टोकियो ऑलिम्पिक : भारताची सुवर्ण झेप दुहेरी आकड्यात जाणार का?

अनिरुद्ध संकपाळ

टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय संघ 126 खेळाडूंसह सहभागी होत आहे.कधी काळी ऑलिम्पिकमध्ये हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचे प्रभुत्व होते. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, मुष्ठियुद्ध या क्रीडाप्रकारांमध्ये लक्षणीय यश मिळवले आहे. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.

गतवर्षी लांबणीवर टाकण्यात आलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा जपानमध्ये येत्या 23 जुलैपासून होत आहे. कोरोना संकटामुळे जगातील सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. याचा फटका क्रीडा जगतालाही चांगलाच बसला. जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव अशी ओळख असलेली ऑलिम्पिक स्पर्धाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. हळूहळू लोक न्यू नॉर्मलला आत्मसात करू लागले.

क्रीडा विश्वही बायो बबलचा प्रयोग करून आपले क्षेत्र खुले करण्याचा प्रयत्न करत होते. यूएईमध्ये झालेली आयपीएल स्पर्धा कोरोना काळातही यशस्वीरीत्या आयोजित करता येऊ शकते याचे उदाहरण बनली. आता अशाच मोठ्या बायो बबलमध्ये जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव टोकियो ऑलिम्पिक जपानमध्ये होत आहे.

अधिक वाचा :

ऑलिम्पिक बेड अँटी सेक्स, अमेरिकन धावपटूची टीका

राहुल द्रविड कोच असता तर करण जोहरची ‘ती’ हिम्मत झाली नसती

सर्व जगाबरोबरच भारत टोकियो ऑलिंम्पिकसाठी सज्ज झाला आहे. यंदाचे ऑलिम्पिक भारतीय संघासाठी तसेच देशवासीयांसाठी एक आशेचे किरण घेऊन आले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला अनेक क्रीडा प्रकारांत सुवर्णपदकांची आशा आहे.

भारत आता हॉकी आणि कुस्ती या आपल्या पारंपरिक खेळ प्रकारांबरोबरच बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, मुष्ठियुद्ध या क्रीडाप्रकारातही प्रावीण्य मिळवत आहे. या क्रीडा प्रकारात आपण जागतिक स्तरावर अव्वल दर्जाचा खेळ करत आहोत.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या संघात 126 खेळाडूंचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये इतका मोठा चमू घेऊन जाण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे. या ऑलिम्पिकमध्ये 18 खेळांतील 69 क्रीडा प्रकारांत भारतीय खेळाडू भाग घेणार आहेत. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे.

कुस्तीमध्ये पुरुष आणि महिला गटात स्पर्धा

भारताचा कुस्ती हा आवडता खेळ आहे. प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारताला पदकाची आशा असतेच. गेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने साक्षी मलिकने कांस्य पदक जिंकले होते. ती कुस्तीत भारताकडून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला ठरली होती. पण टोकियो ऑलिम्पिकध्ये ती सहभागी होणार नाही.

तिचा वारसा चालवण्याची जबाबदारी विनिश फोगाटवर आहे. याचबरोबर अंशू मलिक आणि सीमा बिसला यांच्याही कामगिरीकडे कुस्ती चाहत्यांचे लक्ष असणार आहे. पुरुषांच्या गटात बजरंग पुनिया, दीपक पुनिया आणि रवीकुमार दहिया हे पदकासाठी दावेदार असतील. या सर्वांनी जागतिक कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे.

बॅडमिंटनमध्ये सर्व मदार सिंधूवर

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारताचे चार खेळाडू पात्र ठरले आहेत. यात स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, बी साई प्रणीथ, सात्विकसाईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी यांचा समावेश आहे. यातील सिंधू आणि प्रणीथ हे दोघे महिला आणि पुरुष एकेरीमध्ये पदकाचे दावेदार आहेत. सिंधूने गेल्या ऑलिम्पिमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

यंदा तिचा डोळा सुवर्ण पदकावर असणार आहे. गेल्या काही स्पर्धांमधील तिचा फॉर्म पाहता ती सुवर्ण पदकाची दावेदार नक्की ठरू शकते. तिच्या जोडीला असलेल्या प्रणीथलाही एकेरीत चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा :

युवा नेमबाज इतिहास रचणार?

क्रिकेट सोडून भारत सध्या कोणत्या क्रीडा प्रकारात सातत्याने चांगली कामगिरी करत असेल तर ते नेमबाजीत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तब्बल 15 नेमबाज देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यात मनू भाकर, सौरभ चौधरी आणि राही सरनोबत यांसारख्या युवा नेमबाजांचा समावेश आहे.

