1971 मध्ये पाकिस्तानची फाळणी लष्करामुळेच झाल्याचा आरोप करून पाकिस्तान पुन्हा एकदा फुटू शकतो, असा इशारा माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. सध्याच्या परिस्थितीचा साकल्याने वेध घेतल्यास पाकिस्तानातील अस्थिरतेचा फायदा तेथील मूलतत्ववादी घेण्याची दाट शक्यता आहे. त्यातून या देशात यादवी माजून पाकिस्तान पुन्हा एकदा फुटू शकतो.
पाकिस्तानमध्ये अत्यंत नाट्यमय स्वरूपाच्या राजकीय घटना-घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये घडताना दिसत आहेत. अर्थात यामध्ये नावीन्य असे काहीच नाही. कारण सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या की अशा स्वरूपाच्या घडामोडी तिथे होत असतात, हा इतिहास आहे. पाच वर्षांपूर्वीचा काळ पाहिल्यास सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी नवाझ शरीफ यांना तेथील न्यायालयायकडून शिक्षा सुनावली जाणे, अटक होणे याचे नाट्य रंगले होते. यावेळी साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणावरून अटक करण्यात आली. या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानात असंतोषाचा आगडोंबही उसळला. तथापि त्यानंतर त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आणि त्यांची सुटका झाली.
पाकिस्तानात तीन प्रमुख सत्ताकेंद्रे असून त्यांच्यामधील राजकीय सुंदोपसुंदीची ही सर्व फलश्रुती आहे. या तीन सत्ताकेंद्रांमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ, इम्रान खान आणि पाकिस्तानचे लष्कर यांचा समावेश आहे. या तिघांमधील रस्सीखेच कमालीची वाढली आहे. 'द डॉन' या पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्राने अलीकडेच आपल्या अग्रलेखामध्ये असे म्हटले आहे की, पाकिस्तान हा यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. पाकिस्तानातील संघर्षमय स्थिती इतकी स्फोटक बनली आहे की, त्यामुळे हा देश फुटीच्या मार्गावर आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर इम्रान खान यांनी देशाला उद्देशून एक भाषण केले असून ते सर्वांचे लक्ष आकर्षित करणारे ठरले. या भाषणामधून त्यांनी थेट लष्कराला इशारा दिला आहे.
पाकिस्तानातील पाठ्यपुस्तकांमधून आजवर असे शिकवले जायचे की, 1971 मध्ये पाकिस्तानची जी फाळणी झाली आणि पूर्व पाकिस्तान हा बांगला देश म्हणून स्वतंत्र झाला, ते भारताचे कारस्थान होते. पाकिस्तान हे सातत्याने मांडत आला आहे. परंतु इम्रान खान यांनी त्याला थेट छेद देणारी वक्तव्ये केली. ते म्हणाले की, मी तेव्हा अंडर 18 क्रिकेट खेळण्यासाठी पूर्व बंगालमध्ये गेलो होतो. त्यावेळी पाकिस्तान सरकार व लष्कराविरोधात तेथील जनतेमध्ये असणारा प्रचंड रोष मी पाहिला होता. या द्वेषामुळे आणि असंतोषामुळे हा भाग फुटून बाहेर पडला. या संपूर्ण प्रकरणात सर्वांत मोठी चूक झाली ती पाकिस्तानी लष्कराची.
किंबहुना पाकिस्तानच्या लष्करामुळेच देश फुटला, ही बाब इम्रान खान यांच्या निमित्ताने एका माजी पंतप्रधानाने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितले. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, आज पाकिस्तानात अगदी तशीच परिस्थिती निर्माण झाली असून यावेळीही लष्कराच्या भूमिकेमुळे पाकिस्तान पुन्हा फुटू शकतो, असा गर्भित इशाराही इम्रान खान यांनी दिला आहे. हा इशारा देताना त्यांनी पाकिस्तानी लष्करावर थेट आरोप करून त्यांना शांत राहण्याचा एक प्रकारे सज्जड दमच दिला आहे. यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि इम्रान खान यांच्यातील संघर्ष एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे.
