वास्‍तव : ‘जिमी जिमी’ बनलंय चीनचं क्रांतिगीत | पुढारी

वास्‍तव : ‘जिमी जिमी’ बनलंय चीनचं क्रांतिगीत

सध्या चीनमध्ये व्हायरल होत असलेलं ‘जिमी जिमी’ हे क्रांतिगीतांच्या इतिहासातलं नवं आणि वैशिष्ट्यपूर्ण गाणं ठरतंय. कारण मूळ गाण्याची भावना ही ‘बेला चाव’ किंवा ‘हम देखेंगे’मधे अभिप्रेत असलेल्या क्रांती किंवा बंडाची नाही. पण भाषेच्या पलीकडे जाऊन बघितलं तर हेच गाणं सध्याच्या उपासमारीने भरडलेल्या चिनी जनतेला बळ देताना दिसतंय.

कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार थांबवण्यासाठी चीनने ‘झिरो कोव्हिड पॉलिसी’चा आधार घेतलाय. या योजनेचा फटका आता चीनच्या सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. भुकेने त्रासलेल्या चिनी जनतेने आता सरकारच्या ढिसाळ कारभाराला विरोध करण्यासाठी नवा मार्ग शोधलाय. बप्पीदांचं ‘जिमी जिमी’ हे ‘डिस्को डान्सर’मधलं गाणं चिनी जनतेच्या असंतोषाचं प्रतीक बनलंय.

2020 मध्ये कोरोना हा रोग जगभर पसरला आणि अनेक देशांना लॉकडाऊन जाहीर करावा लागला. या लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणार्‍या सर्वसामान्यांचे बरेच हाल झाले.

कोरोनावर लस सापडल्यानंतर बर्‍याचशा देशांत आता हा रोग आटोक्यात आलाय. पण तो पूर्णपणे संपलेला नाही. ज्या चीनमध्ये या रोगाचा शोध लागला, तो चीन आजही देशातल्या अनेक भागांमध्ये लॉकडाऊन जाहीर करून कोरोनाशी झुंज देतोय. पण या सततच्या लॉकडाऊनमुळे चिनी जनतेमध्य मात्र असंतोष वाढतच चाललाय.

या पॉलिसीमुळे स्थानिक प्रशासन संस्थांना कधीही लॉकडाऊन लावणं सोपं झालं. आठवड्याभरासाठी घोषित झालेली ही ताळेबंदी कसलीही पूर्वसूचना न देता महिनाभर लांबवली जाऊ लागली. इतकं होऊनही वाढती रुग्णसंख्या, लसीकरण, चाचणी कार्यक्रम, वैद्यकीय व्यवस्था, अन्नपुरवठा अशा सगळ्याच आघाड्यांवर येणारं अपयश लपवण्यासाठी जिनपिंग यांच्या सरकारने इंटरनेटवरही कडक निर्बंध लागू केलेत.

फेब्रुवारी 2022 च्या शेवटच्या दोन आठवड्यांत चीनमध्येे अचानक कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार झपाट्याने होऊ लागला. त्यामुळे तात्पुरत्या शिथिल झालेल्या झिरो कोव्हिड पॉलिसीची नव्याने अंमलबजावणी केली जाऊ लागली. अनेक जण आपापल्या घरांमध्येे, कॉलेजच्या होस्टेलमध्येे, कंपन्यांमध्ये अडकून पडले. अगदीच गरजेचं कारण असेल तरच लोकांना बाहेर पडायला परवानगी दिली जायची.

सुरुवातीला काही दिवसांपुरतं मर्यादित असलेलं हे कडक लॉकडाऊन नंतर कुठल्याही पूर्वसूचना न देता वाढवलं जाऊ लागलं आणि मग मात्र चिनी नागरिकांचा संयम सुटला. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सर्वसामान्य चिनी जनता या सरकारी आडमुठेपणाला जमेल त्या पद्धतीने विरोध करतेय. त्यात भारतीय संगीतकार बप्पी लाहिरींचं ‘जिमी जिमी’ हे गाणं त्यांचं सरकारविरोधी क्रांतिगीत बनलंय.

सततच्या अनियोजित लॉकडाऊनमुळे उपासमारीचं, बेकारीचं प्रमाण वाढतच चाललंय. सरकारचं लक्ष या समस्यांकडे वळवून घेण्यासाठी चिनी नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने या जनआंदोलनात आपला सहभाग नोंदवतायत. रस्त्यावर उतरून सरकारी मनमानीला विरोध करणं शक्य नसल्यामुळे नागरिकांनी इंटरनेटलाच आपल्या लढाईचं मैदान बनवलंय. या लढाईसाठी चिनी टिकटॉक अ‍ॅप ‘दोयीन’ त्यांच्या मदतीला धावलंय. टिकटॉकसारखंच ‘दोयीन’वर वेगवेगळ्या गाण्यांचे लिपसिंक करून व्हिडिओ बनवता येतात.