अभिनव बिंद्राने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वहिले वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकून दिले होते. आता हाच वारसा या युवा नेमबाजांना पुढे न्यायचा आहे. तेजस्विनी सावंतसारख्या अनुभवी नेमबाजाकडूनही यंदा पदकाच्या अपेक्षा आहेत. नेमबाजीच्या जीवावरच आपण यंदा इतिहासातील सर्वात चांगली कामगिरी करू, असा विश्वास जाणकारांना वाटत आहे.

नीरज चोप्राचा भाला पदकाचा घेणार का वेध…

अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताची ऑलिम्पिकमधील कामगिरी फारशी चांगली नाही. पण नीरज चोप्राकडून भारताला मोठ्या आशा आहेत. त्याने 2018 च्या आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णवेध घेतला होता. त्यामुळे त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा निर्माण केली आहे. त्याच्या जोडीला शिवपाल सिंहही असणार आहे.

हॉकीतील सुवर्ण दुष्काळ संपणार का?

एकेकाळी ऑलिम्पिक हॉकी म्हटलं की भारताचे सुवर्णपदक निश्चित असायचे. पण काळ बदलला, खेळ बदलला आणि भारत त्याच्याच राष्ट्रीय खेळात मागे पडत गेला. पण, यंदाचा हॉकी संघ मजबूत दावेदारी करेल असे जाणकार म्हणत आहेत. त्यामुळे हॉकीतील बहुप्रतीक्षित नववे सुवर्ण टोकियो ऑलिम्पिकमधून येणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे.

भारताचा पुरुष हॉकी संघ ऑलिम्पिक खेळण्याची ही 20 वी वेळ आहे. तर महिला संघ ऑलिम्पिकध्ये तिसर्‍यांदा भाग घेत आहेत. त्यांच्याकडूनही पदकाच्या अपेक्षा आहेत. पुरुष संघाचे मनप्रीत सिंह नेतृत्व करत आहे. तर महिला संघाचे नेतृत्व राणी रामपाल हिच्याकडे आहे.

अधिक वाचा :

तिरंदाजी : भारतीय बाण पदकाचा घेणार का वेध?

ऑलिम्पिकमध्ये भारत तिरंदाजीतही पदक मिळवू शकतो. आतापर्यंत तिरंदाजीत भारताला अजून पदक जिंकता आलेले नाही. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चार तिरंदाज पात्र ठरले आहेत. यात 3 पुरुष आणि एका महिला खेळाडूचा समावेश आहे. यात तरुणदीप राय, अतनू दास, प्रवीण जाधव या पुरुष तिरंदाजांचा समावेश आहे.

यातील तरुणदीप राय हा 37 वर्षाचा तिरंदाज सर्वात अनुभवी असून त्याने 2004 आणि 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही सहभाग नोंदवला होता. त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन रौप्य पदके पटकावली आहेत. अतनू दासची भारतातील सर्वात अव्वल दर्जाच्या तिरंदाजांमध्ये गणना होते. त्याने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता.

महिलांमध्ये दीपिका कुमारी ही एकटीच भारताची दावेदारी सादर करणार आहे. दीपिका कुमारी सध्या जागतिक तिरंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तिचे हे तिसरे ऑलिम्पिक आहे. यापूर्वी तिने 2012 आणि 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता.

मेरी कोम बॉक्सिंग क्वीन पदकसंख्या वाढवणार?

ऑलिम्पिकमध्ये भारताचे नऊ मुष्ठियोद्धे सहभागी होतील. यात पाच पुरुष आणि चार महिला मुष्ठियोद्ध्यांचा समावेश आहे. पण सर्वांच्या नजरा या बॉक्सिंग क्वीन मेरी कोमवर असणार आहेत. 2012 ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्य पदक जिंकले होते. आता तिच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. पुरुषांमध्ये विकास कृष्णन, अमित पांघल यांच्याकडून पदकाची अपेक्षा ठेवली जात आहे.

या सर्व क्रीडा प्रकारांत भारत पदकाची अपेक्षा करत आहे. पण, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारताच्या 126 खेळाडूंचे एकच उद्दिष्ट असणार आहे, ते म्हणजे आपली सर्वोत्तम कामगिरी करणे आणि भारतासाठी पदक जिंकून आणणे. यंदा ऑलिम्पिकमध्ये भारताचा संघ मोठा आहे. त्यामुळे पदकांची संख्याही वाढणार अशी आशा करायला हरकत नाही.

भारताने आतापर्यंत 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 12 कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची एकूण टोटल ही 28 आहे. यंदा भारत एकूण सुवर्ण पदकांचा आकडा दुहेरीत नेण्याचा आटोकाट प्रयत्न नक्की करेल.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : पैलवानाच्या वजनाइतकं सोनं देतो पण माझा पैलवान वाचवा 

Back to top button