घड्याळ नव्हे, ‘स्टेटस सिम्बॉल!’ | पुढारी

घड्याळ नव्हे, ‘स्टेटस सिम्बॉल!’

सचिन बनछोडे

एखाद्याची श्रीमंती दाखवण्याचे कामही हल्ली घड्याळे करू लागलेली आहेत. जगभरातील अनेक सेलिब्रिटी, धनकुबेरांच्या मनगटांची शोभा वाढवणारी ही घड्याळे इतक्या किमतीची असतात, की ते पाहून आपले डोळे पांढरे व्हावेत! हार्दिक पंड्याच्या कोट्यवधी रुपयांच्या घड्याळ यामुळे अशा घड्याळांची न्यारी दुनिया कुतूहल वाढवत आहे.

काळ आणि वेळ ही माणसासाठी प्राचीन काळापासूनच महत्त्वाची वाटत आलेली बाब आहे. घड्याळे नव्हती त्या वेळी लोक सूर्याच्या स्थितीवरून वेळेचा अंदाज घेत. वाळूची घड्याळेही यासाठी बनवली गेली. सध्या आपण वापरतो त्या मनगटी व भिंतीवरील घड्याळांचे आद्य पूर्वज युरोपात पंधराव्या शतकात अवतीर्ण झाले, असे मानले जाते. गुंडाळत जाणार्‍या स्प्रिंगवर आधारित अशा घड्याळांनी माणसाला वेळेचे अचूक भान करून देण्यास सुरुवात केली आणि घड्याळे ही हळूहळू मानवाच्या दैनंदिन जीवनाचा एक भागच बनली.

आधुनिक माणसाचे जीवन तर घड्याळाच्या काट्याबरोबरच चालणारे आहे. सध्या वेळ पाहण्यासाठी म्हणूनच नव्हे, तर अन्यही अनेक गोष्टींसाठी घड्याळे वापरली जातात. ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरलेली अनेक महागडी घड्याळेही आहेत. अशा घड्याळांची दुनियाही न्यारीच आहे!

मुळातच मनगटी घड्याळांचा जन्म ‘स्टेटस सिम्बॉल’ बनण्यासाठीच झाला होता, असे म्हटले तरी चालेल. याचे कारण म्हणजे इसवी सन 1571 मध्ये इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ(पहिली) हिला रॉबर्ट ड्युडले याने असे पहिले मनगटी घड्याळ दिल्याचे म्हटले जाते. खुद्द महाराणीच्या मनगटावर हे घड्याळ असल्याने त्या वस्तूला किती मोल आले असेल, याची आपण कल्पना करू शकतो.

काही लोकांच्या म्हणण्यानुसार, जगातील पहिले मनगटी घड्याळ अब्राहम लुईस-ब्रेगेट याने सन 1810 मध्ये नेपल्सची राणी कॅरोलिन म्युरत हिच्यासाठी बनवले होते. सुरुवातीच्या काळात अशी मनगटी घड्याळे विशेषतः महिलांसाठीच सुंदर ब्रेसलेटप्रमाणे बनवली जात होती आणि पुरुष मंडळी ‘पॉकेट वॉच’ म्हणजेच खिशात ठेवण्याची घड्याळे वापरत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस एक सोय म्हणून सैनिकांनी मनगटी घड्याळे वापरण्यास सुरुवात केली आणि या घड्याळांबाबतचा लिंगभेद मावळत गेला.

कालौघात मनगटी घड्याळांमध्येही अनेक नवे नवे प्रकार येत गेले. 1950 च्या दशकात विजेवर चालणारी घड्याळे आली, तर 1969 मध्ये क्वॉर्टझ घड्याळांचे युग सुरू झाले. 1990 मध्ये रेडिओ कंट्रोल्ड घड्याळे आली, तर 2013 मध्ये अ‍ॅटोमिक वॉचही आले! एक वेळ अशी आली, की ‘वेळ पाहणे’ इतकाच घड्याळांचा उद्देश राहिला नाही. मनगटावरील घड्याळातून माणसाच्या हृदयाच्या ठोक्यांपासून किती पावले चालणे झाले, इथपर्यंतची ‘आरोग्यदायी’ माहिती मिळू लागली. स्वित्झर्लंड हा देश महागड्या, लक्झरी घड्याळांचा माहेरघरच बनलेला आहे.

जगभरातील अनेक सेलिब्रिटी, धनकुबेर लोकांच्या हाती मोठ्या ब्रँड्सची महागडी घड्याळे असतात. मनगटावर असे महागडे घड्याळ असणे हे एखाद्याच्या श्रीमंतीचे, प्रतिष्ठेचे लक्षणही बनू लागले. त्यामुळे घड्याळांची हौस असो किंवा नसो, अनेक गर्भश्रीमंत लोक असे घड्याळ हातात बांधून घेऊ लागले. ही घड्याळे वेळ दाखवण्याबरोबरच लोकांना त्यांची श्रीमंती व समाजातील स्थान दाखवण्याचेही काम करू लागली. अशी काही घड्याळे सर्वसामान्यांना थक्क करणारीच आहेत!

