नव्या जाणिवांचे साहित्य | पुढारी

नव्या जाणिवांचे साहित्य

प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार किरण गुरव, प्रणव सखदेव यांना जाहीर झाले आहेत. नागरसंवेदना, अनोखी कल्पिते आणि आधुनिकोत्तर जाणिवांचे कथन प्रणव सखदेव यांच्या लेखनात आहे; तर सर्वस्वी नवी ताजी वाटावी अशी अनागर जीवनाची कथा किरण गुरव यांनी लिहिली आहे. नव्या पिढीतील लेखकांच्या लेखनवैशिष्ट्यांचा परिचय करून देणारा लेख.

गेल्या दोन दशकांत मराठी कथेने नवे रूप धारण केले आहे. चिंचोळ्या आशयाची मराठी कथा आता बहुमुखी झाली आहे. रंगनाथ पठारे, राजन गवस, सतीश तांबे, जयंत पवार, नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर, आसाराम लोमटे, किरण गुरव यांनी मराठी कथेचा नवा रूपबंध घडविला आहे. विशेष बाब म्हणजे जयंत पवार, आसाराम लोमटे यांच्या नंतर आता किरण गुरव यांच्या कथासंग्रहास साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.किरण गुरव यांच्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’ व ‘श्रीलिपी’ हे संग्रह एकाच वर्षी प्रकाशित झाले आणि या कथासंग्रहांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले. सर्वस्वी नवी ताजी वाटावी अशी अनागर जीवनाची कथा त्यांनी लिहिली. त्यांच्या कथेतील जीवनाशय, वातावरण आणि कथनाने वाचकांना खिळवून ठेवले आहे. आजच्या काळाचे धु्रवीकरण, खंडितता, गुंते, ताणतणाव आणि लगतच्या मानवी सद्भावाची सृष्टी वेगाने लुप्‍तप्राय होते आहे. त्याचे सखोल दर्शन घडविणारी कथा त्यांनी लिहिली. जागतिकीकरण काळाचे पेच आणि सामान्य माणसाचे हरवललेपण कथांमधून त्यांनी समरसून मांडले आहे. आल्हाददायक वाटावी अशी उपमान सृष्टी, मिश्कील निवेदनद‍ृष्टी व प्रदेश बोलीचा संपन्‍न आविष्कार या कथेत आहे. त्यांच्या ‘सांगण्या’चा बंध हा दीर्घकथेचा आहे. मानवी जीवनातील मूलभूत भावनेला साक्षात करण्याची अद्भुत किमया किरण गुरवांच्या कथेत आहे. मानवी वर्तन स्वभावामागे दडलेल्या इच्छांचे गारूड ते कथारूपात सहजपणे पेरतात. वाचकांच्या त्यांच्या जाणिवेचा गडद पुनःप्रत्यय देणारा व त्याचा विस्तार करणारा कथाबंध ते घडवत आहेत.

‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या संग्रहात तीन दीर्घकथा आहेत. त्या अभिनव अशा आहेत. या त्रिवेणी कथांमधून महत्त्वाची आशयसूत्रे प्रकटली आहेत. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या कथेत खेडेगावातील एक सामान्य व्यक्‍ती कुटुंबासह त्याच्या तरुण मुलाला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमासाठी शहरात प्रवेश घेण्यासाठी जाण्याच्या प्रवासाचे विलोभनीय चित्र आहे. गावातून शहरात आलेल्या कुटुंबाच्या ‘वावरण्या’तून आणि शहरपाहणीतून गाव तसेच शहरातील भिन्‍नता आणि खेड्याविषयीचा सद्भाव आहे. संपूर्ण कथेत उपहासविनोदाच्या शैलीचे अजब रसायन आहे. तरुण मुलाच्या मिश्कील निवेदनातून शहर व कुटुंब न्याहाळणीचा नजारा पेश केला आहे. तो अद्भुत वाटावा असा आहे. गुरव यांच्या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे तपशिलांचा भरगच्चपणा, तसेच स्थळ, द‍ृश्ये, प्रसंग, घटना, वर्तन व भावना संवेदनांचा घनदाट प्रत्यय देणारी त्यांची शैली आहे. एखाद्या शहराचा एवढा उभा-आडवा तपशील नकाशा रेखाटणारी ही मराठीतील अपवादात्मक कथा आहे. त्यामुळे त्यांच्या कथनाला सजीव सचित्रता प्राप्‍त होते. अनुभव-भावसंवेदनांचा भरगच्च प्रत्यय देणे हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य ठरते.

