पंडित जवाहरलाल नेहरू : सौंदर्यवादी आणि विज्ञाननिष्ठ | पुढारी

पंडित जवाहरलाल नेहरू : सौंदर्यवादी आणि विज्ञाननिष्ठ

जयदेव डोळे

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखा एक अद्वितीय नेता आणि अत्यंत त्यागी स्वातंत्र्यसैनिक भारताचा नेता होता, हे जेव्हा आठवते तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नेहरू यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. आज नेहरूंसारख्या नेत्याची उणीव भासते आहे. पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने…

14 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन देशभर बालदिन म्हणून साजरा होतो. आजच्या पिढीला जवाहरलाल नेहरू बालदिनाच्या निमित्तानेसुद्धा माहीत नाहीत. कारण जो पक्ष नेहरूंना एवढा मोठा करून गेला, तो पक्षच जवाहरलालजींच्या ध्येयधोरणापासून दूर गेला आहे. म्हणूनच जवाहरलालजी यांच्या पुण्यतिथीची पन्नास वर्षे झाली तरी तरुण पिढीला या मनुष्याची साधी दखल घ्यावी असेही वाटले नाही. तसे पाहिले तर स्वातंत्र्यसंग्रामाचे नेते म्हणून नेहरू भारतभर सर्वांचेच हिरो होते.

जितके गांधीजी नव्हते तितके नेहरू सर्वांचे लाडके होते. त्याची प्रचिती हिंदी चित्रपटांनी नेहमीच जाणवून दिली. राज कपूर, दिलीप कुमार, कधी कधी देव आनंद हे अभिनेते व दिग्दर्शक आणि नंतर बी. आर. चोप्रा, के. असिफ, गुरुदत्त आदी दिग्दर्शकांनी जवळपास सर्वच चित्रपटांमधून नेहरूंचा अनुयायीच नायक म्हणून उभा केला होता. हा नायक देखणा असे. तो शिक्षित असे. त्याला लहान मुलांचा लळा होता. तो सौंदर्यवादी आणि समाजवादी असा एकाच वेळी असायचा.

गरिबांना मदत करणे किंवा स्वतः गरिबांपैकी एक असणे, त्यागी असणे, साधी राहणी जगणे अशा नेहरूंच्या सर्व वृत्ती हिंदी चित्रपटांच्या नायकांमध्ये बघायला मिळत असत. हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्री पुरुषांची समता आणि गरीब विरुद्ध श्रीमंत या संघर्षामध्ये गरिबांची बाजू घेण्याची धमक या सर्व गोष्टी भारताला हिंदी चित्रपटांमधून नेहरूंमुळे शिकायला मिळाल्या. थोडासा धर्मनिष्ठ, ईश्वरनिष्ठ; पण बराचसा विज्ञाननिष्ठ, शिवाय लोकशाहीवादी असा चेहराही या चित्रपटांच्या नायकांना नेहरूंमुळे मिळाला.

नेहरूंनी उच्च शिक्षणावर जो भर दिला, त्यामुळे भारतभरच एक उदारमतवादी, प्रगतिशील, लोकशाहीनिष्ठ आणि समतावादी दृष्टिकोनाचा विद्यार्थी आकार घेऊ लागला. महाराष्ट्रामध्ये या विचारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. कारण महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा विचारांचा पाया आधीच घालून ठेवला होता. म्हणून  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा महाराष्ट्र अशीही त्याची ओळख राहिली.

नेहरूंच्या उच्च शिक्षणाच्या आग्रहाचा पुरेपूर फायदा महाराष्ट्राने घेतल्याचे आढळते. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र पुरोगामी आणि उच्चशिक्षित दिसतो, त्याचे कारण नेहरूंनी रचलेला पायाच होय. नेहरू यांचे नेतृत्व थोडेसे एकखांबी असले तरी त्यांनी सर्व राज्यांचे मोठे पुढारी काँग्रेसमध्ये आपल्या बरोबरीने आणून ठेवले. त्यामुळे संघराज्यात्मक चौकट असूनही राज्यांना विघटनाचा अथवा वेगळेपणाचा त्रास झाला नाही.

