संक्रांतीचे खगोलीय गुपित

संक्रांतीचे खगोलीय गुपित
Published on
Updated on

'मकरसंक्रांती' यामध्ये दोन महत्त्वाचे शब्द आहेत. एक म्हणजे मकर, जो एक तारकासमूह आहे आणि संक्रांत किंवा संक्रमण म्हणजे स्थित्यंतर. मकर ही रास म्हणून आपण ओळखतो. यासाठी आपल्याला वेध लागतात 14 जानेवारीचे. पण यावेळच्याप्रमाणे कधी कधी ही तारीख 15 जानेवारी असते. हीच संक्रांती इ.स. 1000 मध्ये 31 डिसेंबरला साजरी होत होती, तर 9000 वर्षांनी आपण हीच संक्रांती जूनमध्ये साजरी करू. काय आहे हे खगोलीय गुपित?

मकरसंक्रांती! नव्या वर्षाचा पहिला सण! तिळाच्या खमंग वड्या आणि पोळ्या खात, एकमेकांशी गोड बोलण्याचे संकल्प करीत आणि वचने देत हा सण आपण साजरा करतो. भारतामधील भौगोलिक विविधतेमुळे हा सण ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आणि नावाने साजरा होतो. या काळात हंगाम बदलत असल्यामुळे या बदलाला खूप महत्त्व आहे. बर्‍याच प्रदेशांमध्ये संक्रांती या नावानेच हा सण साजरा होतो, तर राजस्थान आणि गुजरातमध्ये उत्तरायण नावाने साजरा होतो. हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये माधी, तामिळनाडूमध्ये पोंगल, आसाममध्ये माघ बिहू किंवा भोंगली विह नावाने साजरा होतो. काश्मीरमध्ये शिशूर सेन्क्रात, केरळमध्ये मकरा विलाकू या नावाने साजरा होतो. भारताबरोबर नेपाळ, थायलंड, लाओस, कम्बोडिया, म्यानमार या देशांमध्येदेखील संक्रांती साजरी केली जाते. याला सामाजिक, सांस्कृतिक आयाम तर आहेतच; पण खगोलशास्त्रीय दृष्टीने खूपच महत्त्व आहे.

पृथ्वीचा अक्ष झुकलेला आहे. याला आयनांश असेही म्हणतात. पृथ्वीवर अनेक वलये काम करीत असतात आणि त्यामुळे पृथ्वीला वेगवेगळ्या गती आहेत. जसे स्वतःभोवती ती फिरते, तशीच ती सूर्याभोवती फिरते. पृथ्वीला परांचन गतीदेखील आहे. ही झुकलेल्या अक्षामुळे आहे. यामध्ये पृथ्वी एखाद्या झुकल्या भोवर्‍यासारखीदेखील फिरते. यामुळे त्याची एक परांचन कक्षा तयार होते. यावर अनेक तारे आहेत. जेव्हा पृथ्वीचा उत्तर अक्ष परांचन कक्षेवरील ज्या तार्‍याकडे रोखलेला असतो, तो त्यावेळी पृथ्वीचा ध्रुव तारा असतो. ही परांचन कक्षा पृथ्वी 26000 वर्षांमध्ये पूर्ण करते. साधारण 5000 वर्षांपूर्वी आपला ध्रुव हा ठुबान तारा होता. पुढे 12000 वर्षांनी आपला ध्रुव अभिजित तारा असेल. पृथ्वी आणि सूर्य यांच्या अशा अनेक गतींमुळे आपल्याला विविध ऋतू अनुभवता येतात.

मकरसंक्रांती या शब्दामध्ये दोन महत्त्वाचे शब्द आहेत. एक म्हणजे मकर, जो एक तारकासमूह आहे आणि संक्रांत किंवा संक्रमण म्हणजे स्थित्यंतर. मकर ही रास म्हणून आपण ओळखतो. यासाठी आपल्याला वेध लागतात 14 जानेवारीचे. पण कधी कधी मात्र ही तारीख 15 जानेवारी असते आणि कदाचित वाचून आश्चर्य वाटेल, की हीच संक्रांती इ.स. 1000 मध्ये 31 डिसेंबरला साजरी होत होती, तर 9000 वर्षांनी आपण हीच संक्रांती जूनमध्ये साजरी करू. नावावरून आपल्याला या सणाचे संदर्भ लक्षात येतात. आपले सण हे आकाशातील बदलांशी आणि पर्यायाने ऋतूंशी जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. प्रवेश करतो म्हणजे काय? तर सूर्याच्या पार्श्वभूमीवर मकर रास आपल्याला दिसते आणि महिनाभर ती या राशीमध्ये असते. आपल्या राशिचक्रामध्ये मकर ही दहावी रास आहे. सुरुवातीपासून अंश मोजले तर ती बरोबर 270 अंशावर आहे. सूर्य जेव्हा या बिंदूवर येतो, तेव्हा आपण असे म्हणतो की सूर्याने मकर राशीत प्रवेश केला. आपले बहुतेक सर्व सण हे हिंदू कॅलेंडरप्रमाणे आहेत. यात चंद्राची स्थिती ही प्रमाण स्थिती मानली जाते. त्यामुळे बहुतेक सर्व सणांच्या तारखा आपल्याला बदललेल्या दिसतात. हा एकमेव सण असा आहे, की तो अनेक वर्षे एकाच तारखेला येतो. कारण तो सौर कॅलेंडरला अनुसरून आहे.

