नव्या औषधाचा कितपत दिलासा? | पुढारी

नव्या औषधाचा कितपत दिलासा?

जगभरात अल्झायमर या आजाराने ग्रस्त असणार्‍यांची संख्या मोठी असून, अलीकडील काळात त्यात वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रापुढे आव्हान निर्माण करणार्‍या या व्याधीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक संशोधने सुरू आहेत. अलीकडेच एका कंपनीने अल्झायमरला सुरुवातीच्या टप्प्यावरच रोखणारे औषध विकसित केल्याचा दावा केला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील नवनव्या संशोधनांमुळे अनेक दुर्धर आजारांपासून बचाव करण्यासाठी, नियंत्रण मिळवण्यासाठी मानवाला मोठा दिलासा मिळाला आहे. देवी, पोलिओ यासारख्या एकेकाळी जीवघेण्या मानल्या जाणार्‍या रोगांवर लसी विकसित करून या साथजन्य, संसर्गजन्य रोगांना जवळपास हद्दपार करण्यात मानवाला यश आले. कोरोनासारख्या आधुनिक मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या विषाणू संक्रमणाने भलेही खूप मोठे थैमान घातले असेल; पण अंतिमतः त्यावर लसी विकसित झाल्याने आज संपूर्ण जग मोकळा श्वास घेऊ शकत आहे. असे असले, तरी आजही कर्करोगासारख्या आजारांचे आव्हान आपल्यापुढे आहे.

याखेरीज अन्यही काही आजार किंवा डिसऑर्डर्स आहेत, ज्यांची मीमांसा किंवा चिकित्सा नीटपणाने झालेली नाही किंवा हे आजार जडण्यास कारणीभूत असणार्‍या अचूक घटकांचा शोध लागलेला नाही. अल्झायमर हा यापैकीच एक म्हणावा लागेल. अल्झायमर हा मज्जातंतूला हानी पोहोचवणारा आजार आहे, ज्यामुळे स्मृतिभ्रंश होतो. अलॉईस अल्झायमर या जर्मनीतील एका डॉक्टरने 1906 मध्ये हा आजार जगासमोर आणला होता.

या आजाराने ग्रस्त प्रथम रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्याच्या मेंदूतील प्लेक्स आणि गुंता शोधून काढला. त्यानुसार अल्झायमर हळूहळू मेंदूच्या ऊतींचा नाश करतो व स्मरणशक्ती हिरावून घेतो, यामुळे मन व मेंदू विचलित होते, असे निरीक्षण मांडण्यात आले. जगभरातील साडेपाच कोटींहून अधिक लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे; मात्र अद्यापही यावर ठोस उपाय मिळालेला नाही. ‘अल्झायमर्स अँड रिलेटेड डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडिया’ या संघटनेच्या माहितीप्रमाणे, भारतातील साठ वर्षांवरील वयोगटात सुमारे 53 लाख नागरिकांना अल्झायमर्सचे निदान झाले आहे. 2030 पर्यंत यात सुमारे 20 लाखांची वाढ होऊ शकते, असा या संघटनेचा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर अलीकडेच अल्झायमरवरील एका नव्या औषधाच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. ‘लेकेनमॅब’ असे या औषधाचे नाव असून, त्याच्या चाचणीतील निष्कर्षांनुसार, अल्झायमर, डिमेन्शिया यासारख्या विस्मृतीच्या आजारांची लक्षणे दिसण्यापूर्वीच त्यांचा प्रतिबंध करता येणे शक्य होणार आहे. वास्तविक, ‘लेकेनमॅब’ ही एक अँटिबॉडी आहे. ही अँटिबॉडी मेंदूतील पेशींवर जमा झालेला विषारी प्रोटिनचा थर काढून टाकते. अनेकांच्या मते, मेंदूमध्ये तयार होणार्‍या अ‍ॅमिलाईड प्लेक्स हे अल्झायमर रोग होण्याचे मुख्य कारण आहे. ‘लेकेनमॅब’ हे अँटिअ‍ॅमिलाईड औषध आहे.

