व्यक्‍तिमत्‍व : राजकीय प्रगल्भतेचा दुर्मीळ आदर्श | पुढारी

व्यक्‍तिमत्‍व : राजकीय प्रगल्भतेचा दुर्मीळ आदर्श

जेसिंडा आर्डन यांनी दिलेला न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा हा जगभरात चर्चेचा ठरला. वास्तविक, त्यांनी केलेले कार्य न्यूझीलंडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारखे आहे. विशेषतः कोव्हिड 19 काळात त्यांनी चांगले काम केले. मी सक्षमपणे काम केले आहे. पण या पदावर राहण्यासाठी आता माझ्यात क्षमता उरलेल्या नाहीत, असे सांगून त्या स्वेच्छेने पायउतार झाल्या. इंग्लंडप्रमाणेच न्यूझीलंडची लोकशाही परंपरेला प्राधान्य देते. या परंपरेला साजेसे आणि राजकारणात दुर्मीळ होत चाललेली प्रगल्भता दाखवणारे जेसिंडा यांचे पाऊल आहे.

राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि यशाच्या शिखरावर असतानाच माघार घेणे यात एक प्रकारची चतुराई असते. लेनीन यांनी म्हटल्याप्रमाणे एक पाऊल पुढे टाकण्यासाठी दहा पावले मागे टाकली तरी चालतात. त्याचप्रमाणे न्यूझीलंडच्या राजकीय नभांगणावर एखाद्या तारकेप्रमाणे चमकणार्‍या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी आपल्या पदाचा त्याग करून जगातील लोकशाही राष्ट्रांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय अनेकांना बुचकळ्यात टाकणारा ठरला.

न्यूझीलंड या लोकशाही राष्ट्राची एक अद्भुत किमया आहे. या राष्ट्राची लोकशाही ही इंग्लंडच्या लोकशाही प्रणालीवर चालते. तेेथे इंग्लंडप्रमाणेच मर्यादित राजेशाही आणि लोकशाही आहे. इंग्लंडच्या राणीच्या प्रतिनिधी म्हणून तेथे असलेल्या व्यक्तीस गव्हर्नर जनरल असे म्हटले जाते. त्याच्याकडे कार्यकारी प्रमुखाचे अधिकार आहेत. जनतेच्या सभागृहातून सर्वाधिक जागा मिळवणार्‍या पक्षाचा नेता हा पंतप्रधान म्हणून निवडला जातो. कनिष्ठ सभागृहाचे महत्त्व आणि वरिष्ठ सभागृहाचे दुय्यम स्थान ही रचना इंग्लंडप्रमाणेच तेथे आहे. जेसिंडा आर्डन यांनी 2017 मध्ये मजूर पक्षाच्या नेत्या म्हणून जबरदस्त यश मिळवले. त्यांच्या पाठीशी तेथील काही डाव्या पक्षांची आघाडीसुद्धा आहे.

पहिला कार्यकाल पूर्ण करून एक वर्षापूर्वी त्या पुन्हा निवडून आल्या होत्या. परंतु यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी आपले पंतप्रधान पद का सोडले, हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे. खुद्द जेसिंडा आर्डन यांनी याचे उत्तर मोठे मार्मिक दिले आहे. राजीनामा देताना त्या खूप भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूूही तरळले होते. त्या म्हणाल्या की, मी घेतलेला निर्णय योग्य आहे आणि तो विचारपूर्वक घेतला आहे. त्यांचे असे म्हणणे होते की, याचा अर्थ मी कमजोर किंवा कमकुवत आहे असा नाही. मी सक्षम आहे आणि मी सक्षमपणे काम केले आहे. पण या पदावर राहण्यासाठी आता माझ्यात क्षमता उरलेल्या नाहीत.

याचाच अर्थ असा की, आपल्या मर्यादांची जाणीव त्यांना झाली. देशापुढील प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्षाला पुढील निवडणुकीत अंधाराच्या खाईत लोटण्याऐवजी आपण पद त्याग केलेला चांगला, असे त्यांना वाटले. मजूर पक्षाने आता त्यांच्या ऐवजी ख्रिस हिपकिन्स यांची पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. परंतु जेसिंडा यांनी आपल्या नावाभोवती जे वलय निर्माण केले होते ते खरोखरच अद्भुत आणि चमत्कारिक होते.

जेसिंडा आर्डन या वयाच्या 37 व्या वर्षी पंतप्रधान झाल्या. दिसायला अत्यंत देखण्या आणि तेवढेच आकर्षक व्यक्तिमत्त्व, यामुळे त्यांना फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीमुक्तीवादी नेत्या म्हणून ओळखले जात असे. तसेच त्यांचे वर्णन सेलिब्रिटी पोलिटिशियन असेही केले जात असे. त्यांच्यावर अनेक वेळा टीका झाली. अनेकवेळा त्यांच्याबद्दल काही दूषणेही देण्यात आली पण त्या टीकांची आणि दूषणांची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. अगदी बीबीसीने सुद्धा त्यांच्या राहण्याबद्दल टीका केली होती. पण शेवटी बीबीसीला माफी मागावी लागली. आकर्षक व्यक्तिमत्त्व असणे, चांगली संवादशैली लाभणे आणि लोकांची मने जिंकणे हे यशस्वी नेत्यांचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. त्यांची तुलना पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याशी केली जात असे. बेनझीर यांच्यापेक्षाही त्या कमी वयात पंतप्रधान पदावर पोहोचल्या आणि जगातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली होती.

