आंतरराष्‍ट्रीय : कागदी वादळ | पुढारी

आंतरराष्‍ट्रीय : कागदी वादळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे सध्या एका प्रकरणामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. हे प्रकरण आहे दस्तावेजांचे. बायडेन यांच्या डेलावेयरमधील घर आणि वॉशिंग्टन कार्यालयातून 8 वर्षे जुन्या गुप्तचर फायलींचे 20 संच सापडले आहेत. त्यामध्ये विविध देशांशी संबंधी टिपणे असलेली कागदपत्रे, गुप्तचरांनी दिलेली माहिती, युक्रेनसह इराण आणि ब्रिटनमधील घडामोडींशी संबंधित माहिती असलेली कागदपत्रे आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ज्यो बायडन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या खासगी निवासस्थानी काही वर्गीकृत कागदपत्रे सापडली. या दस्तऐवजांचे महत्त्व असे की, त्यामध्ये काही गोपनीय माहिती असल्याची चर्चा आहे. अमेरिकेतील एफआयबी (फेडरल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) या संस्थेने ही धाड घातली आणि तेथील कागदपत्रे ताब्यात घेतली. हे प्रकरण एक वादळी प्रकरण म्हणून सध्या गाजत आहे. याबद्दल सीएनएन या वृतसंस्थेच्या तीन वार्ताहरांनी सुद्धा मौलिक प्रकाश टाकणारे विश्लेषण केले आहे. या प्रकरणाचा शोध आणि बोध काय, याचा विचार जरूर केला पाहिजे.

वर्तमानकाळात ऐतिहासिक दस्तावेजांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. कारण ही कागदपत्रे जगाच्या राजकारणावर प्रकाश टाकणारी असतात. जगाच्या राजकारणातील काही गोपनीय माहिती या कागदपत्रातून प्रकट झालेली असते. त्या अनुषंगाने या कागदपत्रांचे जागतिक बाजारपेठेतील मोल अधिक आहे. विशेषत: अमेरिकेच्या राजकारणातील लोकांचे नातेवाईक व्यवसाय उद्योगात असल्यामुळे त्यांच्याकडूनही या कागदपत्रांचा दुरुपयोग होण्याची दाट शक्यता असते. या कारणांमुळे तेथील गुप्तचर यंत्रणा अशा कागदपत्रांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा बेजबाबदारपणा खपवून घेत नाहीत. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका खासगी रिसॉर्टमध्ये 325 कागदपत्रे मिळाली होती. या प्रकरणाची छाननी अद्याप सुरू आहे. त्याचा शोध तेथील यंत्रणा घेत आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्या प्रकरणाचा निपटारा अजून झालेला नाही. त्यावेळी खुद्द जो बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप केला होता. आता तोच आरोप विरोधी पक्ष ज्यो बायडन यांच्यावर त्यांचे विरोधक करत आहेत.

सीएनएन या वृत्तसंस्थेने या कागदपत्रांचे विश्लेषण केले आहे. तसेच अमेरिकेतील न्याय विभागसुद्धा या प्रकरणाशी चौकशी करत आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसने यासंदर्भात कानावर हात ठेवले असून त्यामध्ये काय आहे हे सांगण्यास नकार दिला आहे. त्याचा शोध सुरू आहे. अंतिम तथ्य समोर आल्याशिवाय त्याबद्दल फारसे काही बोलता येणार नाही, अशा प्रकारची सोयीस्कर युक्तिवाद करणारी उत्तरे दिली आहेत. त्यामुळे हे प्रकरण कोणते वळण घेणार याबद्दल चर्चा आणि विचारविनिमय सुरू आहे.

