T20 World Cup 2021 : कांगारूंचे स्वप्नवत जेतेपद | पुढारी

T20 World Cup 2021 : कांगारूंचे स्वप्नवत जेतेपद

मिलिंद ढमढेरे

दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकावर (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाने प्रथमच आपले नाव कोरले. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणे अपेक्षित होती. मात्र तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचे हित अधिक महत्त्वाचे आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय संघ पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.

संयम, चिकाटी, सांघिक कौशल्य, महत्त्वाच्या क्षणी आक्रमकता आणि जबरदस्त आत्मविश्वास याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुबईत नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकावर प्रथमच आपले नाव कोरले. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या संघाने सातत्यपूर्ण खेळास अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाने आजपर्यंत एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत पाच वेळा अजिंक्यपद मिळविले असले तरी टी-20 स्पर्धेत मात्र त्यांना जगज्जेतेपदावर मोहर नोंदविता आली नव्हती. त्यामुळेच की काय, यंदा या स्पर्धेपूर्वी संभाव्य विजेत्या संघांमध्ये त्यांची गणना केली जात नव्हती. कांगारूंचा संघ फक्त कागदावरच वरचढ आहे, अशी टीकाही करण्यात आली होती. तथापि या टीकेला आपल्या कामगिरीद्वारेच उत्तर द्यायचे, असे कांगारूंनी ठरविले होते आणि त्यानुसार प्रत्येक सामन्यात त्यांची कामगिरी सरसच ठरली. (T20 World Cup)

अंतिम सामन्यात त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या न्यूझीलंडचा सहज पराभव करीत आपली महानता पुन्हा सिद्ध केली. साखळी गटातील सर्व सामन्यांत सफाईदार विजय मिळणार्‍या पाकिस्तानने उपांत्य फेरीपर्यंत केलेली वाटचाल आणि बलाढ्य भारतीय संघावर साखळी गटातच पराभूत होण्याची झालेली नामुश्की हेदेखील या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

विश्वचषक स्पर्धा म्हणजे कोण्या एका खेळाडूची स्पर्धा नसते. येथे संघातील प्रत्येक खेळाडू मौल्यवान असतो, हेच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दाखवून दिले. संघातील पहिली फळी लवकर बाद झाली तर मधल्या फळीने सावध; परंतु आक्रमक खेळ करीत संघाला विजयपथावर नेण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, हे तत्त्व त्यांच्या खेळाडूंनी उपांत्य फेरीत पाकिस्तान विरुद्ध अंमलात आणले. विजयासाठी 177 धावांचा पाठलाग करताना त्यांचा निम्मा संघ 96 धावांमध्ये तंबूत परतला होता, त्या वेळी सामन्याचे पारडे पाकिस्तानच्या बाजूने झुकले होते.

तथापि, मार्कोस स्टोईनिस आणि मॅथ्यू वेड यांनी 81 धावांची अखंडित भागीदारी करीत संघास सनसनाटी विजय मिळवून दिला. गोलंदाजीतही कीर्तिवान गोलंदाज अपयशी ठरले तर त्यांची जागा भरून काढण्याची जबाबदारी ऑस्ट्रेलियाचे दुसरे गोलंदाज पार पाडतात, हे उपांत्य आणि अंतिम सामन्यात दिसून आले. कांगारूंच्या डम झंपा या लेग स्पिनरने या स्पर्धेत तेरा विकेट्स घेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली. अंतिम सामन्यात त्याला अपेक्षित यश मिळाले नाही, तेव्हा त्याचा सहकारी जोश हॅजलवुड याने किफायतशीर गोलंदाजी करतानाच तीन विकेट्सही घेतल्या. (T20 World Cup)

अपयशी कर्णधार म्हणून सनरायझर्स हैदराबाद संघाने डेव्हिड वॉर्नर यांची संघातून हकालपट्टी केली होती. त्याच वॉर्नर याने विश्वचषक स्पर्धेत सात सामन्यांमध्ये 289 धावा करताना स्पर्धेचा मानकरी किताबही पटकावला आणि ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदात सिंहाचा वाटा उचलला. वॉर्नरचा सहकारी मिचेल मार्श हा गेली दोन-तीन वर्षे वेगवेगळ्या दुखापतींना सामोरे जात आहे. तरीही त्याने या दुखापतींना महत्त्व न देता आपल्या संघास सर्वोच्च यश मिळवण्यासाठी प्राधान्य दिले. अंतिम सामन्यात त्याने केलेली नाबाद 77 धावांची खेळी याचेच प्रमाण होती. नाहीतर भारतीय खेळाडू हार्दिक पंड्या. संघाच्या कामगिरीपेक्षा मौल्यवान वस्तू कशा घेता येतील याकडे त्याचे लक्ष असते.

न्यूझीलंडच्या संघात अनेक गुणवान खेळाडू आहेत. त्यांनी इसवी सन 2000 मध्ये चॅम्पियन्स चषक जिंकला, तर यंदा त्यांनी जागतिक कसोटीचे अजिंक्यपद पटकाविले. या दोन विजेतेपदांचा अपवाद वगळता आजपर्यंत त्यांना अनेक वेळेला विश्वचषकातील सर्वोच्च स्थानापासून वंचित राहावे लागले आहे. टी-20 स्पर्धेतही त्याचाच प्रत्यय दिसून आला. उपांत्य फेरीत बलाढ्य इंग्लंडविरुद्ध त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत विजय मिळविला.

