बहार विशेष : ‘हत्या : की आत्महत्या?’ | पुढारी

बहार विशेष : ‘हत्या : की आत्महत्या?’

सुनील डोळे

सोमवार, 20 सप्टेंबर या दिवशी उत्तर प्रदेशच्या धार्मिक जगतात जणू भूकंपच झाला. त्याचे कारण ठरले ते अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांची कथित आत्महत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि संत समाजातील अनेक मान्यवरांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महंत गिरी यांनी आत्महत्या केली की, त्यांची नियोजनपूर्वक हत्या करण्यात आली हे अजून गुलदस्त्यातच आहे. त्याचा तपास सध्या उत्तर प्रदेश पोलिसांचे खास पथक करत आहे. एक खरे की, या अनपेक्षित आणि काहीशा गूढ घटनेमुळे केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर सारा देश ढवळून निघाला आहे. अजूनही त्याचे पडसाद उमटत आहेत. धार्मिक जगतसुद्धा सूड आणि आकसाच्या भावनेपासून अलिप्त राहिलेले नाही हे त्याद्वारे स्पष्ट होत चालले आहे. नरेंद्र गिरी हे प्रयागराज येथील बाघंबरी मठाचे महंत म्हणजेच प्रमुख होते. ते प्रयागराजचेच रहिवासी होते. खेरीज तेथील गंगाकिनारी असलेल्या प्रसिद्ध हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी म्हणूनही कार्यरत होते. निरंजनी आखाड्याशी संबंधित असलेल्या गिरी यांनी सुरुवातीच्या काळात या आखाड्याचे सचिवपद भूषवले होते. एवढी मोठी पदे भूषवत असलेल्या या महनीय व्यक्तीने अचानकपणे स्वतःला संपवण्याचा निर्णय कसा घेतला की तसे करण्यास त्यांना भाग पाडले गेले या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे मोठेच आव्हान म्हटले पाहिजे. जे कोणी यात दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा निर्वाळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. कारण ते स्वतः गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे महंत. साहजिकच त्यांच्यासाठी या संपूर्ण प्रकरणाचा तपास प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे या मुद्द्यावरून योगी सरकारवर निशाणा साधला असून त्यांना याचे राजकारणच करायचे आहे, असे अखिलेश यादव यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून जाणवू लागले आहे. अर्थात ते स्वाभाविकच.

कोट्यवधी रुपयांची संपत्ती

मुख्य विषय आहे तो कोणत्या परिस्थितीमुळे महंत नरेंद्र गिरी यांच्या जीवनाचा असा शोकात्म शेवट झाला. गिरी यांनी गळफास लावून घेतल्याची माहिती प्रयागराज पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर जेव्हा पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना मठातील त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडावा लागला. मात्र महंत गिरी यांचा देह खाली उतरवला जाईपर्यंतच त्यांनी अंतिम श्वास घेतला होता. त्यांच्या खोलीत पोलिसांना सुमारे सात ते आठ पानांची एक विस्तृत चिठ्ठी मिळाली असून त्यातील सारा तपशील या संपूर्ण तपासातील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. येथे हेही नमूद केले पाहिजे की, प्रयागराज येथील बाघंबरी मठ आणि गंगेच्या संगमावरील हनुमान मंदिर संस्थानकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. एवढेच नव्हे तर नोएडा भागातही बाघंबरी मठाची काही एकर जमीन असून या भूखंडांची किंमत अब्जावधी रुपये असल्याचे सांगितले जाते. तसे पाहिले तर महंत नरेंद्र गिरी हे अनेकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. 2012 साली महंत आणि हंडियाचे तत्कालीन आमदार महेश नारायण सिंह यांच्यात कडाक्याचे भांडण काही कारणांवरून झाले होते. याच महंत यांनी 2015 साली एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला महामंडलेश्वर ही उपाधी बहाल केली होती. त्यावेळी तो मोठा आणि वादाचा चर्चेचा विषय ठरला होता. खेरीज 17 नोव्हेंबर 2019 रोजी निरंजनी अखाड्याचे सचिव महंत आशिष गिरी यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. तेव्हाही महंत नरेंद्र गिरी वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. हे कमी म्हणून की काय, 2004 साली बाघंबरी मठाचे महंत झाल्यानंतर नरेंद्र गिरी यांनी तेव्हाचे एक बडे पोलिस अधिकारी आर. एन. सिंह यांच्याशी संघर्षाची बतावणी केली होती. ते प्रकरण जमीनजुमल्याशी संबंधित होते. मग खुद्द सिंह यांनीच काही दिवस हनुमान मंदिरासमोर धरणे धरले. अखेर तेव्हाचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी आर. एन. सिंह यांना सेवेतून निलंबित केले तेव्हा कुठे हा सगळा मामला थंडावला होता. सांगण्याचा मुद्दा असा की, अनेकदा महंत नरेंद्र गिरी हे वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. रामजन्मभूमी आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. संत समाजात त्यांच्या शब्दाला मोठेच वजन होते. लागोपाठ दोन वेळा ते अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते. साधू मंडळींना महामंडलेश्वर वा अन्य उपाध्या प्रदान करण्याचे कार्य या परिषदेतर्फे केले जाते. 2019 साली जेव्हा प्रयागराज येथे कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता तेव्हा त्यात महंत नरेंद्र गिरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कुंभमेेळ्याच्या आयोजनात त्यांचे मार्गदर्शन वारंवार घेतले जात होते.

