गुन्हेगारी : महाठकसेन सुकेशच्या नवलकथा | पुढारी

गुन्हेगारी : महाठकसेन सुकेशच्या नवलकथा

विनिता शाह : मनी लाँडरिंग प्रकरणात तुरुंगात असणारा सुकेश चंद्रशेखर हा अलीकडच्या काळातील बहुचर्चित महाठग म्हणून ओळखला जात आहे. तिहारच्या तुरुंगात कैदेत असूनही या ठकसेनाची जीवनशैली आलिशान राहिल्याचा आरोप केला जात आहे. अनेक वर्षांपासून सुकेशने माजी मुख्यमंत्र्यांचा नातू असल्याचे सांगून शेकडो लोकांना फसवले आणि कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली. हिंदी, इंग्रजी आणि दक्षिणेतील जवळपास सर्व भाषा जाणणार्‍या सुकेशने सरकारी कर्मचारी आणि राजकारणी यांचीही फसवणूक केली आहे.

भारतामध्ये घोटाळेबाज आणि त्यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या सुरस कथा यांचा एक वेगळाच इतिहास आहे. देशातील बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून विदेशात स्थायिक झालेल्या विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांच्या कहाण्यांनी आर्थिक विश्व ढवळून निघाले होते. त्यांच्या कथांना लाजवेल अशी कहाणी सुकेश चंद्रशेखर या ठकसेनाच्या फसवणुकीची आहे. चौतीस वर्षीय सुकेश चंद्रशेखर हा कर्नाटकातील बंगळूर येथील रहिवासी. आलिशान जीवन जगण्याच्या उत्कटतेमुळे तो एक ठग बनला. त्याने अभिनेत्री लीना मारिया पॉलशी लग्न केले होते, जी त्याच्या फसवणुकीच्या खेळ्यांमध्ये एक साथीदार होती. सुकेशने बिशप कॉटन बॉईज स्कूल, बेंगलोर येथे शिक्षण घेतले होते. लहानपणापासूनच त्याच्या डोक्यात झटपट श्रीमंतीचे वेड भरले होते.

आर्थिक फसवणूक प्रकरणात त्याला पहिल्यांदा अटक झाली तेव्हा त्याचे वय होते अवघे 17 वर्षे! सुकेशने एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ राजकारण्याच्या मुलाचा मित्र असल्याचे सांगून एका कुटुंबाची तब्बल 1.5 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. नंतरच्या काळात सुकेशने बंगळूरच्या पोलिस आयुक्तांची खोटी स्वाक्षरी करून एक प्रमाणपत्र प्रकाशित केले होते आणि तो कर्नाटकात कुठेही गाडी चालवू शकतो, असा दावा केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी तो अल्पवयीन होता. माजी मुख्यमंत्र्यांचा नातू असल्याचे दाखवून सुकेशने शेकडो लोकांना फसवून करोडो रुपयांची माया जमवली. नंतर त्याने किंग इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी सुरू करून गुंतवणूकदारांना 2000 कोटी रुपयांना गंडा घातला.

निवडणूक आयोगाच्या लाच प्रकरणी चंद्रशेखरला एप्रिल 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. तो एका हॉटेलमध्ये बसून टीटीवी दिनाकरन ग्रुपसोबत डील करण्याच्या प्रयत्नात होता. निवडणूक आयोगाशी संपर्क असल्याचा दावा करून सुकेश 50 कोटी रुपयांच्या करारावर बोलणी करण्याचा प्रयत्न करत होता. चंद्रशेखर याने दावा केला की, शशिकला गटासाठी आण्णा द्रमुकचे दोन पानांचे चिन्ह मिळवण्यासाठी तो निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांना लाच देणार होता. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या हॉटेलमधील खोलीतून 1.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. काही वेळा कर्नाटकचे माजी मंत्री करुणाकर रेड्डी यांचे सहायक असल्याचे भासवून आणि कधी कधी बी.एस. येडियुरप्पा यांचे सचिव असल्याचे भासवून सुकेशने लोकांची फसवणूक केल्याची प्रकरणे आहेत.

अशा लोकांकडे एक वेगळ्याच प्रकारची वक्तृत्वकला, संवादकौशल्य आणि संभाषणशैली असते. त्या आधारे ही मंडळी भल्याभल्यांंना आपल्या जाळ्यात ओढतात. सुकेशही त्याला अपवाद नाही. . रॅनबॅक्सी कंपनीचे माजी चेअरमन शिवसेंद्र सिंग यांची पत्नी अदिती सिंह यांना सुकेशने अशाच प्रकारे गंडा घातला आणि त्यांच्याकडून 200 कोटी रुपयांची वसुली केली होती. अदितीला तिच्या नवर्‍याला तुरुंगातून बाहेर काढतो, असे सांगून आपल्या जाळ्यात ओढले होते. अदितीसोबत बोलायचा तेव्हा तो स्वत:ला पीएमओ आणि गृहमंत्रालयातील तैनात अधिकारी असल्याचे सांगायचा. या सर्व गोष्टींसाठी तो व्हॉईस मोड्युलेटिंग सॉफ्टवेअरचा ही वापर करत होता. त्याने मंत्रालयासंबंधित काही क्रमांकांची कॉपी केली होती. या व्यतिरिक्त सुकेश याने बॉलीवूडमधील काही अभिनेत्र्यांनाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये अभिनेत्री जॅकलिन हिचे नाव अधिक चर्चेत होते. यासाठी जॅकलिन हिला सुकेशच्या मनी लॉन्डरिंगप्रकरणी चौकशीसाठीसुद्धा बोलावण्यात आले होते. प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आणि तपासादरम्यान असे समोर आले की, सुकेश चंद्रशेखर हा जॅकलिनवर पाण्यासारखा पैसा उधळायचा.

