सिंहायन आत्मचरित्र : यशवंतराव चव्हाण : सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : यशवंतराव चव्हाण : सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

गतवर्षी पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहे, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

सह्याद्रीच्या कुशीत अनेक माणसं जन्माला येत असतात; पण त्यातल्या एखाद्यालाच हिमालयाची उंची प्राप्त होते. एव्हरेस्ट सर करण्याची महत्त्वाकांक्षा अनेकांना असते; पण एखादाच शेरपा तेनसिंग एव्हरेस्टवर झेंडा रोवण्यात यशस्वी होतो. यशवंतराव चव्हाण साहेब हेसुद्धा हिमालयाच्याच उंचीचं व्यक्तिमत्त्व! परंतु, हिमालयाची उंची त्याच्या पायथ्याशी उभं राहून समजत नसते, असं म्हणतात. त्याप्रमाणे चव्हाणसाहेबांचं श्रेष्ठत्वही मराठी माणसाला पूर्णांशानं समजलं होतं, असं म्हणणं धाडसाचं होईल!

यशवंतराव चव्हाण साहेब आणि आबांचे स्वातंत्र्य लढ्यापासूनचे संबंध. एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेला. त्यामुळे त्यांचे मैत्र दाट. मी तर त्यांना लहानपणापासूनच पाहत आलो होतो. ते कोल्हापुरात आले की, न चुकता ‘पुढारी’त अथवा आमच्या घरी येत. आबांची नि त्यांची तासन्तास चर्चा चाले. त्यातून त्यांचं सुसंस्कृत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व उलगडत जाई.

संबंधित बातम्या

आबांच्या नि त्यांच्यामध्ये नेहमीच राजकारण, समाजकारणापासून साहित्यापर्यंत अनेक विषयांवर सांगोपांग चर्चा होत असत. एक प्रकारची मेजवानीच असायची ती! माझ्यासाठी तर तो गृहपाठच होता आणि तो मी मनापासून गिरवीत असे. त्याचा उपयोग मला भविष्यात फार चांगल्या पद्धतीनं झाला..!

ते मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांच्याशी स्पर्धा करणं कोणालाच जमलं नाही आणि जवळजवळ तीन तपं त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. 1962 साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी त्यांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्ली दरबारी नेलं; पण तरीही महाराष्ट्रावर त्यांची पकड कायम राहिली. त्यांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी गावपातळीवरच्या सामान्य कार्यकर्त्यालाही ते व्यक्तिशः ओळखत. त्याला नावानं हाक मारीत! लोकांप्रति असणारी त्यांची निष्ठा कल्पनातीत होती. त्यामुळे त्यांच्याएवढा लोकसंग्रह अन्य कुणा नेत्याचा असेल का, याबद्दल शंकाच आहे.

त्यांच्या आणि आबांच्या चर्चेतून अनेक मौलिक विचार जन्म घेत असत. सरकारनं बहुजन कल्याणकारी असलं पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. आबांशी चर्चा करताना ते एकदा म्हणाले होते.

“लोकशाही राज्यकारभारामध्ये, चांगलं काम करणं किंवा लोकांच्या उपयोगाचं काम करणं, एवढं पुरेसं नाही. काम चांगलं तर केलंच पाहिजे; पण काम चांगल्या प्रकारे झालं आहे, याची लोकांना प्रचिती येणं तेवढंच महत्त्वाचं आहे. लोकांना ते जाणवलं पाहिजे. कारण, राज्यकारभाराची खरी कसोटी लोकांच्या समाधानातच आहे. केवळ सरकार चांगलं असून उपयोग नाही, तर सरकारचा कारभार चांगला चालला आहे, असं लोकांना वाटलं पाहिजे. जाणवलं पाहिजे. तरच तो राज्यकारभार चांगला म्हणता येईल!”

अशा या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. शाळकरी वयातच ते स्वातंत्र्य लढ्यात उतरले. शाळेच्या पटांगणात तिरंगा फडकावल्याबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. तुरुंगात त्यांना आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन, एस. एम. जोशी अशा दिग्गजांचा सहवास लाभला. त्यांना इथंच वैचारिक बाळकडू लाभलं आणि त्यांचा पिंड त्यावर पोसला गेला.

तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी डॉ. बाळकृष्ण हे राजाराम कॉलेजचे प्राचार्य होते. त्या बुद्धिमंताचं चव्हाणसाहेबांना बहुमोल मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या विचारांना अधिक प्रगल्भता प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी पुण्यात जाऊन लॉची पदवी घेतली. परंतु, देशभर उसळलेली स्वातंत्र्य चळवळीची खदखद त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला!

1937 साली झालेल्या प्रांतिक कौन्सिलच्या निवडणुकीत त्यांनी सातारा जिल्ह्यातून काँग्रेसचे उमदेवार निवडून आणले. ही त्यांच्या भविष्यातील राजकीय जीवनाची नांदीच होती. या निवडणुकीनं त्यांचं नेतृत्व प्रस्थापित झालं. मात्र, 1942 च्या चळवळीत ते भूमिगत झाले; पण ब्रिटिश सरकारनं त्यांच्यावरचा राग त्यांच्या पत्नीवर काढला. वेणुताईंना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनाही दोनवेळा तुरुंगवास भोगावा लागला. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग,’ असाच तो सारा काळ होता.

परंतु, ‘फानूस बन के जिस की हिफाजत हवा करे, वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे।’ या उक्तीप्रमाणे 1946 च्या निवडणुकीत ते स्वतःच प्रचंड बहुमतांनी निवडून आले आणि तेव्हाचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

पुढे 1952 च्या निवडणुकीतही चव्हाणसाहेब प्रचंड बहुमतांनी विजयी झाले. मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात त्यांना नागरी पुरवठा, समाजकल्याण आणि वन अशी खाती मिळाली. त्यांनी आपल्या अंगभूत प्रशासन कौशल्यानं या खात्यात चैतन्य निर्माण केलं.

1956 साली द्वैभाषिक राज्य स्थापन झाले होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा ऐन भरात आला होता. त्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मुकुट खूपच काटेरी होता. मात्र, आपल्या सौजन्यशील वागण्यानं यशवंतराव चव्हाण साहेबांनी तारेवरची कसरत करीत ती जबाबदारी खंबीरपणे पार पाडली. पं. नेहरू महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला प्रतिकूल होते. मात्र, चव्हाणसाहेबांची नेहरूंच्या नेतृत्वावर निष्ठा होती. नेहरूंचा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याला विरोध असल्यामुळे काँग्रेस पक्षांतर्गत चव्हाणसाहेबांची फारच कोंडी होई. विरोधक तर त्यांना धारेवरच धरत. दरम्यान, पं. नेहरू यांचा प्रतापगड दौरा ठरला. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण नेहरूंच्या हस्ते होणार होतं. त्यावेळी मी, आबा आणि सर्जेराव पाटील प्रतापगडावर गेलो होतो.

त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र समितीनं प्रतापगडाच्या पायथ्याशीच वाडा कुंभरोशी इथं उग्र निदर्शनं करण्याची घोषणा केली होती. नेहरूंनी त्यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात शिवरायांविषयी अनुदार लिखाण केलं होतं! त्याचाही जनतेत प्रचंड संताप होता. त्यामुळे परिस्थिती कमालीची तंग होती.

परिस्थितीचं गांभीर्य ओळखून चव्हाणसाहेबांनी समितीच्या नेत्यांशी सामंजस्यानं चर्चा केली. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेतली. चव्हाणसाहेबांकडे ‘कन्व्हिंसिंग पॉवर’च इतकी जबरदस्त होती की, कितीही चिडलेला माणूस शांत होऊन माघारी जात असे. त्या दिवशीही तसंच झालं. समिती नेत्यांना समजावून सांगण्यात ते यशस्वी झाले आणि निदर्शनं अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडली.

या प्रकारानं चव्हाणसाहेबांनी एका दगडात दोन पक्षी मारले. एक तर त्यांनी निदर्शनं होऊ दिली; पण कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही आणि त्यामुळे पंडित नेहरूंच्या ध्यानी संयुक्त महाराष्ट्राचा धगधगता प्रश्नही आणून दिला. हा त्यांच्या मुत्सद्देगिरीचा भाग होता, यात शंकाच नाही. त्यामुळे प्रतापगडावरील भाषणात पं. नेहरूंनी छ. शिवरायांच्या कार्याची मनःपूर्वक प्रशंसा केली आणि मूळ वादावर पडदा पडला. दौर्‍याला गालबोट लागलं नाही, हे अर्थातच चव्हाणसाहेबांचं यश!