मानवी जगण्यातले अवस्थांतरणाचे जग आणि या गतीत खूप काही हरवल्याची जाणीव गुरव यांच्या सर्वच कथेत केंद्रीय स्वरूपात आहे. अचंबित वाटणारी शहरी भौतिक सृष्टी व त्यांच्या वागणुकीबरोबर गावाकडील ‘असते’पणाच्या विरोधद्वंदातून त्यांची कथा घडली आहे. हा फरक भैतिक सृष्टीबरोबर मूल्यद‍ृष्टीचा देखील आहे. ‘भरपूर काय तरी कायमचं आपण मागं टाकलेलं आहे किंवा कायमचं आपल्यापासून दूर गेलेलं आहे’, या हरवलेपणाची गडद जाणीव त्यांच्या सबंध कथाविश्‍वाला लगडून आहे.

‘इंदूलकर ः चरित्र, काळ आणि निर्मिती यांची अन्वेषणकथा’ या कथेत लोकविलक्षण असा प्रत्यक्षता आणि कल्पिताचा ‘कथाखेळ’ रचला आहे. कथेतल्या कथेत अनेक कथा आहेत. कथाप्रवाह वाचकांना निवेदनात सहभागी करून कथा ‘रचतो’ आहे. वाचक इंदूलकरबरोबर त्या कथेचा कधी भाग होऊन जातो ते कळत देखील नाही. कथा एकाच वेळी तीन पातळ्यांवर घडविली आहे. ऑफिसकथा, घरकुटुंबकथा व स्वप्नकथा अशा तिहेरी दर्शनबिंदूत ती घडते. एकाच व्यक्‍तिमत्त्वाच्या आत दुहेरी व्यक्‍तिमत्त्वे नांदत असतात. त्याच्या वर्तन स्वभावावर या दोन्ही व्यक्‍तिमत्त्वाचे ताण असतात. ऑफिस काळ हा अंगावर येणारा काळ आहे. या द्वंद्व प्रतिमांतून काळवेग साक्षात केला आहे. घरकुटुंबावकाशात घरातील व गावाकडील ताणतणाव आहेत. आणि स्वप्नमालिकेत ‘आतले’ आणि ‘बाहेर’च्या विश्‍वातील ताण आहे. ताणमुक्‍तीची ही कथा आहे. मध्यान्हीचा दिवस अणि मध्यान्हीची रात्र एकदम दिसावी तसे होते. तारेवरील जीवघेण्या कसरती कराव्या लागणार्‍या आजच्या माणसाची ही कथा आहे.