देशात 13 आखाडे

महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर आखाडा हा विषय वारंवार चर्चेत आला. मात्र आखाडा म्हणजे नेमके काय हे जाणून घेणे अगत्याचे आहे. देशात सध्याच्या परिस्थितीत शैव, वैष्णव आणि उदासीन पंथांच्या साधूंचे एकूण 13 आखाडे आहेत. मात्र त्यांच्यातही मोठ्या प्रमाणावर मतभिन्नता दिसून येते. आखाड्यांची ही व्यवस्था 1954 सालापासून सुरू झाली. पूर्वी आखाड्यांना बेडा म्हणजेच साधूंचा समूह असे संबोधले जायचे. आखाडा हा शब्द मुघल काळापासून सुरू झाला असे मानले जाते. काही जाणकारांच्या मते आखाडा या संकल्पनेचा उगम अलख या शब्दापासून झाला आहे. असे सांगतात की, आदी शंकराचार्यांनी आठव्या शतकात 13 आखाडे तयार केले होते व तेच आजपर्यंत कायम आहेत. उर्वरित कुंभमेळ्यात सर्व आखाडे एकत्र स्नान करतात करतात. तथापि, नाशिकच्या कुंभात वैष्णव आखाडा नाशिकमध्ये व शैव आखाड्याशी संबंधित साधूसंन्यासी त्र्यंबकेश्वरी स्नान करतात. ही व्यवस्था पेशवाईच्या काळात 1772 पासून अखंड सुरू आहे. असो.

नरेंद्र गिरी व आनंद गिरी यांचा वाद

मूळ मुद्दा असा की, महंत नरेंद्र गिरी यांचा रहस्यमय मृत्यू व त्यावरून निर्माण झालेले वादळ. यात संशयाची तलवार नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याच्या डोक्यावर टांगलेली आहे. नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यातील वाद गेल्या अनेक दिवसांपासून गाजत होता. नरेंद्र गिरी यांच्यावर आनंद गिरी यांनी गंभीर आरोप केल्यामुळे आखाडा परिषदेत प्रचंड खळबळ माजली होती. बाघंबरी मठ आणि हनुमान मंदिर अशा दोन्ही ठिकाणी जमा होणार्‍या कोट्यवधींच्या रकमेत नरेंद्र गिरी यांनी फेरफार केल्याचा आरोप आनंद गिरी यांनी केल्यानंतर प्रचंड खळबळ माजली होती. त्यासाठी आनंद गिरी यांनी दोन व्हिडीओही प्रसिद्ध केले होते. यातील एका व्हिडीओमध्ये, मठ आणि मंदिराशी संबंधित काही मंडळी बारबालांसोबत नृत्य करताना दिसली होती. त्यामुळे गुरू आणि शिष्य यांचे नाते कमालीचे कडवट होत गेले. नंतरच्या काळात दोघांमधून विस्तवही जाईना. हे आरोप महंत नरेंद्र गिरी यांच्या जिव्हारी लागले होते. त्यांनी आपल्या सहकार्‍यांकडे आपली याविषयीची वेदना प्रकट केली होती. अखेर जे अपेक्षित होते तेच घडले. महंत नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी यांना बाघंबरी मठ आणि हनुमान मंदिरातून हद्दपार केले. त्यामुळे तर आगीत तेल ओतले गेले. तथापि, आखाड्याने यात हस्तक्षेप केला. मग आनंद गिरी यांनी महंत नरेंद्र गिरी यांची बिनशर्त माफी मागितली. त्यामुळे काही काळ शांतता निर्माण झाल्याचे चित्र दिसले. तथापि ती वादळापूर्वीची शांतता ठरली. आता पोलिसांनी आनंद गिरी याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या समग्र चौकशीतूनच महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणावर साद्यंत प्रकाश पडू शकतो. त्याचवेळी आनंद गिरी याने आपण निर्दोष असल्याचा दावा केला असून आपल्याला या प्रकरणात हेतूपूर्वक गुंतवले जात आहे असे म्हटले आहे. अर्थात कोणताही संशयित सुरुवातीला असेच म्हणत असतो. या प्रकरणात आणखीही काही मंडळी गुंतली असावीत, असा पोलिसांचा कयास आहे. महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जी चिठ्ठी लिहून ठेवली, त्यात केवळ नरेंद्र गिरी नव्हे तर अन्य अनेकांची नावे असल्याचे तपास यंत्रणांनी म्हटले आहे. आता जेव्हा या सगळ्यांचीच कसून चौकशी केली जाईल, तेव्हाच या प्रकरणाचे गूढ उलगडेल.

आखाड्यातील राजकारण

एक खरे की, साधू आणि संन्याशांचे आखाडेदेखील राजकारण आणि परस्परांवर कुरघोडी करण्यापासून मुक्त राहिलेले नाहीत हे या प्रकरणामुळे स्पष्ट झाले आहे. राजकारणातील आखाडे आपण सातत्याने अनुभवत आलो आहोत, परंतु आखाड्यातील राजकारणाची आणि श्रेष्ठत्व गाजवण्याची धग एखाद्या महंताच्या जीवावर उठल्याची भेदक घटना आपण क्वचितच पाहात आहोत. धर्माचा बाजार मांडणार्‍या भोंदू मंडळींचा अपवाद केला तर साधू, संन्यासी, बैरागी यांच्याकडे समाजात आजही आदराने पाहिले जाते. मात्र, महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणामुळे आखाडा या विषयातील एक काळा अध्याय समोर आला आहे.

कालाय तस्मै नमः… दुसरे काय!

Back to top button