समाजभान : विवाह आणि कुटुंब संस्थेला धोका | पुढारी

समाजभान : विवाह आणि कुटुंब संस्थेला धोका

डॉ. ऋतू सारस्वत

गेल्या 70 वर्षांत जगाचा प्रजनन दर 50 टक्क्यांनी घसरला आहे. याचे कारण विवाहित जोडप्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. स्वातंत्र्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली आलेल्या ’सहजीवन क्रांती’ने समाजव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करून तरुण पिढीला जीवनभर समर्पण, त्याग आणि जबाबदारी या शब्दांपासून अपरिचित राहणार्‍या मार्गावर ढकलले आहे. सहजीवनातील आधुनिक सामाजिक क्रांती म्हणून मुखवटा घातलेली लैंगिक हुकूमशाहीची ही नवीन मोहीम विवाह आणि कुटुंब संस्थेचा अर्थच नष्ट करत आहे.

जपानमधील 6.30 लाख उद्योग उत्तराधिकारी न मिळाल्याने बंद पडण्याचा धोका असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. विशेष म्हणजे, बंद पडण्याचा धोका निर्माण झालेले हे सर्व उद्योग नफ्यात सुरू आहेत. साहजिकच, या बंद होणार्‍या उद्योगांमुळे जपानचे मोठे आर्थिक नुकसान होईल. यामुळे सुमारे 6.5 दशलक्ष नोकर्‍या नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या व्यावसायिकांसमोरील सर्वात मोठे संकट म्हणजे, यातील बहुतेकांना वारस नाही. हा एक गंभीर मुद्दा आहे. भविष्यात जगातील अनेक देशांमध्ये अशाच समस्या उद्भवण्याच्या शक्यता आहेत. फक्त त्यांचे स्वरूप वेगळे असू शकते. या समस्यांचे मूळ कारण झपाट्याने बदलणारी सामाजिक व्यवस्था असणार आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या जून 2022 च्या अहवालानुसार, गेल्या 70 वर्षांत जगाचा प्रजनन दर 50 टक्क्यांनी घसरला आहे. या अहवालानुसार, येत्या काळात जगभरामध्ये वृद्ध लोकसंख्येमध्ये वाढ होईल. वृद्ध लोकसंख्येमुळे अनेक आर्थिक धोके निर्माण होतात. वृद्धांची संख्या वाढत जाताना काम करणार्‍या, कार्यक्षम तरुण लोकसंख्येमध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, अशी परिस्थिती का निर्माण होत आहे? भविष्यात भारतालाही याचा सामना करावा लागेल का? जागतिक प्रवाह पाहता, दक्षिण कोरिया, चीन, अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीमध्ये विवाहित जोडप्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. आजची तरुण पिढी विवाह करण्याबाबत अनिच्छुक दिसून येते. याचे कारण त्यांना सुखाचे विशेषतः शारीरिक सुख मिळवण्यासाठी घराबाहेरचे मार्ग सापडले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपकडे वाटचाल करणार्‍या भारतातील तरुण पिढीलाही लग्नाचे ओझे वाटू लागले आहे. 2020 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, 26 ते 40 वयोगटातील 42 टक्के भारतीय तरुणांना लग्न करायचे नाही.

एस्टेव्हन आर्टिज ओस्मिना आणि मॅक्स रॉजर यांनी ‘मॅरेजेस अँड डिव्होर्सेस’ नामक अहवालामध्ये विश्लेषण केलेल्या आकडेवारीनुसार, जगातील विवाह दर सातत्याने घसरत आहे. विवाहाशिवाय सहजीवनाची प्रकरणे वाढत आहेत. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) देशांची यासंदर्भातील माहिती तपासली असता, गेल्या शतकात ऐंशीच्या दशकात केवळ 10 टक्के मुले विवाहबाह्य संबंधांमधून जन्माला आली होती. मात्र 2014 मध्ये ही वाढ बहुतेक देशांमध्ये 20 टक्क्यांहून अधिक होती. काही देशांमध्ये ती 50 टक्क्यांहून अधिक होती. हे चित्र केवळ श्रीमंत देशांपुरते मर्यादित नाही. मेक्सिको आणि कोस्टारिकासारखे गरीब देशही या श्रेणीत आहेत.