उगवण्यासाठी आधी ते पेरावं लागतं, हे शेतकरी कुटुंबातून आलेल्या यशवंतरावांना चांगलं ठाऊक होतं. म्हणूनच नेहरूंच्या दौर्‍यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पेरला आणि पुढे 1959 मध्ये त्यावेळच्या काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी या महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आल्या असताना चव्हाणसाहेबांनी त्या प्रश्नाला पुन्हा एकदा खतपाणी घातलं.

त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची आवश्यकता इंदिराजींच्या लक्षात आणून दिली. इंदिराजींनी दिल्लीला परत गेल्यावर ही बाब नेहरूंना पटवून दिली. नेहरूंनी हिरवा कंदील दाखवताच, स्वतंत्र महाराष्ट्राचा मंगलकलश खुद्द यशवंतराव चव्हाणसाहेबांनीच आणला. हा जसा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील जनतेचा विजय होता, तसाच तो चव्हाणसाहेबांच्या मुत्सद्देगिरीचाही विजय होता; हे नाकारता येणार नाही!

मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर त्यांनी कृषी, उद्योग आणि सहकार या क्षेत्रांना चालना दिली. ग्रामीण भागाच्या अगदी तळापावेतो नेतृत्व निर्माण व्हावे आणि ग्रामविकासात लोकसहभाग वाढावा, या हेतूनं त्यांनी पंचायतराज ही संकल्पना अंमलात आणली. या संकल्पनेतून ग्रामीण भागातून नेतृत्वाची नवी पिढी उभी राहिली. इतकेच नव्हे, तर इतर राज्यांमध्येेही पंचायतराजचं अनुकरण झालं. यामध्ये चव्हाणसाहेबांचा द्रष्टेपणाच दिसून येतो.

त्यांच्या कारकिर्दीत अठरा नवे साखर कारखाने उभे राहिले. त्यामुळे सहकारी साखर उद्योगाला चालना मिळाली. शिवाजी विद्यापीठ तसेच मराठवाडा विद्यापीठाची स्थापनाही त्यांच्याच प्रोत्साहनातून झाली. त्यांच्याच कारकिर्दीत कोयना आणि उजनी धरणांची उभारणी झाली, तसेच विश्वकोश मंडळ आणि मराठी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना हे तर त्यांचं अत्यंत महत्त्वाचं सांस्कृतिक कार्य म्हणावं लागेल. त्याष्टीनं नवमहाराष्ट्राचे शिल्पकार ही त्यांची ओळख यथार्थच म्हटली पाहिजे.

चीनच्या आक्रमण काळात नेहरूंनी त्यांना केंद्रात बोलावून घेतलं. साहजिकच, त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी चव्हाणसाहेबांनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण, हा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला होता. तसं पाहायला गेलं, तर चव्हाणसाहेबांनंतर बाळासाहेब देसाई यांना संधी मिळायला हवी होती. त्यांच्याकडे तडफ होती, धडाडी होती. त्यांचा नोकरशाहीवर वचक होता. तसेच लोकनेता म्हणून त्यांचे जनता-जनार्दनात वेगळं स्थान होतं. मात्र, यशवंतरावांच्या मनात त्यावेळी काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्याच कालावधीत आबा आणि मी चव्हाणसाहेबांना भेटायला गेलो होतो. तेव्हा आबांनी सहजच विषय काढला.

“आपल्यानंतर कोण?” आबांनी विचारलं.
“बघूयात श्रेष्ठी काय निर्णय घेतात ते.” चव्हाणसाहेब उत्तरले.
“खरं तर, बाळासाहेब देसाईंना संधी मिळायला हवी,” आबा म्हणाले.
त्यावर चव्हाणसाहेब क्षणभर विचारात पडले आणि मग आबांना म्हणाले,
“राजकारणात तसं होत नाही. मी जातीयवादी नाही; पण मी मराठा आहे आणि बाळासाहेबही मराठाच आहेत. त्यामुळे बाळासाहेबांना संधी दिली, तर मराठा असल्यानं त्यांना मुख्यमंत्रिपदावर बसवण्यात आलं, असा जनतेत संदेश जाईल.”
चव्हाणसाहेबांचे हे विचार ऐकून आबा तर एकदम सर्दच झाले.
“पण, तुम्ही मराठा होता, म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकलात!” आबा अत्यंत परखडपणानं उद्गारले.

