सिंहायन आत्‍मचरित्र : घर ते अपुले छान! | पुढारी

सिंहायन आत्‍मचरित्र : घर ते अपुले छान!

सिंहायन आत्‍मचरित्र :  प्रकरण 28

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहे, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

सिंहायन आत्‍मचरित्र

पुढे असावा बागबगीचा
वेल मंडपी जाईजुईचा
आम्रतरुवर मधुमासाचा
फुलावा मोहर गोरापान
असावे घर ते अपुले छान

पी. सावळाराम यांच्या गीतातील या ओळी सुंदर घरकुलाचं स्वप्न रंगवताना कशा बहरून आलेल्या आहेत! आणि ते खरंही आहे. कारण, प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक स्वप्नामधलं घर दडलेलं असतंच. ‘रोटी, कपडा और मकान’ या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, असं म्हटलं तर त्यातील ‘मकान’ म्हणजेच ‘घर’ ही सर्वात मूलभूत गरज आहे, असंच म्हणावं लागेल. ‘नटसम्राट’ नाटकातला म्हातारा ‘कुणी घर देता का घर’ असं आर्त स्वरात म्हणतो…

कुणी घर देता का घर?
एका तुफानाला कुणी घर देता का?
एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून,
माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून
जंगलाजंगलात हिंडतंय.
जिथून कुणी उठवणार नाही
अशी एक जागा धुंडतंय.
कुणी घर देता का घर?

एक आर्त टाहो फोडून ‘नटसम्राट’मधला गणपतराव बेलवलकर जेव्हा रानोमाळ भटकत राहतो, तेव्हाच माणसाच्या आयुष्यात घराचं महत्त्व काय आहे, ते लक्षात येतं! ही त्या नटसम्राटाची वेदना ऐकणार्‍याचं काळीज चिरत जाते. त्या तुफानाला घर नसल्याच्याच ह्या वेदना आहेत.

माणूस दिवसभर कुठेही भटकला, तरी रात्री डोकं टेकायला तो आपल्या घरातच जात असतो. घराशिवाय माणसाच्या जगण्याला पूर्णत्व येतच नाही. ‘घर सोडून परदेशी होणे,’ अशी मराठीमध्ये एक म्हणच आहे. याचा सरळ अर्थ असाच आहे, की ज्याला घर नाही तो परदेशी किंवा निर्वासित!

म्हणूनच नेहमी जो बेघर असतो, तो छोट्याशा घराचं स्वप्न बघतो. ज्याला छोटं का असेना, एक टुमदार घर असतं, तो बंगल्याचं स्वप्न बघत असतो आणि ज्याच्याकडे एखादा छानसा बंगला असतो, तो आलिशान हवेलीचं स्वप्न बघण्यात गढून जातो.

एक बंगला बने न्यारा
रहे कुनबा जिसमें सारा

कुंदनलाल सैगलांच्या आवाजातील हे सुंदर गीत तशाच एका स्वप्नाकडे निर्देश करतं. 1937 साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेसिडेंट’ या चित्रपटाचा भणंग नायक, एका ‘न्यार्‍या’ बंगल्याच्या स्वप्नात दंग असतो. एक अशा सोन्याच्या बंगल्याच स्वप्न तो रंगवतोय, की जो चंदनाच्या वनात बांधलेला असतो आणि त्याचं स्थापत्य प्रत्यक्ष विश्वकर्म्यानं केलेलं असतं. तो बंगला तयार झाल्यावर त्यात त्याचा सारा ‘कुनबा’ म्हणजे कुटुंब सुखासमाधानानं राहणार असतं.

घर म्हणजे जिथं माणूस सुखासमाधानानं विसावा घेतो ते पवित्र स्थान! आईच्या गर्भाशयानंतर दुसरं सुरक्षित आणि ऊबदार ठिकाण म्हणजे फक्त माणसाचं घर म्हणजे जिथं माणूस सुखासमाधानानं विसावा घेतो ते पवित्र स्थान! आईच्या गर्भाशयानंतर दुसरं सुरक्षित आणि ऊबदार ठिकाण म्हणजे फक्त माणसाचं घर!

