क्रीडा : किमयागार! | पुढारी

क्रीडा : किमयागार!

मिलिंद ढमढेरे

आपल्या देशातील अनेक पर्यटन स्थळी पूलची गेमपार्लर दिसून येतात. मात्र क्यू स्पोर्टस्मधील बिलियर्डस् आणि स्नूकर या खेळाच्या स्पर्धांमध्ये यश मिळविणे ही काही सोपी गोष्ट नसते. तिथे खेळाडूंच्या सर्वांगीण कौशल्याची कसोटी असते. जागतिक स्तरावर निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची क्षमता फारच थोड्या खेळाडूंमध्ये असते. अशा मोजक्या खेळाडूंमध्ये पंकजचे स्थान खूप वरचे आहे.

पंकज या 36 वर्षीय खेळाडूने आतापर्यंत गुणांच्या प्रकारातील जागतिक बिलियर्डस् स्पर्धेत सात वेळा अजिंक्यपद मिळविले आहे. त्यामध्ये त्याने 2016 ते 2019 असे सलग चार वर्षे जगज्जेतेपद राखले होते. वेळेनुसार होणार्‍या स्पर्धांच्या प्रकारांत त्याने दोन हॅट्ट्रिकसह आठ वेळा जागतिक विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली आहे.

त्याखेरीज जागतिक सांघिक स्पर्धेतही त्याने भारताला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. बिलियर्डस्मध्येच सात वेळा आशियाई अजिंक्यपद तसेच दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धांचे विजेतेपद त्याने मिळविले आहे.

स्नूकरमध्ये त्याने वैयक्तिक विभागात 21 वेळा अजिंक्यपदावर नाव कोरले आहे. भारताला दोन वेळा सांघिक गटाचे जगज्जेतेपद मिळवून देण्यातही त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्षे फारशा स्पर्धा झालेल्या नाहीत, अन्यथा कारकिर्दीच्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत त्याने विजेतेपदाचा रौप्यमहोत्सव यापूर्वीच साजरा केला असता.

लहानपणीच खेळाचे बाळकडू

पंकज याचा जन्म पुण्यातील सिंधी कुटुंबात झाला. मात्र त्याचे शालेय शिक्षण कुवेत आणि नंतर बंगळूर येथे झाले आहे. पंकज याचे मोठे बंधू क्रीडा वैद्यक शास्त्रांमध्ये असल्यामुळे त्याला दहाव्या वर्षीच बिलियर्डस् व स्नूकरची आवड निर्माण झाली. दूरद़ृष्टी लाभलेले मार्गदर्शक असतील तर त्यांना लहान मुलांमधील नैपुण्य पटकन ओळखता येते. ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक अरविंद सावूर यांच्या नजरेतून पंकजचे कौशल्य सुटले नाही.

त्यांनी पंकजला स्पर्धात्मक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वयाच्या अकराव्या वर्षी पंकजने कारकिर्दीतील पहिले विजेतेपद मिळविले. त्यानंतर त्याने गेल्या पंचवीस वर्षांमध्ये कामगिरीचा आलेख सतत चढता ठेवला आहे.

एकाच वर्षी बिलियर्डस् आणि स्नूकर या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये जगज्जेतेपद मिळवण्याचा दुहेरी पराक्रम त्याने तीन वेळा केला आहे. तसेच हौशी खेळाडूंच्या जागतिक बिलियर्डस् आणि स्नूकर स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. जागतिक स्तरावर विजेतेपद मिळवणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू होण्याचाही पराक्रम त्याने केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये त्याने आपल्यापेक्षा वयाने आणि मानांकनांमध्ये श्रेष्ठ असलेल्या खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवला आहे. राष्ट्रीय स्तरावर या दोन्ही खेळांमध्ये मिळून त्याने जवळजवळ तीन डझन विजेतेपद मिळवली आहेत.

सातत्यपूर्ण कामगिरी

हात घालीन तिथे सोने असे आपण नेहमी म्हणत असतो. पंकजबाबत असेच म्हणावे लागेल. बिलियर्डस्, स्नूकर आणि पूल आदी खेळांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या स्पर्धांमध्ये त्याने अतिशय सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने क्यू स्पोर्टस् म्हणजे उभ्याने खेळायचा कॅरम.

मात्र या प्रकारातही शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बिलियर्डस् आणि स्नूकर या दोन्ही प्रकारांमध्ये खेळाडूला बहुतांश वेळ उभेच राहावे लागते. साहजिकच त्याला तासन्तास उभे राहण्याची सवय करावी लागते आणि त्यासाठी भक्कम शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक असते. त्याचप्रमाणे या खेळामध्ये हाताचाही भरपूर उपयोग करावा लागतो.