‘बाजार ः दि मार्केट’ या कथेत जागतिकीकरणाचा काळाचा गडद असा प्रभाव आहे. ग्राहककेंद्री बाजाराचे आसुरी कथन आहे. एका खेड्यातील आठवडी बाजाराचे दिलखेचक निवेदन आहे. विविध भाज्या, फळे, कपडे, दुकाने, विविध आवाजाच्या रंग-गंध-संवेदनांबरोबर रंगात आलेल्या बाजारात एक वेडा मार्केटिंगचे फंडे ओरडून ओरडून सांगत आहे. या कथेत पराभूत माणसाचे केविलवाणे करुणचित्र रेखाटले आहे. गुरव यांच्या कथेत अस्वस्थ कालांतरण आणि अवस्थांतरणांच्या पाठीमागे भूतकाळाचा आनंदसोहळारूपी जगाचा पडदा आहे. तो पुन्हा पुन्हा अनावृत्तपणे उसळी मारून साकार होतो. हिरवंगार रान, पखरण घालणारे निळंशार आभाळ, भैरीचा डोंगर, चांदणं, घर, झाडंपेरं, लिंगोबा-म्हसोबाचा डोंगर,आईचे हाकारे अशा ‘बळेवंत’ निसर्गाची हाक आहे. ती ‘वांझोट्या आणि भाकड वर्तमानकाळापासून बाजूला झाली आहे’ याचा व्याकूळ आठवणपट त्यांच्या कथेत आहे. भूतकाळातील सर्व तर्‍हेचा सुकाळ आणि वर्तमानातील दुष्काळाची ही कथा आहे. त्यात मूल्यद‍ृष्टी आहे. ‘नव्या शहरी नेपथ्याच्या घरकुटुंबात पोरांना सद्यःस्थितीत आईचे पाठीवरून भरड हात फिरवण्यातील त्रिकालाबाधित आशय समजेल का?’ अशा भावजाणिवेची ही कथा आहे. काळ व मूल्यांतरणाची ही कथा आहे. त्यात वेगवान बदलाची पडझडचित्रे आहेत. नात्यांचा भूतकाळ आणि वर्तमानातील विभागणीची ही कथा आहे. गावपरिसर ही त्याची ‘विसावा सृष्टी’ आहे. याचबरोबर किरण गुरवांची कथा अनेकवचनी कथा आहे. तिच्यात कथनाचा चित्तवेधकपणा आहे.

जुन्या कथेतील अलंकरणसृष्टीचे नूतनीकरण आहे. कोल्हापूर-राधानगरीची भूमिकथा म्हणून ती वेगळी ठरते ती तिच्यातील घनदाट आशय समृद्धतेमुळे. कोल्हापूर भूमी परिसरातील सजीव ध्वनी रूपांचा, बोलींचा लखलखाट आणि चमचमाट त्यांच्या कथेच्या पानोपानी आहे.त्यामुळे किरण गुरव यांचे कथावाङ्मय मौलिक आणि महत्त्वपूर्ण ठरते.

‘कोसला’ कादंबरीने तरुणांच्या जगाची नवी दिशा मराठी कादंबरीला दाखवली. त्या वाटेवरून महाविद्यालयीन जगाचा नकाशा पुढे अनेक कादंबरीकारांनी आणला. नागरसंवेदना, अनोखी कल्पिते आणि आधुनिकोत्तर जाणिवांचे कथन सखदेव यांच्या लेखनात आहे. ‘काळे कोरडे स्ट्रोक्स’ या त्यांच्या कादंबरीत आजच्या महानगरातील महाविद्यालयीन तरुणांची भावकहाणी चित्रित केली गेली आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या आयुष्यातील घडामोडींतून नव्या जगाची दिशा, गती आणि मानवी स्वभाव कादंबरीत प्रकटले आहेत. त्यास महानगरीय जीवनाचे संदर्भ आहेत. मास कॉमला प्रवेश घेतलेल्या तरुणाच्या जीवनातील तीन वर्षांच्या काळातील घडामोडींचे चित्रण या कादंबरीत आहे. समीर आणि त्यांच्या जिवलग मित्र-मैत्रिणीचे एक खुले जग कादंबरीत प्रातिनिधिक स्वरूपात आहे.

सानिकाचा मित्र चैतन्य अपघातात मरण पावतो. या मरणाचा तिला धक्‍का बसतो. पुढे समीर व सानिकात मैत्री निर्माण होते. सानिका अचानक परागंदा होते. पुढे समीर सलोनी नावाच्या तरुणीच्या सहवासात येतो. तिच्यात गुंततो. तीही मामाबरोबर न्यूझीलंडला निघून जाते. तो एकाकी होतो. मानवी नात्यातील सोबतीचा शोध सबंध कादंबरीभर आहे. या पात्रांवर मरणाचे ओझे देखील आहे. कुटुंबातील मित्राच्या मृत्यूमुळे आलेले एकाकीपण आणि त्यातून अस्तित्वाची परिमाणे व गुंते अधोरेखित केली आहेत. कादंबरीत महाविद्यालयीन वातावरणातील खुलेपणा व मोकळीकतेचे चित्रण आहे. आधीच्या पिढीतील मध्यमवर्गीय ताण आणि ओझ्यातून बाहेर पडलेल्या पिढीचे जगणे कादंबरीत आहे. तरुणांचे बिनधास्त जग आहे. खाण्या-पिण्यापासून लैंगिक संबंधातील मोकळेपणाचा अवकाश कादंबरीत आहे. त्यामुळे हॉटेल्स, पब, बारमधील तरुण-तरुणींच्या मुक्‍त वावराने कादंबरीचा अवकाश गजबजलेला आहे. सानिका आणि चैतन्य, समीर आणि सानिका, समीर आणि सलोनी, मी आणि विजीत, समीर आणि पिअर, समीर आणि अरुण या तरुण पात्रांच्या भावविश्‍वातून कादंबरीतील कथन आकाराला आले आहे.