जगातील सर्वात अव्वल अशा महागड्या घड्याळांच्या ब्रँड्समध्ये पॅटेक फिलीपी ग्रँडमास्टर खाईम, ब्रेगेट ग्रँड कॉम्प्लिकेशन मेरी अँटोनिएट, जेगर-लेकॉल्त्रे जॉयलेरी, चोपार्ड 201 कॅरेट वॉच, रोलेक्स यासारख्या अनेक ब्रँड्सचा समावेश होतो. जगातील सर्वात महागड्या घड्याळांमध्ये अव्वल स्थान ‘ग्रॅफ डायमंड्स हॅल्यूसिनेशन’चे आहे. त्याची किंमत 55 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 4 अब्ज, 8 कोटी, 49 लाख, 93 हजार रुपये (फक्त!) आहे.

दुसर्‍या स्थानावरील सर्वात महागडे घड्याळ आहे ‘ग्रॅफ डायमंड्स द फॅसिनेशन.’ त्याची किंमत आहे 40 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 2 अब्ज, 97 कोटी, 8 लाख, 60 हजार रुपये. तिसर्‍या स्थानावर आहे ‘पॅटेक फिलीपी ग्रँडमास्टर खाईम.’ हे 31 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 2 अब्ज, 30 कोटी, 21 लाख, 94 हजार, 850 रुपयांचे घड्याळ. आता अशा अब्जावधी रुपयांची घड्याळे आहेत, याचा अर्थ, त्यांना खरेदी करणारेही लोक असणारच!

उगीचच शोभेसाठी इतक्या महागड्या घड्याळांची निर्मिती होणार नाही! लिलावांमध्येही घड्याळांना मोठीच किंमत मिळत असते. 2019 मध्ये स्वित्झर्लंडची लक्झरी वॉच कंपनी ‘पॅटेक फिलीपी’च्या एका घड्याळाला लिलावात तब्बल 31 दशलक्ष स्विस फ्रँक म्हणजेच सुमारे 222 कोटी रुपयांची किंमत मिळाली. एखाद्या रिस्टवॉचला मिळालेली ही जगातील सर्वाधिक किंमत होती. अर्थात, हा लिलाव चॅरिटीसाठी करण्यात आला होता व मिळालेली सर्व रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी दान करण्यात आली.

‘पॅटेक फिलीपी’च्या या ‘ग्रँडमास्टर खाईम 6300 ए-010’ घड्याळाची निर्मिती खास लिलावासाठीच झाली होती. यापूर्वी ‘डेटोना रॉलेक्स’च्या नावे ‘जगातील सर्वात महागडे घड्याळ’ असा किताब होता. 2017 मध्ये या घड्याळाला 17.8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 127 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. अनेक सेलिब्रिटी महागडी घड्याळे घेऊन चर्चेत येत असतात. फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोकडे महागड्या मोटारींचा जसा ताफा आहे, तसाच महागड्या घड्याळांचाही संग्रह आहे. त्याच्याकडील एका रोलेक्स घड्याळाची किंमत 3 कोटी 72 लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. हे घड्याळ 18 कॅरेट व्हाईट गोल्डने बनवलेले असून त्यावर 30 कॅरेटचे हिरे जडवलेले आहेत.

विराट कोहलीचे ‘रोलेक्स डेटोना’, कायली जेनरचे 18 कॅरेट व्हाईट गोल्डचे ‘पॅटेक फिलीपी’, ड्रेकचे ‘रिचर्ड मायली आरएम 69’, जे झेडचे ‘पॅटेक फिलीपी’ घड्याळही चर्चेत आले. सध्या क्रिकेटपटू हार्दिक पंड्याही महागड्या घड्याळांमुळे चर्चेत आला आहे. ‘आयसीसी टी-20 वर्ल्ड कप’नंतर आपले क्रिकेटपटू अगदीच हात हलवत परत आले नाहीत, हे हार्दिक पंड्याच्या हातावरून दिसून आले. त्याच्याकडील दोन महागडी घड्याळे मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकार्‍यांनी जप्त केली. त्यांची किंमत 5 कोटी रुपये होती, असे म्हटले गेले.

मात्र खुद्द हार्दिकने घड्याळ दीड कोटी रुपयांचे असल्याचा खुलासा सोशल मीडियातून केला. दीड कोटी रुपयांमध्ये काय काय येऊ शकते, याची कल्पना आपण करू शकतो. अशा वेळी नुसते दीड कोटींचे घड्याळच एखादी व्यक्ती घालते म्हटल्यावर आपल्या भुवया उंचावणारच! मात्र उच्चभ्रू समाजात आता अशी घड्याळे घालणे हे प्रतिष्ठेचेच लक्षण मानले जाते. एखाद्याची ‘चांगली वेळ सुरू आहे,’ असेच आपण त्यावरून समजायचे झाले!

Back to top button