हवामान बदल, वाढत्या प्रदूषणामुळे शेतकर्यांना पेरणीचा काळ निवडण्याबाबत संभ्रम राहतो. मात्र, एआयच्या मदतीने शेतकर्यांना हवामानाच्या अंदाजाचे आकलन करत त्याचे विश्लेषण करणे आणि त्यानुसार लागवडीचे नियोजन करता येणे शक्य होत आहे. तसेच कोणते पीक घ्यावे अणि पेरणी कधी करावी, याचा आराखडा तयार करता येतो. लवकरच कृषी क्षेत्रात एआय रोबोटिक्सचा प्रवेश होणार असून, तो आपल्या हातात शेती आणि शेतकर्यांच्या कामाचे नियंत्रण ठेवेल, यात शंका नाही.
वर्तमान जगात असे कोणतेच क्षेत्र राहिले नाही की, ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा वापर केला जात नाही. आरोग्य, शिक्षण, औद्योगिक क्षेत्र, अगदी शेतीसारख्या पारंपरिक कामातही एआय तंत्रज्ञान सक्रिय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बारामती येथे त्याची प्रायोगिक चाचणी झाली असून, ती यशस्वी ठरली आहे. त्यामुळे लवकरच रोबो फार्मरची एंट्री होईल. आजमितीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हा जगभरात चर्चेचा विषय आहे. ज्या क्षेत्रात एआयचा सर्वाधिक वापर होतो, ते क्षेत्र आधुनिक मानले जाते. एआयच्या मदतीने रुग्णावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे कोणी म्हटले, तर कोणी घाबरणारदेखील नाही आणि तो काही गडबड करेल, अशी शंकाही मनात उपस्थित होत नाही. उलट माणसाच्या तुलनेत एआय रोबो कौशल्याने काम पार पाडेल, असेच सर्वांना वाटते आणि रुग्णदेखील निश्चिंत राहतो. एकुणातच एआयवरची वाढती विश्वासार्हता त्याच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहे. त्याचे नाव घेताच आपल्या डोळ्यांसमोर उच्च प्रतीचे आणि कौशल्यप्राप्त तंत्रज्ञानाचे चित्र येते.
गेल्यावर्षीच्या शेवटच्या महिन्यापासून यावर्षीच्या प्रारंभी पुणे जिल्ह्यातील बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या (एडीटी) सुमारे 75 हजार एकर जमिनीवर ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट आणि एटीडी यांनी एकत्र येऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याचे सकारात्मक परिणाम हाती लागले. विविध प्रकारच्या पेरण्या, पिकांची देखभाल, कापणी किंवा छाटणीपर्यंतचे सर्व काम एआयच्या माध्यमातून पूर्ण केले आणि एआयने केवळ पिकांची चांगल्यारीतीने पेरणी केली नाही, तर सर्व शेतीकामे सहजपणे करणे शक्य असल्याचे सिद्ध झाले. रोबोच्या माध्यमातून शेतीकामात उच्च दर्जाचे तंत्रज्ञान हाताळणे खूपच सोपे आहे.
एआयच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने बारामतीतील कृषी प्रकल्पात विविध पिकांचे उत्पादन घेण्यात आले. या तंत्रज्ञानानुसार रोपट्यात, जमिनीत विविध प्रकारचे सेन्सर बसविले गेले आणि त्यांनी पिकाच्या प्रत्येक स्थितीची माहिती दिली. पिकाला पाणी कधी हवे आहे, किती हवे आहे. किती खत हवे, रोपट्यांना किती आणि कसे तापमान हवे, अशा प्रकारची बारीकसारीक गोष्टींची माहिती शेतकर्यांना एआय तंत्रज्ञान उपग्रह आणि संगणकाच्या मदतीने देते. मातीतील नायट्रोजन, फॉस्फरससारख्या पोषक तत्त्वांव्यतिरिक्त तापमान, हवेची गती, वार्यातील आर्द्रता रोपट्यांच्या निकोप वाढीसाठी किती गरजेची आहे, याचीही इंत्थभूत माहिती दिली जाते. या सर्व गोष्टींना कशा प्रकारे हाताळावे, हेदेखील समजते. एआय तंत्रज्ञान शेतकर्यांना तसेच शेतीकामावर लक्ष ठेवणार्या संशोधक व्यावसायिकांना शेतीतील सर्व प्रकारची माहिती देते. एआय सेन्सरच्या मदतीने रोपट्यांच्या सर्व गरजा भागविल्या जातात आणि त्यामुळे पिकाची वाढ अधिक जोमाने आणि लवकर होते.