आजघडीला इम्रान खान यांना पाकिस्तानातून मिळणारे समर्थन प्रचंड मोठे असून त्यात वाढच होत चालली आहे. किंबहुना, इतकी लोकप्रियता असणारा नेता पाकिस्तानला आजवर कधीच मिळालेला नव्हता. मुळात, पाकिस्तानात शरीफ घराणे, भुत्तो घराणे यांसारख्या घराणेशाहीचाच पगडा सर्वोच्च पदावर राहिला आहे. तथापि, इम्रान खान हा सर्वसामान्यांचा नेता म्हणून पुढे आला आणि लोकसमर्थनामुळेच सत्तेतील प्रमुख पदावर विराजमान झाला. लष्कराने टाकलेल्या डावपेचांनंतर इम्रान यांची या पदावरून गच्छंती करण्यात आली तेव्हा पाकिस्तानात मोठा जनक्षोभ उसळला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना अटक झाल्यानंतर संतापलेल्या लोकांनी पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयापुढे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्यापुढे मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली. या आंदोलनांचे, संघर्षाचे चित्र पाहून जगभरातील प्रसार माध्यमे पाकिस्तानात आता लष्करी बंड होणार असे सांगत होती. पण तसे अजिबात घडलेले नाही. साधारणतः 2 आठवड्यांहून अधिक काळ हा संघर्ष सुरू असूनही पाकिस्तानचे लष्कर अद्यापही शांत आहे. याचे कारण इतिहासात पहिल्यांदाच असे दिसून आले आहे की, पाकिस्तानी लष्कराला पाकिस्तानी जनतेचे समर्थन मिळत नाहीये.
1977 मध्ये अशाच प्रकारची लोकप्रियता लाभलेले झुल्फिकार अली भुत्तो हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यांच्यामध्ये आणि तत्कालीन लष्करप्रमुख झिया उल हक यांच्यामध्येही अशाच प्रकारचा संघर्ष झाला होता. त्या संघर्षामध्ये झुल्फिकार अली भुत्तो यांना माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर 1999 मध्ये भारताबरोबरचे कारगिल युद्ध हे तत्कालीन लष्कप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी घडवून आणल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला. शरीफ यांना श्रीलंकेतील एका बैठकीला पाकिस्तानचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यासाठी मुशर्रफ यांनी पाठवले होते. या बैठकीला जाण्यासाठी शरीफ जेव्हा विमानात बसले तेव्हा इकडे मुशर्रफ यांनी सरकार बरखास्त करून टाकले. ही बातमी कळताच त्याच विमानाने शरीफ पुन्हा परत आले. पण त्यांचे विमान पाकिस्तानात लँड होऊ दिले नाही. यावरून पाकिस्तानचे राजकीय नेतृत्व आणि लष्कर यांच्यात प्रचंड संघर्ष झाला. अखेरीस ते विमान लँड होऊ दिले. पण मुशर्रफ यांनी शरीफ यांना हटवून लष्करी राजवट प्रस्थापित केली.
या दोन्ही प्रकरणांमध्ये लष्करी हुकूमशहांचाच विजय झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे यावेळीही पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिफ मुनीर पुढे येतील आणि इम्रान खान यांना अटक करून तुरुंगात धाडतील व पाकिस्तानात पुन्हा एकदा लष्करी राजवट लागू होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण पाकिस्तानी लष्कराने नेहमीच लोकांमध्ये प्रसिद्ध होणार्या पंतप्रधानांचे पंख छाटण्याचे काम केले आहे. त्यामुळे झुल्फिकार अली भुत्तो, नवाझ शरीफ, बेनझीर भुत्तो यांच्याप्रमाणेच इम्रान खान यांनाही संपवण्याचा प्रयत्न होईल, असे लोकांना वाटत होते. पण पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने इम्रान यांची बाजू उचलून धरली आणि त्यांना जामीन मंजूर केला. दुसरीकडे पाकिस्तानच्या लष्करामध्ये आता फूट पडली आहे. याचे कारण इम्रान खान हे पंजाबचे असून ते पठाण आहेत. पाकिस्तानच्या लष्करामध्ये निम्म्याहून अधिक अधिकारी हे पंजाबी आणि पठाण आहेत. तसेच या सर्वांचे इम्रान खान यांना समर्थन आहे. त्यामुळे इम्रान खान यांचेे पारडे जड झाले आहे. सातत्याने माध्यमांसमोर येऊन ते जनतेला आवाहन करत आहेत.