तेरे घर के सामने एक घर बनाऊँगा
तेरे घर के सामने दुनिया बसाऊँगा

‘तेरे घर के सामने’ या चित्रपटाचा नायक त्याच्या प्रेयसीला, तिच्या घरासमोरच आपलं घर बांधण्याचं वचन देतो आहे. पण तो पुढे जे म्हणतो ते अधिक महत्त्वाचं आहे. ‘तेरे घर के सामने, दुनिया बसाऊँगा,’ असं तो म्हणतो. याचा अर्थ ‘घर’ हे केवळ ‘घर’ नसतं, तर ती त्या माणसाची स्वतःची अशी एक वेगळी ‘दुनिया’च असते. प्रत्येकाचं घर, मग ते लहान असो वा मोठं, ते त्याचं आगळंवेगळं ‘जग’च असतं.
माणसाला घराची अतीव ओढ असते. मी घराबाहेर कुठेही गेलो, दिल्लीला गेलो, पुण्या- मुंबईला गेलो, परदेशी गेलो, तरी कोल्हापूरच्या कधी एकदा माझ्या घरी परत येईन असं मला होऊन जातं. मला जशी घराची ओढ असते, तशी ती प्रत्येक माणसाला असते, किंबहुना प्रत्येक जिवाला असते. प्रत्येक पिलापाखराला आपापल्या घरट्याची ओढ असते. आपल्या घराची ऊब ती आपल्याच घराची ओढ असते. तशी ऊब जगात कुठंही नसते.

आमचं ऊबदार घर ः

मीही अशाच एका ऊबदार घरात वाढलो. लहानाचा मोठा झालो. कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतील आमचं घर, हे खूपच सुंदर आणि प्रशस्तही होतं. खरं सांगायचं तर तो बंगला नव्हता म्हणूनच त्याला घर म्हणायचं; अन्यथा तो एक प्रकारचा चिरेबंदी वाडाच होता.
आबांनी फार विचारपूर्वक ते घर बांधलं होतं. जणू आई आणि आबांच्या स्वप्नामधलंच ते घरकूल होतं. आबांनी नेहमीच प्रत्येक गोष्ट मजबूत आणि चिरस्थायी केली. आमचं शुक्रवार पेठेतील घर हे त्याचं उत्तम उदाहरण होतं.

याच घरात मी आणि माझ्या बहिणी, आम्ही लहानाचे मोठे झालो. याच घरात माझं बालपण रांगलं, दुडूदुडू धावलं, कधी कधी धपकन पडलं, रडलंसुद्धा! आणि बघता बघता कात टाकून त्यानं यौवनातही पदार्पण केलं.

माझ्या बहिणीही इथंच लहानाच्या मोठ्या झाल्या. सहा जणींपैकी चार जणींची लग्नंही याच घरात झाली आणि नांदायला जाऊन पुन्हा त्या माहेरवाशिणी म्हणून माघारी येऊ लागल्या आणि मग बघता बघता आमच्या कुटुंबाचा खटाला प्रचंड वाढला. तो इतका वाढला, की त्या प्रशस्त घरकुलालाही तो आता आवरेनासा झाला. कारण आता बहिणी काही एकट्या दुकट्या माहेरी येत नसत, तर त्यांच्याबरोबर सुट्ट्यांना आणि सणासुदीला त्यांचे पती आणि मुलंही येऊ लागली. आबांचं आणि आईचं गोकुळ ओसंडून जाऊ लागलं. एक खूप गाजलेली कविता आहेः

घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती
या घरट्यातुन पिलू उडावे
दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती

असंच आमचं घर आहे. या कवितेत म्हटल्याप्रमाणे इथून दिव्यशक्ती घेऊन मी काय आणि योगेश काय – विशाल गगनात भरार्‍या मारतो, दूरप्रदेशी – दूरदेशी जातो. पण आमच्या पंखांना घरट्यात येऊन पंख मिटून विसावा घेण्याची ओढ ही असतेच, कारण याच घरातून आम्हाला दिव्यशक्ती मिळालेली असते. आमच्या पराक्रमाला आमचं घर हाच खरा विसावा असतो. ‘निर्णयसागर’च्या कामासाठी मी दीर्घकाळ मुंबईत राहिलो. तिथंही माझी सोय चांगली होती, पण माझ्या कोल्हापूरच्या घराची ओढ काही स्वस्थ बसू देत नव्हती. माझ्या मनाला पंख फुटायचे आणि मी मनोवेगानं घरी येऊन विसावायचो. माझा विसावा मला कल्पनेत का असेना, पण मला माझ्या हक्काच्या घरात मिळायचा.