सुकेश 2020 पासून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या मागावर होता. कारागृहातून तो तिला वारंवार फोन करायचा. त्याने आपण सरकारी अधिकारी असल्याचे भासवून जॅकलिनचा मेकअप आर्टिस्ट शान मुथीलच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने आपली ओळख रत्न वेला अशी सांगून आपण सन टीव्हीचा मालक असल्याचे तिला सांगितले होते व आपल्याकडे बरेच प्रोजेक्ट असल्याचेही त्याने तिला सांगितले होते. त्यानंतर त्यांचे एकमेकांना भेटणे सुरू झाले. सुकेशने जॅकलिनला सोन्याचे आणि हिर्‍याचे इयरिंग्स, ब्रेसलेटस्, ब्रॅंडेड शूज, बॅग अशा अनेक किमती वस्तू दिल्या. याशिवाय तिला ‘इस्क्युअला’ नामक एक महागडा घोडा आणि मिनी कूपर कारही भेट म्हणून दिली. त्याशिवाय तिच्या अमेरिकेत असलेल्या बहिणीला त्याने 1 लाख 50 हजार डॉलर्स कर्जरूपात (सुमारे 10 कोटी रुपये) दिले. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियातील तिच्या भावाला पंधरा लाख रुपये दिले. जॅकलिनने तशी कबुली ईडीसमोर दिलेली आहे. सुकेशने जॅकलिनला भारत फिरण्यासाठी विमान उपलब्ध करून दिले होते. या विमानाचे दोन महिन्याचे भाडे झाले एक कोटी 39 लाख रुपये!

आदितीकडून केलेली 200 कोटींची वसुली सुकेशने एका फसवणुकीच्या प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असताना केली होती हे सर्वांत धक्कादायक म्हणावे लागेल. पैशांच्या जोरावर सुकेश तिहारमध्ये चैनीचे जीवन जगत होता. सुकेश त्याचा संपूर्ण फसवणुकीचा धंदा कारागृहातच चालवत होता. यासाठी तुरुंगातील अधिकार्‍यांना पैसे चारून आपलेसे करण्याचे कसब त्याच्यासाठी नवे नव्हते. सुकेशला तिहारच्या रोहिणी कारागृहातील वॉर्ड क्रमांक 3 आणि बरॅक क्रमांक 204 मध्ये ठेवण्यात आले होते. तेथे लावलेल्या 10 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज स्कॅन केल्यानंतर सुकेश आणि तुरुंग अधिकार्‍यांमधील संगनमत उघड झाले.

पैशाच्या जोरावर तिहारच्या रोहिणी कारागृहात सुकेशला एकटे राहण्यासाठी संपूर्ण बरॅक देण्यात आल्याचा आरोप आहे. तिहार प्रशासनाला कोट्यवधी रुपयांची लाच देण्याच्या बदल्यात या सर्व सुविधा मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. कारागृहात उघडपणे फोन वापरण्याची, पूर्व भेटीशिवाय त्याच्या ओळखीच्या व्यक्तींना भेटण्याची, जेल नियमावलीचे उल्लंघन करून त्याच कारागृहात बंद असलेली त्याची पत्नी मारिया पॉलला कधीही भेटण्याची परवानगी दिल्याचा आरोप आहे. बरॅकमध्ये सर्व सुविधा देण्याऐवजी सुकेश या तुरुंग कर्मचार्‍यांना दरमहा 1 ते दीड कोटी रुपये देत असे, अशी माहिती पुढे आली आहे.

हिंदी, इंग्रजी आणि दक्षिणेतील जवळपास सर्व भाषा जाणणार्‍या सुकेशबद्दल पोलिस अधिकारी सांगतात की, त्याला एकदा पाहिल्यावर वाटलेच नाही की, तो इतका दुष्ट प्रवृत्तीचा गुंड आहे. परंतु सुकेशने पोल्ट्री फार्मपासून ते अंडरवेअर उत्पादक, प्रेशर कुकर उत्पादक, बँक कर्मचारी, पार्किंग व्यवस्था बनवणारे, ड्रायफ्रूट पॅकेजिंग उद्योजक, सरकारी कर्मचारी आणि राजकारणी अशा असंख्य व्यक्ती आणि संस्थांची फसवणूक केली आहे.

सुकेशचा चेन्नईच्या ईस्ट कोस्ट रोडवर एक भव्य आलिशान बंगला आहे. या बंगल्यावर ईडीने छापा टाकला तेव्हा मोठे घबाड समोर आले. या बंगल्यात हजारो सजावटीच्या वस्तू, पेंटिंग, आर्टवर्क आणि चांदी-पितळेच्या मूर्ती होत्या. घन तांब्यापासून बनविलेले घोड्याचे डोके ठेवले होते. याशिवाय 16 हाय-एंड लक्झरी कार्स, ज्यात रॉल्स रायस गोस्ट, बेंटले बेंटाग्या, फरारी 458 इटालिया, लैबॉर्गिनी उरुस, एस्कलेड, मर्सिडिीज एएमजी 63 यांचाही यामध्ये समावेश आहे. सुकेशला त्याचे वडील चंद्रशेखर हे त्याला सांगत, तू भरपूर शिक आणि नाव कमव. पण सुकेशने आपल्या वडिलांचा उपदेश न ऐकता भलत्याच मार्गाने नाव कमावले.

Back to top button