मनोरंजन : भुरळ ‘व्हायरल’ची! | पुढारी

मनोरंजन : भुरळ ‘व्हायरल’ची!

प्रथमेश हळंदे

भारतासाठी 2016 हे वर्ष विविध कारणांनी खूप महत्त्वाचं ठरलं. सत्तासंघर्षातील राजकीय उलथापालथी, जीएसटी, आतंकवाद्यांचा उरी हल्ला, त्याला सर्जिकल स्ट्राईकचं चोख प्रत्युत्तर आणि नोटबंदी या त्यातील काही महत्त्वाच्या घटना.

2016च्या उत्तरार्धात ‘जिओ’ लाँच झालं आणि भारतात नव्या डिजिटल क्रांतीचे वारे जोमाने वाहू लागले. हायस्पीड इंटरनेट, कॉलिंग सुविधा आणि तीही चक्क फुकट! या स्वस्तात मस्त इंटरनेट प्लन्समुळे भारतीयांचा इंटरनेट वापर कितीतरी पटीने वाढला. जिथे महिन्याला एक जीबी डेटाही अति वाटायचा तिथे दिवसाला दीड जीबी डेटाही अपुरा पडू लागला.

त्यापाठोपाठ दोन महिन्यांत झालेल्या नोटबंदीने खर्‍या अर्थाने भारतीयांच्या दैनंदिन ऑफलाईन व्यवहारांवर लगाम लावायला सुरुवात केली आणि त्यांना ऑनलाईन पर्यायांचा स्वीकार करणं भाग पाडलं. यामागच्या राजकीय आणि औद्योगिक उलाढालींची गणितं सोडवणं सामान्य जनतेला आजही डोईजडच होईल. 2016पासून सुरू झालेल्या या नव्या डिजिटल युगाचा मनोरंजन क्षेत्राने मात्र पुरेपूर फायदा करून घेतला.

म्युझिकली या चायनीज सोशल मीडिया अ‍ॅपचे 2017 च्या आसपास भारतात 50 लाखांहून अधिक युझर्स होते. या अ‍ॅपमध्ये युझर्स आपल्या आवडत्या गाण्यांवर जास्तीत जास्त 15 सेकंदांचे लिप सिंक व्हिडीओज बनवू शकत होते. पुढे हे अ‍ॅप ‘टिकटॉक’ या नावाने बदलले जाईपर्यंत भारतीयांना या अ‍ॅपची चांगलीच सवय होऊन गेली होती. ‘टिकटॉक’ने या सवयीचं व्यसनामध्ये रूपांतर केलं. हे व्यसन इतकं वाढलं की जेव्हा भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत ‘टिकटॉक’वर बंदी घातली तेव्हा त्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. भारतीयांचं हे ‘टिकटॉक’ वेड पाहून अल्पावधीतच ‘इंस्टाग्राम’ या सोशल मीडिया जायंटने टिकटॉकशी साधर्म्य साधणारं ‘रील्स’ हे नवं फिचर नेटीझन्सच्या हवाली केलं आणि तुफान वेगाने ते लोकप्रियही झालं. आता पंधरा ते तीस सेकंदांचे हे व्हिडीओज नव्या पिढीचा ‘कंटेंट’ म्हणून पुन्हा एकदा खपू लागले आणि जगाच्या कानाकोपर्‍यातील काळाच्या ओघात मागे पडलेल्या, सहसा कानावर न पडणार्‍या अशा कित्येक नव्या-जुन्या गाण्यांना अनपेक्षितपणे नव्याने प्रसिद्धी मिळू लागली.

या ‘व्हायरल’ प्रसिद्धीचं अलीकडचं ताजं उदाहरण म्हणजे झारखंडमधून व्हायरल झालेलं ‘बचपन का प्यार’ हे गाणं! सहदेव दिर्दो या झारखंडच्या अवघ्या 14 वर्षांच्या शाळकरी मुलाचा दोन वर्षांपूर्वी त्याच्या शिक्षकांनी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ इंटरनेटवर अचानक व्हायरल झाला आणि देशभरात ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’चे बोल घुमू लागले.

वास्तविक सुप्रसिद्ध रॅपर बादशाह याने जुलै महिन्यात सहदेवने गायलेल्या मूळ व्हिडीओचा रिमेक आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केल्यानंतर मूळ व्हिडीओचा शोध सुरू झाला आणि सहदेवचा व्हिडीओ जगासमोर आला.

हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, स्वतः झारखंडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांनी सहदेवची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याचं कौतुक केलं. वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बॉलीवूडनेही हा ट्रेंड उचलून धरला आणि या गाण्यावर नंतर असंख्य सेलिब्रिटी थिरकताना दिसले. सहदेवला तर ‘इंडियन आयडॉल’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही आमंत्रित करण्यात आलं.

ऑगस्टमध्ये रॅपर बादशाहने सहदेवला सोबत घेऊन ‘बचपन का प्यार’ हे नवं गाणं रिलीज केलं, ज्याला 200 मिलियनहून अधिक व्ह्यूज आहेत. झारखंडच्या एका गावात राहणार्‍या गरीब सहदेवला या एका व्हिडीओने अमाप प्रसिद्धी मिळवून दिली.

पण खरं तर सहदेवच्या यशात सगळ्यात मोठा वाटा आहे तो या गाण्याच्या मूळ शिल्पकारांचा. पीपी बरीया या गीतकाराने लिहिलेलं आणि मयूर नादिया यांनी संगीतबद्ध केलेलं हे मूळ गाणं गायलंय ते कमलेश बारोट या गुजरातच्या एका आदिवासी गायकाने! आपल्या आदिवासी संस्कृतीतून मिळालेला लोकगीतांचा वारसा पुढे चालवणार्‍या कमलेशला मात्र सहदेवइतकी प्रसिद्धी मिळू शकली नाही. कमलेशसारखे असे कितीतरी प्रसिद्धीपासून वंचित राहिलेले लोककलावंत आज या ‘व्हायरल कंटेंट’च्या माध्यमातून लोकांसमोर येतायत खरे; पण त्यांच्यापेक्षा जास्त कौतुक आणि सन्मान त्यांना कळत-नकळत समोर आणणार्‍यांच्याच पदरी पडतोय, ही खेदाची बाब आहे. गाण्याच्या मूळ शिल्पकारांनाच नवी संधी देण्याऐवजी भाषिक आणि प्रांतीय अडथळ्यांचे कारण देत इतर पर्याय उभे केले जात आहेत आणि त्यांना ‘रिमेक’, ‘अमुक व्हर्जन’, ‘तमुक कव्हर’ असे चकचकीत लेबल्स लावून रसिकांच्या गळी उतरवण्याचाही केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.

सरत्या ऑगस्टमध्ये व्हायरल झालेलं सिंहाली भाषेतील ‘मनिके मागे हिते’ या गाण्याबाबतही हेच चित्र सध्या दिसून येत आहे. रॅपर सतीशन आणि गायिका योहानी यांनी गायलेलं ‘मनिके..’ रिलिज झाल्यावर वार्‍याच्या वेगाने इंटरनेटवर धुमाकूळ घालू लागलं.

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या अकाऊंटवरून ‘कालिया’मधील त्यांचा एक जुना व्हिडीओ या गाण्यावर एडिट करून शेअर केला तर टायगर श्रॉफ, माधुरी दीक्षितसारखे कैक सितारे या गाण्यावर ठेका धरताना दिसले.

विविध भारतीय भाषांमध्ये याचे ‘कव्हर्स’ही रिलिज करण्यात आले. योहानीनेही आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात बॉलीवूडच्या काही गाण्यांचे ‘कव्हर्स’ केलेत आणि आता ‘मनिके..’ने भारावलेलं बॉलीवूड आणि त्याचे कव्हर्स बनवून प्रसिद्धी मिळवण्यासाठी होणारी चढाओढ पाहून सध्या ती हिंदी शिकू पाहतेय. अर्थात तिच्या पदरी सुवर्णसंधी पडते की घोर निराशा हे बॉलीवूडचा लहरीपणा आणि येणारा काळच ठरवेल.

