भारताचा 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आज, रविवार, 20 नोव्हेंबरला रंगारंग प्रारंभ होतो आहे. हा महोत्सव गोव्याची राजधानी पणजीत सोमवार, 28 नोव्हेंबरपर्यंत चालेल. कोरोनानंतर प्रत्यक्ष होणार्या या महोत्सवाच्या माहितीचा एक ट्रेलर…
भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 1952 मध्ये झाला. तेव्हापासून हा महोत्सव देशाच्या विविध शहरांमधून फिरत असे. 2004 पासून गोवा कायमचे घर झाले. गोवा कायमचे घर होण्यास पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांनी विरोधही केलेला होता. राजधानी पणजीत आंदोलनाचे नाट्य रंगले होते. खळखळ मोठी झालेली. राजकारण्यांसह दिल्लीस्थित सरकारी बाबूंनी इफ्फी स्वतःच्या राज्यात नेण्यासाठी मोठी धडपड केली होती. केंद्र सरकार विशेषतः तत्कालीन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री सुषमा स्वराज आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर खमके होते. ते गोव्याच्या पाठीशी ठाम राहिले. परिणामस्वरूप जागतिक पर्यटननगरीही असलेल्या गोव्यात इफ्फी स्थिरस्थावर झाला. बहरत गेला.
देशासह परदेशातील चित्रपटप्रेमींना बौद्धिक मेजवानी देणारा हा महोत्सवाची दुनियादारी आवर्जून केली पाहिजे. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटांची भारतीय रसिकांना, चित्रकर्मींना ओळख व्हावी म्हणून हा महोत्सव सुरू केला. चित्रसंस्कृतीत जगात कोठे काय सुरू आहे, आपण भारतीय कोणत्या पायरीवर आहोत, काय शिकायला हवे ते ज्ञात व्हावे हा हेतू. त्यासाठी नेहरूंनी समिती नेमली होती. तिच्या शिफारशीनंतर चित्रपटांच्या माध्यमातून जगाची सफर अनुभवता येऊ लागली. आज या प्रवासाची व्याप्ती विलक्षण गतीने वाढलेली आहे.
जगभरातील संस्कृती
नानाविध देशांतील माणसे, त्यांची संस्कती-विकृतीचे सूक्ष्म पैलू उलगडणारे चित्रपट पाहिले की माणूसपणाला हाकारा मिळतो. एकेक चित्रपट म्हणजे हजारभर पानांचे पुस्तक वाचल्याचा मोठा आनंद. भवताली हिंसा वाढत असताना माणूसपणाची रेघ गडद करणारे चित्रपट भेटतात ते अशा महोत्सवामधून. ते जगाची दुनियादारी घडवतात. माणूस नावाच्या प्राण्यांच्या गुजगोष्टी सांगतात. या गोष्टी तापदायक आनंद देतात.
दक्षिणेचा डंका
देशात सध्या दक्षिणेच्या चित्रपटसृष्टीचा डंका घुमतो आहे. त्यांनी तिकीटबारीवर पैशांचा छनछनाट किती डोळे दीपविणारा असतो ते सिद्ध केलेले आहे. काही मराठी चित्रपटांत असते तशी प्रबोधनाची भलतीच मास्तरकी न करता दक्षिणेचे चित्रपट गोष्ट छान सांगतात. परिणामी प्रादेशिकतेच्या मर्यादांपलीकडे जाऊन ते गल्ला गोळा करतात. दक्षिणेतील काही चित्रकर्मींशी महोत्सवात संवाद साधता येणार आहे.