बायोजेन आणि ईसाई या औषधनिर्मिती करणार्‍या कंपन्यांनी 18 महिन्यांच्या क्लिनिकल ट्रायलनंतर हे औषध अल्झायमरवर प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. यासाठी अल्झायमरची सौम्य लक्षणे असणार्‍या 1,795 व्यक्तींवर संशोधन करण्यात आले. अभ्यासासाठी सहभागी करून घेण्यात आलेल्या या व्यक्तींची वयोमर्यादा सरासरी 55 ते 80 अशी होती. मानसिक आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित आजारांची तीव्रता मोजण्यासाठी डॉक्टरांकडे त्यांचे स्वतःचे काही निकष असतात. त्याआधारे रुग्णाच्या आरोग्यावर होणार्‍या औषधांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन केले जात असते. ‘लेकेनमॅब’ची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा करणार्‍या वैद्यकीय चमूनेही अशाच प्रकारच्या निकषांचा आधार घेतला. त्यातून या औषधांच्या सेवनामुळे सदर व्यक्तींमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांतच अल्झायमरचा धोका 27 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यश मिळाले. अर्थात, या औषधाच्या आणखीही काही चाचण्या होणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे असून, त्या झाल्यानंतर हे औषध बाजारात उपलब्ध होऊ शकेल.

आता प्रश्न उरतो तो या नव्या औषधाच्या शोधामुळे अल्झायमरसारख्या आजारावर नियंत्रण मिळवता येणे शक्य होईल का? ढोबळमानाने याचे उत्तर तूर्त तरी नाही, असे द्यावे लागेल. असे का? याचे एक कारण या औषधाच्या किमती असे आहे. त्याचबरोबर या औषधाच्या सेवनामुळे मेंदूला सूज येणे आणि मेंदूत रक्तस्राव होणे, यासारखे काही दुष्परिणामही समोर आले आहेत. किमतीबाबत विचार करायचा झाल्यास, ‘लेकेनमॅब’ची किंमत किती असेल? हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी ते प्रचंड महाग असणार, असे मानण्यास जागा आहे. याचे कारण बायोजेन या कंपनीने गतवर्षी अल्झायमरवर प्रभावी ठरणार्‍या ‘एडुहेल्म’ या औषधासाठी वार्षिक खर्च 56 हजार डॉलर्स इतका होता. म्हणजेच, भारतातील रुग्णाला एक वर्षभर हे औषध घेण्यासाठी जवळपास 40 लाख रुपये मोजावे लागतील.

बायोजेनच्या या औषधाच्या किमती ऐकून अमेरिकन सिनेटमधील सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला. चालूवर्षी या कंपनीने औषधांच्या किमती निम्म्यावर आणल्या. त्यांचा विचार केला, तरी 22 लाख रुपये खर्च करणे हे भारतासारख्या देशातील उच्च मध्यमवर्गातील नागरिकांसाठीही सोपे नाही. केवळ हे औषधच नव्हे, तर अल्झायमरवर विकसित करण्यात आलेली अशी अनेक औषधे किमतीच्या द़ृष्टीने रुग्णांच्या आवाक्याबाहेरची आहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या रुग्णांनाच या औषधांचा वापर करता येईल. अलीकडील काळात मेडिक्लेम घेण्याची टूम वाढली आहे; परंतु इतक्या महागड्या औषधोपचारांसाठी आरोग्य विमा घेणेही परवडणारे नाही.

या अतिप्रचंड किमतींच्या औषधांमुळेच अल्झायमरसारख्या रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाहीये. आजघडीला 65 ते 74 वर्षांतील 1,000 व्यक्तींमध्ये सरासरी अल्झायमरचे चार रुग्ण दिसून येताहेत. 75 ते 84 वर्षांच्या 1,000 लोकांमध्ये हे प्रमाण 32 इतके आहे. भारत हा आज तरुणांचा देश असल्यामुळे पाश्चिमात्य देशांइतके आपल्याकडे वयोवृद्ध नागरिकांचे प्रमाण मोठे नाहीये. पाश्चिमात्य देशांमध्ये लोकसंख्येचा मोठा हिस्सा हा ज्येष्ठ नागरिकांचा आहे. त्यामुळे या देशांमध्ये अल्झायमरच्या समस्येचे गांभीर्य अधिक प्रकर्षाने जाणवते.

परंतु, भारतात आणखी काही वर्षांनी लोकसंख्येचा पट पालटणार आहे. त्यावेळी ज्येष्ठनागरिकांची संख्या वाढलेली असेल. त्यामुळे दूरदर्शीपणाने विचार करून अल्झायमरच नव्हे, तर अशा दुर्धर व्याधींवरील उपचारांसाठी संशोधन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना चालना दिली पाहिजे. आज अनेक आजारांच्या मुळाशी जाऊन पाहता बदललेली जीवनशैली, वाढलेले ताणतणाव, सकस आहाराची कमतरता आणि व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे दिसून येतात. अल्झायमरचा विचार करता मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण यासारख्या घटकांमुळे अल्झायमरची तीव्रता वाढत जाते. हे लक्षात घेता मेंदूस्नेही आणि मनाला सुखावणारा आहार आणि जीवनशैली अंगीकारणे हाच उत्तम इलाज आहे.

प्रा. विजया पंडित

Back to top button