आबांच्या सडेतोड हल्ल्यानं चव्हाणसाहेब क्षणभर स्तब्ध झाले. एक तर मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीला असं काही ऐकायची सवय नसते आणि स्थान मोठं असल्यानं त्यांना कोणी सडेतोड बोलतही नसतं. चव्हाणसाहेबांनी एकंदरीत अंदाज घेतला आणि त्यांनी हसूनच तो विषय टाळला.

प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्रिपदी मारोतराव कन्नमवारांची वर्णी लावण्यात आली आणि त्यांच्या आकस्मित मृत्यूनंतर यवतमाळच्या वसंतराव नाईक यांना संधी देण्यात आली. राजकारणात सत्ता हीच महत्त्वाची असते. ती आपल्याच बगलेत कशी राहील, याची दक्षता घेण्यात येत असते. त्याला चव्हाणसाहेब तरी कसे अपवाद असतील? मात्र, सत्ता गेल्यानंतर काय अवस्था होते, याचं प्रत्यंतरही चव्हाणसाहेबांना उतारवयात आलंच!

बाळासाहेब देसाई हे आबांचे जवळचे मित्र. एकदा श्रेष्ठींशी झालेल्या मतभेदावरून बाळासाहेबांनी तडकाफडकी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सार्‍या महाराष्ट्रात खळबळ उडाली. आमच्यासाठी हा मोठाच धक्का होता. मी आणि आबा लगेचच गाडी काढून त्यांच्या भेटीला निघालो. बाळासाहेबांनी नेहमीप्रमाणेच मोठ्या प्रेमानं आमचं स्वागत केलं. आबांनी मूळ मुद्द्यालाच हात घातला.

“राजीनामा दिलात ते चांगलं झालं नाही! अजूनही वेळ गेली नाही. राजीनामा मागं घ्या, नाहीतर राजकारणाबाहेर फेकले जाल. प्रवाहाच्या बाहेर पडाल!”

त्यावर बाळासाहेब आत्मविश्वासानं म्हणाले, “तसं होणार नाही. तीस ते चाळीस आमदार माझ्या मागे आहेत! श्रेष्ठींना माझा विचार करावाच लागेल!”

त्यांचा दांडगा आत्मविश्वास पाहून आबाही गप्पच बसले. उठता उठता एवढंच म्हणाले, “तसं असेल तर तुम्हाला माझ्या शुभेच्छा!”
परंतु, बाळासाहेबांना वाटत होतं, तसं काही घडलं नाही. आधी पाठिंबा देणार्‍या आमदारांनी ऐनवेळी पाठीमागून पळ काढला आणि सत्तेला सलाम केला. अखेर बाळासाहेब एकटे पडले! सरळ कोल्हापूरला येऊन राहिले. नंतर मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी आपली चूक मान्य केली; पण त्याला आता फार उशीर झाला होता.

ऑक्टोबर, 1962 मध्ये चीननं भारतावर विश्वासघातानं आक्रमण केलं. जबाबदारी स्वीकारून तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिला. तेव्हा पं. नेहरूंनी चव्हाणसाहेबांना तातडीनं दिल्लीला बोलावून घेतलं आणि त्यांच्यावर मोठ्या विश्वासानं संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवली. चव्हाणसाहेब प्रांतिक राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात आले. आपल्या मुरब्बी प्रशासन कौशल्यानं त्यांनी लवकरच संरक्षण खात्यावर आपली घट्ट पकड बसवली.

संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी आपल्या लष्करात आवश्यक त्या सर्व सुधारणा केल्या. 1965 साली पाकिस्ताननं भारतावर आक्रमण केलं. तेव्हापर्यंत यशवंतरावांनी भारतीय लष्कर चांगलंच सशक्त केलं होतं. भारतीय लष्करानं असा काही पराक्रम गाजवला की, खेमकरण रणभूमी पॅटन रणगाड्यांचं कब्रस्तान म्हणून ओळखली जाऊ लागली! या युद्धात विमानांचा वापर करण्यासाठी यशवंतरावांनी लालबहादूर शास्त्रींचं मन वळवलं आणि त्याची परिणिती पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्यात झाली.

