काश्मीर : नव्या रणनीतीची गरज | पुढारी

काश्मीर : नव्या रणनीतीची गरज

दहशतवाद्यांच्या सततच्या कुरापतींमुळे काश्मीर खोरे बराच काळ अस्वस्थ राहिले आहे. गेल्या काही महिन्यांत विशेषतः अफगाणिस्तानात तालिबानचे शासन प्रस्थापित झाल्यापासून पाकपुरस्कृत दहशतवाद्यांकडून काश्मिरी नागरिकांवर आणि सुरक्षा दलांवर सतत हल्ले होत आहेत. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात उघडलेल्या जोरदार मोहिमेमुळे आणि काश्मीर च्या विकासासाठीच्या प्रयत्नांमुळे दहशतवाद्यांचे म्होरके बिथरले आहेत. श्रीनगरमध्ये राखीव दलाच्या तुकडीच्या बसवर केलेला बेछूट गोळीबार हेच दर्शवणारा आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 वगळल्यानंतर 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत काश्मीरमध्ये 366 दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांचे म्होरके आता काही काळच सुरक्षा दलांपासून दूर राहतील, अशी चिन्हे आहेत. सुरक्षा दल, पोलिस कर्मचारी आणि परप्रांतीयांची हत्या करणार्‍या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी बीमोड केला आहे. दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांवर हल्ले करून त्यांना पुन्हा काश्मीर खोर्‍यातून हुसकावून लावण्याचे कारस्थान रचले. परंतु, सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना वेचून काढले आणि ठार केले.

त्याचवेळी काश्मीर खोर्‍यात लोकशाही व्यवस्था पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आजघडीला काश्मीर खोर्‍यातून केवळ दहशतवाद्यांचे उच्चाटन केले जात नसून, स्थानिक नागरिकांचे भवितव्यदेखील उज्ज्वल करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. केंद्र सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर काश्मीरचा चेहरा बदलताना दिसत आहे.

गेल्या तीन दशकांत पहिल्यांदाच काश्मीरचे सर्व जिल्हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. पूर्वी पर्यटक श्रीनगर, बडगाम, बारमुल्ला, अनंतनाग जिल्ह्यांनाच भेटी देऊ शकत होते. आता कुपवाडच्या तंगधरला, बंगस, बांदीपुरातील गुरेज, पुलावामाच्या शिकारगाह यासारख्या पर्यटनस्थळांनादेखील भेट देऊ शकतात. पर्यटकांची वाढती वर्दळ पाहता श्रीनगर विमानतळावर दररोज 40 पेक्षा अधिक उड्डाणे होत आहेत.

जम्मू-काश्मीरच्या युवकांच्या हाती एकेकाळी हातात दगड असायचे, आज त्याच हातांना लेखणी आणि रोजगाराचे वेध लागले आहेत. केंद्राकडून युवककेंद्रित योजना आणल्या जात असून, त्या आधारावर ते विकासाचा मार्ग निवडत आहेत. काश्मीरचा विकास घडवण्यासाठीचे केंद्राचे हे सर्व प्रयत्न पाहूनच पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे म्होरके अस्वस्थ झाले आहेत आणि त्यातूनच काश्मीर खोरे पुन्हा एकदा अशांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. श्रीनगरच्या जेवन भागात राखीव दलाच्या तुकडीच्या बसवर केलेला बेछूट गोळीबार हा दहशतवादी बिथरल्याचे लक्षण मानता येईल.

या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले, तर 12 जवान जखमी झाले आहेत. या बसमध्ये नवव्या बटालियनचे जवान होते आणि ते ड्युटीवरून परतत होते. या घटनेच्या एक दिवस अगोदर सीमेपलीकडून घुसखोरी करणार्‍या गटातील एका महिला दहशतवाद्यास सुरक्षा दलाने ठार केले. तत्पूर्वी, दोन दिवस अगोदर बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला केला आणि त्यात दोन जवान हुतात्मा झाले.

पोलिसांच्या बसवर हल्ला करण्याचे कारस्थान हे एखाद्या दुबळ्या संघटनेचे असू शकत नाही. या हल्ल्याने पुलवामा हत्याकांडाची आठवण झाली. दुसरीकडे, सीमेपलीकडून वाढती घुसखोरी पाहता पाकिस्तान हा काश्मीरमध्ये पुन्हा अशांतता निर्माण करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे दिसून येते. काश्मीर खोर्‍यातील दहशतवादाचे स्वरूप आणि हल्ल्यांचे प्रकार बदलत आहेत.

मध्यंतरी, निरपराध नागरिकांना लक्ष्य करण्यात येत होते तसेच पोलिस आणि सुरक्षा दलांवरील हल्ले वाढू लागले असून, गेल्या वर्षभरात सुमारे 19 पोलिसांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. काश्मीरमध्ये हिंसाचार हा ठराविक काळाने होत आहे आणि यानुसार मोठा घातपात घडवून आणण्याची शंकाही व्यक्त होत आहे. सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या स्थानिक लोकांना अटक केली जात आहे.

