रिहाना : बार्बाडोसची राष्ट्रनायिका - पुढारी

रिहाना : बार्बाडोसची राष्ट्रनायिका

तब्बल 396 वर्षांनंतर बार्बाडोसची ब्रिटिश राजवटीतून सुटका झाली. आपल्या या नव्या राष्ट्राची नायिका म्हणून बार्बाडोसने पॉपस्टार रिहानाला निवडलं आहे. कधीकाळी बार्बाडोसच्या रस्त्यांवर बेल्ट विकणारी रिहाना आता राष्ट्रनायिका म्हणून जगासमोर आली आहे.

गेली 396 वर्षं ब्रिटिश राजवटीखाली असलेल्या बार्बाडोसला नोव्हेंबरमध्ये स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देण्यात आला. बार्बाडोसला कागदोपत्री स्वातंत्र्य 1966 मध्येच मिळालं होतं. पण तेव्हा देशातलं सर्वोच्च अधिकार असलेलं महाराणी पद ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांच्याकडे होतं. तिच्या वतीने गव्हर्नर जनरल पदावरच्या व्यक्‍तीकडे देशाची संवैधानिक जबाबदारी सोपवली गेली होती.

सप्टेंबर 2021 मध्ये आलेल्या संविधान कायद्यानुसार स्वतंत्र देशासाठी महाराणी पदाला पर्याय म्हणून राष्ट्राध्यक्षपद देण्यात आलं. 20 ऑक्टोबर 2021 रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल सँड्रा मेसन यांची देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली. 30 नोव्हेंबरला मेसन यांचा शपथविधी पार पडला. त्या कार्यक्रमात बार्बाडोसला जगभर ओळख मिळवून देणार्‍या पॉपस्टार रिहानाला ‘राष्ट्रनायिका’ हा बहुमान दिला गेला.

रिहानाचा जन्म बार्बाडोसच्या सेंट मायकेल भागात झाला. तिच्या वडिलांचा कपड्यांचा एक छोटा स्टॉल होता. पण तिथल्या कमाईतले निम्मे पैसे त्यांच्या दारूच्या व्यसनातच उधळले जायचे. बर्‍याचदा दारूच्या नशेत ते पत्नीला मारहाण करायचे. त्या दोघांचं भांडण सोडवू पाहणार्‍या रिहानालाही दरवेळी वडिलांचा मार खावा लागायचा. एकदा घरी यायला फक्‍त दहा मिनिटं उशीर झाला म्हणून तिच्या वडिलांनी तिला जोरदार थप्पड मारली होती. पुढचे बरेच दिवस ती तो गालावरचा वळ घेऊनच वावरत होती. नवर्‍याच्या व्यसनाला कंटाळून रिहानाच्या आईने शेवटी संसार मोडला. आपल्या भावंडांमध्ये वयाने मोठ्या असलेल्या रिहानानं घर सांभाळलं. कॉम्बरमेअर स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना ती वडिलांसोबत त्यांच्या कपड्याच्या स्टॉलवर जाऊ लागली. छोटी रिहाना त्या स्टॉलबाहेर टोप्या, बेल्ट, ओढण्यांचा ढीग लावून विकायची. ती नंतर नफ्याच्या पैशातून मिठाई खरेदी करायची.

स्वतः बनवलेल्या पुड्यांमधून त्या मिठाई ती शाळेतल्या मुलांना विकायची. नफ्यातून नफा कसा काढायचा हे तिला बरोबर समजलं होतं. आज ती ज्या आत्मविश्‍वासाने मोठमोठ्या ब्रँडसोबत घसघशीत करार करते, त्याचं खरं गुपित तिच्या लहानपणीच्या धडपडीत दडलं आहे. वडिलांनी व्यसनापायी आपलं किती नुकसान केलंय हे रिहाना आजही विसरली नाही. पण तिच्या आजच्या यशाचं, हिमतीचं श्रेय मात्र ती तिच्या वडिलांनाच देते. त्यांनीच मला पोहायला, मासे पकडायला, गाडी चालवायला शिकवलं आणि जगण्याचं बळ दिलं असं ती सांगते.

लहानपणी रिहानाचा रंग ना धड काळा होता, ना धड गोरा. पण तिच्या या रंगामुळे शाळेत तिला सतत चिडवलं जाऊ लागलं. जराशी गोरी असल्यामुळे ती कृष्णवर्णीय नक्‍कीच नव्हती. पण तिला त्यांच्यासारखीच वागणूक मिळत गेली. त्यात वयाच्या मानाने इतरांपेक्षा थोडी जाड असल्याने ती तिच्या शाळेत चेष्टेचा विषय बनली होती. आई-वडिलांची भांडणं आणि शाळेत होणार्‍या मानसिक छळाला कंटाळून तिनं संगीतात मन रमवायचं ठरवलं. इतरांसारखी तीही कॉलेज वगैरे करू शकत होती; पण त्याऐवजी तिनं संगीतातच करिअर करायचं ठरवलं.

वयाच्या 15व्या वर्षी रिहानाने तिच्या दोन मैत्रिणींना सोबत घेऊन एक ग्रुप बनवला. मे 2005 मध्ये तिचं ‘पॉन दि रिप्ले’ हे गाणं रिलिज झालं. काही दिवसांतच या गाण्याने अमेरिकेत धुमाकूळ घालत रिहानाचं नाव देशभर पोचवलं. नोव्हेंबर 2011पर्यंत रिहानाचे सहाही अल्बम रिलिज झाले होते. एकापाठोपाठ एक विक्रम नोंदवत रिहानाने जगातल्या आघाडीच्या पॉपस्टारच्या पंगतीत स्थान मिळवलं. तिच्या ‘गुड गर्ल गॉन बॅड’ अल्बमने तिला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. संगीत क्षेत्रात मानाचा समजला जाणारा ग्रॅमी पुरस्कार पटकावणारी ती एकमेव रॅप गायिका आहे.

2018 मध्ये तिला बार्बाडोसची ‘युवा आणि संस्कृती’ राजदूत म्हणून मान्यता मिळाली. 2008पासून बार्बाडोसमध्ये रिहानाचा वाढदिवस हा ‘रिहाना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. रिहानाने वेळोवेळी सत्य आणि न्यायासाठी आवाज उठवला आहे. इंडियानातल्या एलजीबीटी समूहासोबत होणार्‍या भेदभावाला तिने कडाडून विरोध केला. अमेरिकेतला वर्णद्वेष आणि पोलिस अत्याचारांच्या विरोधातही तिने ठाम भूमिका घेतली होती. भारताच्या राजधानीत शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू होतं. शेतकर्‍यांचं हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने बरेच प्रयत्न केले. पण शेतकरी डगमगले नाहीत. या दडपशाहीला विरोध करताना ‘याबद्दल आपण का बोलत नाही’, असं ट्विट करत तिनं या आंदोलनाला पाठिंबा दिला.

-प्रथमेश हळंदे

Back to top button