एनएफडीसीचे प्रथमच आयोजन
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यंदा प्रथमच या महोत्सवाचे आयोजन करत आहे. त्यांनी आयोजनात काही स्वागतार्ह बदल केले आहेत. प्रारंभीच्या चित्रपटाचा खेळ अगोदर होईल, त्यानंतर उद्घाटनाचा रंगारंग कलाविष्कार. तसेच समारोपाबाबतही. अगोदर समारोपाचा चित्रपट, नंतर समारोपाचा सोहळा. रसिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य दिले जात आहे. त्यांचा वेळेचा विचार करून छोट्या-छोट्या गोष्टींचे बारकाईने नियोजन होताना दिसते आहे. चित्रपटांचे वेळापत्रक हाती आल्याने रसिकांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला. निर्धारित वेळेच्या अगोदरच नियोजन पूर्ण झाल्याचा सुखद अनुभव येतो आहे.
कोरोनामुळे एकाच वर्षी दोन इफ्फी
कोरोना महामारीने जगाला त्रस्त केले होते. परिणामी 2020 मध्ये इफ्फी होऊ शकला नाही. तो 2021 च्या जानेवारीत घेतला. 2021 च्या नोव्हेंबरमध्ये सालाबादप्रमाणे पुन्हा इफ्फी पार पाडला. दोन्ही महोत्सव हायब्रीडच. काहींनी घरबसल्या घेतला चित्रपटांचा ऑनलाईन आनंद. काहींनी नियम पाळून पणजी गाठलेली. 51 वा आणि 52 वा इफ्फी. एकाचवर्षी दोन इफ्फी. चित्रपट महोत्सवातील ही ऐतिहासिक नोंद. 2021 मध्ये कोरोनाचा काच मात्र थोडासा सैलावला होता.
मास्टर क्लास… ओपन फोरम
चर्चा ही राजकीय कृतीच असते. त्यामुळे ती लाखमोलाचीच. 2004 पासून ओपन फोरम होत असे. त्यास प्रतिसादही चांगला होता. काही वर्षे त्यात खंडही पडला. यंदा ही खुली चर्चा पुन्हा सुरू व्हावी, अशी अपेक्षा. मास्टर क्लास भारीच. चित्रपट निर्मितीच्या कैक पैलूंवर अनुभवी चित्रकर्मी, अभ्यासकांना ऐकता येते. त्यांच्याशी संवाद साधता येतो. अनेक मास्टर क्लासना चित्रपटांपेक्षा जास्त गर्दी वाहत असते. यंदाही मास्टर क्लासमध्ये अनेक बापमाणसे भेटणार आहेत.
एक नजर…
प्रतिनिधी : 5 हजार 600 हून जास्त
माध्यम प्रतिनिधी : 515 हून जास्त
किती देशातील चित्रपट आहेत? : 79
महोत्सवातील एकूण चित्रपट : 280 हून जास्त
देशातील सेलिब्रिटी : 220 हून जास्त
आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी : 118 हून जास्त
अल्मा आणि ऑस्कर आणि परफेक्ट नंबर
ऑस्ट्रियन दिग्दर्शक डायटर बर्नर यांचा अल्मा आणि ऑस्कर या चित्रपटाने महोत्सवाचा उघडेल पडदा. पोलंडचे दिगिदर्शक क्रिसझटॉप झानुसी यांच्या परफेक्ट नंबर या चित्रपटाने महोत्सवाची होईल सांगता.
सिनेमा आणि जगण्याचे एकजीव रसायन
कार्लोस सौरा या स्पेनच्या दिग्गज चित्रकर्मीस यंदाचा सत्यजत रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्या आठ कलाकृती महोत्सवात पाहता येतील. मी माझ्या जगण्यातून सिनेमा वेगळा काढू शकत नाही, अशा धारणेने जीवन जगलेला अवलीया. 90 वर्षांचा तरुण महोत्सवास येतोय. सोरा या अरेबिक शब्दाचा अर्थ होतो क्रांती. हुकूमशहा सत्ताधीश असताना त्याला शरण न जाता या राजवटीविरोधात भाष्य करणार्या कलाकृती निर्माण करणारा दिग्दर्शक.
सुरेश गुदले