बारामतीच्या एआय सिस्टीमने शेतीकाम नियंत्रित केलेले असताना तेथे बसविलेल्या संगणकाने दर अर्ध्या तासाला जमीन आणि जमिनीबाहेरील हवेत होणार्या बदलाची माहिती सेन्सरच्या माध्यमातून उपग्रहाला पाठविली आणि उपग्रहाने एआय, सॉफ्टवेअरयुक्त संगणकाला पाठविली. या माहितीच्या आधारे मातीत किती पाणी द्यायचे, किती खते द्यायची, यासारखी माहिती दिली. यानुसार शेतकर्यांनी काम केले आणि या प्रयत्नांतून त्यांच्या हाती कधी नव्हे ते एवढे पीक पडले. मात्र, सध्या प्रायोगिक प्रोजेक्टनुसार शेती केली जात आहे. त्यात केवळ एआयच सामील नाही, तर एआय तंत्रज्ञानाची माहिती असणारे तज्ज्ञ, शेतकर्यांचादेखील समावेश आहे. कारण, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीची वेगवेगळी माहिती गोळा केली जाते आणि तो संपूर्ण डेटा संगणकाला पाठविण्यात येतो. त्याचे आकलन करत शेतकरी, तज्ज्ञ मंडळी शेतीची कामे करण्याची सूचना देतात.
सामान्यपणे हवामानाचा अंदाज, हवामान बदल, वाढत्या प्रदूषणामुळे शेतकर्यांना पेरणी करण्याचा काळ निवडण्याबाबत संभ्रम राहतो आणि ती बाब आव्हानात्मक आहे. मात्र, एआयच्या मदतीने शेतकर्यांना हवामानाच्या अंदाजाचे आकलन करत त्याचे विश्लेषण करता येऊ शकते आणि त्यानुसार लागवडीचे नियोजन करता येणे शक्य आहे. तसेच कोणते पीक घ्यावे अणि पेरणी कधी करावी याचा आराखडा तयार करता येतो. शेवटी लवकरच कृषी क्षेत्रात एआय रोबोटिक्सचा प्रवेश होणार असून, तो आपल्या हातात शेती आणि शेतकर्यांच्या कामाचे नियंत्रण ठेवेल, यात शंका नाही. परिणामी, या तंत्रज्ञानामुळे निरीक्षक किंवा नियंत्रक ठेवण्याची गरज राहणार नाही. कालांतराने एआय तंत्रज्ञान रोबोच्या रूपातून स्वत: शेती करताना दिसेल. एआय ज्याप्रमाणे अन्य क्षेत्रात चमत्कार करत आहे, तसाच चमत्कार शेतीकामातही करण्याची शक्यता दिसत आहे.
कृषी क्षेत्रात एआय अॅप्लिकेशन हे उपाय सांगण्याबरोबरच शेतकर्यांना पाणी व्यवस्थापन, पिकाचे चक्र, वेळेवर कापणी, पिकांचे प्रकार, किडीचा प्रादुर्भाव आदी बाबतीत सल्ला देण्याचे काम करतात. एआय आधारित व्यवस्था हवामानाचा अंदाज वर्तवितात. उपग्रह आणि ड्रोनच्या मदतीने फोटो घेण्यासह तापमान, पाऊस, वार्याची गती, उष्णता यासारख्या गोष्टींचा डेटा गोळा केला जाईल. कीटकांचा, किडीचा पिकांवर होणारा परिणाम आणि खराब होणार्या पिकांच्या स्थितीची माहितीदेखील गोळा केली जाईल.