घरात एक मोठा झोपाळा होता. त्यावर बसून झोके घेत घेतच आम्ही भावंडं मोठी झालो होतो, पण आता त्या झोपाळ्याचा ताबा आबांच्या नातवंडांनी घेतला होता. बघता बघता झोपाळ्यात बसणार्‍यांची संख्या प्रचंडच वाढली. मग त्यात बसण्याकरिता भांडणं आणि झोंबाझोंबी सुरू झाली. कधीकधी तर गुद्दागुद्दीही होऊ लागली. मग तडजोड होऊन, झाडून सारे जण दाटीवाटीनं त्या झोपाळ्याला लोंबकळतच झोके घेऊ लागत. बिचारा झोपाळा मात्र कुरकुरत का असेना, पण हिंदोळू लागत असे.

हे सगळं कसं होतं, तर एखादा चांगला सिनेमा बघायला जावं. तो नेमका हाऊसफुल्ल असावा, पण माघारी न येता, थिएटरच्या एखाद्या कोपर्‍यात दाटीवाटीनं उभं राहून त्या सिनेमाचा आनंद लुटावा, अशीच त्यावेळी आमची अवस्था होत होती!

..आणि मग या सर्व प्रकारात आम्हाला आता आमचं घर लहान पडू लागलं आणि तसं होणं काही चुकीचं नव्हतं. मुळात आमचं घर शुक्रवार पेठेतील एका अरुंदशा गल्लीत होतं. घरापुढचा रस्ता इतका अरुंद होता, की समोरून एखादी चार चाकी गाडी आली, तर दुसर्‍या गाडीला तिला क्रॉस करून जाणं महाकठीण होत असे. मग अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या गाड्या दारात पार्क करणं शक्यच होत नसे. कारण आमच्या घराला ‘कार पार्किंग’ची व्यवस्थाच नव्हती. एरव्ही माझी नि आबांची गाडी दारात उभी करणंच मुश्कील होऊन जाई. त्यात घरी येणारे पाहुणे गाड्या घेऊन आले, तर चांगलीच पंचाईत होऊन बसे.

सत्यशोधक चळवळीतून आलेले आबा समाजप्रिय गृहस्थ होते. त्यांना माणसांपासून दूर जाऊन राहणं पटत नव्हतं. गल्लीत, गावात, माणसांत राहावं या मताचे ते होते. त्यामुळेच भर गजबजलेल्या वस्तीत त्यांनी घर बांधलं होतं.

आईची जडणघडणही तशीच झालेली. शेजारच्या एखाद्या महिलेनं यावं आणि म्हणावं, “वैनी, थोडं दूध देता का? आज आमचा गवळी आलाच नाही बघा!” मग आईनं हसत मुखानं तिच्या भांड्यात चांगलं पावशेरभर दूध ओतावं, यात आईला खरं सुख, खरा आनंद मिळत असे.

…आणि मलाही शुक्रवार पेठेतील घरात राहणं आवडायचं. माझं सगळं लहानपण या घरात गेलेलं. त्याच्या अनेक आठवणी माझ्या मनात जपून ठेवल्या आहेत. आजही वेगळी वाट करून मी या घरावरुन नजर टाकून येतो. मी मोठा झालो, विदेशात जाऊन आलो, तिथली संस्कृती पाहून आलो, तरीही मला माझं हे घरच अधिक ऊबदार वाटायचं. लहानपणी गल्लीतल्या मित्रांसोबत गल्लीतच खेळलेलं क्रिकेट, आट्यापाट्या, हुतूतू, गोट्या, विटीदांडू या खेळांची चव काही औरच असते. ज्यांनी त्याची चव चाखली, ते भाग्यवान. ज्यांना चाखायला मिळाली नाही, ते दुर्दैवी!

