमाणे ब्राझीलच्या इव्ह एअर मोबिलिटी, जपानची स्काय ड्राईव्ह आणि जर्मनची लिलीयम बोलोकॉप्टर कंपनीनेदेखील उड्डाण करणार्‍या मोटारींचा विकास सुरू केला आणि या मोटारी आकाशात आणि जमिनीवर चालण्यासाठी सज्ज केल्या जात असताना त्याची चाचणी आणि अपग्रेडेशन प्रक्रिया केली जात आहे. सद्यस्थितीत काल्पनिक वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी विकसित देशांतील डझनभर मोटारी हवेत उडण्याचा सराव करत असून सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास त्या ‘ट्रेंड’ केल्या जात आहेत.

फ्लाईंग मोटार चर्चेत

काही दिवसांपूर्वी हवेत उडणार्‍या दोन मोटारींची धडक झाली आणि त्यात मोठी दुर्घटना झाली होती. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेने फ्लाईंग मोटारीची चर्चा सुरू झाली. तसेच चीनच्या जिलीन येथे दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी चांगचुन एअर शोदरम्यान एक्स्पेन एरोहॉटच्या दोन ‘व्हीटीओएल’ एकमेकांना धडकल्या. या धडकेत एक प्रवासी जखमी झाला; मात्र या अपघातामुळे व्हीटीओएल मोटारींच्या होणार्‍या घटनांची चर्चा सुरू झाली; पण प्रारंभिक टप्पा असल्याने अशा प्रकारच्या घटना होण्याची शक्यता अधिक असते. कालांतराने त्या अधिक सुरक्षित होतीलच. त्यामुळे हवेत उडणार्‍या मोटारी आता कॉमिक बुक किंवा हॉलीवूडपटापुरतीच मर्यादित राहिलेल्या नसून आगामी काळात मानवी जीवनाचा भाग बनणार आहेत. याअनुषंगाने आपत्कालीन सेवा, पर्यटनसारख्या क्षेत्रात या वाहनांचे प्रस्थ वाढू शकते.

सुरक्षेचा प्रश्न

हवेत उडणार्‍या मोटारींचे दोन अपघात पाहिले, तर त्यांच्या सुरक्षाविषयक बाबींवर गांभीर्याने प्रश्न उपस्थित राहत आहेत. अर्थात, अपघाताच्या घटनेमुळेच या मोटारीची चर्चा होत आहे असे नाही, तर आणखी काही घटकांमुळे चर्चेला हवा मिळत आहे. म्हणजे आता नवीन मॉडेल नवीन जीवनशैलीला पूरक ठरवताना नव्या शहरांची गरज म्हणूनही पाहिले जात आहे. कारण, भविष्यात वाहतूक कोंडीत अडकून पडायला लोकांकडे वेळ नसेल. त्यामुळे फ्लाईंग मोटार काही मिनिटांतच इच्छीत स्थळी नेण्याचे काम करणार आहे आणि त्यामुळे वेळ आणि पैसा वाचेल; पण या मोटारीबाबत केवळ सुरक्षाच नाही, तर उड्डाण आणि लँडिंगची परवानगी हादेखील कळीचा मुद्दा राहणार आहे. यावर सध्या नियोजनबद्धरीत्या योजना आखली जात आहे. वाहतूक नियम, वैमानिकाला प्रशिक्षण, बॅटरी रिलायबिलिटी यासारख्या समस्या वेळीच मार्गी लावल्या, तरच उड्डाण घेणार्‍या मोटारींत अडथळे येणार नाहीत. अन्यथा त्या पुस्तकातच राहतील. तूर्त 2030 पर्यंत जगभरातील मोठ्या शहरांतील आकाश हे मोटारींनी व्यापलेले असेल, हे निश्चित!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news