असा ‘व्हायरल कंटेंट’ आणि त्याचा जनमानसावर होणारा प्रभाव मनोरंजन उद्योगविश्वाने फार आधीच ओळखलेला आहे. एखाद्या चित्रपटात प्रादेशिक अस्मिता ठळकपणे दाखवण्यासाठी प्रामुख्याने त्या त्या प्रदेशातील लोकसंगीत आणि लोकगीतांचा सढळहस्ते वापर झालेला दिसतो. बर्‍याचदा ती लोकगीते मूळ स्वरूपातच मूळ गायकांना घेऊन बनवली जातात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या चित्रपटातील ‘कोंबड्याने बांग दिली’ हे गाणं! या गाण्यात सुप्रसिद्ध लोकगायिका साखराबाई टेकाळे या त्यांच्या नेहमीच्या शैलीत, फर्ड्या आवाजात काळूबाईला आळवताना दिसतात. कधी मूळ गाण्यात कथेच्या स्वरूपानुसार बदल केले जातात.

पण त्याने या गाण्यामागच्या भावनेला धक्का लागणार नाही याचीही विशेष काळजी घेतली जाते. जसं की ‘गल्यान साकली सोन्याची’ हे आगरी कोळी गीत आपल्याला ‘दिल है की मानता नहीं’मध्ये खास बॉलीवूड अंदाजात ऐकायला मिळतं. शब्द बदलले असले तरी बापाच्या बोटीवरून पळून आलेल्या श्रीमंत पूजा भट्टवर लाईन मारू पाहणार्‍या दीपक तिजोरीच्या तोंडी हे गाणं शोभून दिसतं. सध्या मराठी चित्रपटसृष्टीतही जुनी गाजलेली गाणी, ते कलाकार पुन्हा एकदा नव्याने पडद्यावर अवतरत असून हे चित्र नक्कीच सुखावह आहे. पण बॉलीवूडने मात्र रिमिक्सच्या नावाखाली मूळ कलाकृतीला लाजवतील असले चित्रविचित्र प्रयोग सुरू केले आहेत.

नव्याने व्हायरल झालेल्या मूळ गाण्यांमध्ये एखादं रॅप कडवं टाकलं आणि त्याच्या संगीत संयोजनेत बदल केला की झाला नवा रिमेक, असा गैरसमज बॉलीवूडमध्ये फोफावला असून बर्‍याच चांगल्या गाण्यांची अशी वाट लागताना पाहणं (होय, पाहणंच. ऐकण्यासारखं राहातच नाही त्यात काही!) संगीतप्रेमींसाठी शोकांतिका आहे.

सहजगत्या उपलब्ध असलेल्या इंटरनेटच्या जोरावर दर दिवसाला व्हायरल होत असलेल्या रील्समुळे जुन्या किंवा अपरिचित गाण्यांना अपेक्षित असलेली प्रसिद्धी पुन्हा मिळतेय हे चित्र जरी सुखावह असलं तरी या नाण्याची दुसरी बाजू मात्र आगामी काळात भयंकर ठरू शकते, हे ही खरं! सर्व काही झटपट मिळवण्याचा अट्टाहास वाढत चालला असून मनोरंजनाच्या व्याख्याही आता बदलत चालल्या आहेत. फक्त तीसेक सेकंदांच्या व्हिडीओज पाहून आपलं मनोरंजन करवून घेणार्‍या लोकांना एखादा चित्रपटासाठी तीन तास किंवा टीव्हीवरील मालिकेचा एखादा एपिसोड बघण्यासाठी खर्च होणारा अर्धा तास खर्च करणं आता नकोसं वाटू लागलं आहे.

एखादं गाणं उबग येईपर्यंत व्हायरल झाल्यावर त्याच्या रिमिक्स आणि कव्हर्सच्या गर्दीत ते परत काळाच्या पडद्याआड जातंय, ते पुन्हा कधीही वर न येण्यासाठीच! एकीकडे पंधरा सेकंदांत सादर होणारं गायन, अभिनय वा नृत्य व्हायरल झाल्यानंतर मीडियाकडून तेच खरं टॅलेंट असल्यासारखं मिरवलं जातंय, त्याला नाहक आणि अवास्तव प्रसिद्धी मिळतेय आणि तर दुसरीकडे त्या कलेच्या खर्‍या साधनेला व साधकांना, त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी घेतल्या जाणार्‍या त्यांच्या परिश्रमांनाही आपसूकच तिलांजली मिळतेय.

जर खरोखर जुन्या-नव्या, परिचित-अपरिचित लोककलावंतांना न्याय मिळवून द्यायचाच असेल तर बॉलीवूड आणि मीडियाने ‘जे जे व्हायरल, ते ते उत्तम’ या मानसिकतेचा त्याग करण्याची नितांत गरज आहे.

Back to top button