या विजयाचं श्रेय जसं सेनादलाचं, पंतप्रधान शास्त्रींचं तसेच ते चव्हाणसाहेबांचही होतं, याबद्दल कोणाचं दुमत असायचं कारण नाही.
पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी या तिन्ही पंतप्रधानांसमवेत त्यांना काम करण्याचा योग आला. संरक्षण, अर्थ, परराष्ट्र व्यवहार आणि गृह खात्यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी जबाबदारीनं आणि यशस्वीपणे सांभाळली. कारभारावर आपली छाप उमटवून दिल्लीत महाराष्ट्राची शान वाढवली. मी, आबा व केशवराव भोसले जर्मनीहून मागवणार्‍या प्रिटिंग मशिनचे लायसेन्स मिळवण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी चव्हाणसाहेब केंद्रात मंत्री होते. त्यांनी मला इंपोर्ट लायसेन्स चारच दिवसांत मिळवून दिलं. इतकंच नाही, तर मशिन बसल्यानंतर ते कोल्हापूरला प्रेसमध्येही आले.

मात्र, 1969 मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्त्वनिष्ठ चव्हाणसाहेबांनी, राष्ट्रपतींच्या निवडणुकीवेळी मोरारजी देसाई आणि स. का. पाटील यांच्या सोबत जाऊन संजीव रेड्डी यांच्या बाजूनं कौल दिला. त्यामुळे त्यांनी इंदिराजींची नाराजी ओढवून घेतली. इंदिराजींची काही मतं न पटल्यामुळे त्यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं. आणीबाणीला चव्हाणसाहेब अनुकूल नव्हते. त्यामुळे त्यांची आणीबाणीत फारच कुचंबणा झाली!

आणीबाणीनंतर घेतलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर इंदिराजींच्या धोरणांविरुद्ध असणार्‍यांनी उघड बंड पुकारलं आणि पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रीय काँग्रेसचे आय काँग्रेस आणि आर काँग्रेस (रेड्डी काँग्रेस) असे दोन पक्ष अस्तित्वात आले. ज्या काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी चव्हाणसाहेबांनी आपलं कौशल्य पणाला लावलं होतं, त्या पक्षाची शकलं होताना त्यांना पाहावी लागली.

त्यांचे शिष्य शरद पवार यांनीही ‘पुलोद’ प्रयोगातून आपली स्वतंत्र चूल मांडली. त्याचा घाव त्यांच्या जिव्हारी बसला. त्यांच्याच शिष्यानं महाराष्ट्र काँग्रेस फोडली, असा अप्रत्यक्ष त्यांच्यावर ठपका ठेवला गेला, तर शरद पवारांच्या बंडाला चव्हाणसाहेबांचा मूक आशीर्वाद होता, असाही संदेश दिल्लीपर्यंत पोहोचला गेला. या प्रकारानं दिल्ली दरबारी चव्हाणसाहेबांची कळत नकळत मानहानी झाली, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

पुढे चरणसिंग यांच्या मंत्रिमंडळात चव्हाणसाहेबांना उपपंतप्रधानपद मिळालं. महाराष्ट्रासाठी ही निश्चितच गौरवाची गोष्ट होती; पण तो आनंद फार काळ टिकला नाही. हे सरकार लवकरच कोसळले आणि त्यांचं उपपंतप्रधानपद अल्पायुषी ठरलं. त्यानंतर पुन्हा निवडणुका होऊन इंदिराजी पंतप्रधान झाल्या. इंदिराजींना जनतेनं दिलेला कौल मान्य करून, चव्हाणसाहेब परत स्वगृही आले.

पण, जे नुकसान व्हायचं ते होऊन गेलं होतं. इंदिराजींनी शेवटपर्यंत त्यांची उपेक्षाच केली. कुठून तरी बोळवण करायची म्हणून त्यांना आठव्या वित्त आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं. मात्र, त्यात ते काही रमले नाहीत.

यशवंतराव चव्हाणसाहेबांचा व्यासंग अफाट होता. मोजक्या सुसंस्कृत राजकीय नेत्यांपैकी ते एक होते. साहित्य, कला, संगीत यामध्ये ते मनापासून रमत असत. अनेक साहित्य संमेलनं, कवी संमेलनांना त्यांची उपस्थिती असे. मी उपस्थित असलेल्या कराडच्या साहित्य संमेलनातील एक घटना सांगतो.

