World Cup 1983 : भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट - पुढारी

World Cup 1983 : भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट

ध्येय, आत्मविश्‍वास आणि धाडस काय असते हे दाखवत कपिल देवने भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेत भारतीय संघाची ( World Cup 1983 ) दखल घ्यायला भाग पडले. नंतरच्या काळात भारतीय संघाच्या दिमाखदार कामगिरीने 83 चे यश हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिले. 83 च्या विजयाने भारतीयांना मोठी स्वप्ने बघायची शिकवण दिली ही सर्वात महत्त्वाची बाब म्हणता येईल.

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबई विरुद्ध कर्नाटक रणजी सामना बघायला मी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर गेलो होतो. या मैदानाला स्टेडियमसारखे स्टँडस् नाहीत. तेव्हा प्रेक्षकांची अपेक्षाच नव्हती आणि तसेही हल्ली रणजी करंडकाच्या सामन्यांना प्रेक्षक कुठे असतात. त्या दिवशी मात्र त्या सामन्याला मला दोन प्रेक्षकांची साथ होती. एक म्हणजे मुंबई क्रिकेटचे गाढे अभ्यासक, प्रख्यात क्रीडा समीक्षक डॉ. मकरंद वायंगणकर आणि दुसरे प्रेक्षक होते भारताचे माजी गोलंदाज, 1983 च्या विश्‍वचषक ( World Cup 1983 ) विजेत्या संघाचे सभासद बलविंदरसिंग संधू. बलविंदरसिंग संधूंची अजून एक ओळख आता सर्वांना माहीत झाली आहे ती म्हणजे कबीर खानच्या ‘83’ सिनेमासाठीचे ते प्रमुख सल्लागार होते. समोरच्या मैदानातल्या सामन्यात मुंबईची वाताहत लागत असल्याने आम्हा मुंबईकर प्रेक्षकांना सामना बघवत नव्हता. या संधीचा फायदा घेऊन मी बलविंदरसिंग संधू यांच्याशी गप्पा मारल्या. विषय होता तो अर्थात 1983 चा विश्‍वचषक ते चित्रपट ‘83’.

भारताने 1983 चा विश्‍वचषक ( World Cup 1983 ) जिंकला तेव्हा तो बलाढ्य वेस्ट इंडिजला हरवून आपण जिंकू शकतो हा आत्मविश्‍वास कर्णधार कपिल देव सोडला तर कुणा इतर भारतीयांत होता असे मला वाटत नाही. भारतीय नागरिक सोडाच; पण आपल्या विश्‍वचषकाच्या संघातही तो नव्हता. जेव्हा कपिलने तो जागवला तेव्हाच इतिहास घडला. त्या विश्‍वचषकाच्या सुरुवातीला 1975 आणि 1979 च्या सुमार कामगिरीनंतर भारताला कुणी खिजगणतीतही धरत नव्हते. तेव्हा कुणी भारताला फेव्हरिट वगैरे म्हटले असते तर त्याच्या क्रिकेटच्या ज्ञानाची कीव केली गेली असती. साहजिकच मला तो इतिहास आणि त्या निमित्ताने 83 चित्रपटाविषयी संधूंकडून जाणून घ्यायचे होते. भारताच्या वेस्ट इंडिजसाठी मामुली असणार्‍या 183 धावांचा पाठलाग करताना पहिले खिंडार पाडले ते बलविंदरसिंग संधूंनी. ग्रिनीजला चकवणारा चेंडू संधूंना नवी ओळख देऊन गेला. माझ्याशी बोलताना ते गमतीत म्हणाले, माझ्या कारकिर्दीत मी अजूनही बळी मिळवले आणि काही तर त्याहून उत्तम चेंडूंवर. मला चटकन अमजद खानची आठवण आली. अमजद खानने अनेक भूमिका केल्या; पण ओळख कायमची राहिली ती गब्बरची. संधू आणि ग्रिनीजचे नाते असेच काहीसे म्हणावे लागेल.