आबांचा तर सारा मित्र परिवारच आगळावेगळा. कुणीही कधीही यावं आणि जावं. ‘आवो जावो घर तुम्हारा,’ अशीच आमच्या घराची अवस्था झाली होती. तिथं अपॉईंटमेंट घेऊन येणं वगैरे असले सोपस्कार कधीच नव्हते. अण्णाप्पा पाडळकरांसारखे पैलवान तर गल्लीच्या तोंडापासूनच, ‘संपादऽऽक! हायसा काय घरात?’ अशी आरोळी ठोकीतच घरात प्रवेश करीत असत आणि आबाही तेवढ्याच चढ्या आवाजात, ‘या वस्ताद!’ म्हणून त्यांचं स्वागत करायचे.

माय सासरी नांदते ः

चार बहिणींची लग्नं झाली असली, तरी अद्याप माझ्या दोन बहिणी लग्नाच्या होत्या. त्यातच गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे आईला घराबाहेर पडता येत नव्हतं. तिला अर्धांगवायूचा झटकाही येऊन गेला होता; पण ती हार मानणार्‍यांपैकी नव्हती. बेडरूममध्ये बसूनच नातवंडांना खेळवण्यात तिला धन्यता वाटायची. तिच्यासाठी हा फार मोठा विरंगुळा होता.

पण आईचा आनंद लेकी माहेराला आल्या, की गगनात मावत नसे. लेकीचं माहेरपण आणि जावयांची ऊठबस करण्यात तसेच नातवंडांचं कोडकौतुक करण्यात तिचा जन्म धन्य होऊन जात असे. बहिणाबाई चौधरींनी उगीच म्हटलेलं नाही?

दे रे दे रे योग्या ध्यान
ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते

आमची आई अशाच संस्कृतीत वाढलेली होती. त्यामुळेच ती या आमच्या जुन्या घरात चांगली रमली होती. परंतु, आताशा हे घर आपल्या लेकी, सून, जावई आणि नातवंडांसाठी अपुरं पडतंय, हे तिच्या ध्यानी येऊ लागलं होतं. त्यामुळे मी व आबांनी आता नवं, मोठं घर बांधण्याचा निर्णय घेतला.

..आणि एकदा निर्णय घेतल्यावर आबा लगेच कामाला लागले. त्यांनी नागाळा पार्कात बंगल्यासाठी जागा घेण्याचं निश्चित केलं. त्यावेळी नागाळा पार्कातच जयसिंगराव घाटगे (कागलकर सरकार) यांनी प्लॉट पाडले होते. आबा पोपटराव जगदाळेंना सोबत घेऊन गेले आणि त्यांनी त्यातला एक सोयीस्कर रस्त्याकडेचा प्लॉट खरेदी केला.

अर्थात, सुरुवातीला मी तो प्लॉट पाहिला नव्हता. निर्णयसागरच्या व्यापामुळे मी त्या काळात मुंबईलाच जास्ती असे. कोल्हापूरला आल्यानंतर मी तो प्लॉट जाऊन पाहिला. मला तो प्लॉट खूपच लहान वाटला. आता बंगलाच बांधायचा, तर तो मोठा प्रशस्त हवा. त्याच्या पुढेमागे जागा हवी, लॉन इत्यादीसाठी स्पेस हवा, अशा मताचा मी होतो.

म्हणून मग मी परत पोपटराव जगदाळेंना बरोबर घेऊन जयसिंगराव घाटगे (कागलकर सरकार) यांच्याकडे गेलो आणि त्या प्लॉटला लागूनच आणखी एक मोठा प्लॉट खरेदी केला. जे काही करायचं ते दणक्यात करायचं, हा माझा स्वभावच होता नि आहे. गमतीची गोष्ट म्हणजे त्या काळी नागाळा पार्कातील त्या प्लॉटची किंमत एक रुपया स्क्वे. फूट होती. असे आम्ही दोन प्लॉट घेतले. त्यापैकी मोठ्या प्लॉटवर बंगला बांधायचा नि छोटा प्लॉट गार्डन आणि लॉनसाठी ठेवायचा निर्णय आम्ही घेतला.

