Third Wave Of Corona : धोका तिसऱ्या लाटेचा | पुढारी

Third Wave Of Corona : धोका तिसऱ्या लाटेचा

तिसरी लाट ( Third Wave Of Corona ) देशभर एकाच वेळी येऊ शकत नाही. सुरुवातीला अन्य शहरांपेक्षा प्रमुख आणि मोठी शहरे अधिक प्रभावित होऊ शकतात. लहान जिल्हे आणि ग्रामीण भारतात काही आठवड्यांच्या विरामानंतर संसर्गग्रस्तांची संख्या वाढणे शक्य आहे. तथापि, संसर्ग कधी आणि किती प्रमाणात होईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी तयार असणे आवश्यक आहे.

नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस कोव्हिड 19 च्या रुग्णसंख्येत घट झाली होती आणि अनेकांना आशा होती की, लवकरच जनजीवन पूर्वपदावर येईल. परंतु ओमायक्रॉनने जवळ जवळ सर्व काही बदलून टाकले आणि आता संसर्ग होणार्‍यांची संख्या दररोज वाढत आहे. भारतात दररोज सुमारे 35,000 रुग्णसंख्या नोंदविली जात आहे. केवळ दोनच आठवड्यांत ही दैनंदिन रुग्णसंख्या पाच पटींनी वाढली आहे. दोन आठवड्यांपूर्वी ती 7,000 होती. राष्ट्रीय पातळीवर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट (टीपीआर) दोन टक्क्यांच्या पुढे गेला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये संसर्गाची वेगवान वाढ होत आहे. या दोन्ही शहरांनी अनुक्रमे पाच टक्के आणि पंधरा टक्के एवढा टीपीआरचा आकडा पार केला आहे. ( Third Wave Of Corona )

भारतात अधिकृतरीत्या केवळ 1700 ओमायक्रॉन रुग्णांची पुष्टी झाली असली, तरी तज्ज्ञांच्या मते, सध्याचे बहुतांश (50 ते 80 टक्के) रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत. जरी सार्स कोव-2 च्या सर्व प्रकारांची पुष्टी आरटी-पीसीआर चाचणीने होऊ शकत असली, तरी ते ओमायक्रॉन, डेल्टा किंवा इतर कोणत्या प्रकारातील विषाणू आहेत हे जाणून घेण्यासाठी जनुकीय अनुक्रम (जिनोम सिक्‍वेन्सिंग) आवश्यक आहे. एकंदर जेवढे जनुकीय अनुक्रम शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत, त्यात ओमायक्रॉनचा वाटा वेगाने वाढत आहे. ( Third Wave Of Corona )

दिल्लीतील सर्व रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत. दक्षिण आफ्रिका, ब्रिटन आणि इतर देशांच्या अनुभवांचा विचार करता लवकरच ओमायक्रॉन विषाणू भारतभर डेल्टा विषाणूची जागा घेईल, अशी भीती आहे. गेल्या सहा आठवड्यांत ओमायक्रॉनबद्दल भरपूर शास्त्रीय डेटा समोर आला आहे आणि याबाबत असलेली एकंदर समज वाढली आहे. ओमायक्रॉन डेल्टापेक्षा तीन ते चार पट अधिक वेगाने पसरणारा विषाणू आहे. म्हणजेच डेल्टाद्वारे बाधित एक व्यक्‍ती दुसर्‍या व्यक्‍तीस संसर्गग्रस्त करू शकत असल्यास ओमायक्रॉनचा संसर्ग झालेली व्यक्‍ती तीन ते चार व्यक्‍तींना संसर्गग्रस्त करू शकते. ( Third Wave Of Corona )

सुदैवाने ओमायक्रॉन हा व्हेरियंट सौम्य आजारास कारणीभूत ठरतो. विशेषतः पूर्वी ज्यांना संसर्ग होऊन गेला आहे किंवा कोव्हिड 19 प्रतिबंधक लसीकरण ज्यांचे पूर्ण झाले आहे, त्यांना फक्‍त सौम्य संसर्ग होण्याची शक्यता आहे. मागील कोव्हिड 19 संसर्ग आणि लसीकरणामुळे रोगाचा धोका कमी होतो. लसीकरण न केल्यास धोका अधिक असतो; परंतु लसीकरण केले तरी संसर्ग होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेकडून आपण आणखी एक धडा शिकायला हवा तो म्हणजे ओमायक्रॉनची रुग्णसंख्या खूपच लवकर वाढते आणि तितक्याच वेगाने ती कमीही होते. सामान्यतः दोन ते तीन आठवड्यांत ही गोष्ट घडून येते. संसर्गग्रस्तांची संख्या वाढलेली असूनही रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी राहते.