आमच्या गप्पांची गाडी आता हळूहळू 1983 ( World Cup 1983 ) कडून ‘83’कडे यायला लागली होती. मुळात क्रिकेटवर सिनेमा बनवणे हे महाकठीण काम आहे. आपल्या देशात क्रिकेट हा धर्म आहेच; तेव्हा क्रिकेटवरच्या चित्रपटात जर कलाकार हे क्रिकेटपटू वाटले नाहीत तर ती धर्माची विटंबना ठरते. संधू मला गप्पा मारताना कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल भरभरून सांगत होते. विशेषतः रणवीर सिंगने कपिलदेव बनण्यासाठी जी मेहनत घेतली त्याला तोड नाही. संधूंनी त्यांच्या तयारीचे काही व्हिडीओ मला दाखवल्यावर या चित्रपटाबद्दल माझी उत्सुकता अजूनच वाढली. 10 एप्रिल 2020 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाने त्याचे प्रदर्शन दीड वर्ष लांबवले. कबीर खानला तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलिज करायचा नव्हता. कारण हा भीम पराक्रम बघायला मोठा पडदाच योग्य व्यासपीठ होते. चित्रपट बघताना हे तंतोतंत पटते.

खरं तर या चित्रपटाची कथा काय आहे हे सर्वांना माहीत आहे. तरीही हा चित्रपट गुंगवून ठेवतो. कबीर खानने मोठ्या कल्पकतेने खर्‍या खेळाडूंच्या प्रतिमा आणि पडद्यावरचे कलाकार यांची सांगड घातली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला पासपोर्टच्या माध्यमातून खेळाडूंची ओळख करून देण्याची कल्पकता दाखवली असली तरी या कथेत दिग्दर्शकाला क्रिएटिव्ह लिबर्टी घेण्याचे कुठे फारसे स्वातंत्र्य नव्हते. आज जी चाळीशी पार केलेली मंडळी आहेत, त्यांना तर प्रत्येक सामन्याचा धावफलकही तोंडपाठ आहे. ते सर्व जसेच्या तसे उभे करताना नुसते कलाकार खेळाडूंसारखे दिसून चालणार नव्हते. यामुळेच कलाकारांच्या निवडीबरोबर त्यांना त्या त्या प्रत्येक खेळाडूंच्या सवयी, लकबी आणि मुख्य म्हणजे त्यांच्यासारखे खेळताना दिसणे गरजेचे होते. कपिलदेवचा नटराज शॉट तसेच अफलातून इंग्लिश, श्रीकांतची नको तिथे डोळे मिचकवायची सवय, वेंगसरकरचा कव्हर ड्राईव्ह किंवा गावस्करचे नुसते चालणेही तसेच्या तसे यायला पाहिजे होते. हे जर का जमले नसते तर चित्रपट वास्तवाशी विसंगत झाला असता. यातला एक खेळाडू रणजीपटू होता. पण बाकीचे सगळे गल्लीपर्यंतच खेळलेले होते. तेव्हा यांची एक कलाकार म्हणून मेहनत आणि ती करून घेणार्‍या बलविंदरसिंग संधूंचे कौतुक करावे तितके थोडेच.

खेळांवर आधारित आता बरेच चित्रपट बॉलीवूडमध्ये बनले आहेत. पण त्यात आणि ‘83’मध्ये फरक आहे तो म्हणजे ‘83’साठी दिग्दर्शकाला कथा फुलवायला विशेष वाव नव्हता. कारण ‘83’च्या विजयाबाबत कुठलीही छेडछाड आपण सहन केली नसती. हा विजय निव्वळ विजय नव्हता किंवा विश्‍वचषक मिळवणे नव्हते तर हा विजय म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर दाखवलेल्या विश्‍वासाचे प्रतीक होता. आपणही विश्‍वविजयी बनू शकतो हा आत्मविश्‍वास देणारा विजय होता. जेव्हा क्रीडा पत्रकार एकाच दिवशी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला धावले तेव्हा झिम्बाब्वे विरुद्ध भारत सामन्यात 5 बाद 17 अशा अवस्थेत असताना कपिलदेवने इतिहास घडवत भारताला विजय तर मिळवून दिलाच; पण आपण इथे आलोय ते विश्‍वचषक जिंकण्यासाठी हे सांगत आपल्या सहकार्‍यांचे डोळे उघडले. भारतीय संघ जेव्हा इंग्लडला गेला होता तेव्हा जमले तर काही विजय मिळवून इंग्लंडच्या उन्हाळ्याचा आस्वाद घ्यायचा इतकीच माफक अपेक्षा होती. बहुतांशी खेळाडूंनी तर पुढे अमेरिकेत फिरायला जायचेही तिकीट काढले होते. कपिलदेवने ध्येय्य, आत्मविश्‍वास आणि धाडस काय असते हे दाखवत भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेत भारतीय संघाची दखल घ्यायला भाग पडले. याच मनोवृत्तीवर आपण पुढे गावस्करच्या नेतृत्वात 1985 ची वर्ल्ड सीरिज चॅम्पियनशिप जिंकत ‘83’ हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिले.

