साहित्य : अंतर्मन ढवळणारा महापूर - पुढारी

साहित्य : अंतर्मन ढवळणारा महापूर

विपुल शिंदे

महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात यंदा पावसाच्या प्रकोपानं हैदोस घातला. या विध्वंसाला खेड्याबरोबरच शहरेही अपवाद राहिलेली नाहीत. एकंदरीतच ऋतुचक्र बदलले व माणसाची मतीही फिरली, अन् त्याचेच फटके तो अनुभवत आहे. पर्यावरण बदल ही समस्या जागतिक बनली आहे.

अन् याच पार्श्वभूमीवर सुरेश पाटील यांची ‘पाणजंजाळ’ ही सखोल आशय असलेली कादंबरी प्रकाशित झाली आहे. कादंबरी प्रचंड चित्रदर्शी असून तिचा पोत, मांडणी ही चाकोरीबद्ध नसून तिला चिंतनाचं अधिष्ठान लाभल्याने ती मन व्यापून राहते.

भावनिक महापुराच्या लाटा माणसाचं व्यक्तिगत जीवन, तर नदीचा महापूर हा सगळंच उद्ध्वस्त करतो, ही कादंबरीची कॅचलाइन. या प्रमेयाभोवतीच कादंबरी फिरत राहते.

या प्रमेयाला अनेक आयाम, फाटे आहेत, पायवाटा आहेत. ही वाटचाल जशी प्रेम, वात्सल्य, दुःख, हाव, स्पर्धा आदी मानवी भावभावनांच्या जंजाळातून होते; तशीच ती ढगफुटी, अतिवृष्टी आदी नैसर्गिक घटनांनाही कवटाळते. मानवी भावभावना असो वा महापूर; दोन्हीकडेही पातळी ओलांडली तर त्याचं रौद्र, भीषण रूप मानवी मुळावरच घाला घालतं हे कादंबरीचं मुख्य सूत्र अंतर्बाह्य हादरवून टाकणारं आहे.

बलराज व प्रिया, गौरी या त्रिकोणाभोवती फिरणारी ही प्रेमकथा. गोष्ट प्रेमाची असली तरी ती पठडीतील किंवा चाकोरीबद्ध नव्हे. प्रेम हे गुदगुल्या करणारं असलं तरी प्रेमाचा ज्वरही अनेक समस्या निर्माण करतो; मग त्या सामाजिक, कौटुंबिक असतील वा व्यक्तिगत. हे चित्रणही खूपच भेदक आहे. मनोव्यापारांच्या या उठाठेवीत लाडे-पाटलांसारखं व्यक्तिमत्त्व आपल्या भोवतीच वावरत असल्याचा भास होत राहतो.

या सव्यापसव्यामध्ये बलराज, प्रिया, गौरी ही मध्यवर्ती पात्रं असोत… वा गोविंदा, राधाई, शकू, कोकणातील परशुराम वाणी, त्याची पत्नी अर्चना यांसारखी पात्रं कधी आपल्या मनाचा ठाव घेतात हे कळूनही येत नाही. कादंबरीतील मानवी वृत्ती-प्रवृत्तीचे असे असंख्य आयाम महापुरासारखंच मन व्यापून टाकतात.

पात्रांचं मनोविश्लेषण ही या कादंबरीची खूपच मोठी जमेची बाजू आहे. कादंबरीतील कोणतंही पात्र विसविशीत नाही. प्रत्येक पात्राला स्वतःची भूमिका आहे.

तळईसारख्या अनेक गावात यंदा भूस्खलन झालं. त्याखाली घरं गाडली गेली. अनेक संसारांचा चिखल झाला. पाणजंजाळमधील पैंजणवाडीच्या भळभळणार्‍या जखमाही अशाच आहेत. निसर्गाच्या प्रकोपापाठीमागची कारणमीमांसा काय? निसर्गातील बदल… वातावरणीय बदल म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करायचं का? असे कादंबरीने पुढे आणलेले अनेक प्रश्न विचारप्रवर्तक आहेत.

शिवाय ही कादंबरी प्रश्न मांडून न थांबता त्याची उत्तरंही देते, हे तिचं आणखी एक व्यवच्छेदक वैशिष्ट्य. मकवाडसारख्या खेडेगावातील महापुराला ही कादंबरी जितक्या तीव्रतेनं भिडते, त्याच ताकदीने ती पुणे-मुंबईलाही कवेत घेते.

कादंबरीच्या मांडणीत कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, रंजकता नाही. जे काही आहे, ते सत्याची कास पकडणारं असल्याने हे रसायन चांगलंच दाहक झालं आहे.

कादंबरीचा पट विशाल असून कादंबरीत जबरदस्त नाट्य आहे, मग ते मानवी भावभावनांचं असेल वा खवळलेल्या निसर्गाचं. कादंबरीला जशी खोली आहे, तशी गतीही. एखादा सव्यसाची लेखक एखाद्या विषयाला मनापासून भिडला तर कथानकाचा डोह कसा ढवळून काढला जातो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. वास्तवतेला भिडणारी हळुवार; परंतु आक्रमक भाषा हेही या कादंबरीचं ठळक वैशिष्ट्य ठरावं.

सव्वापाचशे पानांच्या या कादंबरीत कथानकाबरोबरच पाऊसही कायम वाटचाल करीत राहतो. सामाजिक समस्यांना मध्यवर्ती ठेवून लेखन करणं ही बाब सोपी नव्हे. परंतु, पाटील यांनी ‘पाणजंजाळ’च्या निमित्ताने मोठा अवकाश व्यापला असून ही कादंबरी म्हणजे महापुरातील दुःखाचा सशक्त हुंकार आहे.

Back to top button