स्वातंत्र्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली आलेल्या ‘सहजीवन क्रांती’ने समाजव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करून तरुण पिढीला जीवनभर समर्पण, त्याग आणि जबाबदारी या शब्दांपासून अपरिचित राहणार्‍या मार्गावर ढकलले आहे. 2018 मध्ये ‘सहवास आणि बालकल्याण’ या नावाने प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, सहवासातून जन्माला आलेल्या मुलांना गरिबी, असंतोष, भीती आणि असुरक्षिततेचा त्रास होतो. सहजीवनातील आधुनिक सामाजिक क्रांती म्हणून मुखवटा घातलेली लैंगिक हुकूमशाहीची नवीन मोहीम विवाह आणि कुटुंब संस्थेचा अर्थच नष्ट करत आहे. 19 व्या शतकातील समान हक्कांसाठीचा महिलांचा लढा एका मूलगामी स्त्रीवादात बदलला. त्याचा उद्देश लैंगिक विषमता कमी करण्यापेक्षा स्त्री आणि पुरुषांमधील लैंगिक ओळख पुसून टाकणे (हेट्रोसेक्श्युअल) हा होता. कारण, हा द़ृष्टिकोन त्यांच्या द़ृष्टीने प्राचीन संस्कृतीचे प्रतीक होता.

गॅब्रिएल कुबी यांच्या ‘द ग्लोबल सेक्श्युअल रिव्होल्युशन : डिस्ट्रक्शन ऑफ फ्रीडम इन द नेम ऑफ फ्रीडम’ या पुस्तकाने स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वातंत्र्य नष्ट करणार्‍या नव्या हुकूमशाहीच्या विरोधात कुटुंब आणि विवाह संस्थेचा पद्धतशीरपणे नाश करणार्‍यांचे चेहरे उघडे पाडले आहेत. त्याला संपवून लैंगिक साम्यवाद प्रस्थापित करायचा आहे. मानवजातीचे खरे स्वातंत्र्य लैंगिक साम्यवादातच आहे, असे मानणार्‍यांना लैंगिकमुक्तीचा मार्ग अंतिमतः सभ्यतेच्या नाशापर्यंत जातो, या वस्तुस्थितीची जाणीव नाही.

मानववंश शास्त्रज्ञ जे. डी. अनविन यांचे ‘सेक्स अँड कल्चर’ या पुस्तकात सुमारे 5,000 वर्षांच्या इतिहासात पसरलेल्या 80 आदिम जमाती आणि सहा संस्कृतींचा सखोल अभ्यास मांडण्यात आला आहे. अनविन यांना लोकांची सांस्कृतिक उपलब्धी आणि लैंगिक संयम यांच्यात सकारात्मक संबंध आढळला आहे. अनविनने मोठ्या तपशिलांसह रूपरेषा मांडली असून, त्यानुसार जसजशी राष्ट्रे समृद्ध होतात, तसतशी ते लैंगिकतेसंदर्भातील नैतिकतेबाबत अधिकाधिक उदारमतवादी होत जातात. तथापि, लैंगिक स्वच्छंदतेमध्ये गुंतल्याने जीवन-शक्ती नष्ट होऊ लागते. लैंगिकतेसंदर्भातील प्राचीन, पारंपरिक निकष आणि संस्कृती यांच्यातील संबंधांचे हे दस्तऐवजीकरणानुसार जेव्हा लैंगिक संधी कमी केल्या जातात, तेव्हा समाजाची भरभराट होते, अशी मांडणी करण्यात आली आहे. कुटुंबाबाहेर लैंगिक संबंध ठेवण्याची संधी आणि सभ्यतेचा र्‍हास यांच्यात अनविनला 100 टक्के सहसंबंध सापडला आहे.

मातृत्व आणि विवाहाच्या बंधनातून मुक्तता आणि मुक्त लैंगिक संबंधांची प्राप्ती लैंगिक समानता स्थापित करू शकते, असे स्त्रीवाद्यांना वाटते का? खरेच असे आहे का? असे असते तर अमेरिकेसह इतर अनेक देशांनी 100 टक्के लैंगिक समानता प्राप्त केली असती. नैसर्गिक मानवी भावनांच्या मुक्तीद्वारे पितृसत्ताकतेपासून मुक्ती होईल, असे मानणे ही एक भ्रामक कल्पना आहे. त्याला स्त्रियांच्या शोषणाचे, संघर्षाचे केवळ आवरण देणे, ही सुनियोजित रणनीती आहे. कारण, आजच्या काळात ‘प्रजनन उद्योग’ वेगाने आपले वर्चस्व वाढवू लागला आहे.

‘वर्क, मेट, मॅरेज, लव्ह : हाऊ मशिन्स शेप अवर ह्युमन डेस्टिनीज’ या पुस्तकाच्या लेखिका डेबोराह स्पार म्हणतात की, आधुनिक तंत्रज्ञानाने मुलांचे संगोपन आणि कुटुंबाची पारंपरिक रचनाच उखडून टाकली आहे. याचे भविष्यात घातक परिणाम होतील. हा गंभीर प्रश्न असून, यावर वेळीच विचार न केल्यास भविष्यात भारतीय समाजाचे अध:पतन होण्याची शक्यता अधिक आहे.
(लेखिका समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत)

 

Back to top button