या विजयाने मुख्य काय केले असेल तर भारतीयांना मोठी स्वप्ने बघायची शिकवण दिली. हाच विजय बघत एके दिवशी विश्‍वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचा भाग असायचे स्वप्न शाळकरी सचिन तेंडुलकरने बघितले आणि पुढे 38 वर्षे ते स्वप्न बाळगत पूर्ण केले. भारताने या 83 च्या विजयानंतर अनेक स्पर्धा जिंकल्या. 2011 चा विश्‍वचषक जिंकला, 2007 चा ट्वेंटी-ट्वेंटी विश्‍वचषक जिंकला. या विश्‍वविजयांचे महत्त्व तितकेच आहे; पण 83 च्या विजयाचे काकणभर जास्त आहे. कारण या विजयाने पुढच्या विजयाची स्वप्ने रचली.
‘अंथरुण पाहून पाय पसरावे’ ही आपली शिकवलेली मध्यमवर्गीय मनोवृत्ती असते. पण भारतीय क्रिकेट जगतात मोठे अंथरुणही आपण मिळवू शकतो याचा विचार करायला कपिलदेवने शिकवले. हा बदल घडवायला जितकी परिश्रमांची गरज असते, तितकीच मानसिकतेची गरज असते. एकदा का ही आवाक्याबाहेरची गोष्ट एका जिद्दी माणसाने साधली की, आपोआप इतरांनाही ती साध्य वाटायला लागते. एकेकाळी 1 मैल अंतर चार मिनिटांत धावायचे आव्हान अशक्यप्राय होते. कुणी त्याच्या वाटेला जायचेच नाही. रॉजर बॅनिस्टरने 1954 साली 3 मिनिटे 59 सेकंदात एक मैल धावून दाखवले. तेव्हापासून अचानक हे आव्हान पेलण्यासारखे वाटायला लागले आणि आतापर्यंत 1400 पेक्षा जास्त धावपटू यापेक्षा कमी वेळात धावले आहेत. क्रिकेटबाबत बोलायचे तर एकदिवसीय सामन्यात द्विशतक हे अशक्यप्राय वाटायचे. जेव्हा 2010 साली तेंडुलकरने पहिल्यांदा काढले. त्यानंतर 7 द्विशतके एकदिवसीय सामन्यात काढली गेली. तेंडुलकरने तो भोज्जा शेवटच्या षटकात गाठला. पण पुढे रोहित शर्माने 264 करून दाखवल्या. तेव्हा 1983 चा विश्‍वचषक हा संत तुकारामांच्या ‘असाध्य ते साध्य, करीत सायास, कारण अभ्यास तुका म्हणे’ या अभंगाला साजेसा होता. यात अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा सायास, प्रयास, प्रयत्न, सराव, मेहनत सर्व काही आले.

आज क्रिकेटमध्ये पैसा आला आहे, तंत्रज्ञान आले आहे, फिटनेस आणि आहार तज्ज्ञ आहेत, प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करून डावपेच रचायला डेटा उपलब्ध आहे. यामुळे क्रिकेट सोपे झाले आहे असे नाही; पण तयारीला पूरक अशी बरीच मदत उपलब्ध आहे. पण जेव्हा निव्वळ जिद्दीच्या जोरावर इतिहास बदलता येतो याचे दुसरे कुठले उत्कृष्ट उदाहरण 1983 च्या आपल्या विश्‍वचषक विजयाइतके नसावे.

आजच्या ज्या तरुण पिढीने 1983 चा तो थरार अनुभवला नसेल, त्यांनी हा चित्रपट पाहायलाच पाहिजे. खरे तर या विषयावर चित्रपट खूप आधीच यायला पाहिजे होता. पण कबीर खानच्या ‘83’ने सर्व इतिहास फार सुंदर रीतीने पुन्हा जागवला. नुकताच कपिलदेव 6 जानेवारीला 63 वर्षांचा झाला. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम केले असतील; पण कृतार्थतेचा क्षण कुठला असेल तर तो विश्‍वचषक लॉर्डस्च्या मैदानात स्वीकारल्याचा. त्या अंतिम सामन्यात हरल्यावर वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लाईव्ह लॉईड म्हणाला होता, भारतीय क्रिकेटचे आगमन झाले आहे आणि ते दीर्घ काळासाठी असेल. लॉईडची भविष्यवाणी खरी ठरली.

  • निमिष वा. पाटगावकर

Back to top button