टेकइन्फो : कृत्रिम बुद्धीचे विस्मरण | पुढारी

टेकइन्फो : कृत्रिम बुद्धीचे विस्मरण

डॉ. दीपक शिकारपूर

सन 2022 अगदी जवळ येऊन ठेपले आहे. कोरोनाच्या संकटामुळे आजचं युग जवळपास पूर्णपणे डिजिटल झालंय. माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे. माहितीने जागतिक अर्थव्यवस्थेत आता ‘तेला’ची जागा घेतली आहे. प्रत्येक वस्तू, उपकरण हे ‘स्मार्ट’ असणं चैन नसून आज गरज बनली आहे. संगणक आणि यंत्रमानवांची तांत्रिक प्रगती गेल्या वीसएक वर्षांत विलक्षण झपाट्याने झाली असल्याने मानव आणि यंत्रमानव यामधील सीमारेषा पुसट होत आहे. ‘ऑटोमेशन’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता ही आज सगळ्यात वेगाने वाढणारी क्षेत्रे होत निघाली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, बिग डेटा अ‍ॅनालिसिस, रोबोटिक्स या आणि यासारख्या घटकांमुळे संबंधित संगणकीय प्रणाली आणि यंत्रणा अधिकाधिक ऑटोनॉमस म्हणजे स्वतंत्रपणे निर्णय घेणार्‍या आणि स्वयंभू बनत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील ही झेप अनेक क्षेत्रांवर आपला प्रभाव दाखवायला नजीकच्या काळात सुरुवात करेल. अनेक क्षेत्रे या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदलतील. येत्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात रोबो (यंत्रमानव) हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटक बनेल.

अनेक प्रकारचे उद्योग लोकांच्या इच्छा, आवड-निवड किंवा चेहर्‍याचे विश्लेषण करण्यासाठी मशिन लर्निंगचा वापर करतात. काही संशोधक आता एक वेगळा प्रश्न विचारत आहेत. संगणक माहिती कशी विसरू शकेल? म्हणजे अगदी माणसासारखेच की..? मशिन अनलर्निंग हे एक नवीन क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअरमध्ये निवडक स्मृतिभ्रंश निर्माण करण्याचे मार्ग शोधते. साठवलेल्या माहितीच्या साठ्यामधून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे किंवा डेटा पॉईंटचे सर्व ट्रेस काढून टाकणे हे त्याचे ध्येय आहे, तेही त्याच्या कामगिरीवर परिणाम न करता. माहितीचा दुरुपयोग, गुप्तता व सुरक्षेबद्दल अनेकवेळा चर्चा होत असते.

अनेक सोशल मीडिया उद्योगांवर याच मुद्द्यावर अनेक देशांत खटले चालू आहेत. संगणक वापरकर्ते उत्पादक कंपन्यांना वैयक्तिक माहिती हटविण्यास सांगू शकतात; पण ते प्रत्यक्षात घडेलच याची खात्री नसते, ते सामान्यतः अंधारात असतात की, त्यांच्या माहितीने कोणत्या अल्गोरिदमने ट्यून किंवा प्रशिक्षित करण्यास मदत केली. मशिन अनलर्निंगमुळे एखाद्या व्यक्तीला त्याचा डेटा आणि त्यावर कंपनीची नफा मिळवण्याची क्षमता दोन्ही काढून घेणे शक्य होऊ शकते. यामुळे ग्राहकांचा प्रणाली उत्पादकांवर असलेला विश्वास वाढेल, त्यांना अधिक सुरक्षित वाटेल व ते अधिक माहिती प्रदान करतील. काही संशोधक औषधांवर असलेल्या एक्स्पायरी डेट या संकल्पनेवर काम करत आहेत.

म्हणजे ठराविक काळानंतर ती माहिती आपोआप नष्ट होईल. माहिती नष्ट करायची तारीख ग्राहक टाकू शकेल. 2021 च्या सुरुवातीला, अमेरिकेतील यूएस फेडरल ट्रेड कमिशनने चेहर्‍यावरील ओळख साठवणार्‍या स्टार्टअप उद्योग पॅराव्हिजनला अनुचितपणे प्राप्त केलेल्या व्यक्तींच्या चेहर्‍याचे फोटो आणि त्यांच्याबरोबर प्रशिक्षित मशिन-लर्निंग अल्गोरिदमचा माहितीचा संग्रह हटवण्यास भाग पाडले. फेसबुकनेही एक्सपायर हे नवे सॉफ्टवेअर लवकरच सादर करणार, असे नुकतेच जाहीर केले आहे. प्रभावी विस्मरण प्रणाली वापरकर्त्यांना माहिती नष्ट करण्याचे एक नवीन वैशिष्ट्य देऊ शकेल. या प्रणालींनी मग माहिती काढून टाकलीच पाहिजे आणि त्याचे परिणाम पूर्ववत केले पाहिजेत, जेणेकरून भविष्यातील सर्व प्रक्रिया ही माहिती अस्तित्वात नसल्याप्रमाणे चालतील.

मेंदूच्या कार्याबद्दल आजही आपल्याला जेमतेम 10 टक्के माहिती आहे, असे मानले जाते. त्यामुळेच मेंदूतील विचार प्रक्रिया व इतर घडामोंडींबाबत मोठे संशोधन जगभरात सर्वत्रच वेगाने सुरू आहे. एवढे मात्र खरे की, तांत्रिक प्रगती मानवासाठी आहे हे ध्यानात ठेवणे आणि स्वतःला तिचा गुलाम न बनू देणे हे अखेरीस मानवाच्याच हातात आहे!

Back to top button