चिनी जनतेने सरकारला विरोध करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करून व्हिडिओ बनवलेत. त्यासाठी त्यांनी 1982ला आलेल्या आणि बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘डिस्को डान्सर’ या बॉलीवूड सिनेमातल्याJimmy Jimmy songआधार घेतलाय. मँडेरीन या चिनी बोलीभाषेत ‘जिमी’ या शब्दांचा अर्थ ‘आम्हाला भात द्या’ असा होतो. सरकारने वाढवलेल्या लॉकडाऊनमुळे होणारी उपासमारी थांबवण्यासाठी चिनी नागरिक सरकारकडे पुरेशा अन्नपुरवठ्याची मागणी करत आहेत. यासाठी घरातली रिकामी भांडी दाखवत ‘जिमी जिमी’ हे गाणं गायलं जातंय. काहींनी मूळ हिंदी गाण्यावरच व्हिडिओ बनवलेत, तर काहींनी या गाण्याच्या मँडेरीन अनुवादावर व्हिडिओ बनवलेत.

चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओंच्या काळात चीनचा बाहेरच्या जगाशी असलेला संबंध अतिशय मर्यादित होता. त्यामुळे पश्चिमेकडे किंवा शेजारच्या देशांमध्ये मनोरंजनाच्या क्षेत्रात कोणतं वारं वाहतंय याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. माओंच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी ‘डिस्को डान्सर’ भारतात रिलिज झाला. अगदी कमी काळातच त्यातली गाणी चीनसोबतच जगभर लोकप्रिय झाली. त्यातही ‘जिमी जिमी’ची लोकप्रियता इतरांपेक्षा जास्त आहे.

चीनमध्ये ऐंशी-नव्वदच्या दशकातल्या सर्वाधिक हिट गाण्यांमध्ये ‘जिमी जिमी’चा समावेश होतो. या गाण्याला तिथं मानाचं समजलं जाणारं गोल्ड मेडलही मिळालं होतं. पार्वती खान यांनी गायलेलं हे गाणं ‘टेस ओके’ या मूळ फ्रेंच गाण्यावरून प्रेरित आहे. पण मूळ गाण्यापेक्षाही या भारतीय गाण्याने जगभर प्रसिद्धी मिळवलीय. याचं निर्विवाद श्रेय गाण्याचे संगीतकार बप्पी लाहिरी यांनाच जातं. ‘जिमी जिमी’ने रशियात खूप प्रसिद्धी मिळवली. त्यात झळकलेल्या मिथुन चक्रवर्तीचं वेड रशियाला लागलं. तेव्हाचे सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह भारत दौर्‍यावर आले असताना पंतप्रधान राजीव गांधींनी त्यांच्यासमोर अमिताभ बच्चन हे भारतातले सगळ्यात मोठे सुपरस्टार असल्याचं सांगितलं. त्यावर मिखाईल म्हणाले, ‘पण माझ्या मुलीला तर फक्त मिथुनच माहितीय!’

आंदोलनं आणि क्रांतिगीतांचं अतुट नातं भाषिक, भौगोलिक मर्यादांना झुगारून अधिकाधिक बळकट कसं होतं, याची बरीचशी उदाहरणं आहेत. ‘बेला चाव’ हे इटालियन क्रांतिगीत याचं मोठं उदाहरण आहे. हे गाणं उत्तर इटलीतल्या शेतमजुरांनी आपल्यावर लादल्या जाणार्‍या सक्तीच्या कामाला विरोध करण्यासाठी गायलं होतं. या गाण्याची झालेली भाषांतरं त्या त्या भाषांमधली क्रांतिगीतं ठरली. सध्या चीनमध्ये व्हायरल होत असलेलं ‘जिमी जिमी’ हे क्रांतिगीतांच्या इतिहासातलं नवं आणि वैशिष्ट्यपूर्ण गाणं ठरतंय. कारण मूळ गाण्याची भावना ही ‘बेला चाव’ किंवा ‘हम देखेंगे’मध्ये अभिप्रेत असलेल्या क्रांती किंवा बंडाची नाही. पण भाषेच्या पलीकडे जाऊन बघितलं तर हेच गाणं सध्याच्या उपासमारीने भरडलेल्या चीनी जनतेला बळ देताना दिसतंय.

सीमा बीडकर

Back to top button