या वाढत्या ट्रेंडवरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, दिल्ली (दिल्लीसाठी ही पाचवी लाट असेल) आणि मुंबईत एक नवीन लाट येईल. भारतासाठी नव्या लाटेचे हे प्रारंभिक लक्षण आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे; परंतु रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. निवडक भागांत खूप वेगाने प्रकरणे वाढू शकतात; पण त्यामुळे रुग्णालयांवर फारसा ताण पडेल अशी भीती नाही. तसेच तिसरी लाट देशभर एकाच वेळी येऊ शकत नाही. सुरुवातीला अन्य शहरांपेक्षा प्रमुख आणि मोठी शहरे अधिक प्रभावित होऊ शकतात.

लहान जिल्हे आणि ग्रामीण भारतात काही आठवड्यांच्या विरामानंतर संसर्गग्रस्तांची संख्या वाढणे शक्य आहे. तथापि, संसर्ग कधी आणि किती प्रमाणात होईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी तयार असणे आवश्यक आहे. अलीकडेच 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या वयोगटातील 7.4 कोटी किशोरवयीन मुले लसीसाठी पात्र ठरतात. त्यानंतर दहा जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोव्हिडविरुद्धच्या लढाईतील बिनीचे शिलेदार आणि 60 वर्षांपेक्षा अधिक वयांच्या व्याधीग्रस्त व्यक्‍तींना तिसरा डोस दिला जाईल.

लसीकरणामुळे गंंभीर आजाराचा धोका टळतो आणि रुग्णालयात दाखलही व्हावे लागत नाही. तथापि, संसर्ग रोखण्यात लसींची भूमिका अत्यंत मर्यादित स्वरूपाची आहे. त्यामुळे संपूर्ण लसीकरणदेखील एखाद्या व्यक्‍तीला संसर्ग होणार नाही, याची हमी देऊ शकत नाही. संसर्ग टाळण्यासाठी नाक आणि तोंड झाकणारा मास्क वापरणे आवश्यक आहे. अनावश्यक प्रवासही टाळायला हवा. एखाद्याला भेटणे आवश्यक असेल तर बंदिस्त जागेऐवजी मोकळ्या ठिकाणी भेटणे चांगले. सध्या आपण आशावादी राहू शकतो, अशी परिस्थिती आहे.

मोठ्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. परंतु सर्वच शहरांमध्ये संसर्ग वाढत आहे. अर्थात रुग्णांचे एकूण राष्ट्रीय प्रमाण फार जास्त असू शकणार नाही. कोव्हिड 19 संसर्गाला आजारापासून वेगळे करण्याचा हेतू असा की, रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांची संख्या कमी राहू शकते. काही शहरांमध्ये रुग्णालयांच्या आरोग्यसेवेवर त्याचा दबाव असू शकतो. परंतु दुसर्‍या लाटेत आपण जसे पाहिले तसा त्याचा परिणाम होणार नाही. प्रत्येकाने वैयक्‍तिक स्तरावर खबरदारी घेणे आणि कोव्हिडरोधी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची ही वेळ आहे. विशेषतः ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे, तेथे काटेकोरपणे नियम पाळले गेले पाहिजेत.

कोव्हिडचे दोन्ही डोस सर्वांनी घेतले पाहिजेत आणि अधिक खबरदारी घ्यायची असेल तर पात्र व्यक्‍तींनी तिसरा डोसही घेतला पाहिजे. काही लक्षणे दिसल्यास लगेच चाचणी केली पाहिजे. चाचणी होण्यास उशीर होत असल्यास मास्क सातत्याने वापरला पाहिजे आणि चाचणीचा अहवाल येईपर्यंत लोकांना भेटणे टाळले पाहिजे. उच्च धोका असलेल्यांनी स्वतःचे संरक्षण करण्याची वेळ आता आलेली आहे. सरकारच्या तयारीचा आढावा घ्यायचीही वेळ आली आहे. काही निर्बंध लावावे लागतील. तथापि केवळ दैनंदिन नवीन रुग्णसंख्या हा निकष नसावा आणि निर्णय घेताना रुग्णालयात दाखल होण्याचा दर विचारात घेतला पाहिजे.

आर्थिक घडामोडींमध्ये समतोल राखणे आणि निर्बंधांचा गरिबांवर परिणाम होणार नाही, याची खात्री करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. निर्बंध राज्यव्यापी न लादता, ते स्थानिक पातळीवर प्रदेश-विशिष्ट असावेत. सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट केली पाहिजेत. त्या ठिकाणी लोक तपासणीसाठी जाऊ शकतात आणि आवश्यकतेनुसार चाचणीही करू शकतात. येत्या काही दिवसांत देशात कोव्हिड 19 चे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सतर्क राहण्याची गरज आहे. पण घाबरण्याची गरज मात्र नाही. प्रत्येकाने योग्य पद्धतीने कोव्हिड नियमावलीचे पालन केल्यास ही लाट कमीत कमी परिणामांसह संपुष्टात येईल. या लाटेचा मुकाबला करण्याच्या प्रक्रियेत आपण सर्वांनी आपापली भूमिका योग्यरीत्या बजावली पाहिजे.

डॉ. चंद्रकांत लहरिया
साथरोगतज्ज्ञ

Back to top button