दहशतवाद्यांना अर्थसहाय्य करणार्‍या लोकांचीदेखील धरपकड केली जात आहे. परंतु, ज्या रीतीने श्रीनगर आणि परिसरातील दहशतवादी कारवाया करत आहेत, ते पाहता सुरक्षा दलांची डोकेदुखी पुन्हा वाढणे स्वाभाविक आहे. जवानांचे हौतात्म्य क्लेेषदायक आहे. पाकिस्तानात तयार होणारे दहशतवादी हे काश्मीरच्या लोकशाहीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

बेरोजगारी किंवा गरिबीमुळे स्थानिक युवक हे दहशतवादाकडे वळत असल्याचे चित्र आता इतिहासजमा झाले आहे. त्यामुळे धार्मिक कट्टरता आणि धर्मांधतेच्या आधारावर काश्मीर खोर्‍यात जिहादी दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. खोर्‍यातील दहशतवादी गट आणि समर्थक हे सोशल मीडियाच्या मदतीने पाकिस्तानातील म्होरक्यांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. प्रत्यक्षात कट्टरपंथी विचारसरणीतूनच देशात आणि काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांसाठी पार्श्वभूमी तयार होत आहे.

आतापर्यंतचा पाकिस्तानचा अनुभव पाहता एखादेवेळी सूर्य आपली उगवण्याची दिशा बदलेल, नदी-नाल्यांचा प्रवाह बदलेल; पण पाकिस्तान कधीही सरळ मार्गावर येणार नाही. शांततेच्या चर्चा, विश्वास प्रस्थापित करण्यासाठी आखलेल्या उपाययोजना, समझोता एक्स्प्रेस, मैत्री बस यासारखे भारताच्या बाजूने केले गेलेले सर्व प्रयत्न पाकिस्तानमुळे धुळीस मिळाले. त्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवादाला थारा मिळणार नाही, अशीच रणनीती आखणे गरजेचे आहे.

दहशतवाद्यांची अधिकाधिक हानी होणे आणि जवान अधिकाधिक सुरक्षित राहतील, या रीतीने रणनीती आखावी लागेल. दहशतवाद्यांचे अस्तित्व जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत काश्मीरमध्ये कुरापती चालूच राहतील. म्हणूनच काश्मीरविरोधातील कारस्थान आपल्याला कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ द्यायचे नाही.

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे पुन्हा सक्रिय झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही प्रशिक्षण केंद्रे आर्थिक मदत मिळाल्याशिवाय सक्रिय होऊच शकत नाहीत. आज पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर पडलेला नसतानाच हे तळ सक्रिय झाले आहेत; तर उद्या जेव्हा पाकिस्तानात आर्थिक गुंतवणूक यायला सुरुवात होईल तेव्हा भारताची डोकेदुखी कमालीची वाढणार आहे. त्यामुळे भारताला येत्या काळात पुन्हा एकदा राजनैतिक प्रयत्न वाढवून पाकिस्तानला कसे खिंडीत पकडता येईल, याचा विचार करावा लागेल. तसेच आपल्या सुरक्षा यंत्रणांनाही आता येणार्‍या काळात अत्यंत सतर्क राहावे लागेल.

पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी करण्यासाठी शेकडो दहशतवादी तयार आहेत. यासाठी रेझिस्टन्स फ्रंट नावाची एक आघाडी पाकिस्तानने सुरू केली असून, त्या माध्यमातून काश्मीरमधील दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी उत्तर काश्मीरवर लक्ष केंद्रित केले आहे. या उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा पाकचा डाव आहे.

खरे म्हणजे, एकूणच पाकिस्तानात आज भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढणे काही थांबत नाही. भारतात दहशतवादी घुसवणे किंवा चीनच्या चिथावणीवरून भारतामध्ये अस्थिरता निर्माण करणे, हे उद्योग पाकिस्तान करतच आहे. पाकिस्तानची अवस्था निरोप्रमाणे झाली आहे, ही गोष्ट दुर्दैवी आहे.

सध्याची पाकिस्तानातली परिस्थिती अशीच राहिली आणि जनतेच्या मनातील क्षोभ असाच वाढत राहिला, तर तिथे राजकीय नेतृत्वच नव्हे, तर आतापर्यंत सत्ता गाजवणारे लष्कर, धार्मिक मूलतत्त्ववादी संघटना आणि दहशतवादी गट यांच्या साम्राज्याला सुरुंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानी सामान्य नागरिकांना आता बदल हवा आहे.

आजवर भारताचा खुळखुळा करून, काश्मीरचा भावनिक मुद्दा करून जनतेची मते मागणे हेच उद्योग सत्ताधार्‍यांनी केले; परंतु या सर्वात सामान्य पाकिस्तानी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. आता पंतप्रधान इम्रान खान यांना भारत किंवा काश्मीर हा मुद्दा उगाळून जनतेच्या उद्रेकाला शांत करता येणार नाही. आज पाकिस्तानला वाचवणारे फार देश शिल्लक राहिलेले नाहीत. सौदी अरेबियाने साथ सोडली आहे, अमेरिका नाराज आहे.

एकटा तुर्कस्तान पाठिंबा देत असला, तरीही त्या देशाची वैयक्तिक प्रतिमा अत्यंत डागाळलेली आहे. त्यामुळे पाकिस्तान जितका चीनच्या आहारी जाईल त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागणार आहेत. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून पाकिस्तानचा भारतविरोधी कारवायांचा वेग वाढला आहे. मात्र, आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या भक्कमतेमुळे दहशतवाद्यांचे सर्व मनसुबे सफल होत नाहीयेत. यामुळेच दहशतवादी नवनवीन क्लृप्त्या-युक्त्या वापरून भारताला लक्ष्य करत आहेत.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

Back to top button