कराडच्या साहित्य संमेलनात ते स्वागताध्यक्ष होते, तेव्हाची गोष्ट. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे हे खाली प्रेक्षकांत बसलेले होते. हे चव्हाणसाहेबांनी व्यासपीठावरून पाहिलं. मात्र, ते तडक व्यासपीठावरून खाली उतरले आणि पु.ल. यांच्या शेजारी जाऊन बसले. ते पाहून संयोजकांची एकच तारांबळ उडाली आणि त्यांनी चव्हाणसाहेबांसह पु.ल. यांनाही व्यासपीठावर बोलावून घेतलं. त्यांना साहित्यिकांविषयी केवढा आदर होता, हे या एकाच घटनेवरून सिद्ध होतं.

ते केवळ रसिकच नव्हते, तर उत्तम प्रकारचे साहित्यिकही होते. ‘ऋणानुबंध’, ‘कृष्णाकाठ’, ‘भूमिका’, ‘विदेश दर्शन’, ‘सह्याद्रीचे वारे’, ‘युगांतर’ ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली ग्रंथसंपदा होय. ते पट्टीचे वक्ते होते. मराठीप्रमाणे इंग्रजीवरही त्यांचं चांगलंच प्रभुत्व होतं तसेच त्यांचं हिंदीही दर्जेदार होतं. लोकशाही समाजवाद या तत्त्वप्रणालीवर त्यांची गाढ श्रद्धा होती. त्यांच्यावर कधीच कसलाही आरोप झाला नाही. ते आयुष्यभर निष्कलंकच राहिले. अशा या दूरद़ृष्टीच्या, अष्टपैलू नेत्याची अखेरच्या काळात मात्र परवड झाली, त्याची खंत वाटते.

‘पुढारी’साठी नवीन मशिनरी मागवताना त्यांचं अनमोल सहकार्य लाभलं होतं. मी ‘विशाल सह्याद्री’ हे पत्रक चालवायला घ्यावं, अशी त्यांची फार इच्छा होती; पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला. त्यावर त्यांनी तो विषय सोडून दिला. चव्हाणसाहेब आग्रही होते; पण हट्टाग्रही मुळीच नव्हते. आबांच्या अमृत महोत्सवाच्या समारंभाला ते आवर्जून उपस्थित राहिले आणि आबांवर भरभरून बोलले. ते आम्हाला घरच्यासारखे होते. आबा आणि मी नेहमी त्यांच्याशी चर्चा करीत असू. प्रत्यक्ष नाही तरी फोनवरून बोलणे होत असे. मी जेव्हा जेव्हा दिल्लीत जात असे, तेव्हा त्यांच्या एक रेसकोर्स रोड या निवासस्थानी त्यांची भेट घेत असे.

स्वगृही परतताना शब्द देऊनही शरद पवार आपल्याबरोबर आले नाहीत. काँग्रेसमध्ये आपण एकाकी पडलो, याची त्यांना कायम खंत लागून राहिली होती. ही खंत ते पुनःपुन्हा बोलून दाखवीत असत.

इथं बाळासाहेब देसाईंच्या मोठेपणाची एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल. जेव्हा यशवंतराव चव्हाणसाहेब इंदिराजींच्या विरोधात गेले, त्यावेळी इंदिराजींना यशवंतरावांना खच्ची करण्यासाठी महाराष्ट्रात पर्याय हवा होता. त्याद़ृष्टीनं चाचपणी करताना इंदिराजींच्या लक्षात आलं की, बाळासाहेब देसाई हे चव्हाणसाहेबांना तगडे स्पर्धक ठरू शकतात. त्यांना जनमानसात मोठं स्थापन आहे. ते हेरून इंदिराजींनी बाळासाहेबांना दिल्लीला बोलावून सांगितलं,

“तुम्ही यशवंतरावांविरोधात उभे राहा! मी तुम्हाला मुख्यमंत्री करते!”
मात्र, चव्हाणसाहेबांची ज्येष्ठता विचारात घेऊन बाळासाहेबांनी तसं करणं टाळलं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. मात्र, चव्हाणसाहेबांना बाळासाहेब आपल्याला शिरजोर होतील, अशी भीती नेहमीच वाटत होती.
राजकारणी माणसं ही नेहमीच सत्तेविना लुळीपांगळी असतात; पण पुन्हा जर सत्ता मिळाली, तर त्यांच्यात नवसंजीवनीच संचारत असते, असा अनुभव आहे.