संक्रांत ही सर्वसाधारणपणे 14 जानेवारी किंवा यावेळीप्रमाणे 15 जानेवारीला येते. पण ही स्थिती सध्याची आहे. कायम राहणारी नाही किंवा पूर्वीदेखील नव्हती. लिप वर्षामध्ये ही 15 जानेवारीला येते आणि एरव्ही 14 जानेवारीला, म्हणजे 14, 14, 14, 15 जानेवारी हे चक्र चालू राहते. गेली 40 वर्षे आपण याच पद्धतीने संक्रांत आलेली पहात आहोत. परंतु, 2009-2012 या चक्रामध्ये बदल दिसून आला. 2009 आणि 2010 मध्ये 14 जानेवारी आणि 2011 व 2012 मध्ये 15 जानेवारी अशा तारखांना संक्रांत होती. हे चक्र पुढेही चालू राहील. 2049 ते 2052 या चक्रामध्ये संक्रांत क्रमाने 14-15-15-15 जानेवारीला अशी असेल. पुन्हा 40 वर्षांनी 2089-2092 मध्ये 15-15-15-15 जानेवारी अशी संक्रांत असेल. 2100 मध्ये अजून वेगळेच काहीतरी घडणार आहे. जरी 2100 या आकड्याला चारने पूर्ण भागाकार होत असला, तरी हे लिप वर्ष नसेल.

ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे जर एखाद्या वर्षाला 100 ने भाग जात असेल आणि जर 400 ने पूर्ण भागता येत असेल, तरच ते लिप वर्ष असू शकते. याचा अर्थ असा, की 2100, 2200, 2300 आणि 1900 ही लिप वर्षे नाहीत, पण 2000, 2004 मात्र आहेत. ज्या अर्थी 2100 हे वर्ष लिप वर्ष नाही, यात जास्तीचे दिवस मोजले जाणार नाहीत आणि यामुळे संक्रांत ही एक दिवसाने पुढे जाणार आहे.

2101 ते 2114 या वर्षांमध्ये संक्रांती 16-16-16-16 जानेवारी अशी येईल. हा असाच बदल 100 वर्षांनी होईल; पण केव्हा? जेव्हा वर्षाला 100 ने भाग जातो; पण 400 ने नाही आणि हे 100 वर्षांचे चक्र आणि 40 वर्षांचे चक्र एकाच वेळेस चालू राहते आणि या दोन्हींचा परिणाम होऊन संक्रांतीच्या म्हणजेच सूर्य संक्रमणाच्या तारखा बदलत जातील. या तारखा पुढे जाण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण सूर्याभोवती एक फेरी पूर्ण झाली की एक वर्ष मानतो.

वर्षामध्ये आपण 365 दिवस मानत असलो, तरी पृथ्वीची सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास जो वेळ लागतो तो आहे 365 दिवस 56 तास आणि 9 मिनिटे. यामुळे सूर्य मकर राशीमध्ये दरवर्षी 6 तास 9 मिनिटे उशिरा जातो. ही वरची 9 मिनिटे खूप महत्त्वाची आहेत. कारण चार वर्षांत संक्रांत 24 तास 36 मिनिटांनी पुढे जाते. पण लिप वर्ष तिला फक्त 24 तासांनीच मागे खेचते. (लिप वर्षात जास्तीचा दिवस घेतल्यामुळे संक्रांत पुन्हा आधीच्या दिवशी येते.) ही साचलेली 36 मिनिटे संक्रांतीला थोडे थोडे पुढे ढकलत राहतात. समजा यात सूर्य 1 किंवा 2 मिनिटे जरी उशिरा आला, तरी हे चक्र 44 वर्षांचे होते! आणि समजा तो 1-2 मिनिटे लवकर आला, तर हे चक्र 36 वर्षांचे होते. या बदलाची गती पाहिली तर 72 वर्षांनी एक दिवस संक्रांत पुढे जाते. असो, या बदलत्या तारखांचा अनुभव आपल्याला काही फारसा अनुभवता येणार नसला, तरी हे गणित एकूणच विस्मयकारक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news