भारतीय राजकारणात गांधींच्या पाठोपाठ नेहरूच असे एक नेते होते, जे लेखक म्हणून आणि विचारक म्हणून विख्यात झाले. ज्या ज्या वेळी ते तुरुंगात असत त्या त्या वेळी नेहरूंनी भरपूर लिखाण केले. इंदिरा गांधींना लिहिलेली पत्रे किंवा मुख्यमंत्र्यांना लिहिलेली पत्रे ही आजही या माणसाच्या उमद्या मनाची आणि विशाल दृष्टीची साक्ष देतात.

इतिहासाचे नेहरूंचे ज्ञान प्रचंड होते. त्यामुळे सगळ्या निर्णयांमागे त्यांनी ऐतिहासिक आढावा घेऊन विचार केल्याचे आढळते. त्यांचे मन चिंतनशील आणि सौंदर्यवादी असल्यामुळे बरेचदा माणसाच्या चांगुलपणावर त्यांचा भरवसा राही.. भ्रष्ट मंत्र्यांना नेहरूंनी बाहेरचा रस्ता दाखवला. शिवाय संसदेतही भ्रष्टाचाराच्या विरोधात ते नेहमी भूमिका घेत; परंतु देशाच्या उभारणीचा काळ असल्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराकडे डोळेझाकसुद्धा केली.

माणसाच्या चांगुलपणावर त्यांचा भरवसा असल्यामुळेच चीनने भारतावर आक्रमण करावे हे त्यांना सहन झाले नाही. राजकारणामधील डावपेच त्यांना कळत होते; मात्र इतका घोर फसगतीचा प्रकार ते पहिल्यांदाच अनुभवत होते. त्यामुळे त्यांना व त्यांच्या प्रतिमेला जबर धक्का बसला. तब्बल 17 वर्षे पंतप्रधानपद सांभाळणारा हा माणूस चीनच्या आक्रमणामुळे हादरून गेला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नेहरू यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. अब्दुल लासेल, मार्शल टीटो यांसारख्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी अलिप्तता जोपासण्याचे राजकारण केले. विचाराने समाजवादी असल्यामुळे त्यावेळच्या सोव्हिएत रशियाकडे नेहरूंचा ओढा होता; परंतु अमेरिकेचाही तेवढाच दबाव असल्यामुळे नेहरूंनी भांडवलशाही आणि साम्यवाद यांना सारखी वागणूक देण्यासाठी अलिप्ततेचा पवित्रा आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वीकारला. त्यांचे त्यागी व्यक्तिमत्त्व आणि प्रचंड बुद्धिीत्ता यामुळे नेहरू त्या काळात एक आंतरराष्ट्रीय शांततेचे दूत म्हणूनही ओळखले जात असत. त्या काळी नेहरू जागतिक नेत्यांपैकी एक मानले जायचे.

उत्तुंग व्यक्तिमत्त्व असूनही नेहरू घराणेशाहीच्या आहारी गेल्याचे आपण पाहतो. आपली कन्या इंदिरा हिला त्यांनी आपला वारस म्हणून नियुक्त केले नसले तरी सूचकपणे त्यांनी इंदिरा गांधी यांना काँग्रेसमध्ये वाट मोकळी करून दिली आणि नंतरचा राजकीय इतिहास आपण सारे जाणतोच. एक अद्वितीय नेता आणि त्यागी स्वातंत्र्यसैनिक होते, हे जेव्हा आठवते तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो.

आज नेमकी नेहरूंसारख्या नेत्याची उणीव भासते. त्यांच्याप्रमाणे कोणताही नेता आज लेखन करत नाही. त्याचे वाचनही अत्यल्प असते. तो आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय नसतो. कलांचा आस्वाद घेण्यात त्याला रस नसतो. विद्वान म्हणून त्याची इतरांशी मैत्री नसते. शास्त्रज्ञ, साहित्यिक आणि कलावंत त्याच्या जवळच्या वर्तुळात नसतात. आजच्या बहुतेक राजकीय नेतृत्वाकडे नेहरूंची विज्ञाननिष्ठा आणि धाडसीपणा यांचा अभाव दिसतो. नेहरूंनी समाजातील चांगुलपणाला नेहमीच पुढे आणले. कटकारस्थानात अथवा डावपेचात नेहरू अग्रेसर नव्हते. आजचे राजकीय पुढारी कारस्थानी आणि कपटी वाटतात, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखा सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेता आपला पंतप्रधान होता याचे आश्चर्यही वाटते.

Back to top button