वसंतदादा पाटलांचंही असंच बोलकं उदाहरण आहे. राजीव गांधींशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. एवढ्या मोठ्या जनाधार असलेल्या नेत्याला वाळीत टाकता येत नसतं. त्यांची कुठेतरी सोय लावावीच लागते. हे ध्यानी घेऊन राजीव गांधींनी त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. दादा त्या राज्यपालपदात खूश नव्हते. परंतु, तब्येतीच्याही तक्रारी चालू होत्या. त्यामुळे एक विश्रांती म्हणूनच त्यांनी राज्यपाल पदाचाही राजीनामा दिला.

ते दिल्लीत असताना व सत्तेत नसताना एकदा मी आणि रसिकभाई शहा त्यांना भेटायला गेलो होतो. बोलता बोलता मी त्यांना म्हणालो, “दादा, हे काही खरं नाही! तुम्ही परत मुख्यमंत्री व्हायला पाहिजे!”

यावर दादा काहीही बोलले नाहीत; पण त्यांनी “मधुमेह वाढल्यामुळे मला आता सक्रिय राजकारणात यायचं नाही,”असे सांगितले. “तुम्ही मला मारायचं ठरवता का? अशा परिस्थितीत मी मुख्यमंत्रिपद काय सांभाळणार?” दादा विषण्णपणे म्हणाले.
मग, मात्र मला राहावलं नाही. मी दादांना स्पष्टच म्हणालो, “दादा, इथं राहिलात तर असेच राहाल. पुन्हा मुख्यमंत्री झालात तर निदान तिरंग्यात लपेटून तरी जाल!”

माझ्या या रोखठोक बोलण्यातील खोच दादांच्या चांगलीच लक्षात आली. ते आणि रसिकभाईही क्षणभर निःशब्द झाले. पुढे दादा पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा मधुमेह कुठल्याकुठे पळून गेला. मुख्यमंत्री म्हणून दादांनी कामाचा कसा धडाका लावला होता, याचा सारा महाराष्ट्र साक्षीदार आहे.

याउलट शंकरराव चव्हाणांचं मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर ते एकदा कोल्हापूरला आले होते. त्यांच्यासोबत बाळासाहेब विखे-पाटीलही होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्या स्वागताला कुणीही फिरकलं नव्हतं. जणू कोल्हापुरात काँग्रेस अस्तित्वातच नव्हती. अखेर त्यांची सर्व व्यवस्था मी केली होती.

हे सर्व पाहिलं, ऐकलं की, ‘शेक्सपियर हा पूर्ण शहाणा माणूस होता’ हे वि. स. खांडेकरांचे विधान खरं वाटू लागतं आणि ‘किंग लियर’ची गोष्टही पटू लागते. राजकारणात सगळेच उगवत्या सूर्याला नमस्कार करीत असतात. मावळत्या सूर्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही आणि इथला सूर्यास्तही कधी होईल, याचा नेम नसतो. त्याला कालमापनाचं गणित लागू पडत नाही.

चव्हाणसाहेबांच्या बाबतीतही तेच झालं. आयुष्याच्या संध्याकाळी ते खूपच एकटे पडले. ज्यांना त्यांच्या जवळचं मानलं जात होतं, त्यांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवल्यामुळे ते खूपच नाराज झाले. आता त्यांना एकमेव साथ सोबत होती ती त्यांच्या धर्मपत्नीची! सौ. वेणुताईंची! पण नियतीला तेही बघवलं नाही! नियतीनं वेणुताईंनाही त्यांच्यापासून हिरावून घेतलं! 1 जून, 1983 रोजी त्यांच्या धर्मपत्नी सौ. वेणुताईंचं दुःखद निधन झालं. त्याचा यशवंतरावांना जबरदस्त धक्का बसला. 2 जून रोजी त्यांच्या लग्नाचा बेचाळिसावा वाढदिवस होता. त्याच्या एक दिवस आधीच मृत्यूनं वेणुताईंवर घाला घातला आणि ही राजहंसांची जोडी फुटली! त्या दोघांचं चाळीस वर्षांचं अद्वैत हरपलं.

