तुलसी गौडा : जंगलाचा ज्ञानकोश | पुढारी

तुलसी गौडा : जंगलाचा ज्ञानकोश

रेणुका कल्पना

जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई म्हणजे तुलसी गौडा. जंगलाला स्वतःची ओळख असते. जंगलात काम करून त्यांना कळलेल्या गोष्टी नुसत्या माहितीवर आधारित नाहीत. त्यातून जंगलाबद्दलचा द़ृष्टिकोनही कळतो.

जंगल का आदमी सीखता है
पगडंडियों से चलना,
पेड़ों से विकसित होना,
बारिश से नाचना
और गीत
खुखड़ियों की तरह
उग आते हैं खुद ब खुद ।

आदिवासी कवयित्री जेसिंता केरकट्टा यांच्या ‘जंगल कहता है’ या कवितेच्या या ओळी. चालण्यासारखी अगदी नैसर्गिक गोष्टही जंगलातला माणूस जंगलाकडूनच शिकतो. त्याचं नाचणं, गाणंही इथेच बहरतं. जंगल काय सांगतंय हे ते नुसत्या कानांनीच नाही तर डोळ्यांनी, नाकाने, स्पर्शानेही, अनेकदा चवीनेही ऐकत असतात. पायाखालच्या जमिनीचा ओलावा अनुभवूनही जंगल काय सांगतंय हे त्यांच्या अनवाणी पायांना कळत असतं.

2020च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा 8 नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडल्यापासून याच अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं.

‘मला जंगलाची भाषा येते’ हे त्या कानडी भाषेत, हलक्की आदिवासींंच्या खास लहेजात उच्चारत असल्या तरी त्यांचा देह ती जंगलाचीच भाषा बोलत असतो. वयाच्या विसाव्या वर्षी होन्नाली गावातल्या अगसूर नर्सरीत झाडांच्या संगोपनाचं काम त्यांनी सुरू केलं होतं. 12 वर्षांपूर्वी त्या निवृत्त झाल्या तेव्हा आत्तापर्यंत त्यांनी 40-50 हजार झाडांचं संगोपन केलं असेल, असं वन विभागाचे अधिकारी म्हणाले.

पद्मश्री घेण्यासाठी जंगलातून अनवाणी पायांनी, सुती साडी अंगाला गुंडाळून गौडा राष्ट्रपती भवनात आल्या हाच सध्याचा चर्चेचा विषय आहे. त्यांचा हा पेहराव विशेषतः गळ्यातले पिवळ्या मण्यांच्या माळांचे सहा पदर घातलेल्या गौडा यांना पाहिलं की कधीतरी गुगलवर पाहिलेल्या कोणत्या तरी आफ्रिकन आदिवासी महिलांची आठवण येते. हलक्की समुदायासोबतच उत्तर कर्नाटकातल्या सिद्दी, कुणबी असे अनेक आदिवासी आफ्रिकेतल्या मसाई मारा समुदायासारखे दिसतात. तुलसी गौडा यांना पद्मश्री मिळण्याआधीही अनेकदा या समुदायातली माणसं प्रकाशझोतात आलीयत.

गाण्यासाठी पद्मश्री मिळालेल्या हलक्कीच्याच सुक्री बोमागौडा, हंपी युनिव्हर्सिटीतल्या लोकविज्ञान विभागाकडून सन्मानित केले गेलेले हलक्की वैद्य हनुमनाथन गौडा, सिद्दी समुदायातले पहिले आमदार शांताराम अशी अनेक उदाहरण घेता येतील. तरीही भारत सरकारच्या दस्तऐवजात त्यांची नोंद नाही. अनुसूचित जमातींच्या यादीत नाव मिळवण्यासाठी कित्येक वर्षे त्यांचा लढा चालू आहे. गौडा यांच्या निमित्ताने तरी त्याला गती येईल.