मात्र अंतिम फेरीत कांगारूंविरुद्ध त्यांच्या गोलंदाजांनी सपशेल निराशा केली. केन विल्यमसनने केलेल्या झंझावती 85 धावांच्या जोरावर त्यांनी ऑस्ट्रेलियापुढे 173 धावांचे आव्हान ठेवले होते. त्या वेळी न्यूझीलंडचे गोलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावयास लावतील, अशी अपेक्षा होती. तथापि वॉर्नर, मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या धडाकेबाज खेळापुढे त्यांच्या गोलंदाजांची डाळ शिजली नाही. विल्यमसन हा एकहाती विजय मिळवून देऊ शकत नाही, हेदेखील येथे सिद्ध झाले.

पाकिस्तानच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी खरोखरीच कौतुकास पात्र आहे. साखळी गटात सर्वच्या सर्व पाच सामने त्यांनी जिंकले. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हा उपांत्य फेरीपूर्वी एवढा आजारी पडला होता, की त्याला अतिदक्षता विभागात दोन रात्री काढाव्या लागल्या. तरीदेखील हा खेळाडू रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर थेट सरावासाठी हजर झाला. उपांत्य फेरीत त्याने दमदार अर्धशतकही टोलवले.

एके काळी क्रिकेटचे सम्राटपद भूषविणार्‍या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी यंदा सपशेल निराशा केली. साखळी गटातील पाच सामन्यांपैकी फक्त एकच सामना त्यांना जिंकता आला. अनपेक्षित आणि सनसनाटी कामगिरी करण्याबाबत प्रसिद्ध असलेल्या बांगलादेश संघाला एकही सामना जिंकता आला नाही. श्रीलंकेसारख्या तुल्यबळ संघालादेखील साखळी गटातच पराभव पत्करावा लागला. जेमतेम दोनच सामने त्यांना जिंकता आले.

अफगाणिस्तान म्हटले, की आपल्यासमोर सतत युद्धाच्या छायेत वावरणारा देश असेच चित्र उभे असते. दिवसातला प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेत वावरणार्‍या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी या विश्वचषकात दोन सामने जिंकून चाहत्यांची मनेही जिंकली. विजय मिळवण्याची ईर्ष्या असेल, आत्मविश्वास असेल तर कितीही अडथळे आले तरी ते सहजगत्या पार करता येतात, हेच त्यांच्या खेळाडूंनी दाखवून दिले आहे. त्यांचा गोलंदाज मुजीब उर झादरान याने स्कॉटलंडविरुद्ध पाच गडी बाद करीत सनसनाटी कामगिरी केली.

भारतीय खेळाडूंकडून निराशा

आर्थिक उत्पन्नाचे मर्यादित स्रोत, सरावाची वानवा आदी अनेक अडचणी असताना कसे आत्मविश्वासाने सामोरे जाता येते, याबाबत भारतीय खेळाडूंना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. अन्य देशांच्या तुलनेत विचार केला तर भारतीय क्रिकेटपटूंना भरपूर पैसा मिळतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेगवेगळ्या श्रेणीनुसार खेळाडूंना वार्षिक मानधन देण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे. त्याखेरीज आयपीएल स्पर्धा म्हणजे खेळाडूंसाठी कुबेराचा खजिना लुटण्याची संधी असते. कोणतीही आर्थिक चिंता नसताना खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणे अपेक्षित असते. मात्र तशी जिद्द भारतीय खेळाडूंकडून दिसली नाही.

पाकिस्तानकडून पहिल्याच सामन्यात धुळधाण उडाल्यानंतर भारतीय जागे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र न्यूझीलंड विरुद्ध लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या. धडाकेबाज सलामीवीर म्हणून ख्याती असलेल्या रोहित शर्माला तिसर्‍या क्रमांकावर पाठविणे, अन्य फलंदाजांच्या क्रमवारीत विनाकारण बदल करणे, अनुभवी गोलंदाजांचा समावेश न करणे, कचखाऊ नेतृत्व, संघ व्यवस्थापन आणि खेळाडू यांच्यात सुसंवादाचा अभाव, विश्वचषक खेळण्यासाठी आवश्यक असणार्‍या गांभीर्यपूर्ण देहबोलीचा अभाव आदी अनेक कारणांमुळे भारतास उपांत्य फेरी गाठता आली नाही.

त्याचप्रमाणे सततच्या सामन्यांमुळे खेळाडूंची झालेली शारीरिक आणि मानसिक दमछाक, भारताच्या लढतींना भरपूर प्रेक्षकवर्ग मिळतो म्हणून या लढती संध्याकाळीच ठेवण्याचे धोरण, त्यामुळे सायंकाळी दवयुक्त वातावरणाचा खेळाडूंच्या कामगिरीवर झालेला अनिष्ट परिणाम हीदेखील भारतीय संघाच्या पराभवाची कारणे म्हणावी लागतील.

दुर्दैवाने क्रिकेट संघटकांसाठी क्रिकेट सामने म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक विश्रांतीचा अपेक्षेइतका गांभीर्याने विचार केला जात नाही. खेळाडूही आपली आर्थिक बाजू बळकट करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीत असतात. पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या पत्नी किंवा मैत्रिणीसोबत राहिले तरी शेवटी घरातील विश्रांती अधिक महत्त्वाची असते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. संघनिष्ठेपेक्षा त्यांना पैसा जास्त महत्त्वाचा वाटतो. पैशापेक्षा देशाचे हित अधिक महत्त्वाचे आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय संघ पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.

द़ृष्टिक्षेपात विश्वचषक

सर्वाधिक धावा – बाबर आझम, पाकिस्तान 303 धावा. एकाच डावात सर्वाधिक धावा – जोस बटलर, इंग्लंड – नाबाद 101 श्रीलंकेविरुद्ध. सर्वाधिक बळी – वासिंदु हसरंगा, श्रीलंका – 16 विकेट्स. स्पर्धेचा मानकरी – डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया. अंतिम सामन्याचा मानकरी – मिचेल मार्श. ऑस्ट्रेलिया.

Back to top button