वेणुताईंचं पार्थिव मुंबईतील त्यांच्या ‘रिव्हेएरा’ या बंगल्यावर आणण्यात आलं. त्यावेळी मी मरिन ड्राईव्ह येथील चव्हाणसाहेबांच्या ‘रिव्हेएरा’ बिल्डिंगवर गेलो. 2 जून रोजी अंत्ययात्रा निघाली. वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते अंत्ययात्रेत सामील झाले होते. आम्ही मरिन ड्राईव्हवरून चंदनवाडीकडे चालत जात असताना चव्हाणसाहेब माझ्या खांद्यावर हात ठेवून चालत होते. एका अर्थी ते विकलांगच झाले होते. आम्ही सर्व पायी चालतच चंदनवाडी स्मशानभूमीत पोहोचलो. अंत्यसंस्कारासाठी शरद पवारांची लगबग चालू होती. शोकाकुल वातावरणातच अंत्यविधी पार पडला. त्यांच्या लग्नाच्या बेचाळिसाव्या वाढदिवशीच वेणुताईंचा देह अनंतात विलीन झाला.

वेणुताई गेल्यानंतर चव्हाणसाहेब मनानं आणि देहानंही पूर्णपणे खचून गेले. दिल्लीतील त्यांच्या बंगल्यात कित्येकदा ते एकटेच असत. एखादे पुस्तक वाचीत ते आपला सुनासुना वेळ घालवीत असत. नेहमीची गर्दी आता ओसरली होती. मावळत्या सूर्याची शोकांतिका आता मी चव्हाणसाहेबांंच्यात पाहत होतो. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटत असे, तेव्हा ते जुन्या आठवणींना उजाळा देत असत. भूतकाळात रमून जात. आबांच्या प्रकृतीची चौकशी आस्थेवाईकपणे करीत. कधी कधी निःशब्द होऊन शून्यात बघत बसत. जणू त्यांना आता पैलतीर दिसू लागला होता.

तब्येत बिघडल्यामुळे चव्हाणसाहेबांना 24 नोव्हेंबरला दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांचा उपयोग झाला नाही. 25 नोव्हेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अवघ्या महिन्याच्या आतच यशवंतरावांचंही निधन झालं. त्यांच्यावरच्या उपचारासाठी मुंबईतून खास तीन डॉक्टरांचं पथक दिल्लीला गेलं होतं; पण इलाज चालू करण्यापूर्वीच यशवंतराव बेशुद्धावस्थेत गेले. ते पुन्हा शुद्धीवर आलेच नाहीत. त्यांच्या अखेरच्या क्षणी कोल्हापूरचे रसिकभाई शहा हे त्यांच्याजवळ होते. यशवंतरावांचं पार्थिव खास विमानानं मुंबईला आणण्यात आलं. 27 नोव्हेंबरला कराडमधल्या प्रीतिसंगमावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जनसागराच्या साक्षीनं लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यात आला.

वसंतदादा पाटील आणि शरद पवार आदी नेत्यांसमवेत मीही साहेबांच्या अंतिम यात्रेत सहभागी झालो होतो. यशवंतराव पंचत्वात विलीन झाले आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं.

आम्ही ‘पुढारी’तून ‘यशवंतरावांच्या आचार-विचारांचा वारसा’ हा अग्रलेख लिहिला, तर त्यांच्यावर पुढे काही दिवस खास लेख प्रसिद्ध केले.
यशवंतराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचं सुसंस्कृत नेतृत्व होतं, हे निर्विवाद सत्य आहे. त्यांच्यावर अनेकांनी मर्यादा सोडून टीका केली; पण त्यांनी कधीही आपली मर्यादा सोडली नाही. माणसानं किती सुसंस्कृत असावं, याला काही तरी मर्यादा हवी! चव्हाणसाहेबांंच्या आयुष्यातील अखेरचा काळ अत्यंत दुःखद आणि एकटेपणाचाच गेला. खरं तर त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. बहुतांशी महापुरुषांच्या आयुष्यामध्ये अखेरीस शोकांतच येतो, असा इतिहास आहे. ज्याला उदय आहे, त्याला अस्तही आहे, हा नियतीचा नियम असतो. भरती तिथे ओहोटी हा निसर्गाचा नियम आहे. त्याला चव्हाणसाहेब तरी अपवाद कसे राहतील?

आज साहेबांना जाऊनही सुमारे 36 वर्षे होऊन गेली आहेत. तरीही आजसुद्धा हा आधुनिक महाराष्ट्र ‘यशवंतरावांचा महाराष्ट्र’ म्हणूनच ओळखला जातो, यातच त्यांचं चिरंजीवी मोठेपण दडलेलं आहे!म

Back to top button