जंगलात फिरून या झाडांच्या बिया आणायच्या, बी बँकेत टाकायच्या, झाडाचा हंगाम आला की त्या कुंडीत पेरायच्या. रोपाचं संगोपन करायचं आणि नंतर लाडाकोडात वाढवलेलं रोप जंगलात जाऊन लावायचं. या कामासाठी गौडा यांना कर्नाटक वन विभागाकडून रोजंदारीवर पगार मिळायचा. ज्या दिवसाची हजेरी, त्या दिवसाचा पगार. नंतर कंत्राट पद्धतीनं काम केलं आणि निवृत्त होण्याआधी 14 वर्षे वन विभागाकडेच कायमस्वरूपी नोकरी केली. आजही त्या जंगलात जातात आणि दुर्मीळ बिया मिळाल्या तर वन विभागाच्या बी बँकेत आणून टाकतात.

‘आंबा, फणस ही झाडं तर नेहमीच लावायचो. निलगिरी, सागवान, शिसम, बाभूळ, आईन अशी कितीतरी झाडं मी लावली…’ गौडा सांगतात. वयाच्या 12 व्या की 13 व्या वर्षी लग्न करून त्या होन्नाली गावात आल्या हेही त्यांना आठवत नाही. आठवते ती फक्त पोटातली भूक. त्या तीन वर्षांच्या असताना वडिलांचं निधन झाल्यानंतर ही भूकच आयुष्यभर पोटात होती. त्या भुकेनं कधी शाळेचं तोंडही पाहू दिलं नाही. पण त्या अशिक्षितपणाचा परिणाम त्यांच्या जंगलाबद्दलच्या माहितीवर झाला नाही.

जंगलातलं कोणतं झाड कधी फलधारण करतं आणि कोणत्या दिशेला बिया फेकतं हेही त्यांना माहीत असतं. त्यामुळेच दुर्मीळ झाडांच्याही दर्जेदार बिया शोधणं त्यांना अवघड जात नाही. जंगलाची आई झालेल्या या बाईला झाडांची आई कोणती ते नेमकं कळतं. जंगलातलं एखादं नव्याने उगवलेलं झाड कोणत्या झाडांच्या बियांपासून आलंय हे त्या सांगू शकतात. आपण दाखवा म्हटलं तर हात धरून नेऊन झाडासमोर उभं करू शकतात. पद्मश्री मिळाला असला तरी आत्तापर्यंत त्यांना असलेल्या ज्ञानाची कुठेही नोंद झालेली नाही.

जंगलाबद्दल एवढं कसं कळतं हे त्यांना शब्दात मांडता येत नाही. ‘मला जंगलाची भाषा येते’, एवढंच त्या म्हणतात. जंगलाला स्वतःची ओळख असते. आपल्या या ओळखीसह त्याच्या आतल्या सगळ्या गोष्टींची ओळख जंगल ताजी टवटवीत ठेवत असं, एवढंच गौडा यांना कळतं.

त्यांना ‘एन्सायक्लोपेडिया ऑफ फॉरेस्ट’ म्हणजे जंगलाचा ज्ञानकोश म्हणतात ते उगाच नाही. जंगलात काम करून त्यांना कळलेल्या गोष्टी नुसत्या माहितीवर आधारित नाहीत. त्यातून जंगलाबद्दलचा द़ृष्टिकोनही त्यांच्या मनात आहे. जंगल नसेल तर तापमान वाढेल हे त्या सांगतात, तेव्हा सध्या हवामान बदलासाठी लढणार्‍या आंदोलकांपेक्षा वेगळं काय म्हणतात?

जंगलातल्या माणसांना राजकारण कळत नाही, असं आपल्याला वाटतं. पण जंगलातली माणसं जंगलातल्या लांडग्यांनाही पुरती ओळखून असतात हे विसरून चालणार नाही. कोणत्या लांडग्याने कशी लबाडी केली होती आणि आपल्या किती लोकांची शिकार केली होती हा इतिहास शाळा न शिकलेल्या जंगलातल्या लोकांना तोंडपाठ असतो.

Back to top button