मैत्रभावाचा वा नात्यांच्या शोध हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावरील निराशेचा, उदासीनतेचा स्वर कादंबरीभर आहे. एका अर्थाने जीवनातील काळ्या करड्या स्ट्रोक्सचे हे चित्रण आहे. लैंगिक जीवनातील अनेक कंगोरे त्यामधून ध्वनित झाले आहेत. समीरचा हा अस्तित्व शोध मुंबई, मुळशी व हिमाचल प्रदेशातील मॅकलीओडगंज अशा तिहेरी स्थळावकाशातून साकारला आहे. महानगर, प्राकृतिक जंगल व पहाडी प्रदेशातील या शोधात प्राकृतिक वाटाव्या अशा जंगलभागातील फार्म हाऊसवर समीर जातो. तेथील ओला वारा, लाटांचा नाद, बैलांचे आवाज, हिरवा वास व औदुंबराची सळसळ या पार्श्‍वभूमीवर आदिम शांतता त्याला भावते. यातही त्याच्या एकाकी अवस्थेला विविध परिमाणे लाभली आहेत. कादंबरीत आजच्या तरुणांचे समांतर विचारव्यूह आहेत. अरुण या मित्राच्या निमित्ताने ‘लाईफ खुल नाटक’ आहे. किंवा ‘माणसाच्या आयुष्यात हिडन फाईल्स’च जास्त असतात. अशा अनेक गुंत्यांचा शोध कादंबरीत आहे. ‘सगळ्या फिलॉसॉफीपेक्षा जगण्याला पैसा लागतो. तरायचं असेल तर वाहतं राहावं लागते’ या जाणिवेचे चित्र आहे.
‘काळेकरडे स्ट्रोक्स’ कादंबरीचे निवेदन प्रथम पुरुषी आहे. समीरच्या नजरेतून तीन वर्षांतील घटना-घडामोडींचे चित्रण केलेआहे. त्याचबरोबर पात्रांपात्रांमधील संवादाच्या मितीने त्यास वेगळी परिमाणे लाभली आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी संवाद भाषेच्या छटा आहेत. नव्या काळाचे संभाषित म्हणून मेल संभाषितचा व ‘एसएमएस’चा उपयोग आहे. लोकपरंपरेतील चिमणी-कावळा-ससाणा आणि कान्होबाच्या गोष्टींचा कल्पक उपयोग केला आहे. शारीर अनुभवाचे व तरुणांच्या खासगी आयुष्याचे धीट चित्रण कादंबरीत आहे. महाविद्यालयीन तरुणाच्या नात्यांचा शोध आणि त्यातल्या हरवलेपणाची जाणीव या कादंबरीत केंद्रस्थानी आहे. मनाच्या उदास निराश अवस्थेत ‘चमकत्या अंधाराच्या दिवसांची, जिच्या फण्यावर, हिंदोळतोय, तुझ्या माझ्या नात्यांचा आस’ अशा उदास केऑसचे गडद असे चित्र आहे.

संजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या बालकादंबरीचा साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मान झाला आहे. संस्कारक्षम आणि प्रेरक ठरावी अशी विनूची हृद्य कथा या कादंबरीत आहे. आजच्या समाजाचे भविष्यचित्र दर्शविणारे हे कथारूप मराठीत अप्रुप ठरावे असे आहे. या तीनही साहित्यकृतींनी मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे.

  • प्रा. रणधीर शिंदे

Back to top button