जेसिंडा आर्डन यांनी कोव्हिड काळात चांगले काम केले. त्या काळात त्यांनी अनेक धोरणेही राबवली. त्या कनवाळू आणि सहृदयीही आहेत. पण आपली सहृदयता म्हणजे आपले दौर्बल्य नव्हे हे त्यांनी वारंवार सांगितले आहे. तेथिल धार्मिक ठिकाणावर हल्ला झाला आणि त्यात 51 जण जण मृत्यू पावले तेव्हाची परिस्थिती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हाताळली. त्या काळात त्यांनी दिलेल्या मुलाखती आणि त्यांनी घेतलेली ठाम भूमिका ही न्यूझीलंडच्या लोकांना फार आवडली होती. त्या असे म्हणाल्या होत्या की, मी काही वेगळे केले असे नाही. मी योग्य निर्णय घेतले आणि ते ठामपणे घेतले.

जेसिंडा यांची कारकीर्द तीन महत्त्वाच्या कामांमुळे गाजली. पहिले म्हणजे कोव्हिड काळात त्यांनी चांगले कार्य केले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे विस्कटलेली आर्थिक घडी त्यांनी रुळावर आणली आणि मंदीच्या तडाख्यातून न्यूझीलंडला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिसरे महत्त्वाचे म्हणजे तेथे उद्भवलेल्या ज्वालामुखीच्या वेळी त्यांनी काळजीपूर्वक प्रश्न हाताळले आणि लोकांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला. अखेर कोणताही राजकारणी सदासर्वकाळ प्रश्न सोडवू शकतो असे नाही. परंतु जेसिंडा यांनी घेतलेल्या ठाम भूमिका, लोकांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास आणि त्यांच्यावर केलेले उदंड प्रेम यामुळे त्यांच्याभोवती एक वलय तयार झाले होते.

राजकारणामध्ये यशाच्या शिखरावर असताना नेत्यांना स्वत:च्या मर्यादांचे भान असणेही आवश्यक असते. तसे भान जेसिंडा आर्डन यांनी ठेवले. जनमत आपल्या बाजूने राहील याची त्यांना खात्री वाटत नसावी. प्रश्नांचा गुंता वाढत असताना आपण ही परिस्थिती बदलू शकत नाही हे लक्षात घेऊन पदत्याग करण्याची त्यांची भूमिका ही रास्तच म्हटली पाहिजे. त्यांनी मजूर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे आपला राजीनामा सोपविला. त्यांनी तो मान्य केला. त्यांचा नवा उत्तराधिकारी आता सत्तेवर आला आहे. भविष्यकाळात त्यांच्या उत्तराधिकार्‍याचा मार्गही साधा सोपा नाही. दुसरे म्हणजे प्रश्न सोडविताना जेसिंडा यांनी दाखवलेली सहृदयता आणि माणुसकी नव्या नेत्यामध्ये असेल का? न्यूझीलंडचे कोव्हिडोत्तर काळातील अर्थकारण त्यांना हाताळता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपणास देता येणार नाहीत. त्याचे उत्तर भविष्यातच सापडू शकेल. भविष्यकालीन प्रश्नांची गुंतागुंत पाहता न्यूझीलंडची जनता मात्र जेसिंडा आर्डन यांच्या नेतृत्वाचे वारंवार स्मरण करत राहील. कारण त्यांनी आपल्या दीड टर्मच्या कालावधीत केलेले कार्य न्यूझीलंडच्या इतिहासात खरोखरच सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारखे राहील.

एक महिला असूनही त्यांनी दाखवलेले धाडस, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या कार्याची सर्वदूर पसरलेली ख्याती पाहता भविष्यात न्यूझीलंडच्या भावी नेत्यांना त्यांच्यापासून बरीच प्रेरणा व स्फूर्ती घेता येऊ शकेल. त्यांनी सत्तापद सोडले, राजीनामा दिला याचे अनेकांना आश्चर्य वाटले. पण ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल’ या न्यायाने त्यांनी स्वत:चे पद गेले तरी चालेल; पण आपल्या पक्षाची नामुष्की होता कामा नये. पक्ष पुन्हा ताकदीने समोर यावा म्हणून केलेला त्याग महत्त्वाचा वाटतो. इंग्लंडप्रमाणेच न्यूझीलंडची लोकशाही ही प्रथा परंपरा यावर अवलंबवलेली आहे. हे खरोखरच त्यांच्या प्रगल्भ लोकशाही व्यवस्थेचे लक्षण आहे, असे म्हणावे लागेल.

जेसिंडा आर्डन यांनी केलेले कार्य व त्यांनी बजावलेली कामगिरी याला काही मर्यादाही असतील. कोणताही नेता परिपूर्ण नसतो. जो काम करतो, त्याच्याकडून चुकाही होतात. पण त्या चुकापोटी त्याची बदनामी आणि त्याचा छळ करण्याची प्रवृत्ती राजकारणात अधिक दिसून येते. परंतु आपली सहृदयता म्हणजे कमकुवतपणा नव्हे हे सूत्र घेऊन जेसिंडा यांनी घेतलेला निर्णय निश्चितच इतिहासाला कलाटणी देणारा ठरला असे म्हणता येईल. भविष्यकाळात त्यांनी घेतलेला निर्णय किती अचूक होता हे तेथे वर्षानंतर येणार्‍या निवडणुकीच्या निकालांवरून लक्षात येईल. त्यांचा पक्ष जर पुन्हा निवडून आला तर जेसिंडा आर्डन यांनी दिलेल्या राजीनाम्याचे चीज झाले, असे म्हणता येईल.

प्रा. डॉ.वि.ल.धारुरकर

Back to top button