त्यावेळी कोल्हापूरला मुंबईचे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट पोतदार आले होते. मी त्यांना बंगल्याचं डिझाईन करण्यास सांगितलं. त्यांनी अत्यंत सुंदर आणि आकर्षक असं बंगल्याचं डिझाईन बनवून दिलं. त्याप्रमाणे लगेचच बंगल्याच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. बंगल्याच्या बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर शिंदे यांना दिलं. मात्र, त्यावरच्या देखरेखीचं काम माझे आतेभाऊ जयवंतराव शिंदे यांच्यावर सोपवलं. त्या काळात निर्णयसागरच्या कामामुळे मला सारखं मुंबईला जावं लागत होतं. त्यामुळे बंगल्याच्या बांधकामावर लक्ष ठेवणं मला अशक्य होत असे. तरीही मुंबईतून परतल्यावर वेळ मिळेल तेव्हा मी बांधकामाची पाहणी करीतच होतो. लवकरच बंगला बांधून पूर्ण झाला आणि आम्ही नव्या बंगल्यात राहायला जाण्याचा निर्णय घेतला.

इंदिरा निवास ः

आता नवीन बंगल्याला नाव काय द्यावं, याबद्दल आमच्या घरात बरीच चर्चा, बराच ऊहापोह झाला. मग आबांनीच नाव सुचवलं, ‘इंदिरा निवास’ आबा म्हणाले.

“बाळ, स्त्री हीच घराची खरी मालकीण असते. पुरुष उनाड असतो. त्याचा पाय घरात फारसा टिकत नाही. स्त्री मात्र घर सांभाळून राहते. खर्‍या अर्थानं घर तिचंच असतं.”

“अगदी माझ्या मनातलं बोललात, आबा!” मी म्हणालो, “या बंगल्याला आईचं नाव देणंच योग्य होईल.”
या निर्णयाला आमच्या सौभाग्यवतींनीही सहर्ष पाठिंबा दिला आणि ‘इंदिरा निवास’ या नावावर शिक्कामोर्तब झालं.
मग 18 एप्रिल 1979 रोजी ‘इंदिरा निवास’ची वास्तुशांती संपन्न झाली आणि शुभमुहूर्तावर मी आणि माझी पत्नी सौ. गीतादेवींनी वास्तुप्रवेश केला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर पाहुणे मंडळी आलेली होती. बंगल्याबाहेरच्या लॉनवर मोठा मंडप उभा करण्यात आला होता. जणू वास्तुशांती म्हणजे जाधव परिवार आणि मित्रमंडळींचं स्नेहसंमेलनच होतं.

शरद पवारांचीही उपस्थिती ः

त्यावेळी महाराष्ट्रात ‘पुलोद’चं सरकार होतं आणि शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शरद पवारांचे नि माझे मैत्रीपूर्ण संबंध. त्यांना मी अगत्याचे निमंत्रण दिलं होतं आणि माझ्या निमंत्रणास मान देऊन तेही स्नेहभोजनासाठी उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत अनेक राजकीय नेते आणि मंत्रीही हजर होते, हे विशेष!

बंगला खूपच मोठा आणि प्रशस्त बांधला असून, त्याला सहा बेडरूम आहेत. त्यामुळे आमचा कुटुंबकबिला त्यात अगदी आरामात राहू शकतो. माझ्या चार बहिणींची लग्नं जुन्या शुक्रवार पेठेतील घरात झाली होती; पण पुढील दोन बहिणींची लग्नं मात्र नागाळा पार्कमधल्या नवीन बंगल्यात पार पडली. पुढे तर गोतावळा अधिकाधिक वाढतच गेला. माझी दोन मुले, तसेच सर्व सहाही बहिणींची मुलं, त्यामुळे आधी आमचं गोकुळ होतं, आता त्याची द्वारका झाली. बहिणी, मेहुणे आणि त्यांची मुलं प्रत्येक सुट्टीला आली म्हणजे ‘इंदिरा निवास’मध्ये एक मोठं स्नेहसंमेलनच भरत असे. आजही त्यात खंड पडलेला नाही.

मात्र, आज त्या काळातील लहान मुलं आता स्वतःच आई-वडील झाली आहेत, तर काहींची म्हणण्यापेक्षा सर्वांचीच नातवंडंही खेळू लागली आहेत.

या घराचा पायगुण असा आहे, की या घराला अनेकांचे पाय लागलेले आहेत. मुंबई-पुण्यापासून कोल्हापुरातीलही वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक कधी ना कधी ‘इंदिरा निवास’चा पाहुणचार घेऊन गेलेली आहेत. राज्यकर्त्यांपासून ते राजेरजवाड्यांपर्यंत आणि साहित्यिकांपासून ते कलावंतांपर्यंत अनेकांनी माझ्या घराला आपली पायधूळ झाडलेली आहे.