या गोष्टी लक्षात घेतल्या तर या खेळांमध्ये भाग घेणार्‍या खेळाडूला हात, पाय, कंबर, मान आदी अवयवांचे वेगवेगळे व्यायाम प्रकार नित्यनियमाने करायला लागतात. इतर खेळांप्रमाणेच या खेळातही एकाग्रतेला अतिशय महत्त्व आहे तसेच प्रतिस्पर्धी खेळाडूला पेचात अडकवण्यासाठी आवश्यक असणार्‍या कल्पकतेलाही येथे महत्त्व आहे. सर्वोत्तम खेळाडूसाठी असणार्‍या या सर्व गुणांमध्ये पंकज अतिशय चपखलपणे बसला आहे. संयमी आणि शांतचित्ताने खेळण्याची वृत्ती त्याला नेहमीच विजेतेपदासाठी उपयोगी पडली आहे.

दोहा येथे नुकत्याच झालेल्या जागतिक सिक्स रेड स्पर्धेत त्याने अंतिम फेरीत पाकिस्तानच्या बाबर मसीह याच्यावर शानदार विजय मिळवला. या सामन्यातील बाराव्या फ्रेममध्ये पंकजने केलेला 32 गुणांचा ब्रेक महत्त्वपूर्ण होता. या सामन्यात बाबरने शेवटपर्यंत चांगली लढत देत पंकजवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. तथापि पंकजने शेवटपर्यंत जबरदस्त आत्मविश्वास आणि चिकाटी दाखवत विजयश्री खेचून आणली.

बिलियर्डस् व स्नूकरच्या सांघिक स्पर्धांमध्ये जरी वैयक्तिक सामन्यांचा समावेश असतो. तरीही संघामध्ये असलेल्या खेळाडूंचा समन्वय महत्त्वाचा असतो. अन्य खेळाडूंपेक्षा पंकजचा अनुभव जास्त असला तरीही तो सांघिक खेळांमध्ये आपल्या सहकार्‍यांना प्रोत्साहन देण्याबाबत सतत पुढे असतो. कनिष्ठ सहकार्‍यांकडून मौलिक सूचना स्वीकारताना त्याला कमीपणा कधीच वाटलेला नाही. तसेच प्रतिस्पर्धी खेळाडूंकडूनही भरपूर काही शिकता येते, असेच तो नेहमी मानत आला आहे.

कमालीचा साधेपणा

क्रिकेटमध्ये एक-दोन आंतरराष्ट्रीय सामने किंवा दहा-बारा रणजी सामने खेळणारे खेळाडू आभाळाला हात टेकल्यासारखे वागतात. त्याच्यामध्ये अहंपणा निर्माण झालेला आपण बघतो. पण बिलियर्डस् आणि स्नूकरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भरघोस विजेतेपद मिळविणार्‍या पंकजचे पाय मात्र जमिनीवरच आहेत. चाहत्यांना स्वाक्षरी आणि छायाचित्र देण्याबाबत तो कधीही आढेवेढे घेत नाही.

युवा खेळाडूंना स्वतःहून मार्गदर्शन करण्यास आणि मौलिक सूचना देण्याबाबत तो सदैव तत्पर असतो याचा अनुभव पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अनेक वेळेला दिसून आला आहे. क्यू स्पोर्टस्मध्ये भाग घेणार्‍या काही दिव्यांग खेळाडूंना त्याने मार्गदर्शन केले आहे तसेच गरजू खेळाडूंनाही त्याने भरघोस आर्थिक मदत केली आहे.

पंकजने अलीकडेच चोविसावे जागतिक विजेतेपद मिळविल्यानंतर त्याला प्रसारमाध्यमांनी अजून किती वर्षे खेळणार, असे विचारल्यावर त्याने दिलेले उत्तर खूप महत्त्वाचे आहे. तो म्हणाला, क्यू स्पोर्टस् हा माझा श्वास आहे. आमच्या खेळात सहसा जगज्जेतेपदाच्या आड खेळाडूचे वय येत नाही हे जगातील अन्य प्रौढ खेळाडूंनी दाखवून दिले आहे.

जोपर्यंत माझ्याकडे शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आहे, एकाग्रतेने मी खेळू शकतो तोपर्यंत या खेळात मी भाग घेत राहणार. ऑलिंपिकमध्ये लवकरच आमच्या क्रीडा प्रकारांचा समावेश होणार आहे. त्यावेळी आपल्या देशाचा तिरंगा फडकविणे हेच माझे ध्येय आहे आणि त्यासाठी कितीही कष्ट करण्याची माझी तयारी आहे.

क्यू स्पोर्टस् प्रकारात गीत सेठी, मायकेल फरेरा, अरविंद सावूर, सुभाष अग्रवाल आदी ज्येष्ठ खेळाडूंनी कायमच भारताची प्रतिमा उंचावली आहे. या श्रेष्ठ खेळाडूंच्या मालिकेत पंकजचाही समावेश आहे. त्याच्याकडील महत्त्वाकांक्षा आणि जिगरबाज वृत्ती बघितली तर तो ऑलिंपिकमध्येही भारताला पदके मिळवून देईन अशी खात्री वाटते.

Back to top button