कायदेशीरदृष्ट्या विचार करता या कागदपत्रांमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली गोष्ट अशी आहे की, ज्यो बायडन यांना या कागदपत्रांच्या गुप्ततेची आणि गोपनीयतेची माहिती होती का? तशी जर माहिती असेल तर त्यांनी ती कागदपत्रे का लपवून ठेवली. त्यांना जर माहिती नसेल तर या कागदपत्रांना पाय कसे फुटले? आणि ही कागदपत्रे त्यांच्या खासगी निवासस्थानापर्यंत कशी पोहोचली? स्वत: ज्यो बायडन 2002 ते 2009 या आठ वर्षांच्या काळात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून बायडेन यांच्यावर फार मोठी जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी या कागदपत्रांची गोपनीयता व सुरक्षितता या बाबतीत अधिक काळजी घेणे गरजेचे होते. तसे घडले नाही. त्यामुळे या प्रकरणाला तोंड फुटले आहे. तसे पाहिले तर उपराष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यो बायडन यांच्या कारकिर्दीमध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आर्थिक मंदीशी निकराने सामना केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांनी दुसर्‍या आखाती युद्धामध्ये शांततेसाठी प्रयत्न केले होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या राजकारणातील साधनशुचितेचा ते टेंभा मिरवत होते. पण या प्रकरणाने अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये चांगलीच खळबळ उडून दिली आहे. अमेरिकेच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा आता पुन्हा एकदा मध्यावर आलेला आहे. तिकडे ट्रम्प पक्षीय या प्रकरणाने आनंदी झाले असले तरी त्यांच्यापुढेही अनेक प्रश्न उभे आहेत.

ज्यो बायडन यांच्या कागदपत्रांना फुटलेले पाय आणि यातून निर्माण झालेला वाद हा न्यायप्रविष्ट बनला आहे. खरे तर या न्यायप्रविष्ट प्रकरणात पुढे काय होईल हे आज सांगता येत नाही. पण ‘सीएनएन’ने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील कागदपत्रे ही युक्रेन, इराण आणि इंग्लंडच्या संदर्भात आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्याचा ताणतणाव पाहता या कागदपत्रांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या कागदपत्रातील गोपनीय माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर सुद्धा काही वेगळा प्रकाश टाकू शकते का? त्यामुळे युक्रेन-रशियाच्या युद्धात अमेरिकेच्या भूमिकेमध्ये काही फरक पडतो का? नाटोचा दबाव अमेरिका कसा निर्माण करत आहे आणि त्यातून काही घडेल का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा पैलू असा आहे की, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात आजवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या भूमिकेला विशेष महत्त्वाचे स्थान असते. यादृष्टीने विचार करता मागे घडून गेलेल्या घटनांवरून नव्याने कोणी नवे वादळ निर्माण करते आहे का, असा प्रश्न राजकीय पंडितांना पडला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद हे जगातील सर्वश्रेष्ठ पद मानले जाते. पण अमेरिकन लोकशाहीपुढे अध्यक्षपदही श्रेष्ठ नाही. जर अमेरिकन अध्यक्षाने एखादी चूक केली तर त्याच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा अधिकार असल्याची तरतूद अमेरिकन संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. यापूर्वी हेन्री जॉन्सन, रिचर्ड निकसन, बिल क्लिंटन तसेच डोनाल्ड ट्रम्प या चार अध्यक्षांविरोधात महाभियोग चालवण्यात आला होता. ट्रम्प कसेबसे त्यातून वाचले. या प्रकरणातून घ्यायचा बोध असा की, अमेरिकन लोकशाहीमध्ये अधक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्यापेक्षा संविधान श्रेष्ठ आहे. त्यामुळे अध्यक्ष सत्तेवर असतानाही एफआयबी त्यांच्या विरुद्ध गोपनीय कागदपत्रांचा छडा लावू शकते ही अमेरिकन लोकशाहीची परिपक्वता आहे.

ज्यो बायडन यांची गोपनीय कागदपत्रे त्यांच्या खासगी निवासस्थानी कशी पोहोचली याचा यथावकाश खल होईल आणि त्यातून सत्य बाहेर यायचे ते येईलच. परंतु तूर्त तरी हे वादळ म्हणजे कागदी पेल्यातले वादळ आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळे तत्काळ तरी ज्यो बायडन यांच्या सत्तापदाला खग्रास ग्रहण लागेल, असे वाटत नाही.

डॉ. वि. ल. धारुरकर

Back to top button