पत्रकार हौसिंग सोसायटी ः

कोल्हापूरचे काही ज्येष्ठ पत्रकार मित्र मला भेटायला आले. त्यामध्ये बी. आर. पाटील, जयसिंगराव पिसाळ, विलासराव झुंजार, प्रभाकर कुलकर्णी इत्यादींचा समावेश होता. पत्रकारांच्या हौसिंग सोसायटीसाठी सरकारी जागा मिळावी, यासाठी ते माझ्याकडे आले होते. पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी जागा मिळावी म्हणून शासनाकडे अर्ज केला होता; पण जागा मंजूर झाली नव्हती. म्हणून ही सगळी मंडळी माझ्या भेटीसाठी आली होती.

त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. मी त्यांना जाऊन भेटलो. माझ्यासोबत कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे होते. शरद पवारांनी लगेचच मनावर घेतलं आणि त्याच भेटीत आम्ही पत्रकारांच्या हौसिंग सोसायटीचा प्रश्न मार्गी लावला. मग 4 जानेवारी 1979 रोजी त्या हौसिंग सोसायटीसाठी जागा मंजूर झाली आणि कोल्हापूरच्या गरजू पत्रकारांसाठी घरं बांधण्याचा मार्ग मोकळा झाला.

..आणि तो व्हायलाच हवा होता. कारण, आमचे पत्रकार म्हणजे एकजात सगळे ‘हरफन मौला’! पत्रकारितेत ते इतके गढून गेलेले असतात, की त्यांना कधी कधी घरादाराचीही आठवण येत नसते. वृत्तपत्रांचं कार्यालयच या फकिरांची मस्जिद असते. त्यांचं ठीक असतं, पण त्यांच्या चिल्यापिल्यांचं काय? त्यांना तरी निवारा हवा की नको? पत्रकार जरी झाला, तरी तो माणूसच असतो. त्यालाही संसार असतो, पत्नी, मुलंबाळं असतात. त्या सगळ्यांच्या पालनपोषणाची, चांगल्या निवार्‍याची सोय करण्याची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर असते. मी तर म्हणेन की, सरकारनं प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांच्या निवासस्थानासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. पत्रकार हा समाजाचा जागल्या असतो, सरकारचा खरा समीक्षक असतो. सरकार आणि समाजापुढे आरसा धरण्याचं काम तो करत असतो. त्यामुळं त्याच्या निवार्‍याची सोय शासनानं करायलाच हवी.

बहिणाबाई चौधरींनी म्हटलेलं अगदी खरंच आहे.
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला.

जर सुगरण पक्षीण आपल्या पिलांसाठी खोपा बांधू शकते, तर मनुष्याच्या पिलांना त्यांचं हक्काचं घर का मिळू नये? आपण घर बांधतो ते स्वतःसाठी नसतंच, तर ते पुढच्या पिढीचं देणं म्हणून! आबांनी आमच्यासाठी घर बांधलं. मी आमच्या पोरांसाठी ‘इंदिरा निवास’ उभं केलं. खरं तर आपल्या पोराबाळांसाठी घर उभं करणं हा एक आनंदोत्सवच असतो आणि ते घर म्हणजे एक आनंदाचं भांडारच असतं. म्हणूनच ते प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. ‘शापित’ चित्रपटातील नायक-नायिका काबाडकष्ट उपसतानाही त्यांच्या ओठांवर शब्द येतात ते मात्र भविष्याबद्दलचेच.

तुज्या माज्या संसाराला आनि काय हवं
तुज्या माज्या लेकराला घरकुल नवं

हे प्रत्येकाचं भविष्याबद्दलचं स्वप्न एका घरकुलापाशी पूर्ण असतं. म्हणून घर हे माणसाला पूर्णत्व देतं. भारतीय संस्कृतीत वास्तुपुरुष मानलेला आहे. घराला देवपण दिलेलं आहे. याकरिता प्रत्येकाच्या माथ्यावर हक्काचं मायेचं छत असायला हवं, अशी माझी प्रांजळ भावना आहे.

(sinhayan@pudhari.co.in)

Back to top button