इम्रान यांच्या वाढत्या लोकप्रियतेने धास्तावलेल्या पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या बंदोबस्तासाठी एक विचार चालवला आहे. त्यानुसार सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आधार घेत इम्रान यांना 10 वर्षांसाठी तुरुंगात टाकण्याचा लष्कराचा प्रयत्न आहे. त्याविरोधात इम्रान यांनी थेट इशारे दिले आहेत. तरीही लष्कराने आक्रमक भूमिका घेऊन इम्रान यांच्याविरोधात कठोर कारवाई केली तर मात्र पाकिस्तानात अंतर्गत यादवी माजण्याची दाट शक्यता तेथील परिस्थिती दर्शवत आहे. या यादवीतून पाकिस्तान फुटू शकतो.
दुसरीकडे, या अंतर्गत असंतोषाचा, अस्थिरतेचा फायदा तेथील कट्टरतावादी इस्लामिक संघटनांकडून आणि दहशतवाद्यांकडून घेतला जाण्याची भीती आहे. पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे. या अण्वस्त्रांवर दहशतवाद्यांची नजर आहे. आताच्या अस्थिरतेचा गैरफायदा घेत ही अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडण्याची चिंता जगाला भेडसावते आहे.
इस्लामिक राष्ट्रांची लोकशाहीची मानसिकताच मुळी वेगळी आहे. त्यांच्या दृष्टीने लोकशाही म्हणजे इस्लामीकरण. त्यामुळेच मागील काळात अरब स्प्रिंगसारखी चळवळ यशस्वी होऊ शकली नाही. आताही पाकिस्तानची वाटचाल कट्टर इस्लामीकरणाकडे होऊ शकते.
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील उत्तर वझिरीस्तान भागात तहरीक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने मध्यंतरीच्या काळात इस्लामवर आधारीत शर्रीयत सरकार लागू करुन पाकिस्तानातच एक वेगळे राष्ट्र तयार केल्याची घोषणा केली होती. मध्यंतरी या संघटनेने पाकिस्तानात भीषण दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. दुसरीकडे, बलुचिस्तानातील लोकांचा स्वातंत्र्याचा लढा आजही कायम आहे आणि तहरीक ए तालिबान पाकिस्तानशी या बलुचांनी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे सध्याच्या संघर्षानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत हे दोन प्रांत पाकिस्तानातून वेगळे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. थोडक्यात पाकिस्तानला येत्या काळात विभाजनाला नव्हे त्रिभाजनाला सामोरे जावे लागू शकते, अशी स्थिती आहे.
भारताच्या दृष्टीने अस्थिर पाकिस्तान हा चिंतेचा विषय राहिला आहे. कारण या अस्थिरतेवरुन लक्ष वळवण्यासाठी लष्करे तैय्यबा, जैश ए मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटना सीमेवर सक्रिय होताना दिसतात. त्यामुळे भारतीय लष्कराला येत्या काळात अधिक सजग राहणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, 1971 मध्ये पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा प्रचंड निर्वासितांचे लोंढे भारतात आले होते. आता त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टिकोनातूनही भारताला सावध राहावे लागेल.
डॉ. शैलेंद्र देवळाणकर,
परराष्ट्र धोरण विश्लेषक